भिंगेवाडी(ता.आटपाडी, जि.सांगली) येथे रूग्णावर अघोरी औषधोपचार करणार्या तिघाजणांना पकडण्यात अं.नि.स.च्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.
भिंगेवाडी येथे दर शनिवार व रविवारी अनेक व्याधींवर पावडरचा वापर करून लोकांवर अघोरी उपचार करण्याचे काम भोंदू वैद्य याशीम इमाम शेख(वय 69), त्यांची दोन मुले नजीर(वय 40), करीम (वय 29) गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. गेली 20-25 वर्षे शेख कुटुंबिय हे अघोरी उपचार करत होते. दुधातून पावडर टाकून रूग्णाला औषध दिले जात असे, त्यानंतर रूग्णास उलटी होत असे आणि पोटातील विष बाहेर पाडले जात असे त्यामुळे पोटाचे आजार, कावीळ इतर काही व्याधी बर्या होत असल्याचा दावा शेख करत होते. औषध देण्याच्या या प्रकाराला ढाळ येणे असे म्हणत. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांतून उपचार घेण्यासाठी लोक येत होते. या दैवी उपचारासाठी एका रूग्णाकडून 200 रूपये घेतले जात होते. आठवड्यातील दोन दिवसाच्या काळात किमान 300 ते 400 रूग्ण उपचार घेत होते. सदर बोगस, अघोरी उपचार करणार्याबद्दल अनेक तक्रारी अं.नि.स.कडे आलेल्या होत्या. अं.नि.स.राज्य कार्यकारिणी समिती सदस्य संजय बनसोडे यांनी या अघोरी व दैवी उपचार करणार्या व्यक्तीची गांभीर्याने दखल घेतली. याबाबत बनसोडेयांनी तहसिलदार रामहरी भोसले यांच्याकडे लेखी तक्रार केली. या दरम्यान तहसीलदार यांनी संबंधित व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. सुरवातीला पोलिसांनी कारवाई करण्याची टाळाटाळ केली. कार्यकर्ते आणि प्रशासनाच्या दबावामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली. याशीम, करीम, नजीर यांच्यावर बोगस डॉक्टरची कारवाई झाली. भिंगेवाडी येथे जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ.सी.एस.भिंगे, पोलीस, अं.नि.स.कार्यकर्ते यांनी धाड टाकली. संबंधितावर कठोर कारवाई केली. भोंदू वैद्य याशीम व नजीर यांनी गावचे सरपंच म्हणून काही वर्षे काम केलेले होते. त्यामुळे त्यांना अटक केल्यावर पोलीस ठाण्यात अनेक राजकीय नेत्यांचे फोन येत होते. अं.नि.स.कार्यकर्ते दिलीप क्षीरसागर, अतुल सवाखंडे, संजय बनसोडे(इस्लामपूर) यांनी ठोस भूमिका घेतल्याने अघोरी उपचार करणार्या भोंदूस अटक होऊन कारवाई झाली. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांचे या प्रकरणी सहकार्य मोलाचे ठरले.
–दिलीप क्षीरसागर, इस्लामपूर