महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दिला जाणारा ‘सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ चालू वर्षी जेष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्याताई बाळ यांना ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भारतीय मुस्लिम महिलांच्या अभ्यासक डॉ.रजिया पटेल आणि समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेली पंधरा वर्षे दिला जाणारा प्रबोधन पुरस्कार आजपर्यंत महाराष्ट्रासह देशातील पंजाब, कर्नाटक, आंध्रप्रदेश व मध्यप्रदेश राज्यातील विवेकवादी विचारांच्या कार्यकर्त्यांना दिला गेला आहे. आगरकरांच्मा 116 व्या स्मृतीदिनी 17 जून रोजी पुण्यातील साधना साप्ताहिकाच्या सानेगुरुजी सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक अनंत साठे यांनी दिलेल्या देणगीतून दर वर्षी आगरकर पुरस्कार देण्यात येतो. सन्मान पत्र व रुपये 11,000- असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
‘स्त्री’ मासिकाच्या संपादनापासून सुरु केलेली प्रबोेधन पत्रकारीता विद्याताई बाळ यांनी ‘मिळून सार्या जणी’ मासिकाच्या संपादनापर्यंत सक्रियपणे चालविलेली आहे. ‘नारी समता मंच’ या स्त्री-पुरुषांनी एकत्रितपणे चालविलेल्या संघटनेमार्फत स्त्रियांवरील अत्याचारांच्या विरोधात त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे विचार काया-वाचा-मने प्रत्यक्ष जगण्याचा प्रयत्न विद्याताई यांनी आपल्या आयुष्यात केल्याचे दिसते. स्त्री-पुरुष मैत्री, अर्थपूर्ण सहजीवन, समतेच्या सौंदर्याचे रंग समाजजीवनाच्या विविधांगात उमलविण्याचा आग्रह त्या धरतात. अत्यंत उत्साहाने, आनंदाने व अविचल निष्ठेने हा ध्यास आयुष्यात कृतिशील करण्यात आपली इतिकर्तव्यता मानणार्या विद्या ताईंचा गौरव महाराष्ट्र अंनिसतर्फे केला गेला.
सत्कारमूर्ती विद्याताई बाळ यांनी सत्काराला उत्तर देताना आगरकरांच्या नावाने मिळणार्या पुरस्काराचे आपल्याला अप्रुप असल्याचे सांगितले. महाराष्ट्र अंनिसने चालविलेल्मा कार्याचा गौरव करुन त्यांनी आगरकरांच्या विचारप्रकाशात आपण केलेल्या 40 वर्षातील सामाजिक मार्गक्रमणाचा साक्षेपी लेखाजोखा मांडला. आपल्याला समजलेला विवेकवाद अजूनही मोठ्या समाज घटकापर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे लागणार आहे, असा संकल्प याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.
आगरकरांनी आपल्या आयुष्याच्या उण्यापुर्या 39 वर्षात केलेल्या लिखाणातून कुटुंबापासून विश्वमानवतेपर्यंत जाण्यासाठी आवश्यक चिकित्सक, विवेकी बुद्धी आणि समताधिष्ठीत जीवनपद्धती आवश्यकतेचा आग्रह धरला आहे. त्मामुळे स्त्रीवादी विचारवंतांनी व चळवळींनी आगरकरांच्या समग्र मांडणीचा अवलंब करावा असे प्रतिपादन याप्रसंगी बोलताना डॉ.रजिया पटेल यांनी केले. त्यांनी विद्या बाळांच्या व्मक्तिमत्त्वाचा व कार्यकर्तृत्त्वाचा आढावा घेतला. याप्रसंगी ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांनी अध्यक्षीय समारोप करताना ‘अंधश्रद्धा निर्मूलन खर्या अर्थाने करण्यासाठी परमेश्वराला रिटायर्ड करायलाच पाहिजे’असे आग्रही मत मांडले.
पुरस्कार वितरण समारंभाचे प्रास्ताविक समितीचे राज्य कार्माध्मक्ष अविनाश पाटील यांनी केले, सन्मानपत्राचे वाचन राज्य कार्यवाह मिलिंद देशमुख यांनी केले, सूत्रसंचलन प्राचार्य डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी केले तर आभार अॅड.मनिषा महाजन यांनी मानले. अतिथींचे स्वागत माधव गांधी, माणिक पवार, क्रांती पोतदार व दिनकर साळुंखे यांनी केले.