Categories
इतर

  चिखलीचा सैलानीबाबाचा दर्गा

मनोरुग्णांना साखळदंडाने बांधून करतात अघोरी उपचार
वार्षिकांक – २०१२

                        बुलढाणा जिल्ह्यातील चिखली जवळच्या सैलानी बाबाच्या दर्गा-दरबाराची ख्याती, सर्वदूर पसरलेली आहे. विदर्भ-वर्‍हाड भागातील या दर्ग्याची परंपरा, जवळपास तब्बल 105 वर्षांची सांगितली जाते. चिखलीपासून धाड मार्गावर 25-30कि.मी. अंतरावर पिंपळगाव-सराई परिसरात, सैलानी बाबांचा दर्गा आहे. सैलानी बाबा म्हणजे हजरत हाजी अब्दुल रहेमान, यांना सूफीसंत सैलानी बाबा म्हणूनही ओळखले जाते. यांचा जन्म दिल्ली येथे झालेला. असफजाई घराण्यातील प्रसिद्ध व्यापारी कालेखॉगिया हे त्यांचे वडील. तर आईचे नाव जोहराबी होते. अब्दुल यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड जडली. पुढे ते उस्ताद नुरेमियाँ या प्रसिद्ध कुस्ती तज्ञाकडे, कुस्तीचे विशेष शिक्षण घेण्यासाठी, दक्षिणेतील अकोला-बाळापूर येथे दाखल झाले. पुढे ते हैद्राबादकडे निघाले. वाटेत फकीरबाबाने त्यांना, चमत्कार आणि परमेश्वर व लोकांच्या हिताचा उपदेश केला. पुढे नांदेडच्या दरवेशी बाबांनी, अब्दुल रहेमान यांना पूर्व खानदेशातील चोपड्याच्या सरकार बाबांकडे पाठविले. अन् या दोघांत गुरू शिष्यांचे नाते धारण झाले. हे सरकार बाबा म्हणजे हजरत मुहम्मद खैरूद्दिन मुजर्रद. हे स्वत: सुफी संप्रदायातील नक्षबंदी सिलसिल्याचे, एक अध्यात्मिक अधिकारी होते. त्यांनी, तेथील टेकडीच्या एका गुहेत, या अब्दुल रहेमानवर 18 दिवस, विशेष संस्कार केले. त्यानंतर त्यांस ‘सैलानी’ हा किताब देऊन, विदर्भात लोकसेवा व कल्याणकार्याचा हुकूम केला. त्यामुळे, ते चिखलीत आले. पुढे ती त्यांच्या सल्तनतची राजधानी ठरली. तेथे अब्दुल रहेमान यांचे रात्री उशिरापर्यंत, नेहमी स्मशानात वास्तव्य असे, येथील लोकांच्या अडी-अडचणी, प्रश्न व आजारपण यावर त्यांच्याकडून मार्गदर्शन होत असे त्यामुळे त्यांना ‘सैलानी बाबा’ म्हणून लोक ओळखू लागले. पुढे सतत भ्रमंतीत ते पिंपळगाव-सराई जवळील रानात जांभळाच्या झाडाखाली दिवस रात्र बसत आणि तेथे आलेल्या लोकांशी संवाद करत असत. आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या सैलानी बाबांनी 1906 ला येथे अखेरची समाधी घेतली. या सैलानी बाबांचा ‘संदल मुबारक’ येथे, रंगपंचमीला साजरा केला जातो. सैलानीपासून 3 कि.मी.अंतरावरच्या पिंपळगाव-सराई या खेड्यातून, उंटीनीच्या पाठीवर हा संदल रात्री उशिरा सदर दर्ग्यावर येतो. या प्रसंगी महाराष्ट्रासह, सभोवतालची राज्य आणि सबंध भारतामधून सुमारे 8-10 लाख यात्रेकरू सहभागी होतात. तद्वतच, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा व सैलानी बाबा या तिघांच्या पौराणिक-चमत्कारिक अशा घटना येथील भक्तगण इतरांना सांगतात.

            सैलानी बाबांच्या दर्ग्याचा जो परिसर आहे. त्यास सराई वा सैलानीवाडी म्हणतात. अंदाजे दीड कि.मी.लांबीचा व दीड ते 2 कि.मी.रूंदीचा हा डोंगराळ भाग आहे.

            सदर डोंगराळ भाग वनीकरणाच्या ताब्यात आहे. तर मध्यभागी अंदाजे 100 ते 150 एकर सुपीक, सखल अशी सलग जमीन आहे. मेन रोड लगत नाही घरं, आणि बहुतांशी वेग-वेगळी दुकान आहेत. संपूर्ण जमीन ही सैलानीबाबा-दर्ग्याची असून त्यावर पिंपळगाव रहिवाशी असलेल्या मुजावर यांच्या पारंपारिक काही कुटुंबांकडे मालकी आहे. त्याचप्रमाणे तेथील दुकाने घरे व व्यवसाय जागाही, या पुजारी मंडळींच्याच आहेत. मध्य व मुख्य भागी या सैलानी बाबाचा प्रमुख दर्गा आहे. उत्तरेस दोन दर्गे असून, त्यापैकी एकास जामूनवाले दर्गा म्हणतात. येथेच बाबांची प्राणज्योत मालवल्याची सांगतात. परिसरात अनेक नवे जुने दर्गेआहेत.

            सैलानीवाडीच्या माळावर बाबांच्या चमत्कारांतून, पाणी लागलेले आहे असे सांगतात. विहीरीवर पाणी उपश्यासाठी रहाट वा चरखा आदी कसलीही सोय नसून, सभोवताली सिमेंटच्या कट्ट्यावर उभे राहून, सोल-दोरीद्वारे पत्री मोठे, डब्बे व प्लॅस्टिकच्या मोठ्या हंड्या-घागरीने यातील पाणी चहुबाजूने शेंदून घेतले जाते. या विहिरीच्या सभोवताली अनेक स्त्री-पुरूषांची उघड्यावरच, आंघोळीची रेलचेल असते. तसेच सर्व अंगवस्त्रेही तेथेच धुतली जातात. अश पाण्याच्या सांडपाण्याची व निचर्‍याची तेथे कसल्याही प्रकारची सोय नसल्याने, ते सर्व पाणी तेथेच मुरते. त्यामुळे दलदल व सर्वत्र घाणीचे साम्राज्य. त्यामुळे पाणी अत्यंत अस्वच्छ आणि घाण आहे. येथे प्रत्येकी अंघोळीसाठी, पाणी थंड वा गरम असो. मात्र किमान 10 रू द्यावे लागतात. सरासरी दररोज येथे एरवी किमान 300 ते 400 भक्त स्त्री-पुरूषांच्या आंघोळी होतात. याच विहीरीचे पाणी तिथे पिण्यासाठीही वापरतात. तसेच हे पाणी तीर्थ म्हणून परतणार्‍या भक्तांना आवर्जून विकत देतात!  अमावास्या, पौर्णिमा, सोमवार व शुक्रवार अशा विशेष दिवसांना भक्तांचे प्रमाण किमान हजारांवर जाते, तर वार्षिक पंधरा दिवस चालणार्‍या उरूस-उत्सवात ही संख्या दररोज कित्येक लाखांच्या घरात जाते. याशिवाय लिंबू, बाहुल्या, चादर, ऊद, बाबांचा फोटो, गाण्यांच्या कॅसेट, प्रसाद, साखळी बेड्या-कुलुपं आदी वस्तूंची, दुकानदारी किंवा बाजार येथे खूप मोठ्या प्रमाणात आहे. याच दर्ग्याजवळ महादेव मंदिर, कानिफनाथ मंदिर व हनुमान मंदिरं उभी आहेत. परिसरात अनेक झाडे आहेत. त्यावर काळ्या विचित्र बाहुल्या एकावर एक खिळ्यांनी ठोकलेल्या असतात. त्यामुळे एकूण वातावरण सर्वत्र अकारण भय वाढविते.

            या ठिकाणी विविध व्याधीग्रस्त(बहुतांशी महिला) उभ्या वस्त्रानिशी आंघोळ करून ओल्या कपड्यात येथील प्रमुख अशा वेगवेगळ्या सर्व दर्ग्यावर जातात. मात्र विशेषत्वाने अधिक वेळ एकत्रित गर्दी स्थिरावते, ती सैलानी बाबांच्या दर्ग्यावर. या दर्गा परिसरातील बाजाराच्या खपाची श्रीमंती पण सहज नजरेत भरते. या दर्ग्याच्या बाह्य लोखंडी जाळ्या अन् खांबांना, मतीमंद व मानसिक रूग्णांच्या हाता-पायात, अक्षरश: बेड्या-कुलूप घालून, साखळीने बांधून ठेवले जाते. तर असे अनेक रूग्ण अशा जखडलेल्या अवस्थेत काहीतरी स्वत:शी बडबडत, ओरडत येथील सर्व दर्ग्यावर विशिष्ट वेळी फिरविले जातात. यांचे हात समोर साखळी कुलपात बंदीस्त असतात. तर पायात विशिष्ट अंतराच्या बेड्या-साखळी, कुलपे असतात. त्यामुळे, त्यांना मुळीच व्यवस्थित चालता येत नाही. त्यातही रस्ते-पाऊलवाट या अतिशय अरूंद, अडवळणाच्या-अडचणीच्या आणि डोंगरी चढउताराच्या तथा निसरड्या, चिखल-पाण्याच्या असल्याने, यांना भयंकर त्रास होतो. त्यामुळे नको तेवढा अवाजवी ताण आणि अनिवार्य हालचालीमुळे यातील अनेक रूग्णांच्या मनगट आणि पायांना, अत्यंत गंभीर जखमा झालेल्या असतात. सदर जखमा ओल्या व सतत भळभळणार्‍या उघड्या असतात. तर काहींना केवळ सदर ठिकाणी तात्पुरते फाटक्या कपड्याच्या मळकट चिंध्या बांधल्या किंवा गुंडाळलेल्या असतात. बायका-मुलं दर्ग्याभोवती तास-तास बसून राहतात. ओरडणे, चिरकने, मनाशीच मोघम अफाट बडबडणे, दडपलेल्या वा कोंडलेल्या आपल्या अंतर्मनाचा संताप ते व्यक्त करतात. मध्येच दर्ग्याची नावे घेतात-उच्चारतात. एखादं दुसर्‍या हिंदी-उर्दू शब्द-वाक्य मिश्रीत बोलीतून, बाबांचा महिमा सांगतात. त्यास कोडं वा आवाहन करतात. अन् दर्ग्याच्या नित्यपूजा-पठणातील, हुबेहूब आवृत्ती करतात. अशा वेळी तेथील बायकां-मुलींचे डोक्यावरील केस पूर्ण सुटलेले असतात. तर त्यांना स्वत:च्या अंगावरील कपड्याचेही भान रहात नसते. मध्येच अशा प्रत्येकांच्या दिमतीला त्या-त्या कुटुंबातील किमान 1 ते 3 नातेवाईक असतात. अन् ते अशा वेळी किमान 10-15 ते 20-25 पर्यंत लिंबू त्यांच्या डोक्यावर व शरीराच्या काही भागावर कापून टाकत असतात. तसेच त्यांच्या तोंडात काही कापलेल्या लिंबाच्या फोडी, जबरदस्तीने कोंबून पिळणे आणि काही लिंबू जतन करणे अशा या प्रकारांमुळे लिंबू विक्रीचे तेथे नित्य असे प्रचंड ढिगारे असतात. त्याचप्रकारे सर्वत्र कापलेल्या अशा फोडींचा खच आणि कचरा असतो. या अशा भक्तांमध्ये काही नेमाने येणारे काही किमान 30 ते 40 दिवसांचे पूर्ण निवासी रूग्णभक्त असतात.

            सैलानी बाबांच्या दर्गा परिसरातील अशा सव्वा महिन्यांच्या मुक्कामी-दरबारी भक्तीने व अमाप वार्‍यांमधून करणी, भानामती, तोडगा, भूतबाधा सर्वकाही उतरते. तसेच मुलं-फळप्राप्ती होते. अर्धांगवायू दुरूस्त होतो. मानसिक रूग्ण, वेडे हमखास बरे होतात. मनातील प्रत्येक इच्छा व स्वप्न पूर्ण होते. समृद्धी आणि शांती मिळते. असे असंख्य दावे या भागातील व्यावसायिक लोक व येणार्‍या जाणार्‍या रूग्णांचे सोबती-नातेवाईक केवळ तोंडी बोलतात. अशा रूग्ण वा भक्तांना सैलानी बाबांच्या दरबारात आणणार्‍यांमध्ये गावोगावचे बुवा-बाबा, जीप-टमटम अशा खाजगी वाहन व्यवसायिकांचा समावेश आहे. यापैकी बाबागिरीच्या पहिल्या एजंट घटकांना विशिष्ट टक्केवारी मिळते.  या भागात अतिशय लहान-साधी, खोली महिना दीड हजार रूपये भाड्याने यांना मिळते. काही पक्की घरे वा निवारेही तेथील पुजारी-मुजावरांची आहेत. प्रत्येक दर्ग्यावर दानपेट्या असून, तेथील सर्व व्यवहार खाजगी पारंपारिक वंशाने आहे.

            सैलानी बाबाचा जो मुख्य दर्गा आहे, तेथे मात्र गेली 10-15 वर्षांपासून एक ट्रस्ट निर्माण झाला असून त्यात चिखलीकरांचा प्रभाव आहे. येथे मेन रोड लगत ट्रस्टची 3 मजली बिल्डींग असून येथे यात्रेकरूंच्या निवासाची भाडोत्री सोय आणि अन्य नवस-कंदोरी आदिंसाठी लागणार्‍या भांडे बरतनाची मंगल कार्यालयाप्रमाणे भाड्याने सोय आहे. या परिसरातील रोडवर रोज 100 टमटम रिक्षा चालतात. याशिवाय बाहेरून येणार्‍या भाडोत्री जीप-गाड्या वेगळ्या. मागील 40-50 वर्षांपासून येथील गर्दीत वाढच होत असल्याचे सांगितले जाते. येथील अपवादाने असलेल्या, एका लॉजचे रेटही खूप महागडे व मनमानीचे आहे. तर येथे अंदाजे एका कळशीभर पाण्याच्या प्लॅस्टीक बाटलीला यात्रेकरूंकडून 40 रूपये घेतले जातात.

            येथील बागजाळी दर्ग्याजवळ लहानश्या टेकड्यांच्या पोटपायथ्याला काही विविध झाडं-झुडपं आहेत. त्या झाडांच्या बुंद्याखालची बहुतांशी माती सातत्याने वाहून गेली आहे. त्यामुळे मुळ्या उघड्या पडल्या आहेत. येथील पुजारी व भक्तलोक या संबंधी किंवा याविषयी असे सांगतात की, सैलानीबाबा या ठिकाणी येऊन बसल्यानंतर त्यावेळी रात्री-बेरात्री एक वाघ त्या तशा प्रकारच्या जाळीखालून-मधून येऊन तो बाबांशी संवाद करून तो दर्शन घेत असे. वेगवेगळ्या अशा व्याधीग्रस्त रूग्णांनी, सदर पंधरा वीस फुटांचा तुटक प्रवास, अंग चोरून त्यातून वाकून केला तर तो बरे होण्यास मदत होते. अशी अफवा सांगितली जाते. लहान मुलं-मुली या करिता मुळीच धजावत नाहीत. तर त्यांना अशा आजारी अवस्थेतही जबरदस्तीने भेदरलेल्या स्थितीत त्यांचे आईवडील त्यांना चालवितातच. येथे पण एक कृत्रिम वाघाची कापडी मूर्ती बसविलेली आहे. तर शेजारी एक देवीचं स्वतंत्र ठाणं आहे. येथील बाबांचा दर्गा झाडा-झुडपात आणि अडगळीत आहे. अर्थातच येथेही पुजारी स्वतंत्र असून, दानपेटी व साहित्यांची दुकानं वगैरे आहेत. वार्‍या-वादळाने व पावसाच्या पाण्यामुळे येथे पण दलदल व घाणच पसरलेली आहे. त्यात परत मेन कापडांचा कचरा आणि स्त्री-पुरूषांच्या टाकून दिलेल्या जुन्या कपड्यांची झाडा-जाळ्यांवर व इतरत्र लक्तरे लटकलेली! या दर्ग्याजवळपण अगदी जमिनीलगत एक छोटीशी आडवजा दगडी विहीर आहे. या भागातील अशा प्रकारच्या घाणीचे सर्व पावसाळी पाणी उतार ओघळीने चक्क पालापाचोळ्यासकट त्या विहीरीत पडते आणि त्या विहिरीचे पाणी भक्त आवर्जून पितात आणि गावी बाटल्या-डब्यांमधून एखाद्या पवित्र जलाप्रमाणे घेऊन जातात. येथेपण स्त्रिया-मुली आपल्या मानसिक उद्विग्नतेची अफलातून झडती देतात. येथेही त्यांच्यावर लिंबू कापून तसाच वर्षाव केला जातो, तर जामून दर्गा हा तर पूर्ण पेरलेल्या पिकात असून, पावसाळ्यात वा पीक हंगामामध्ये यास एका व्यक्तीस चालता येईल एवढीच वाट असते. येथे पण दुकानदारी, देणगीपेटी व पुजारी सर्व काही पद्धतशीर. या दर्ग्यावरपण येणार्‍या दु:खी भक्तांमध्ये महिलांची संख्या मोठीच दिसून आली. थंड सावलीमध्ये फरशी व काळ्या जमिनीवर महिला अक्षरश: कितीतरी वेळ त्या दर्ग्याभोवती निर्विकार बसून-पडून असतात. अशातच एक 18 ते 20 वयातील शिक्षित अविवाहित मुलगी येथे आपल्या साठीतील सुशिक्षित अशा वडिलांबरोबर येते. ती बर्‍या कुटुंबातील एक मध्यम-मॉडर्न तरूणी असते आणि दर्ग्याच्या दरबारात सुमारे 15 ते 20 मिनिटे एका विशिष्ट मानसिक अवस्थेत त्याच अंतराच्या जागेत गतीने येरझार्‍या करीत दर्ग्याशेजारी पुढ्यात मागे हात करून उभे असलेल्या आपल्या पित्याला त्रयस्थपणे एकवचनी उद्देशून हिंदी व उर्दू मिश्रीत भाषेत, आवेशाने शिव्या देत होती. त्यामध्ये तिच्या मनाचा किंवा कल्पनेचा कोणीही विचार करत नव्हते. त्यात तिच्या वडीलांचा, बापगिरीचा रोल हा अधिक व्यवहारी व हेकेखोर निर्जीव-घट्ट असावा म्हणून की काय? ती खूप आक्रमकपणे त्यांच्या व्यंग आणि वृत्तीवर, डोळे बंद करून एका तंद्रीमध्ये कठोर शब्द प्रहार करत होती. या तिच्या नाट्यानंतर ती 5-7 मिनिटे जमिनीवर निपचिप कोसळली. त्यावेळी तिच्या सर्व शरीराला भयंकर कंप आणि घाम होता. काही क्षणानंतर ती अत्यंत विसराळू व अपराधी आवाजाने स्वत:ला सावरून, आदबीने वडिलांसोबत दर्ग्याचे दर्शन करण्याची आठवण स्वत: देते. तर काही महिला सैलानी हा त्याची पिंगळी, भाषा बंद कर! असे ओरडत. साखळी कुलपातील अवस्थेत या दर्ग्याहून त्या दर्ग्यास फिरतात. यावेळी त्यांच्या सोबतीच्या नातेवाईकांची अवस्थातरी खूपच दयनीय झालेली असते.

            येथील माळावरील असंख्य कापडी-पॉलिथीन झोपड्यातील व वस्तींवरील भाड्याच्या खोल्यांमधील विविध आजारांचे व बहुतांशी मनोविकारांचे रूग्ण हे खूपच वाईट अवस्थेत जगतात. अनेक दिवस-आठवडे गेले तरी, त्यांच्यात काहीही फरक झालेला नसतो. तर एका बाजूला त्यांना अशा खाईत लोटलेल्या त्यांच्या एजंटाकडून तेथे राहण्याचा वेगळा दबाव असतो. तर स्थानिक सांघिक-व्यापारनिती ही अशा कोंडीत गांजलेल्यांना, भाविनिक व शाब्दीक आधार देऊन, त्यांच्या अशा जुलमी मुक्कामात वाढ करतात. या परिसरात वेड्यांची संख्या बरीच एकवटलेली आहे. कारण काही नातेवाईक यांना घेऊन राहतात. तर काहीजण त्यांना येथे सोडून जातात. त्यामुळे अशा मनोरूग्ण-निराधारांचे आयुष्य नरकदायी बनलेले आहे. तर कुठला व कोणता एखादा असा रूग्ण येथून केव्हा पूर्णपणे बरा होऊन, कोठे परत गेला आहे काय? या संबंधी येथे कोणीही बोलत नाही. येथील मतिमंत वा मनोरूग्णांवर अमानवी व बेकायदेशीर अन्याय होत आहेत. कुठल्याच दवाखान्यात न बरे झालेले व लाखोंने पैसे खर्च केलेले रूग्ण केवळ या दर्गादरबारी येऊन ते ठणठणीत झाल्याचे सांगतात. परंतु याचा कसलाही दाखला ते देत नाहीत. येथे येणारे रूग्ण हे प्रचलित डॉक्टरांच्या तपासण्या आणि उपचार खर्चाला वैतागून आणि काहींना ते शक्य नसल्यामुळे ते दैव व देवाच्या हवाल्याने येथे येतात. मात्र लूट आणि ओढाताणीशिवाय त्यांच्या हाती येथे दुसरे काहीही पडत नाही. जालना येथील वनमाला थोरात नावाच्या अशाच येथील सामान्य व कष्टकरी निवासी रूग्णाच्या नातेवाईकांचा तेथील रस्त्यावर एका दुकानामध्ये झालेला सहज संवाद हा अत्यंत बोलका आहे. तिने स्वत:च्या एका विवाहित मुलीस घेऊन तिच्या संधीवाताच्या आजारासाठी एका मध्यस्थ महिलेमार्फत ती तेथे सव्वा महिन्यासाठी, निवासी दरबारात आली. तिला तब्बल 20 दिवस होऊन गेले होते. तीळमात्र फरक पडला नव्हता. जिने सोडले ती, परत आलीच नाही. खोली भाडे आणि रोजचा खर्च अत्यंत महागडा. हिचे गावी काम बुडालेले, तर घरच्यांसाठी कोणीच नाही. जावई रानात काम करून यांना खर्च पाठवतोय. तोंड दाबून बुक्क्यांच्या मारातील भयंकर मूक अस्वस्थता ती अगतिकतेने व्यक्त करत होती. या परिसरात वेगवेगळ्या अन्य गैर बेकायदेशीर प्रकारांची मुबलक उपलब्धता आहे. सायंकाळी पथदिवे लागल्यानंतर, येथील काही व्यावसायिकांना विशिष्ट वेळी ते नेहमीप्रमाणे चढते. आणि जेव्हा त्यांचे मुख्य संवाद सुरू होतात तेव्हा त्यातून येथील वाईट धंदे व व्यवसायांच्या उजळण्याही होतात. त्यामध्ये पुजारी प्रभावाची सल असते. तसेच आता येणार्‍या भक्त रूग्णांमध्ये अनेक रंग ढंग आढळून येतात. येथे येणारे लोक हे अतिशय अज्ञानी व सर्वसाधारण आर्थिक कष्टकरी वर्गातील, उपेक्षित व शोषित बहुजन घटकांपैकीच असतात. हे कमालीचे भोळसट व विश्वासू अशा सरळ वृत्तीचे असतात. त्यांची मानसिकता व संस्कार हे कमालीचे दैववादी व कर्मकांडाधीन असतात. गोठलेल्या समाजमनाचा व्यापार चालविला जातो, येथे 30 ते 40 वयोगटातील महिलांची 35 टक्के आणि 20 ते 22 वयोगटातील अविवाहित तरूण-तरूणींचा 18 टक्के संचार आहे. अपवादाने काही सुशिक्षित व चांगल्या स्थितीतील तरूण आणि मध्यम वयाच्या सहभागाचे 7 टक्के प्रमाण आहे. 60 ते 70च्या घरातील वृद्ध महिलांच्या सहभागाचे 12 टक्के प्रमाण आहे. तर या महिला घटक शोषित मागास समाज स्तरातीलच आहेत! येथे येणार्‍यांत लग्न न जमलेले वा लांबलेले, पतीसोबत वा कुटुंबासोबत न जमत असलेले, प्रेमभंग झालेले किंवा मनाप्रमाणे न घडलेले, व्यसनी परिवारांतील छळांना त्रासलेले आणि विश्वासघात झालेले, मनाचा कोंडमारा झालेल्या व नाकारलेल्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय 3 ते 4 टक्के प्रमाण हे अशाच समाज घटकांतील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील सेवा निवृत्तीधारकांचे आहे. येथे स्त्री-पुरूषांसाठी एकही सार्वजनिक संडाव वा बाथरूम नाही. तसेच प्रसंगी थांबण्यासाठी कुठलाही सुरक्षित असा एकत्रित… एखादाही आसरा नाही. तसेच तेथे स्वतंत्र पोलीस ठाणे वा चौकी नाही. बसस्थानकपण व्यवस्थित नाही. सरकारी दवाखानापण नाही. इतकेच काय तर औषधा विक्रीचे येथे दुकानही नाही. सार्वजनिक स्वच्छ पिण्याचे पाणी नाही. कॉलेज 25 कि.मी.वर चिखलीत. तर 12 वी पर्यंतचे शिक्षण व दवाखाना हा रायपूरला. अशी येथील सार्वजनिक सुविधा व जीवनाची गाथा आहे. सैलानी बाबांच्या दरबारानिमित्ताने, विषमताधिष्ठीत व पारंपारिक समाजातील दु:ख-वेदना, अज्ञान आणि दारिद्र्याचे येथे चक्क लिलाव होतात. येथे संवेदनांचा मागमूस नाही. मग शासन आणि प्रशासनासंबंधी अखेर बोलण्यासारखे राहिले आहे तरी काय?

– रामकुमार रायवाडीकर