Categories
मुलाखत

धर्म आणि राजकारणाची सरमिसळ लोकशाहीला घातक – उत्तम नरूला (नेपाळ)

सप्टेंबर- २०१९

सध्या देशात चिकित्सक विचार करणे, वरिष्ठांना प्रश्न विचारणे किंवा बहुसंख्याकांच्या मताविरोधात मत व्यक्त करणे, अशा गोष्टी फारशा लोकप्रिय राहिलेल्या नाहीत; पण व्यक्तिस्वातंत्र्य, तिचे किंवा त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूल्यांची मुळे प्राचीन भारतीय संस्कृतीत चांगलीच रुजली होती, असे प्रतिपादन ‘इंटरनॅशनल हुमॅनिस्ट आणि इथिकल युनियन’ ज्या संस्थेला ‘हुमॅनिस्ट इंटरनॅशनल’ असेही ओळखले जाते, त्या संस्थेच्या जागतिक संचालक मंडळाचे सभासद उत्तम निरुला यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या प्रसंगी ‘अंनिवा’ला मुलाखत देताना केले. मानवतेची व्याख्या करताना ते म्हणाले, “लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानता यांचे एकत्रीकरण म्हणजेच ‘मानवता.”

मानवतावादी कोणाला म्हणता येईल?

मानवतावादी तो; जो सत्तेला प्रश्न विचारतो, मुक्तपणे, कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय विचार करतो आणि मानवी हक्क, कर्तव्यांचा आदर करतो. कारण मानवी हक्क वैश्विक आहेत आणि ते जात, धर्म, ताकद आणि राजकारण यांच्या नावाखाली पायदळी तुडवता कामा नयेत.

तुमची संस्था या संदर्भात काय करते?

जिथे-जिथे मानवी अधिकारांचा प्रश्न निर्माण होईल, त्यांच्या पायमल्लीचा प्रश्न निर्माण होईल तेथे-तेथे ते तुडवले जाऊ नयेत म्हणून आमची संस्था ‘ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल’ जगभर कार्यरत आहे. जरी संस्था मूळची लंडनमधील असली, तरी तिचा विस्तार जगातील 70 ते 80 देशांत आहे. आज अनेक देशात लोक आपले विचार मुख्य धारेपेक्षा अलग असल्याने अभिव्यक्त करू शकत नाहीत. पाकिस्तान, सौदी अरेबियासारख्या देशात हा अनुभव वारंवार येतो, आजकाल भारतासारख्या देशातही अशी काही उदाहरणे घडताना दिसत आहेत. विविधता असलेल्या देशात प्रत्येकाला प्रतिष्ठितपणे आपले विचार व्यक्त करता आले पाहिजेत.

मानवतावाद्याने नास्तिक असलेच पाहिजे का?

अनेक मानवतावादी नास्तिक आहेत; पण आम्ही नास्तिकतेचा पुरस्कार करत नाही. ती प्रत्येकाची व्यक्तिगत गोष्ट आहे. आम्ही लोकांना चिकित्सकपणे, मुक्तपणे विचार करायला शिकवतो. सत्तेला प्रश्न विचारण्याचा आग्रह धरतो.

भारतात अनेकांचा असा आक्षेप असतो की मानवतावाद ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. तुमचे काय म्हणणे आहे?

मला हा आक्षेप अजिबात मान्य नाही. विवेकवाद, संशयवाद, मानवतावाद आणि अगदी नास्तिकता या कल्पना भारतीय वारशातूनच आलेल्या आहेत. तोच वारसा आम्ही पुढे चालवीत आहोत. तुला जोपर्यंत उत्तर मिळत नाही, तोपर्यंत प्रश्न विचारत राहा असे बुद्धानेच सांगितले आहे. चार्वाकाबद्दल काय? जैनवाद देवापेक्षा माणसालाच केंद्रस्थानी ठेवतो. ही त्या वेळेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतची परंपरा दैदिप्यमान आहे. हीच परंपरा तर लोकशाही, स्वातंत्र्य आणि समतेची आहे. आज मात्र ही परंपरा आपल्यापेक्षा पाश्चिमात्य देश जास्त हिरिरीने पाळताना दिसत आहे.

मानवतावादी म्हणून आपण धर्म नष्ट केला पाहिजे का?

नाही. अनेक नास्तिक आणि विवेकवादी आहेत, जे म्हणतात, आपण काही काळ देव विसरूया आणि मानवाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करूया, काही संशयवादी जे देवाबद्दल प्रश्न उपस्थित करतात. इथे प्रश्न धर्म संपविण्याचा नाही, तर धर्माला माणसाच्याही वर अवास्तव महत्त्व देण्याचा आहे. अनेक देशांत देवाचा कायदा माणसांच्या कायद्याच्या वरचढ आहे. तेथे साहजिकच मानवी प्रगतीला खीळ बसते. असे हे ईशनिंदेचे कायदे आपल्या वसाहती प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटीश वसाहतवादाने दिलेली देणगी आहे.

तुम्हाला सरकारी आव्हानांना तोंड द्यावे लागते का?

राजकारण्यांना मते हवी असतात. त्यांच्यासाठी जनता राजकीय, आर्थिक मुद्द्यापासून चार हात लांब असलेलीच बरी असते. हे जगभरच चालते. अमेरिकेत अध्यक्ष गोर्‍या लोकांची मते मिळविण्यासाठी स्थलांतरितांना लक्ष्य बनवीत आहेत. भारतात बहुसंख्य हिंदूंची मते मिळविण्यासाठी राजकारण खेळले जात आहे. एकजण जरी सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारत असेल, तरी त्याचा आदर केलाच पाहिजे, प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा जपलीच पाहिजे, असे माझे ठाम मत आहे; पण राजकारणाचा परिणाम होतोच. सरकारे जी धोरणे राबवतात, त्यांचा परिणाम माणसांवर होतोच. त्यामुळे सरकारांच्या बरोबरपण आणि विरोधातही काम करावे लागतेच.

धर्माची आणि राजकारणाची हातमिळवणी कितपत गंभीर आहे?

अशी हातमिळवणी अतिगंभीर आहेच. भारताचेच उदाहरण घ्या, गौ-राजकारण! द्वेषातून उद्भवलेल्या गुन्हेगारीला अल्पसंख्याक विरोधाची दिशा देण्यात येत आहे. हा अतिशय असंस्कृतपणा आहे. भारतीय घटना जगातील सर्वोत्तम घटना आहे. त्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनाची कल्पना, धर्मनिरपेक्षता, देशाच्या विविधतेची जपणूक या संदर्भातील हवाले जगातील अनेक लोकशाह्या देत असतात आणि आज जे देशात घडत आहे, ते बरोबर घटना जे सांगत आहे त्याच्या विरुध्द! राजकारण आणि धर्म यांच्या हातमिळवणीतून धर्माचा भाग म्हणून मानवी अधिकारांच्या उल्लंघनास मान्यता दिली जाणारच. पाकिस्तान हे दुसरे उदाहरण. ‘शरियत’ कायद्याच्या नावाखाली व्यक्तीला ठेचून मारण्याची शिक्षा. अशा घटना धर्म आणि राजकारण एकमेकात मिसळल्याने होणारच.

तुम्ही मूळचे नेपाळचे, पूर्वीचा हिंदू देश; मग तुम्ही कसे काय या बाजूला वळलात?

माझे वडील भटजी होते. मी लहान असताना अनेक कर्मकांडे करायचो. कॉलेजमध्ये गेल्यावर मी इतर धर्मातील तरुणांना भेटू लागलो. मग माझे मलाच प्रश्न पडू लागले. त्यातच मला पाकिस्तानात जाण्याची संधी मिळाली. तेथे मला जाणवले की, या लोकांना माझ्या देव-देवतांची नावेसुद्धा माहिती नाहीत. मला धक्काच बसला. माझ्या देशाच्या इतक्या जवळ असणारा देश माझ्या श्रद्धांपासून इतका दूर? मग माझी जिज्ञासा जागी झाली, वाचन वाढले मी संकुचिततेतून बाहेर आलो.

तुमचे आणि संयुक्त राष्ट्र संघाचे सहकार्य कसे असते?

आम्ही संयुक्त राष्ट्र संघात वंचितांचा; विशेषत: जे विशिष्ट धर्माचे अनुयायी नसतानाही ज्यांच्यावर खटले दाखल केले जातात त्यांचा आवाज आम्ही ‘युनो’त उठवतो. असे अनेक लोक तुरुंगात आहेत, ज्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे. त्यांच्या बाजूने आम्ही लढतो. दाभोलकर, कलबुर्गीसारख्यांच्या खुनाच्या चौकशीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा करतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या स्थानिक पातळीवर, जमिनीवर प्रत्यक्ष लढणार्‍या संघटनांना जागतिक पातळीवर संपूर्ण सहकार्य व पाठिंबा देण्याचे काम आम्ही करतो.