Categories
अंधश्रद्धा पर्दाफाश

दिव्यदृष्टी प्राप्त करून देणार्‍या ‘माईंड पॉवर ट्रेनर’चे पलायन

सप्टेंबर - २०१२

            ‘झी जागरण’ या दूरचित्रवाणीवर दररोज सकाळी 7.20 मिनिटांनी व 11.20 मिनिटांनी अहमदाबादच्या स्नेह देसाईंचा कार्यक्रम असतो. तीस वर्षीय देसाईने परदेशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अभ्यास केला आहे. तो माईंड पॉवर ट्रेनर आहे. रेकी, ज्योतिष, फेंगशुई, वास्तू, टॅरो कार्ड या सर्वांचा त्याचा अभ्यास आहे. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे माणसाचा तिसरा डोळा जागृत करून दिव्यदृष्टीची जाणीव करून देणे व वेदनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. आपणास विशिष्ट अभ्यासाद्वारे दिव्य दृष्टी प्राप्त होऊ शकते व त्यामुळे आपण जगामध्ये कुठेही असलेल्या व्यक्तींना सहजपणे पाहू शकतो. तसेच त्या व्यक्ती काय करीत आहेत ते सुद्धा समजते. आपल्याशी बोलणार्‍या व्यक्तीच्या मनात काय विचार आहे ते आपण ओळखू शकतो. असा त्याचा दावा आहे. वयाच्या नवव्या वर्षांपासून  तो ह्या विद्या लोकांना शिकविण्याचे समाजकार्य करत आहे. आतापर्यंत आठ लाख लोकांना त्याने ह्या विद्येचा लाभ दिला आहे. देशभरातील मोठ-मोठ्या शहरात त्याच्या कार्यशाळा होत असतात. इतरांपेक्षा वेगळा असा ‘मनी अट्रॅक्शन’ची वेगळी चमत्कारीक विद्या त्यास येते. तो आपणास एक कोरा बोगस चेक देतो. आपण त्यावर आपल्या मर्जीप्रमाणे रक्कम लिहायची. काही दिवसांनी आपणाजवळ ठेवलेल्या ह्या चेकमुळे तेवढे पैसे आपणास प्राप्त होतात. मोठा बंगला व पन्नास लाखांची अलिशान बी.एम.डब्ल्यू.कारचे चित्र तो आपणास देतो. नेहमी त्याकडे बघितल्यास ते सर्व आपणास प्राप्त होते. मात्र हे सर्व शिकण्यासाठी आपणास सात हजार रूपये खर्च करून त्याच्या कार्यशाळेत भाग घ्यावा लागतो. देसाईने आपणाकडून पैसे कमविण्यापेक्षा तो स्वत:च कोर्‍या चेकने पैसे का कमवत नाही हा प्रश्न कुणालाच वाटत नाही.

            ‘स्वास्थ्य, संपत्ती, सबंध समस्यांवर दिव्यदृष्टी जागृत करणारा वैज्ञानिक कार्यक्रम पूर्णपणे मोफत अशी जाहिरात इंग्रजी वृत्तपत्राद्वारे, इंटरनेटद्वारे तो करतो. त्यामुळे उच्चभ्रू लोकांपर्यंत पोहोचण्यास तो यशस्वी होतो. सोबत मुलांची स्मरणशक्ती वाढविण्याचा उल्लेख असल्यामुळे पालक आपल्या पाल्यांबरोबर गर्दी करतात. असाच ‘वैज्ञानिक कार्यक्रम’ लागोपाठ तीन दिवस 6 व 7 जुलै 2012 ला नाशिकच्या कालिदास कलामंदिर या वातानुकूलित सभागृहात झाला. सर्वच कार्यक्रम मोफत असल्यामुळे गर्दी झाली होती. परंतु लोकांना एका ठराविक मर्यादेपर्यंतच मोफत माहिती दिली जाते. एकदा लालूच दाखविली की, सात हजार रूपये घेऊन पुढच्या कार्यशाळेची नोंदणी केली जाते. लोक त्याला फसतात कारण पैसा कसा मिळवावा, गाडी बंगला, ‘लॉ ऑफ अ‍ॅट्रक्शन’ प्रमाणे आपणाकडे कसे येईल त्याचं प्रात्यक्षिक दिव्यदृष्टी देणार्‍या पुढच्या कार्यशाळेत असते. त्यासाठी तो त्याच्या साथीदारांच्या सहाय्याने थातूर-मातूर चमत्काराला पेन थेरपीचं नाव देऊन आश्चर्यचकित करतो. ह्या चमत्कारात जळत्या निखार्‍यावरून चालणे, काचांवरून चालणे, मोठ्या चमच्याला पीळ घालणे, हाताने फरशीचे तुकडे करणे, हाताच्या त्वचेतून सुई आरपार घालणे इत्यादींचा समावेश आहे. ह्या सर्वांनी आपणास इजा न होणं म्हणजे ‘पेन थेरपी’. मात्र नाशिकच्या कार्यक्रमात एका शिबिरार्थीचा हात सुईमुळे खूप दुखल्याचे त्याने मला सांगितले. देसाईने पाचशे ते सहाशे लोकांची नोंदणी झाल्यावर शहरातीलच स्पेंडर हॉल ह्या छानशा हॉटेलमध्ये 8 व 9 जुलैला कार्यशाळा(मोफत नव्हे) घेतली. दै.सकाळमधून मला फोन आल्यानंतर प्रा.डॉ.लक्ष्मीकांत कावळे व मी सदर ठिकाणी हजर झालो. स्नेह देसाईचे 20 ते 25 सहकारी आमच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकले नाहीत. महेंद्र दातरंगे, डॉ.टी.आर.गोराणे, प्रा.डॉ.सुदेश घोडेराव इ. कार्यकर्ते हजर झाले. आम्ही इंदिरानगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीकरांना त्यांच्या सहकार्‍यांसोबत बोलविले. पत्रकारसुद्धा तोपर्यंत हजर झाले होते. सुरवातीला आमच्यावर दबाव आणू पहाणारे देसाईचे सहकारी मात्र नंतर वरमले. आम्ही देसाईला दिव्यदृष्टी सिद्ध करण्याचे आव्हान दिले. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही शिबिरार्थींना अक्षरश: ओरडून पुढे येण्याचे आवाहन केले. व फसवणूक झालेल्यांचे पैसे मिळवून देऊ असे सांगितले.

            काही महिला मोठ्या हिमतीने पुढे आल्या. अनेकांनी दिव्यदृष्टी म्हणजे फसवणूक असल्याचे मत व्यक्त केले. शिबिरामधील एका मुलीने डोळे बंद करून आपली आई त्याच हॉलमध्ये उपस्थित असल्याचे दिव्यदृष्टी प्राप्त झाल्याने सर्वांसमोर सांगितले. परंतु त्यावेळी तिची आई मात्र घरी होती. ह्या मुलीने आमच्या आवाहनानंतर पुढे येऊन पत्रकारांसमोर देसाईची फसवेगिरी सांगितली. तोंडी तक्रार करणार्‍यांचे पैसे परत करण्याची आम्ही मागणी करताच क्षणार्धात देसाईच्या सहकार्‍यांनी ते परत केले. कारण अंनिस अशा प्रकारचा कार्यक्रम महाराष्ट्रात होऊ देणार नाही असं आम्ही त्यास जाहीरपणे सांगितल्यामुळे ते सर्व घाबरून गेले. देसाई मात्र कार्यक्रम संपताच(30-40 लाख रूपये घेऊन) घाबरून गाडीत बसला व पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. आम्ही मात्र त्याच्याशी चर्चा करण्याची आमची भूमिका पोलिसांना सांगून त्याची गाडी अडवून जाऊ न देण्याचे ठरविले.  प्रकार गंभीर होत असल्यामुळे पोलिसांनी आम्हास रोखले. व कायदेशीर मार्गाने त्याच्याविरूद्ध तक्रार करण्याची विनंती केली. ह्या गडबडीत देसाईची अलिशान गाडी मात्र दोन दुचाकींना उडवत प्रचंड वेगाने निघून गेली. आम्ही उपस्थित शिबिरार्थींना देसाईने दावा केलेल्या बाबी अवैज्ञानिक कशा आहेत त्या समजावून सांगितल्या. त्यानंतर आम्ही संबंधित इंदिरानगर पोलीस स्टेशनला देसाईविरूद्ध तक्रार दाखल केली.

            दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रांमधील ‘माईंड पॉवर ट्रेनरचे पलायन’ ही बातमी वाचून अनेकांनी फोन करून असे सांगितले की, देसाई कार्यशाळेदरम्यान पुस्तके, सी.डी., बुद्धी वाढविण्यासाठी ताईत, गंडेदोरे, ब्रेसलेट वेगळ्या पैशाने विकत असे. देसाईच्या अशा कार्यशाळेचा नागपूरला मागील महिन्यात विरोध झाला होता. महाराष्ट्र अंनिस पुन्हा एकदा देसाईला आमली दिव्यदृष्टी सिद्ध करण्याचे आव्हान देत आहे. आव्हानातून असाच पळपुटेपणा दाखविला तरी कार्यकर्ते महाराष्ट्रात कुठेच त्याची कार्यशाळा होऊ देणार नाहीत.

            अवैज्ञानिक गोष्टींचा प्रसार ‘वैज्ञानिक शिबीर’ या नावाखाली कसा बेमालूमपणे केला जातो त्याचंच हे आणखी एक उदाहरण आहे.

कृष्णा चांदगुडे