डॉ.मच्छिंद्र वाघ यांना समाजभूषण पुरस्कार
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अभियानाद्वारे जनजागृती करीत असलेले नेवासा येथील समाजप्रबोधनकार व अंनिसचे राज्यप्रतिनिधी डॉ.मच्छिंद्र वाघ यांना कोपरगाव येथील बहुजन विकास व एकता समितीच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार नुकताच कोपरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. विचारवंत व कवी लहुजी कानडे यांच्या हस्ते प्रदान झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये समता परिषदेचे अध्यक्ष पद्माकांत कुदळे, समितीची प्रमुख के.पी.रोकडे, शिल्पकार प्रमोद कांबळे, पंडितराव भारूड आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.मच्छिंद्र वाघ यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे समितीचे कॉ.बाबा आरगडे, अॅड.बन्सी सातपुते, रेखा काळे, पत्रकार संघाचे सुधीर चव्हाण, राहुरीचे प्रबोधनकार भाऊसाहेब बेंबले यांनी अभिनंदन केले.
तुकाराम शिंदे यांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर
दिघोडे, ता.उरण, जि.रायगड येथील ‘महात्मा गांधी विद्यालय व स्व.आर.एन.ठाकूर कला उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहा.शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते तुकाराम एकनाथ शिंदे यांना सन 2011-2012 सालचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे.
समाजाची नि:स्वार्थ भावाने व निष्ठेने सेवा करणार्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे दरवर्षी हा पुरस्कार जाहीर होतो. 5 सप्टेंबर 2012 रोजी शिक्षक दिनी एका खास कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार असून या उज्वल यशाबद्दल शिंदे सरांचे दिघोडे विभागीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ पाटील यांनी विशेष कौतुक केले असून संसथेचे सेक्रेटरी ज्ञानप्रकाश पाटील, शालेय शिबीर समितीचे चेअरमन विनायक घरत, उपाध्यक्ष नारायण पाटील, संस्थेचे सदस्य नरेश पाटील, प्रभाकर मुंबईकर, अविनाश पाटील, पांडुरंग कोळी यांनी सरांचे कौतुक केले.
शिंदे सर गेली 23 वर्षे विद्यालयात सहा.शिक्षक म्हणून कार्यरत असून रायगड जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते क्रियाशील कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेत. वृक्षारोपण, फटाकेविरोधी अभियान, वैज्ञानिक जाणीवा प्रशिक्षण शिबीर, शैक्षणिक साहित्याची स्वत: केलेली निर्मिती याद्वारे विद्यार्थी डोळस बनविण्यात त्यांचे मोलाचे कार्य आहे.