Categories
अभिवादन

डॉ. नरेंद्र दाभोलकर गेलेतच कुठे?

आठवणीतले दाभोलकर
ऑक्टोबर - २०१४

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन 20 ऑगस्ट 2014 ला एक वर्ष उलटले. डॉ.दाभोलकरांना काय हवे होते? हा लोकशाही म्हणवणारा समाज मनाने कणखर असावा, निर्भय असावा, माणसाच्या जगण्यातले सगळे बरेवाईट चढ-उतार त्याने खंबीरपणे स्वीकारावेत, विवेकाने त्यांना सामोरे जावे. त्याने त्यासाठी तर्कहीन, अविवेकी पांगुळगाडे कोणत्याही स्वरूपात स्वीकारू नयेत. विज्ञानाच्या ज्ञात मार्गांनी त्यावर मात करावी. समाजात व्यापक प्रमाणात स्नेह, सौहार्द असावे, माणसाला माणसाबद्दल सादर विश्वास वाटावा. विरोधी विचार मतमतांतरे समाजत असणारच. विवेकपूर्ण चर्चेने, समंजसपणे परस्परांना समजावून घ्यावे, न पटणार्‍या विचारकृतींची विवेकाच्या आधारे पडताळणी करावी, थोडक्यात म्हणजे, शब्द प्रामाण्यापेक्षा अनुभवप्रामाण्य प्रमाण मानावे. अर्थात हे डॉ. दाभोलकर काही प्रथमच सांगत होते असे नाही. अनुभवाप्रामाण्याची ज्ञात परंपरा चार्वाकाइतकी प्राचीन आहे आणि त्याला विरोध करणार्‍यांची परंपराही तेवढीच प्राचीन आहे.

सर्वसामान्यपणे माणसांना जगण्यातल्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी काहीतरी आधार हवा असतो संत तुकाराम महाराजांच्या जातीचा(विचाराने) एखादाच असतो.

सत्य असत्यासी मन केले ग्वाही

मानीयले नाही बहुमता

आपणच आपल्या मनाच्या निर्धाराने चालण्यासाठी खूप मोठे आंतरिक बळ लागते. बहुतेकांना सोपी उत्तरे हवी असतात. आपले सूळ आपल्याच खांद्यावर वाहून नेणे कठीण असते. (अशक्य नसते) पण बहुतेकांना आपला भरीभार कशावर तरी सोपवून मोकळे व्हावेसे वाटते. मग तो देव-धर्म असेल, ज्यांना विवेकाच्या कसोटीवर पारखणे अशक्य असते. त्यातही धर्माच्या नावावर मूळ संकल्पनेपेक्षा परंपरेने आलेल्या कर्मकांडाचाच पसारा फार असतो. सामान्य माणसाला विचारधर्मापेक्षा आचारधर्म सोपा वाटतो. त्यांचा आधार वाटतो. कर्मकांडातील मग, बर्‍या वाईटाचा विवेक गळून पडतो. माणसाला उदात्तीकृत करण्यापेक्षा मनाने कमकुवत करणारी, बुद्धी भ्रष्ट करणारी अनेक कर्मकांडे म्हणजेच धर्म. त्यांची अव्याहत परंपरा चालू ठेवणार्‍या कथा, मिथके, त्यांचा मक्ता घेतलेले धर्माचार्य म्हणवणारे, त्यांच्या दुय्यम आवृत्त्या म्हणजे, समाजाच्या सर्व स्तरातले पुरोहित, स्वामी, बुवा, महाराज स्त्रिया व पुरूष यांच्यावरच्या श्रद्धा असा सगळा पसारा वाढत जातो. त्यांचा जीवनातील मूळ समस्या निराकरणासाठी काही उपयोग होतच नाही. उलट नुकसान मात्र होते. पण, त्याची जाण येण्याइतकेही भान जाग्यावर नसते. माणसे अशा कर्मकांडावरच्या गाढ विश्वासात इतकी गुरफटत जातात की, अनेकदा लौकिक अर्थाने ती शिक्षित, उच्चशिक्षीत(खरे तर साक्षर) असूनही अविवेकाच्या झापडांनी ती अंध होताना दिसतात. त्यामुळे तथाकथित उच्चभ्रूंचा असा समज असतो की, आमची काय ती ‘डोळस श्रद्धा’ उर्वरित अडाणी, अनक्षर, दरिद्री लोकांची ती ‘अंधश्रद्धा’.

डॉ.दाभोलकरांचा प्रयत्न होता तो या सर्वांच्या विवेक जागरणाचा आणि ही परंपरा चार्वाक, गौतम बुद्धापासूनची आहे. डॉ.दाभोलकर हे या प्रवृत्तीचे वर्तमानातले एक टोक आहे. तसेच, त्यांच्या विरोधकांची परंपराही तेवढीच प्राचीन असून, डॉ.दाभोलकरांना संपवणारे त्या परंपरेचे पाईक आहेत. म्हणजे, हा युगानुयुगांचा दोन प्रवृत्तीमधला संघर्ष आहे. त्यातील विवेकमार्गाच्या विरोधकांना ‘सनातनी’ हा शब्द रूढ आहे. पण, साने गुरूजींनी भारतीय संस्कृतीचे विवेचन करताना ‘सनातना नित्य नूतन’ अशी सनातन या शब्दाची व्याख्या केली आहे. सतत परिवर्तनशील, नवीन बदलाला सामोरे जाते ते सनातन. पण हे पठडीबद्ध सनातन्यांना माहीत नाही. खरे तर अशा पठडीबद्दतेने माणसांच्या विचारात आणि वर्तनात एक कर्मठ, स्थितीशिलता येते, ती आक्रमक होते, कर्कश होते, त्यांचे ‘अहं’ हिंसक होतात. विरोध त्यांना सहन होत नाही. विरोधकांना ते आक्रमकपणे संपवतात.

ज्यांना समाजात विवेकाने परिवर्तन घडवायचे असते, त्यांच्याजवळ एक विशाल सहानुभाव असतो, येशू ख्रिस्तासारखा! ‘पाप या प्रवृत्तीचा द्वेष करा, पापी व्यक्तीचा नव्हे’, (हेट् द सिन अ‍ॅण्ड नॉट सिनर) ही वृत्ती चर्चेतून, आपल्या सौजन्यपूर्ण वर्तनातून विरोधी विचाराच्या व्यक्तीविषयीचे सौहार्द कधीही सोडत नाही. मात्र, कर्मठ मंडळीजवळ विवेक आणि सौहार्द यांचा दुष्काळ असल्याने किंवा ‘विवेकाचा जागर’ त्यांच्या भौतिक हितसंबंधांना बाधक ठरत असल्यानेच हिंसक आक्रमकपणा हा त्यांचा स्थायीभाव बनतो आणि ते त्या व्यक्तीद्वेषाला केंद्र करतात. व्यक्तीला संपवले की, त्यांचा विचार संपेल, त्याच्यासारखा विचार-आचार करणार्‍यांवर दहशत बसेल आणि आपल्या स्वैराचाराला रान मोकळे होईल असे त्यांना वाटते. त्यासाठी प्रसंगी त्या विचाराला, व्यक्तीला बदनाम केले जाते. त्यांच्या विचारांना विपर्यस्त रूप देऊन त्यांचा प्रसार करून सामान्यांचा बुद्धिभेद केला जातो. आपण जिंकलो, असे वातावरण काही काळ निर्माण झाले तरी ते टिकत नाही.

म.गांधींचा खून झाला त्याच वर्षीच्या गणेशोत्सवात शनिवारवाड्याजवळ एक पोवाड्यांचा कार्यक्रम झाला. अशा कार्यक्रमांना तेव्हा अलोट गर्दी होई. शाहीर कोण होते आठवत नाही, तेव्हा ते कळतही नव्हते. पण त्यांच्या दोन ओळी आजही मनात घर करून बसल्या आहेत.

‘अरे नथुराम तू मूर्ख मूर्ख रे, सांगू या त्याला,
गांधीजी का मरून जातील, भ्रम झाला तुजला.’

आणि काही दिवसांपूर्वी जागतिक तरूणांनी म.गांधींना लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून, सर्वाधिक मते देऊन शाहिराचे म्हणणे सत्य असल्याची ग्वाही दिली.

तीच गोष्ट चार्वाकांची, गौतम बुद्धांची, तुकारामांच्या काळात विशाल प्रवाहात त्यांना देहाने संपवणार्‍यांची नावेही शिल्लक राहिली नाहीत. हा काळाचा न्याय आहे. दुसरी गोष्ट या विवेकी मंडळींचे बलिदान व्यर्थ गेले नाही. गौतम बुद्धांच्या शत्रुहिंसक यज्ञांच्या विरोधानंतर शंकराचार्यांनाही जपयज्ञ, तपयज्ञ आदी पंचयज्ञ सांगून स्वत:च्या परंपरेला मुरड घालावी लागली आणि पुढे भगवद्गीतेतही तो विचार आला. समाजाला एकेक पाऊल पुढे नेणारी ही बलिदाने आहेत. दाभोलकरांनंतर लगेच एक कायदा संमत होतो आणि वर्षभरात त्याआधारे शतकभर गुन्हे दाखल होतात, हेही एक पाऊल पुढे आहे. ही गती आता वाढवल्याखेरीज समाजाला गत्यंतर नसेल, याचाही लवकरच प्रत्यय येईल.

शेवटी केशवसुतांच्या मृत्यूनंतर गोविंदग्रज म्हणाले होते- ‘केशवसुत कसचे गेले, केशवसुत गातची बसले, जे एकाठायी होते, ते सर्वाठायी भरले:

डॉ. नरेंद्र दाभोलकरांबाबतही असेच होणार आहे, हा विश्वास आहे.

–डॉ. तारा भवाळकर