Categories
पुरस्कार

डॉ.सुनिती मंगल धारवाडकर, भास्कर सदाकळे, प्रा. गौतम निकम, खंडेराव हेरवाडे यांना पुरस्कार

एप्रिल - २०११

डॉ.सुनिती मंगल धारवाडकर यांना ‘आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित महिला वैज्ञानिक पुरस्कार’

जैव रसायनशास्त्राच्या संशोधक डॉ.सुनिती धारवाडकर यांना ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ अप्लाईड केमिस्ट्री’ या संघटनेकडून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ‘प्रतिष्ठित महिला वैज्ञानिक’ हा पुरस्कार फेबु्रवारी महिन्यात नागपुरात प्रदान करण्यात आला. प्रा.डॉ.सुनिती धारवाडकर या महाराष्ट्र अंनिसच्या हितचिंतक असून त्यांचे पती प्राचार्य डॉ.मंगल धारवाडकर महाराष्ट्र अंनिसचे राज्य वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभागाचे कार्यवाह आहेत.

            सर्वसामान्य माणसाला आज जे प्रश्न भेडसावतात, त्यांचे मूळ शोधून त्यांची त्या प्रश्नांतून सुटका करण्याची तळमळ त्यांच्या संशोधनातून दिसून येते. बी.एस्सी, एम.एस्सी या पदव्या मिळवताना त्यांनी प्रथम क्रमांक राखला होता. वैद्यकीय प्रवेशाची संधी मिळालेली असतानाही त्यांनी वैज्ञानिक संकल्पनांचे संशोधन करता यावे म्हणून विज्ञान शाखा निवडली.

            त्यांच्या संशोधनांमध्ये स्वयंचलित वाहनांच्या धुरातील घटकांचे सखोल संशोधनाचा समावेश आहे. त्यासाठी त्यांनी तीन वर्षे फ्रान्स व अमेरिकामधल्या अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये संशोधन केले. वाहनांच्या धुरातील लेड आणि बेंझोपायरीन घटकांचा मानवी आरोग्यावर होणार्‍या परिणामांचा त्यांनी अभ्यास केला. वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी काय करावे याविषयीची पुस्तिका वाहतूक पोलिसांना वाटली. प्रदूषण, पर्यावरणाशिवाय स्त्रियांच्या प्रश्नांचाही अभ्यास केला.

अभिनंदनीय

            तासगाव (जि.सांगली) अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते भास्कर सदाकळे यांना शिवजयंती उत्सव समिती, तासगावच्या वतीने पहिला सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच चाळीसगाव (जि.जळगाव) अंनिसचे कार्याध्यक्ष प्रा.गौतम निकम यांना महाराष्ट्र सामाजिक साहित्यीक संघ व मैत्री संस्था, मुंबई यांचे वतीने ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार मिळाला. शिरोळ (जि.कोल्हापूर) येथील अंनिसचे क्रियाशील कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांना परभणी येथील राष्ट्रीय एकता मंचतर्फे दिला जाणारा ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ मिळाला आहे.

            यानिमित्ताने सदाकळे, निकम व हेरवाडे यांचे म.अं.नि.स.तर्फे हार्दिक अभिनंदन!