Categories
भांडाफोड

गर्भाचे लिंग बदलतो म्हणणारा वैद्य गजाआड!

जून – २०१४

“मुली झाल्या म्हणून सासू जाच करती, नवरा मारहाण करतोय. बाया जाळून घेत्यात, पत्रकात वाचत न्हायीसा व्हयं? अशा नडलेल्या बायांना मी औषीद देतोय! स्वामी समर्थांच्या कृपेने मला विद्या प्राप्त झाली, माझ्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करतोय!” अशी मोठी प्रस्तावना करताना, आजपर्यंत शेकडो लोकांना आपल्या औषधाची प्रचिती आल्याचा दावा करत पुरावा म्हणून शंकर कुंभार यांनी लोकांच्या प्रतिक्रियांनी भरलेल्या वह्या समोर टाकल्या.

“पहिल्या दोन मुली झाल्यात, आता पोरगा पाहिजे” अशी बतावणी करत समोर बसलेल्या सतीशचंद्र कांबळे आणि स्नेहलने मान हलवली. तसे कुंभार पुढे सांगू लागले- “गर्भ राहिल्यानंतर दीड महिन्यांनी, एक आठवडाभर, रोज एक गोळी घ्यायची. दोन महिने झाले असतील तर काय इलाज चालत न्हायी.”

“म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून पंचेचाळीस दिवस ते साठ दिवस या काळातच हे औषध घेतले पाहिजे”- अनिल चव्हाण यांनी खुंटा हलवून बळकट केला.

“व्हय, 45 दिवस ते 60 दिवस या काळातच औषधाची मात्रा चालती. दोन महिन्यांनी त्या गर्भाला अंकुर फुटाय लागतोय. आळ्यावानी पेशी असत्यात. एक आळी चार हजार अंडी घालती, आणि उबवती” कुंभारनी हाताने गोळ्याचा आकारही दाखवला.

“म्हणजे औषधामागे विज्ञान आहे.”- अनिल चव्हाण

“मग हे औषध काम कसं करतंय?-सुशिला यादव! त्या मुलीच्या आई बनल्या होत्या.

“हे बघा, पोरगी हुतीया, त्येला जबाबदार पुरूष हाय! मी म्हणतो तुमी हाय”- सतीशकडे पाहात कुंभार गरजले.

“ते कसं?”

“सांगतो, बाईच्या पोटात नुसतं x असतंय, पुरूषाकडे x आणि y; x-x झालं तर मुलगी, x-y झालं तर मुलगा हुतो. पुरूषाकडून x आलं तर x-x होऊन मुलगी हुती, पुरूषाकडून y आला तर x-y हून मुलगा हुतोय! म्हंजे जबाबदार कोन?

आम्ही माना हलवल्या. “पण तुमच्या औषधाचं काय?”-सुशीला यादवांचा प्रश्न!

“हे औषध ‘x’ मारतंय! x मारला की राह्यला ‘y’ मग x-y हून मुलगा हुतो. एक आळी चार हजार अंडी घालती. त्यातनं तशा आळ्या म्हणजे पेशी बाहेर येत्यात. असा पेशींचा गोळा तयार हुतो” हाताने गोळा दाखवत त्यांनी सांगितले. “आणि दोन महिन्यानंतर त्याला अंकुर फुटतो. म्हणून दोन महिन्यानंतर औषधाचा उपयोग होत नाही.”

विज्ञानाचं अगाध ज्ञान त्यांनी पुन:पुन्हा पाजळले. माझ्या डोळ्यासमोर मटकीला आलेलं मोड दिसू लागले. “या औषधानं x मारतो म्हणजे केवळ y शिल्लक र्‍हातात. आणि x-y हून मुलगा होतोय!”

तरीही मुलीच्या आईनी शंका काढलीच- “तुमच्या औषधाने मुलगाच होईल याची गॅरंटी काय?”

तेव्हा कुंभारानी भिंतीवर लावलेल्या फलकाकडे बोट केले आमचे डोळे तिकडे वळले.

महत्वाच्या सूचना – 1) औषध घेणेस पेशंटने स्वत: हजर रहावे. इतर कोणाकडून औषध दिले जाणार नाही.

2) औषध घेतले नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही.

3) कोणतेही औषध स्वत:च्या जबाबदारीवर घेऊन जाणे.

4) कोणत्याही औषधाला गॅरंटी दिली जाणार नाही.

या कापडाची गॅरंटी देता येत नाही”, त्यांनी शर्टाची बाही हातात धरली. “माणसाची गॅरंटी देता येत नाही, आणि औषधाची कशी देणार? तुमचा विश्वास असला तर औषध घ्या. आता एवढ्या लोकांना गुण आला तो काय उगच?” त्यांनी रजिस्टर समोर धरले; एकेक पान उघडून दाखवू लागले.

“विश्वास नसला तर औषध घेऊ नका! तुमी जावा” पण असे म्हणत त्यांनी पिशवीत हात घातला. 3 डब्या बाहेर काढल्या- “हे बघा सकाळपासनं 13 जणांना औषध दिलंय आता नुसती तीन औषधं राह्यल्यात. विश्वास नसला तर औषध घेऊ नका!” मी औषधाची गॅरंटी देत नाही. काही वेळा गर्भधारणेची तारीख चुकलेली असते. काहीजण पथ्य पाळत न्हायीत. शेवटी त्याची मर्जी.” वर बोट करून त्यांनी सांगितले. ‘तुम्ही शंका काढू नका हो”-अनिल चव्हाणनी सावरून घेतले. कुंभारांची कॅसेट सुरूच होती- “इतर ठिकाणी दहा दहा हजार घेत्यात, डॉक्टर लाखांनी फाडत्यात, त्यांना तुम्ही गॅरंटी विचारताय काय? विश्वास पाहिजे.”

औषधाच्या कालावधीबद्दल खात्री व्हावी म्हणून अनिल चव्हाणनी अजून एक केस पुढे केली. – “पहिली मुलगी झालीय, चारवेळा तपासून कट केलंय, शेवटी तुमच्याकडे आलोय.” म्हटल्यावर कुंभार म्हणाले- “आता गर्भ राहिलाय काय?”

“नाही”

“मग एवढ्यात औषध घेऊ नका. गर्भ राहिल्यावर दीड महिन्यांनी या.”

“आत्ता औषध नेलं तर चालल काय?”

“नाही त्यावेळीच औषध न्या! काय काळजी करू नका, मी बरोबर औषध देतो.”

सतीशनी पैसे विचारले.

“एक हजार एकावन्न रूपये आणि नारळ एवढ्याच फीवर औषध देतोय. मला समाजाची सेवा करायची हाय! न्हायीतर लई पैसा मिळवला असता.”

तरीही यादवबाईंनी दहा रूपयांची पेंडी आठ रूपयाला मागावी तसं म्हटलं- “काय तरी कमी करा.”

“दहा हजारातले नऊ हजार कमी केल्यात. आता कमी होत नाही.

सतीशनी पैसे काढले- आणि मिस कॉल दिला तसे रस्त्यावर सावलीत उभे असलेले बिगर युनिफॉर्ममधले पोलीस आत आले आणि कोल्हापुरात “नरबळी आणि जादूटोणा विरोधी” कायद्याखाली पहिली केस नोंदवली गेली.

कायद्याच्या कलम दहाखाली नोंदवलेली ही महाराष्ट्रातली पहिली केस आहे.

कुंभार यांच्यावर गुन्हा नोंद झाला तो -जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम 10 नुसार. कलम दहानुसार बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा आव आणणे; गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे हा गुन्हा आहे.

गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाचे लिंग बदलता येत नाही हे स्पष्ट करताना डॉ. रश्मी व डॉ. निलेश पेंदूरकर यांनी मुलगा किंवा मुलगी कशी होते त्यामागील शास्त्र स्पष्ट केले.

“मानवी पेशीमध्ये गुणसुत्रांच्या 23 जोड्या असतात. म्हणजे 46 गुणसुत्रे. गुणसुत्रांची 23 वी जोडी लिंग ठरवते. पुरूषामध्ये या जोडीत x आणि y अशी गुणसुत्रे असतात. तर स्त्रीच्या पेशीमध्ये 23 व्या जोडीमध्ये x-x गुणसुत्रे म्हणजे दोन्ही गुणसुत्रे एकाच प्रकारची असतात.

स्त्रीच्या शरीरात बिजांड तयार होतो. ही अर्धी पेशी असते. त्यात 22+1 अशी तेवीस गुणसुत्रे असतात. पैकी शेवटचे गुण सूत्र x प्रकारचे असते. पुरूषाच्या शरीरात शुक्रजंतू तयार होतात. त्या प्रत्येकामध्ये 22+1 अशी तेवीस गुणसुत्रे असतात. पैकी शेवटचे गुणसुत्र प्रकारचे x किंवा y प्रकारचे असते. म्हणजे 22+x किंवा 22+ y प्रकारचे शुक्रजंतू असतात.

गर्भधारणा होते तेव्हा बिजांडामधील 22+ x गुणसुत्रे आणि शुक्रजंतू मधील 22+ x किंवा 22+ y ही गुणसुत्रे एकत्र येतात. त्यातून गुणसुत्रांच्या 22 जोड्या + xx ही शेवटची जोडी किंवा 22 जोड्या + xy ही शेवटची जोडी तयार होते. शेवटची जोडी xx गुणसुत्रांची असेल तर भृण स्त्री लिंगाचे बनते. आणि ती जोडी xy गुणसुत्रांची असेल तर भ्रुण पुरूष लिंगी बनतो.

यावरून मुलगा की मुलगी होणार हे पुरूषाकडून शुक्रजंतूतून आलेल्या गुणसुत्रावरून ठरते.

बिजांड आणि शुक्रजंतू एकत्र येतात, त्यांचे फलन होते त्याचवेळी लिंग ठरलेले असते. दोन्ही मिळून 23 जोड्या असलेल्या गुणसुत्रांची पेशी बनते. पेशीच्या विभाजनातून भ्रुणाची वाढ होते. गर्भधारणा झाल्यानंतर कोणत्याही मार्गाने भु्रणाचे लिंग बदलता येत नाही.

आजपर्यंत गर्भलिंग बदलचा दावा करून फसवणूक केली जात असे. आता अशी फसवणूक करणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. चर्चेत पिनू, प्राचू, सत्यजीत, प्रभंजन, क्षितीज, दिपू, समू आणि शशांकही सामील झाले.

“डॉक्टर तुमची माहिती कुंभारना नसल्यामुळे ते असे समजताहेत की, त्यांचे औषध उपयोगी आहे. कुंभार प्रामाणिक आहेत पण अज्ञानी आहेत; त्यामुळे गुन्ह्यात अडकलेत.”

“नाही, त्यांना चांगलं ठाऊक आहे की, आपले औषध निरूपयोगी आहे, म्हणून तर त्यांनी बोर्ड लावलाय- “औषध आपल्या जबाबदारीवर घ्या, औषधाची गॅरंटी दिली जात नाही. शिवाय तारीख चुकली असणार ही पळवाटही ठेवली आहे.” ‘आणि मुलगीच झाली’ या दु:खात विचारायला आणि हजार रूपये परत मागायला कोण कशाला येतोय! मुलगा झालेले मात्र पेढे घेऊन येत असणार! आनंदाने!!”

“आणि आनंदाने रजिस्टरमध्ये नोंदवत असणार”

आता ते रजिस्टर पोलिसांच्या ताब्यात आहे- आणि पोलीस स्टेशनपासून इन्कमटॅक्स ऑफीस जवळ आहे. कुंभार प्रामाणिक असल्याने त्यांनी इन्कमटॅक्स भरला असणार.

कुंभार म्हणताहेत की, “मी काही कुणाला बोलवायला जात नाही. जो तो आपणहून येतोय. औषध द्या म्हणून मागं लागतोय.”

‘मुलगाच हवा’ ही इच्छा त्यांना ओढून आणते. म्हणजे केवळ कुंभारना पकडून हा प्रश्न संपणार नाही, समाजमन बदलण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेण्याची गरज चर्चेतून स्पष्ट झाली.

साळोखेनगर म्हणजे कोल्हापूर शहराचे एक उपनगर. कळंबा रिंग रोडला लागून पाण्याची टाकी उभी. तिथून दोन मिनिटांच्या अंतरावर छोटे खानी बंगल्यात कुंभारांचे औषधालय! बंगल्याचे नाव “श्री समर्थ” आवाराला लोखंडी सरकदार! आत ‘हुंडाई’ गाडी उभी होती. पहिल्या खोलीत भिंतीलगतच्या खुर्चीवर कुंभार बसलेले. त्यांच्यासमोर टेबल, पुढे दोन खुर्च्या, त्यावर पेशंटनी बसायचे. मागे चार जण बसतील असे लाकडी बाकडे आणि बाजूलाही दोन खुर्च्या! खोली रिकामीच. भिंतीवर देवाचे कॅलेंडर, आणि सूचना फलक!

आतल्या खोलीत झाडाच्या सालींनी भरलेली पोती. ती भिंतीच्याकडेला व्यवस्थित रचून ठेवलेली. त्या पलिकडे संडास बाथरूम. शेवटच्या खोलीत औषध तयार करण्यासाठी बरण्यातून भरलेल्या गोळ्या, भुकट्या इत्यादी साहित्य.

दीड हजार स्क्वेअर फूटाच्या प्लॉटवर बांधलेला हा बंगला एकाने मुलगा झाल्याच्या आनंदात भेट दिल्याचे कुंभार आवर्जून सांगतात.

सकाळपासून तेरा पेशंट औषध घेऊन गेले. ही गोष्ट सकाळी अकराची! आमच्या आधीचे पेशंट सातारचे शनिवार पेठेतील.

पोलिसांनी पंचनामा करायला सुरवात केली तो पर्यंत आणखी तीन पेशंट येऊन गेले. एक हुपरीत सध्या ऊस तोडणीचे काम करताहेत. ते मुळचे बीडचे. बायको, मुलगी, आणि भावाला घेऊन ते आलेले. पण पोलिसांना पाहून ते लांब थांबले. आणि थोड्या वेळात त्यांनी काढता पाय घेतला.

नेसरीहून आलेल्या नवरा बायको व मुलीनेही त्यांचा कित्ता गिरवला. बेळगावचे कुलकर्णी दांपत्य मात्र कुंभारांच्या पर्यंत पोहोचले. पण कुंभारांनी त्यांना हात जोडून सांगितले, “आता मी औषध देत नाही. मी हा उद्योग बंद केलाय. मला या समाजसेवेची गरज नाही. माझी पेन्शन दरमहा सोळा हजार येतीया. तुमी जावा.”

पण पोलिसांनी कुलकर्णी दांपत्याचा जबाब घेतला, ते कापड दुकानात कामाला आहेत.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कोल्हापूर शाखेने भ्रष्टाचार विरोधी सेल सुरू केला. तक्रारी नोंदवण्यासाठी सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण व शिवाजी शिंदे यांचे फोन नंबर दिले. त्या अंतर्गत 76 तक्रारी नोंदवल्या गेल्या. भ्रष्टाचाराच्या तक्रारी अधिक. त्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ट्रॅप करून पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बहुसंख्य तक्रारी, महसूल विभाग, शिक्षण विभाग, पोलीस, हायवे पोलीस, आरोग्य विभाग, बँक, गॅस एजन्सी, तहसीलदार कार्यालय, महापालिका, जिल्हा रूग्णालय या संबंधातल्या आहेत. तर पाच तक्रारी भोंदूबाबांच्या संबंधातल्या!

बहुतेक केसेसमध्ये तक्रारदार पुढे यायला तयार नाहीत. कार्यकर्तेएकेका तक्रारीची शहानिशा करत आहेत. कुंभारांची केस सतीशचंद्र कांबळेंनी हाताळली. कुंभारांशी केलेली चर्चा मोबाईलमध्ये टेप केली. पोलीस अधिक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांना भेटून टेप ऐकवली. त्यांनी करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोणे यांना आदेश दिला.

सतीशचंद्र कांबळे व स्नेहल कांबळेंनी ढोणे यांच्याकडे फिर्याद दिली. करवीर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. आर.एच.गवारे, पी.एस.आय.जी.एम.पालवे, हेड कॉन्स्टेबल सचिन गुरखे, पोलीस नाईक संजय जाधव, कॉन्स्टेबल कुमार पोतदार, कॉन्स्टेबल सागर कांडगावे अशी मोठी टीम मोठ्या उत्साहाने मोहिमेवर निघाली.

रिंग रोडजवळ पाण्याच्या टाकीच्या सावलीत सर्वजण थांबले. पोलीस बिगर युनिफॉर्म असल्यामुळे कुणाला संशय आला नाही.

पण रिंग रोड ही करवीर आणि जुना राजवाडा पोलीस स्टेशनची हद्द आहे. त्यात कुंभारांचा बंगला जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो.

ऐन कारवाईच्या वेळी हा हद्दीचा प्रश्न निर्माण झाला. टाकीच्या सावलीत राहून त्यावर फोनच्या सहाय्याने उपाय शोधण्यात आला. त्यानुसार गुन्हा नोंद करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असल्याने तपास त्यांनी करावा आणि गुन्हा राजवाडा पोलिस स्टेशनकडे वर्ग करावा असे ठरले. या सामंजस्याच्या मार्गामुळे कारवाई होऊ शकली.

प्रत्यक्ष पंचनामा करण्यासाठी जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.अमित मस्के, कॉन्स्टेबल ए.आय.चव्हाण, असिस्टंट सब इन्स्पेक्टर शिवाजी पाटील उपस्थित राहिले. ते येईपर्यंत मात्र करवीर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी कौशल्याने खिंड लढवली. दै.पुढारीचे वार्ताहर प्रशांत उर्फ परशुराम कांबळेंची चांगली साथ मिळाली.

पंच म्हणून कोल्हापूर जिल्हा मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा सुशिला यादव आणि प्रस्तुत लेखक अनिल चव्हाण यांनी स्वाक्षर्‍या केल्या. ऐनवेळच्या धावपळीसाठी दिलदार मुजावर, सुनिता अमृतसागर, कृष्णात कोरे, बिजली कांबळे, रमेश वडणगेकर यांची मोलाची साथ मिळाली.

‘मुलगा व्हावा’ ही इच्छा हेरून, त्यासाठी प्रयत्न करणारी मोठी इंडस्ट्री अस्तित्वात आहे. या प्रकारच्या केसेसची छाननी करताना हे लक्षात आले. त्यांचे काम साखळी पद्धतीने व बिनबोभाट चालते. या इंडस्ट्रीजचे उपविभाग गर्भधारणा होण्यासाठी औषध देणारे, मुलगा व्हावा म्हणून उपचार करणारे, त्यातही गर्भधारणा होण्यापूर्वी औषध देणारे आणि गर्भधारणेनंतर घेण्यासाठी औषध देणारे, गर्भलिंग चाचणी करणारे, मुलगी आहे असे सांगून गर्भपात करणारे इ. आहेत. दैवीशक्ती, जडीबुटी, मंत्रतंत्र, गावठी औषधे, झाडपाला, इथंपासून ते डॉक्टरी इलाजापर्यंत विविध मार्ग स्वतंत्रपणे वापरले जातात. हजारो-लाखो रूपये फी उकळली जाते. एजंटाना टक्केवारीवर मिळकत होते. ते साईड बिझनेस म्हणून काम करतात. संपर्काची चौकशी करून खात्री झाल्याशिवाय एजंट तोंड उघडत नाहीत.

‘मुलगाच हवा’ ही मानसिकता स्त्रियांचे जीवन उद्धवस्त करते. याचे मूळ पुरूषप्रधान संस्कृतीत आहे. काही हजार वर्षांपूर्वी शेतीमध्ये बैलाचा शिरकाव झाला, बैलाच्या सहाय्याने शेत नांगरणार्‍या पुरूषांच्या हाती उत्पादन साधने आली. स्त्री सत्ता संपुष्टात आल्या. स्त्रियांच्यावर अनेक बंधने लादण्यात आली. वंश चालवायचा तर मुलगा पाहिजे; आपण मिळवलेल्या खाजगी संपत्तीला आल्याच रक्ताचा वारस पाहिजे, या मानसिकतेला धर्माने खतपाणी घातले; पुरूषप्रधान संस्कृतीने निर्माण केलेल्या पुराणकथांनी काही हजार वर्षेअसे संस्कार केले आहेत. मनुस्मृतीमध्ये या प्रयत्नांचे व कायद्यांचे एकत्रीकरण पहायला मिळते.

संपत्ती आपल्याच वंशात राहावी ही भौतिक इच्छा, म्हातारपणाची काठी ही व्यावहारिक इच्छा, मरताना पुत्राने तोंडात पाणी घालून स्वर्गाची वाट सुकर करावी ही आध्यात्मिक इच्छा; यातून मुलासाठींचा आग्रह वाढतो. त्याचा अतिरेक होतो. कुटुंबात छळ आणि समाजात हेटाळणी होते. त्यातून काही विपरीत घडल्यास एखाद्या व्यक्तीला जबाबदार धरले जाते. संस्कार आणि संस्कार करणारी पुराणे मात्र नामानिराळी राहतात.

भारतीय घटनेने स्त्री पुरूष समतेचे मूल्य दिले. मुलगा मुलगी एक समान हा विचार रूजवण्याचे प्रयत्न शाळांतून होतात.

पण शाळेपेक्षा अधिक ताकदीने धर्म, मूल्ये रूजवत असतो. शाळेतील कथा कवितांपेक्षा अधिक पटीने धार्मिक पुराणकथा लोकांचे प्रबोधन करतात. समाज, कुटुंब यांच्याबरोबर अनेक वेळा शिक्षकही पुराणातील मूल्ये रूजवण्यात पुढाकार घेतात. शाळांमधील प्रार्थना, सण, समारंभ आणि शिक्षकांचे वर्तन मुलांवर संस्कार करतात.

ज्या काळात स्त्रियांना बापाच्या किंवा नवर्‍याच्या संपत्तीत वाटा नव्हता; स्त्री म्हणजे पुरूषाची खाजगी मालमत्ता समजली जाई. त्यांना शिकण्याची बंदी होती, मुलगी दान देता येत होती. अशा काळात- त्या विचारांच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पुराणकथा आजही संस्कारासाठी वापरल्या जाताहेत. स्त्री समानतेच्या काळात त्याच मूल्यकथा कशा चालतील? याचा विचार व्हायला हवा.

स्त्री-पुरूष समता मूल्याचा संस्कार क्षीण बनल्याने सुशिक्षितही ‘मुलगाच हवा’ म्हणून हटून बसताहेत.

भारतीय घटनेतील मूल्ये रूजवायची तर त्याला अनुसरून संस्कार कथा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जुन्या कथांची चिकित्सा केली पाहिजे.

या पूर्वीही समतेची मूल्ये गौतम बुद्धापासून रूजवण्याचे प्रयत्न झाले. पण वैदिकांनी त्यावर बोळा फिरवला. त्याचे कारण भौतिक परिस्थिती बदलली नव्हती.

अनिल चव्हाण