ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी ख्रिस्ती धर्मियांसाठी पवित्र असलेला ‘ईस्टर संडे’ साजरा करताना केलेल्या भाषणात ख्रिस्ती धर्माचे गुणगान गायिले. भारतातील धर्मगंडाने पछाडलेल्या लोकांची घोषणा कॅमेरॉन यांनी ख्रिस्ती जनतेला उद्देशून केली. पण झालं भलतंच. कॅमेरॉन यांच्यावर टीकेची मोठी झोड खुद्द ब्रिटनमध्येच उठली आहे. वयाची पंचविशीही न गाठलेल्यापैकी 32 टक्के तरूणांनी आम्हाला कोणताही धर्म विचार मंजूर नाही असे स्पष्ट केले आहे. तेव्हा आता आपलं काय होणार याची काळजी चर्चमधील ख्रिस्ती धर्मपंडितांना वाटत असणार.
पण ख्रिस्ती काय, हिंदू पंडित काय किंवा मुस्लीम मुल्ला-मौलवी काय यांनी तरूणाई धर्मापासून दूर जात असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण तरूणाईला आता समजू लागलंय की, गर्वसे कहो-हम सब मानव है!
औद्योगिक क्रांती युरोप खंडात झाली 17 व्या शतकात. या क्रांतीचे बीज होतं न्यूटन-गॅलिलिओप्रणित वैज्ञानिक दृष्टिकोन व वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब. यात विज्ञानाच्या प्रचार व प्रसारामुळे ब्रिटन(ज्याच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही असा) महासत्ता बनला.
पण युरोपमधील ख्रिस्ती धर्मसत्तेने याच विज्ञानाला विरोध केला होता व वैज्ञानिक पद्धतीचा समर्थक गॅलिलिओ याला नजरकैदेची शिक्षा दिली होती.
संघटीत धर्मांनी जगाच्या पाठीवर एकेकाळी अनर्थ माजविला होता. ख्रिस्ती धर्म व मुस्लीम धर्म यांच्यात सात धर्मयुद्धे झाली. एका युद्धात तर लहान बालकांचा वापर करण्यात आला. यातील हजारो बालके मारली केली तर हजारो गुलाम म्हणून पळविली गेली. हा इतिहास आधुनिक तरूणाईला माहीत असणार म्हणूनच रक्तरंजीत धर्म हवाच कशाला असे त्यांना वाटू लागले तर त्यात गैर काय?
मंदिरात, मशिदीत किंवा चर्चमध्ये गेल्यावर मन:शांती लाभते असे ज्यांना वाटते त्यांची मन:शांती हिरावून घेण्याचे कारण नाही. पण अदृश्य दैवी वा असुरी शक्ती आपल्यावर कृपा करते वा आपणाला संकटातून वाचविते हे खरे नाही. देवाचा धावा करून साथीचे रोग हटले नाहीत. देवाची प्रार्थना करून पाऊस पडत नाही वा दुष्काळ हटत नाही. तसं असतं तर मराठवाडा-विदर्भात अनेक धार्मिक स्थळे आहेत. तिथे प्रार्थना करणारे शेतकरी आहेत त्यांनी आत्महत्या का केली?
विज्ञानाच्या प्रभावाने, औद्योगिक क्रांतीपासून ते जगभरच्या वैचारिक क्रांतीपर्यंत जगाचे नेतृत्व एकेकाळी ब्रिटनने केले. यामुळे ब्रिटन एक मुक्त व प्रगल्भ देश बनला. जगातील सर्व धर्म व पंथाच्या लोकांना तो आपलासा वाटतो. धर्म ही अफूची गोळी असं म्हणणारा मार्क्स ब्रिटनमध्येच वास्तव्यास होता. प्रचंड आर्थिक ताकदीच्या अरबांना ब्रिटन आपलासा वाटतो. अशा मुक्त व सशक्त वातावरणात धर्म मागे पडला नाही तरच नवल. ब्रिटन वैज्ञानिक दृष्टिकोनामुळेच सामर्थ्यशाली बनला. कॅमेरॉनना हे केव्हा कळणार आणि भारतात धर्मवाद्यांना याची जाणीव कधी होणार?
मानवी संस्कृतीची विज्ञानाने धर्माच्या कचाट्यातून मुक्तता केली म्हणून जग समृद्ध झाले व संस्कृतीचा विकास झाला. संस्कृतीला पुन्हा धर्माच्या जोखडात अडकवून इतिहासाचे चक्र मागे फिरवण्याची चूक कॅमेरॉन व जगातील आणि भारतातील राजकारण्यांनी करू नये असाच इशारा ब्रिटनमधील तरूणाई देत आहे.
भारतात हल्ली पार्लमेंटच्या निवडणूका चालू आहेत. यावेळी धर्माच्या नावावर भारतीय समाज कसा विभागला जाईल यासाठी काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. जे अमूक अमूक व्यक्तीला मते देणार नाहीत त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे येथपासून ते मुस्लिमांचा बंदोबस्त करा अशी चिथावणी देण्यापर्यंत तसेच मुस्लिमांनी धर्मनिरपेक्षते ऐवजी जातीच्या हिताला प्राधान्य द्यावे अशी मुक्ताफळे उधळण्यापर्यंत राजकारण्यांची मजल गेली आहे.
धर्माच्या आधारावर समाज दुभंगणार्या या अफूच्या गोळीला तरूणाई नकार देत आहे हे ब्रिटनमध्ये दिसले. भारतातील तरूणाई काय करणार हे 16 मे ला दिसेल. निवडणुकीच्या निकालातून भारतीय तरूणाई धार्मिक ध्रृवीकरणाला बळी पडली तर या देशाचा भविष्यकाळ नक्कीच हिंसक असेल. क्रुसेडसारखी उघड युद्धे कदाचित दोन जमातीत होणार नाहीत पण आतंकवादाच्या माध्यमातून छुपे हल्ले निरपराध लोकांवर होत राहतील. माणुसकी लयाला जाईल.
सर्पमित्र अनिल इंगवले यांचे निधन
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सर्पमित्र अनिल इंगवले यांचे दि.25 फेब्रुवारी रोजी कबनूर, जि.कोल्हापूर येथे निधन झाले. अनिलने अंनिसच्या सहकार्याने सर्पविषयक अंधश्रद्धांबाबत गावोगावी, शाळा, महाविद्यालयातून प्रबोधन केले. मोटरसायकलवरून एखाद्या गावात पोचायचे व तेथे मिळेल ती बिदागी घेऊन सापाविषयीचे गैरसमज दूर करायचे हा उपक्रम जवळपास 20 वर्षे अनिलने नेटाने चालविला. अशा त्यागी कार्यकर्त्यामुळेच अंनिसचे बळ वाढले. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात अंनिस, संपादक, कार्यकर्ते सहभागी आहोत.