Categories
न्याय

एखादी व्यक्ती करणी, काळी जादू करते असे भासविणे हा गुन्हा

अभिरूप न्यायालय
जून – २०१४

युवर ऑनर, आरोपीच्या पिंजर्‍यातील ही मंडळी आदिवासी पाड्यातील प्रतिष्ठित लोक आहेत. व पाड्याच्या हितासाठी त्यानी फिर्यादी कुटुंबियांवर कारवाई केली म्हणून त्या सर्वांना नुकत्याच पारित झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुसूचीतील कलम 6 अन्वये त्यांच्यावर खटला भरलेला आहे. अशा प्रतिष्ठितांवर आरोप ठेवणे समाजहिताच्या दृष्टीने योग्य नाही असे मला वाटते.

ही तथाकथित प्रतिष्ठित मंडळी फिर्यादी कुटुंबियांच्या जीवावर उठली होती हे तुम्ही नक्कीच मान्य कराल. काही तरी खोटेनाटे दोषारोप ठेऊन, ऐकीव माहितीच्या आधारे पाड्यातील कुटुंबाला एकटे पाडून त्यांना त्रास देत राहणे, त्यांचे जगणे मुष्किल करणे हे नक्कीच भूषणावह नाही.

परंतु युवर ऑनर, हे फिर्यादी कुटुंब करणी करते, काळी जादू करते व भूतप्रेतांना आमंत्रण देऊन इतरांचे वाईट करू शकते याचा दाट संशय गावकर्‍यांना आल्यामुळेच पाड्यातील हे प्रतिष्ठित सामूहिकरित्या एकमताने निर्णय घेऊन कारवाई करणे अनिवार्य आहे असे त्यांना वाटल्यास त्यात त्यांची काहीही चूक नाही.

हे जे प्रतिष्ठित म्हणवून घेणारे आहेत त्यांनी कुठल्यातरी ऐकीव माहितीच्या आधारे वा या कुटुंबाच्या शेजार्‍या-पाजार्‍यांच्या सांगण्यावरून कुटुंबीयांशी आक्रस्ताळपणे वागणे मानवीयतेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. करणी, काळी जादू वा भूत प्रेतांचे अस्तित्व हे सर्व मनाचे खेळ आहेत. परंपरेच्या ओझ्याखाली दबलेल्या लोकांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता पिढ्यान पिढ्या स्वीकार करत आलेल्या या कल्पना आहेत. व यांच्यामुळे समाजाचे अतीव नुकसान होत आहे. शिवाय अशा गोष्टींचा बाऊ करून, समाजात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. यामागे काही स्वार्थ असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बहुतेक वेळा कुणाचे तरी हितसंबंध यात गुंतलेले असल्यामुळे आपला स्वार्थ साधण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे दोषारोप केले जातात. मंत्रतंत्राने जनावरांचे दूध आटत नाही की लहान मूल आजारी पडत नाही हे तुमच्या लक्षात यायला हवे होते.

परंतु सर, हे कुटुंब गेली कित्येक पिढ्या करणी करत आहेत, असा पाड्यातल्यांचा दावा आहे. अलीकडेच या कुटुंबाच्या घरात खरोखरच करणी करणारं गाठोड सापडल. व त्या गाठोड्यात मंतरलेला नारळ होता. नारळ फोडल्यावर आतून प्लॅस्टिकच्या बांगड्या, नायलॉनच कापड, केसाचा गुंता, हळद कुंकवाच्या पुड्या निघाल्या. यावरूनच हे कुटुंब पाड्यात करणी करते हे सिद्ध होऊ शकते. अशा करणीमुळे पाड्यात काहीही वाईट होऊ शकते. म्हणूनच पाड्यातील प्रतिष्ठितांनी वेळीच काळजी घेत हे सर्व थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पाड्यातील इतर घाबरून करणी करणार्‍यांना पाडा सोडून जाण्याचा आग्रह करत आहेत. तरीसुद्धा पोलीस यांच्यावरच आरोप ठेवत आहेत. हा कुठला न्याय?

तुम्ही जे विधान करत आहात त्याला काही अर्थ नाही, एवढेच मी सांगू इच्छितो. मुळात हे कुटुंब पिढ्यान पिढ्या करणी करत असल्यास असा संशयास्पद गोष्टी स्वतःच्या झोपडीत कधीच ठेवणार नाहीत. कुणी तरी बाहेरचे या कुटुंबावर खोटे नाटे आळ ठेवण्याचे हे कारस्थान असावे असे मला वाटते. कुणी तरी त्यांच्या वाईटावर असून जाणून बुजून अफवा पसरवत आहेत. इतरांना भडकावून त्यांच्याद्वारे या कुटुंबाला पाडा सोडण्यास भाग पाडत आहेत. हा डाव तुमच्या लक्षात यायला हवा होता.

युवर ऑनर, या फिर्यादी बाईने नजर रोखून बघितल्यामुळे शेजारच्या घरातील बाळ आजारी पडले असे तिच्या शेजारचे शपथेवर सांगण्यास तयार आहेत.

वकील महाशय, कुठल्याही खेड्यापाड्यात शेजार पाजार्‍यात काही किरकोळ कारणासाठी बाचाबाची होत असतात. काही वेळा भांडण विकोपाला जाऊ शकते. जमिनीवरून वाद होतात. अशा वेळी सूडाची भाषा वापरली जाते. व कदाचित या सूडापायी करणी, जारण मारण, काळी विद्या अशा काल्पनिक गोष्टींचा वापर होत असावा. अमुक व्यक्ती अपशकुनी आहे, त्यामुळे पाड्याला त्रास होत आहे असा आरोप केला जात असावा. मुलं आजारी पडतात, दुष्काळ पडतो किवा पिकांचे नुकसान होते असे काही बाही कारण पुढे ठेवून त्या कुटुंबाला हैराण केले जात असावे, मारहाण केले जात असावे, त्यांचे जगणे मुष्किल केले जात असावे. या सर्व गोष्टींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे या पिंजर्‍यात उभ्या असलेल्या प्रतिष्ठितांची साथ असते. पाड्याचे पुढारीपण करणार्‍यांनी वेळीच अशा आरोपांचा शहानिशा करून योग्य निर्णय घेतल्यास त्यांच्याच पाड्यातील एका कुटुंबावर अशी वेळ आली नसती. एखाद्याचे जगणे असह्य करणे प्रतिष्ठित म्हणवून घेणार्यांना नक्कीच शोभणार नाही. उद्या अशी वेळ तुमच्यावरही येऊ शकते याचे भान ठेवायला हवे.

युवर ऑनर, या फिर्यादीच्या कुटुंबाच्या करणीमुळे पाड्यात साथीचे रोग पसरण्याची भीती होती, म्हणूनच पाड्यातले पुढारी प्रतिबंधात्मक उपाय करत होते. या उपायामुळे गावात साथ पसरली नाही.

साथीचे रोग कशामुळे पसरू शकतात किंवा त्या पसरू नयेत यासाठी कुठले उपाय करावेत यावर वैद्यकशास्त्रच भाष्य करू शकेल. माझ्या मते वैद्यकीय उपायच रोगराई पसरविणे थांबवू शकतात. यासाठी कुणाला तरी पाड्यातून हकलणे, त्यांना विहिरीचे पाणी वापरण्यास प्रतिबंध करणे, किंवा काही बाही कारणं पुढे करून सर्वांच्यासमोर त्यांचा अपमान करणे पाड्याला शोभणारे नाही.

युवर ऑनर, या कुटुंबातली बाई करणी करते, हे पाड्यातल्या मांत्रिकाने सिद्ध करून दाखवले आहे. या पाड्यातील एका व्यक्तीला अचानक पोट दुखू लागले. व बघता बघता रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. मांत्रिकाने त्याच्या अंगावरून लिंबू ओवाळून कापले. कपलेल्या लिंबामधून लिंबाच्या रसाऐवजी भळाभळा रक्त वाहत होते. व ह्या बाईनेच काही दिवसापूर्वी त्याला रक्ताच्या उलट्या होतील म्हणून धमकी दिली होती. हे तिचेच कारस्थान आहे असे पाड्याला वाटल्यास नवल नाही.

लिंबातून रक्तसदृश पाणी काढण्याला वा अख्ख्या नारळात बाहेरच्या वस्तू कोंबून ठेवण्याला भार मोठी अक्कल लागत नाही. अशा प्रकारचे प्रयोग आजकाल शाळेतील मुलंही करून दाखवतील. फक्त लिंबूमधून रक्तसदृश काही तरी बाहेर पडले म्हणून त्या कुटुंबावर दोषारोप करण्याऐवजी त्या मांत्रिकालाच पोलीसांकडे दिल्यास त्याचे सर्व पितळ बाहेर पडले असते. परंतु पिजर्‍यात उभे असलेल्या आरोपींचा या कुटुंबाच्या शेतजमिनीवर डोळा असावा व त्यासाठी या कुटुंबाचा छळ करून त्यांना पाड्यातून बाहेर काढण्याचा कट त्यानी रचला असावा असे म्हणण्यास येथे भरपूर वाव आहे. स्वार्थापायी घडणार्‍या या अमानुष प्रकारांना थारा देता कामा नये. कुणालातरी सैतान ठरवणे वा सैतानाचा अवतार समजून मारहाण करणे, अपमानास्पद जिणे जगण्यास भाग पाडणे हे कायद्यास धरून नाही, हे तुम्ही तुमच्या अशिलांना समजावून सांगणे गरजेचे आहे. पाड्यातले प्रतिष्ठित आपल्याला कुणीही विचारणारे नाहीत म्हणून काळी विद्या, करणीच्या नावे वचक बसवण्याचा प्रयत्न करणे यासाठी कायद्याने शिक्षा होऊ शकते.

युवर ऑनर, पाड्यात राहणार्‍यांना कायदे कानून, नीती नियमाच्या गोष्टी माहित नसतात. म्हणून तरी त्यांच्या या अपराधाला क्षमा करावी.

कायद्यासमोर सर्व समान आहेत. व कायदा माहित नव्हता ही सबब क्षमा करण्यास पुरेसे ठरत नाही. शिवाय अशा प्रकारे हातात कायदा घेण्याचे रोखण्यासाठी कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे यांना कोर्ट शिक्षा देत आहे.

प्रभाकर नानावटी

लेखक संपर्क : 9503334895