Categories
अंधश्रद्धा

युवतींची नग्नपूजा आणि पैशांचा पाऊस

जून – २०१४

पावसाची जोरदार सर पडून गेली की, सगळीकडे पाणीच पाणी होऊन जाते. तसे होण्याचे कारण म्हणजे पावसाच्या रूपाने ढगातून जमिनीवर पडते ते पाणी. अलिकडे काही ठिकाणी गारांचा पाऊस पडतो. परंतु या गारा म्हणजे बर्फ किंवा गोठलेले पाणीच असते. एखाद्या वर्षी समाधानकारक पाऊस न पडण्याची चिन्हे दिसू लागली तर भाविक मंडळी पर्जन्य यागाचे अनुष्ठान करतात. पर्जन्य यागाचा पर्जन्यवृष्टीशी कोणताही कार्यकारण संबंध नसला तरी सर्वसामान्य लोकांची धार्मिक कर्मकांडे किंवा अनुष्ठाने यावर चुकीची श्रद्धा असते. काही विशिष्ट समाजामध्ये अशाच प्रकारची दुसरी एक(अंध)श्रद्धा खोलवर रूजलेली आहे. या श्रद्धेनुसार एखाद्या युवतीने नग्नावस्थेत देवीची विशेष करून रेणुका देवीची पूजा केली तर पाऊस पडतो आणि तो देखील साधा पाऊस नव्हे तर पैशांचा! कोकण प्रदेशात दापोली गावामध्ये वास्तव्य करून असलेल्या एका महिलेचा शेजारच्या गावात राहणार्‍या एका युवतीशी थोडाफार परिचय झाला होता. महिलेने मोबाईलचा वापर करून त्या अल्पपरिचित युवतीशी संपर्क वाढवला. काही दिवसांनंतर हा परिचय दाट झाला. अल्पावधीतच त्या महिलेने संबंधित युवतीला पैशांचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले.

या आमिषाचे स्वरूप काहीसे गूढ आणि चमत्कारिक होते. महिलेच्या सूचनेनुसार त्या युवतीने नग्नावस्थेत देवीची पूजा करणे आवश्यक होते आणि मग घरी सुबत्ता आल्याने त्या युवतीला चरितार्थासाठी कष्ट उपसावे लागले नसते. ही चमत्कारीक अट ऐकून त्या युवतीचा भीतीने थरकाप उडाला. तिने आपल्या मावशीला विश्वासात घेऊन एकूण सर्व प्रकार तिला कथन केला. या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आल्यावरून मावशीने त्या महिलेला जाब विचारला. परंतु सरळ उत्तर देण्याऐवजी त्या महिलेने मावशी आणि युवती या दोघींशीही भांडण उकरून काढले. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. परंतु पोलिसांची शिष्टाई समाधानकारक झाली नाही. या पार्श्वभूमीवरून प्रस्तुत प्रकरणात पुरोगामी चळवळीतील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी लक्ष घातले आणि पोलिसांना संबंधित महिलेच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यास भाग पाडले. फेब्रुवारी 2014 मध्ये म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत सध्या रितसर कारवाई सुरू झाली असून यथावकाश तिचा निकाल लागेल. दरम्यान प्रस्तुत घटनेतून विविध प्रश्न निर्माण होतात. उदा.नग्नपूजा केल्यानंतर महिलांना काही विशिष्ट अशी शक्ती प्राप्त होते काय? पैशांचा पाऊस केव्हा पडतो? इत्यादी. विविध प्रांतातील प्राचीन रूढी, हवामानशास्त्र इत्यादींबाबतच्या अभ्यासातून उपलब्ध होणारी या प्रश्नांची उत्तरे उद्बोधक ठरतील.

आमच्या सांस्कृतिक इतिहासाचा मागोवा घेतल्यास अगदी प्रारंभीच्या काळात मानव नग्नावस्थेत राहात असल्याचे आढळून येते. अजूनही काही प्रदेशातून तिथले आदिवासी लोक नेहमी नग्नच असतात. सिंधु संस्कृतीच्या अवशेषात अनेक नग्न मूर्ती सापडल्या असून त्या शिवाच्या असल्याचे कैक पंडितांचे अनुमान आहे. शिवाच्या नग्नावस्थेतील मूर्ती भारतात अनेक ठिकाणी आढळतात. शिवाप्रमाणे देवीचीही विविध रूपे असून पुरातन आणि तांत्रिक वाङ्मयात त्यांचीच रूपे आहेत. शाक्तपंथीय अशा नग्नदेवींची पूजा करतात. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात रेणुका देवीचे मंदिर आहे. प्रतिवर्षी तिथे यात्रा भरते. हजारोंच्या संख्येने भक्तगण दर्शनाला एकत्र येतात. देवीची महिलांकडून नग्नपूजा केली जात असे.(1993 पासून शासकीय आदेशानुसार ही प्रथा बंद झाली.) शतकानुशतके नग्न पूजेची ही रूढी चालत आली. गावापासून सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर रेणुकादेवीची चंद्रगुत्ती ही टेकडी आहे. यात्रेच्या दिवशी शेकडो युवती हे अंतर चालत, पळत काटत असत. विशेष म्हणजे या सर्व युवती नग्नावस्थेत असत आणि युवतींचे ‘त्या’ अवस्थेतील दर्शन घेण्यासाठी पुरूष वर्ग रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लाळ घोटत उभा असे. हा प्रकार निश्चितपणे ओंगळ होता. तरीदेखील तो धार्मिक असल्याचे मानले जाऊ लागले. अखेर काही पुरोगामी संघटनांनी या प्रथेच्या विरोधात आवाज उठवला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन 1993 पासून सरकारने या नग्नयात्रेवर बंदी आणली.

इसवीसनाच्या 14 व्या शतकात होऊन गेलेले विद्यारण्य स्वामी(पूर्वाश्रमीचे माधवाचार्य) हे एक महान वैदिक विद्वान होते. त्यांनी हरिहर व बुक्क या दोन सरदारांना शुद्ध करून हिंदू धर्मात परत घेतले आणि त्यांच्या सहाय्याने विजयनगरचे राज्य स्थापन केले. या राज्याचे विद्यारण्य तीस वर्षेप्रधानमंत्री होते. त्यानंतर वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. वेदान्ताचे तत्वज्ञान विशद करून सांगणार्‍या पंचदशी या ग्रंथाची रचना विद्यारण्यांनी केली. या ग्रंथातील एका कथेमध्ये सुवर्णाच्या पावसाचा उल्लेख आहे. या कथेनुसार एका विद्वान ब्राम्हणाने आपले जन्मजात दारिद्र्य नष्ट करण्याच्या उद्देशाने लक्ष्मीमातेची आराधना करण्यास प्रारंभ केला. परंतु अनेक वर्षेतप करूनही त्याला लक्ष्मी प्रसन्न झाली नाही. अखेर त्याने संन्यास घेण्याचे ठरविले. योग असा की, त्याने ज्या क्षणी संन्यास घेतला त्याच क्षणी लक्ष्मी प्रसन्न झाली आणि ती ब्राम्हणाला म्हणाली, वत्सा तुला काय हवं ते मागून घे. ब्राम्हणाने स्पष्टपणे सांगितले की, माते, मी आता संन्याशी झालो आहे. मला संन्याशाला आता कशाचीही अपेक्षा नाही. परंतु लक्ष्मी देवीने फारच आग्रह केला तेव्हा ब्राह्मणाने तिला या भूमीवर सोन्याचा पाऊस पाडण्याची विनंती केली. (इथे सोन्याचा पाऊस हे शब्द लाक्षणिक अर्थाने घ्यावयाचे आहेत. भरपूर जलवृष्टी घडवून आण की, ज्यातून ही भूमी सुजलाम् सुफलाम् होऊन इथल्या सर्वजणांना सुबत्ता प्राप्त होईल असा ब्राह्मणाच्या सूचेनचा गर्भीत अर्थ आहे.)

कर्नायक, आंध्र, तामिळनाडू या भागातील ‘सात भगिनींचे महात्म्य तेथील लोकांच्या पूजनविधीमध्ये आढळून येते. देवीसंप्रदायातील स्त्रीचे महात्म्य दर्शविणारा हा विधी असतो. शेतीचे सुफलीकरण, पाऊस पाडणे, रोगांचे निवारण करणे इत्यादी कामे या देवतास्वरूप सात बहिणींकडे असतात. या देवतांची स्त्री उपासक(पुजारीणी) आपल्या मंत्र सामर्थ्याने गोष्टी घडवून आणतात अशी भाविकांची श्रद्धा असते. कालांतराने मातृसत्ताक संस्कृती मागे पडून तिची जागा पुरूषप्रधान संस्कृतीने घेतली. या काळात धार्मिक विधी हळूहळू स्त्रियांकडून पुरूषांकडे आले. मध्यंतरीच्या कालखंडात पुरूषांना या क्षेत्रात पाऊल टाकताना ‘स्त्री’ बनूनच यावे लागे. प्रारंभी तर पुरूषाला पौरूषाचे खच्चीकरण करून घेऊन खरोखरच स्त्री बनावे लागे. आपल्याकडील देवीचे पुरूष पुजारी ‘स्त्री’ बनूनच देवीची पूजा करू शकतात. उदा.यल्लमा संप्रदाय. देवीच्या स्त्री वेशधारी पुरूष पूजकांना विशिष्ट दैवी सामर्थ्य प्राप्त झालेले असते असा एक समज सर्वत्र रूढ आहे. पण तो सपशेल खोटा आहे. या दैवी पूजकांना कोणतेही अद्भूत सामर्थ्य प्राप्त झालेले नसते. तसेच युवतीने देवीची नग्नपूजा केल्यास पैशांचा पाऊस पडणे, लक्ष्मी मातेच्या आशिर्वादाने सोन्याचा पाऊस पडणे इत्यादी सर्व काही केवळ अंधश्रद्धा होत. पर्जन्यवृष्टी होणे किंवा न होणे हे पर्जन्ययाग किंवा तत्सम अनुष्ठान व कर्मकांडावर अवलंबून असत नाही. हवामान, शास्त्रातील वैज्ञानिक संशोधनानुसार परिसरामध्ये योग्य प्रकारचे हवामान निर्माण झाल्याशिवाय पर्जन्यवृष्टी होणार नाही, असे वातावरण कृत्रिमरित्या निर्माण करून अवर्षणग्रस्त भागामध्ये पाऊस पाडण्याचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत.

यज्ञेश्वर निगळे