Categories
चिकित्सा

एस.एस.सी.बोर्डाचे नमो नम:

जून – २०१४

एस.एस.सी.बोर्डाच्या या वर्षीच्या संस्कृत 100 गुणांच्या पेपरमध्ये भाषांतरासाठी मनुस्मृतीमधला स्त्रियांसंबंधीचा बदनाम झालेला श्लोक देण्यात आला आहे.

पिता रक्षति कौमारे, भर्ता रक्षति यौवने।
पुत्राश्च स्थाविरे भावे, न स्यी स्वातन्त्र्यमर्हति॥

कुमारी असताना पिता रक्षण करतो, यौवनात पती रक्षण करतो, आणि वृद्धावस्थेत पुत्र रक्षण करतात, स्त्री स्वातंत्र्यास लायक-पात्र-अर्हताधारक नाही.

हा श्लोक पाठ्यपुस्तकातील नाही. पाठ्यपुस्तकाबाहेरील वाङ्मयही विद्यार्थ्यांनी अभ्यासावे, म्हणून प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे विचारले जातात.

विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील अभ्यासही करणे गरजेचे आहे; पण तो कोणता अभ्यास असावा हे बोर्डाला अभिप्रेत आहे? शिक्षकांनीही पाठ्यपुस्तकांबाहेरील काही उदाहरणे विद्यार्थ्यांना द्यावीत हे योग्यच आहे. पण ती उदाहरणे काय असावीत? पालकांनी मुलांना पूरक अभ्यासासाठी कोणत्या ग्रंथांची निवड करावी?

प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या एका प्रश्नाने वरील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, ती म्हणजे मनुस्मृती.

पाठ्यपुस्तकात ‘सुभाषित माला’ दिली आहे. त्यातील श्लोक भाषांतरासाठी दिले जातात. त्यांना हा मनुस्मृतीमधील श्लोक पर्यायी प्रश्नात आहे. या श्लोकाचा समावेशही सुभाषितांमध्ये करायचा आहे का? प्रत्यक्षात ‘संस्कृत सुभाषित सरिता’ या पुस्तकाच्या पान नं.55 वर सुभाषित म्हणूनच या श्लोकाचा उल्लेख आहे. संस्कृत पुस्तक लेखकांची मनोवृत्ती यातून स्पष्ट होते. त्यांनी श्लोकाचा अर्थ देताना पुढे पुष्टी जोडली आहे-

“न स्त्री स्वातन्त्र्यम अर्हति।’ म्हणजे ‘स्त्रिया स्वतंत्र होण्यास पात्र नाहीत’ असा अर्थ केला जातो, तो चुकीचा आहे. तिचे रक्षण न करता, तिला एकटी सोडणे योग्य नाही, असा खरा अर्थ आहे. रक्षण करणे म्हणजे रखवालदारी करणे, पाळत ठेवणे, असा अर्थ नाही.”

मनुस्मृतीचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नात अर्थाची किती तोडमोड केली जाते, आणि कुप्रसिद्ध वाक्याला सुभाषिताचा दर्जा दिला जातो, याचे हे उदाहरण आहे. ‘खरा’ अर्थ पाहायचा असेल तर मागचा पुढचा संदर्भ वाचावा.

हा श्लोक मनुस्मृतीच्या 9 व्या अध्यायातील आहे. अध्यायाच्या सुरवातीस भृगु ऋषी म्हणतो- ‘धर्मास हितकर असलेल्या मार्गामध्ये राहाणार्‍या पती व पत्नी यांचे एकत्र असताना व वियुक्त असताना आचरण करावयाचे परंपरा प्राप्त नित्य धर्म मी सांगतो.’ 1.अस्वतन्त्र स्त्रिय: पुरूषै: स्वैर्दिवा निशम्। विषयेषुच सज्जन्त्य: संस्थाप्या आत्मनो वशे। भाषांतरकार अर्थ सांगतात-

‘पिता, भ्राता इत्यादी स्त्रियांच्या आप्तानी स्त्रियास सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. शास्त्राने ज्यांचा निषेध केलेला नाही अशा रूपरसादि सामान्य विषयांमध्येही त्या आसक्त होऊ लागल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे.’ थोडक्यात म्हणजे त्यांना ‘मुठीत ठेवा अन्यथा त्या स्वैर वागतील.’ त्या पुढचा दुसरा श्लोक आहे “….न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति।”

पुढेही असेच श्लोक आहेत. 8 व्या श्लोकात भृगु म्हणतो- ‘या दढशं भजते ही स्त्री सुतंसूते तथाविधम्। तस्मात्प्रजाविशुध्द्यर्थं स्त्रियं रक्षे त्प्रयत्नलात: – म्हणजे स्त्री जशी शास्त्र विहित अथवा निषिद्ध पुरूषाचे सेवन करिते तसा तिला उत्कृष्ट किंवा निकृष्ट पुत्र होतो. यास्तव विशुद्ध अपत्ये व्हावी. म्हणून पत्नीचे मोठ्या प्रयत्नाने रक्षण करावे.”

9. प्रतिबंधादि बलात्काराने स्त्रीचे रक्षण करण्यास कोणीही समर्थ नसतो. परंतु या पुढील उपायांनी त्यांचे रक्षण करता येते.

10. धनसंग्रह करणे, त्याचा विनियोग करणे, द्रव्य व शरीर यांस शुद्ध करणे, स्वयंपाक करणे व शय्या, आसन, पात्रे, इत्यादी गृहातील उपकरणांची देखरेख करणे या कामामध्ये तिला लावावे. 11. आप्त व आज्ञा करणारे पुरूष यांनी स्त्रियांस गृहामद्ये कोंडून जरी ठेविले तरी त्या सुरक्षित रहात नाहीत. तर धर्मज्ञानाच्या योगाने ज्या आपले आपणच रक्षण करतात त्याच सुरक्षित राहतात.

स्त्रियांना ‘चूल आणि मूल’ एवढ्याच कार्यक्षेत्रात त्यांचे ‘रक्षण’ करण्याच्या उद्देशानेच बंद करण्यात आले. त्याच्या जोडीला उपास-तपास, पूजा-अर्चा अशा धर्मकार्यात गुंतवण्यात आले.

स्त्रिया या दुर्जनच-व्यभिचारीच असतात असा अत्यंत विकृत दृष्टिकोन भृगू ऋषीने पुढील काही श्लोकांमध्ये मांडला आहे.

13. ह्या सुंदर रूप पाहात नाहीत व यांचा यौवनादि वयाविषयीही आदर नसतो. तर सुरूप किंवा कुरूप कसाही जरी असला तरी तो पुरूष आहे एवढ्याच कारणाने त्या त्यांचा भोग घेतात.

14. पुरूषांस पाहाताच संभोगाविषयी अभिलाषा उत्पन्न होणे, हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांचे चित्त स्थीर नसल्यामुळे व स्वभावत: त्या स्नेहशून्य असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रयत्नाने जरी रक्षण केले तरी व्याभिचाराचा आश्रय करून त्या पतीच्या विरूद्ध जातात.

18. तथाच श्रुतयो बह्यो निगीता निगमेष्वपी। स्वा लक्षण्य परिक्षार्थं तासां श्रुणुत निष्कृतीः।

व्याभिचार शिलत्व हा स्त्रियांचा स्वभावच आहे. या म्हणण्यास श्रुती प्रमाण देतात. तशा प्रकारच्या अनेक श्रुती वेदात आढळतात.

स्त्रियांसंबंधीची भृगुऋषीची विकृती पुढे मुलाला स्वत:च्या आईला व्याभिचारी म्हणवून प्रायश्चित्त घ्यायला-प्रार्थना करायला लावते.

19 व्या श्लोकात तो म्हणतो- 19.यन्मे माता प्रलुलुभे विचरन्त्या पतिव्रता। तन्मे रेत: पिता वृक्तामित्य स्त्रैतन्नि दर्शनम्। म्हणजे – कोणी एक पुत्र मातेचा व्याभिचार ओळखून म्हणतो, “मन, वाणी व शरीर यांच्या योगाने पतिव्यतिरिक्त पुरूषाची जी इच्छा व्यक्त करीत नाही ती पतिव्रता होय. व अशी जी नाही ती अपतिव्रता माझी माता होत्साती दुसर्‍याच्या गृही जाऊन परपुरूषाचा लोभ करिती झाली. यास्तव परपुरूषाच्या संकल्पामुळे दुषित झालेले मातेचे रज माझा पिता शुद्ध करो” हे स्त्रियांच्या व्याभिचारशीलत्वाचे निदर्शक आहे.

पुरूषी वर्चस्व व वर्णवर्चस्व टिकवणे एवढ्याच उद्देशाने मनुस्मृतीची निर्मिती झाली आहे. या मनोविकृतीमुळे प्राचीन काळापासून स्त्रियांचा छळ केलेला दिसतो. त्यांना ज्ञान-धन आणि मानापासून वंचित ठेवण्यात आले. त्यांचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढेच ठरवले.

रावणाच्या घरी राहिली म्हणून सीतेला अग्निदिव्य करावे लागले. त्यानेही समाधान झाले नाही म्हणून रामाने तिला गरोदर असतानाच वनात सोडले. अहिल्या शिळा बनली. परशुरामाने तर स्वत:च्या आईचा खून करण्याचा आदर्श ठेवला. बालविवाह, विधवांचे केशवपन आणि सती प्रथेच्या नावाखाली स्त्रियांना जिवंत जाळणे हाच धर्म बनला.

आजही काडीचा पुरावा नसला तरी केवळ संशयावरून स्त्रीच्या चारित्र्याबद्दल संशय घेतला जातो. अत्याचाराबद्दल पीडित मुलीलाच दोषी ठरवले जाते. अध्यात्मिक बुवा यात सर्वात पुढे असतात.

स्त्री शूद्रातिशूद्रांसाठी ज्ञानाची कवाडे उघडणार्‍या म.फुलेंनी मनुस्मृती जाळण्याच्या लायकीची ठरवली तर डॉ.आंबेडकरांनी ती जाहीरपणे जाळली. तरीही संधी मिळताच मनुस्मृतीचे उदात्तीकरण करणारे महाभाग आहेतच.

निदान त्यांना शिक्षणव्यवस्थेपासून दूर ठेवण्याची गरज आहे.

अनिल चव्हाण

लेखक संपर्क : मोबा.नं.9764147483