‘रमेश गावस’ हे गोव्यातील पर्यावरणक्षेत्रातील एक महत्वाचं नाव. ‘खाण विरोधी आंदोलन’ म्हटलं की त्यांचंच नाव पुढे येतं. त्यांच्यासारख्या पर्यावरणवाद्यांच्या प्रयत्नांमुळे आज सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील सर्वच खाणींवर बंदी आणलीय. गोव्यातील खाणमालक त्यांच्यावर इतके संतापलेत की, त्यांनी गावस सरांवर हल्ला करण्याचे प्रयत्न केलेत. परंतु गावस सर अजिबात विचलित न होता सातत्याने टक्कर देत आहेत. 1 जूनला निवृत्त झालेले गावस सर तरूणाच्या उमेदीने काम करत आहेत.
आज जरी ‘गावस सर’ पर्यावरणप्रेमी म्हणून ओळखले जात असले तरी ते पूर्वी ‘राष्ट्र सेवा दला’चे कार्यकर्ते, समतावादी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. गोव्यात अंनिसच काम सुरू होण्यापूर्वी अनेक वर्षे अगोदर म्हणजे 1978 पासून ते अंधश्रद्धाविरोधी काम करत आहेत. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी ते जोडले गेले आहेत. आणि हे करत असताना आणिबाणीचे प्रसंगही त्यांच्यावर आले आहेत.
गोव्याच्या सामाजिक जीवनावर मोलाचा ठसा उमटवणार्या गावस सरांशी केलेली ही बातचीत.
मी : सर, तुम्ही शिक्षक आहात. शाळेचं काम सांभाळून राष्ट्रसेवादलात, सानेगुरूजी कथामाला तुम्ही करत होता. पण पर्यावरणरक्षणासारख्या क्षेत्रात तुम्ही कसे उतरला?
गावस सर : पर्यावरणाच्या क्षेत्रात मी सगळ्यात आधीपासून आहे. लहानपणापासून मला झाडं, जंगल, डोंगरदर्या हे सर्व आवडतं. तुम्ही कधी हिरवळीवरून वाहत जाणारं पाणी पाहिलंय? खाली हिरवळ आणि वरून नितळ पाणी वाहतंय हे दृश्य मला खूप आवडतं. पहिल्या पावसात भिजलेला गुलमोहर. त्याच्यावर ढगांच्या आडून हळूच पडणारी सूर्यकिरणं. गुलमोहराच्या फुलांच्या खालच्या हिरवळीवर पडणार्या पाकळ्या, संध्याकाळच्या वेळचं रिमझिम पाऊस, गुलमोहराच्या हिरवळीवर पडणार्या पाकळ्या हे दृश्य आजदेखील मी न चुकता बघतो आणि या मखमली आठवणी मनाच्या कप्यात अलगद जपून ठेवतो.
डोंगरदर्यांमध्ये भटकण्याचं मला लहानपणापासून वेड. 9 वी असताना मी गिर्यारोहणाचा पन्हाळ्याचा कँप केला. त्यावेळी कांचनगंगा शिखर सर केलेली व्यक्ती आम्हाला प्रशिक्षक म्हणून होती.
लहानपणी, वाहणारं पाणी, कुळागारं यांची ओढ नंतर सुटत नसते.
पर्यावरणाचा र्हास लक्षात आल्यामुळे पर्यावरण रक्षणाकडे वळणं क्रमप्राप्त होतं.
प्रश्न : सर, गोव्याबाहेरचे लोक गोव्याला निसर्ग संपन्न मानतात. गोव्यातील हिरवेगार डोंगर आणि नयनरम्य समुद्र किनारे बघायला येतात. मग अशा गोव्यात पर्यावरण रक्षणाची गरज का उभी झाली?
गावस सर : गोवा निसर्गसंपन्न आहे. निसर्गाने आम्हाला भरभरून दिलंय. पण गोव्यातील डोंगरांच्याखाली खनिज आहे. ते काढायचे म्हणजे जंगलतोड आली, डोंगर खणणं आलं. पर्यटक गोव्यातील समुद्रकिनार्याच्या भागात येतात आणि खनिज काढण्याचे उद्योग हिंटरलँड म्हणजे आतल्या भागात चालतात. त्यामुळे गोवा फिरायला आलेल्या लोकांना ते सहजासहजी दिसत नाही.
आता शहा कमिटीने पस्तीस हजार कोटीचा घोटाळा झाल्याचं सांगितलं आणि सुप्रिम कोर्टाने गोव्यातील मायनिंग उद्योगावर बंदी घातली म्हणून या प्रश्नाची गोव्याबाहेर देखील चर्चा सुरू झाली.
तथापि खाण क्षेत्रात असलेल्या लोकांना याचे दुष्परिणाम खूप अगोदरपासून भोगावे लागत होते.
प्रश्न : खाणी या गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हटलं जातं. आणि कोणताही उद्योग म्हटलं की त्याचे थोडेफार दुष्परिणाम असणारंच असं म्हटलं जातं. या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता?
गावस सर : माझा स्पष्ट प्रश्न आहे, ‘तुम्हाला खाणी हव्या की पाणी?’ कारण नजीकच्या भविष्यात ‘पाण्याचा प्रश्न’ गोव्याच्या पुढ्यात अक्राळ विक्राळ स्वरूपात उभा राहणार आहे. गोव्याला पाणी पुरवठा करणारे ओपा, साळावली वगैरे पाण्याच्या स्त्रोतांना खाणींचा विळखा पडला आहे. लोकांना पाण्याला मोताद करून पैसा काय कामाचा?
शिवाय ‘गोव्यातील खाण व्यवसाय हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.’ हा खाण मालकांनी चालवलेला अपप्रचार आहे. सरकारी आकड्यांनुसार अकरा हजार कायमस्वरूपी कामगार खाणीवर काम करतात आणि तेवढेच कंत्राटी कामगार आहेत.
अर्थव्यवस्थेबाबतही अनेक अंधश्रद्धा असतात. त्या हेतुपुरस्सर पसरविल्या जातात. गंमतीची गोष्ट म्हणजे धार्मिक अंधश्रद्धांना आव्हान देणारा माणूसदेखील या आर्थिक अंधश्रद्धांना सहज बळी पडू शकतो.
खाणींमुळे स्थानिक जनतेचा आर्थिक विकास होतो, त्यांना रोजगार मिळतो हे जर खरं असेल तर खाणक्षेत्रातील जनतेकडे पैसा यायला हवा होता. बँकेतील बचतीवरून हे सहज लक्षात येतं. गोव्यातील दरडोई बँकेतील बचत 1,83,000 असताना खाणक्षेत्र असलेल्या डिचोली तालुक्यात बँकेतील दरडोई बचत 22,000 रूपये सत्तरी तालुक्यातील दरडोई बचत 11,000 रूपये, केपे तालुक्यातील 40,000 रूपये तर सांगे तालुक्यातील 12,000 रूपये आहे. म्हणजे संपूर्ण गोव्याच्या तुलनेत आर्थिक विकास झाला नाही, हे स्पष्ट होतं.
दुसरं असं की, खाण व्यवसाय येण्याआधी येथील लोक शेती बागायतीच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून होते. खाणीची अर्थव्यवस्था आल्यानंतर, शेतीबागायतीची अर्थव्यवस्था नाहीशी झाली. खाण अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य असं की, तिला ठराविक आयुष्य असतं. तुम्ही डोंगर खणून खनिज काढलंत, तर पुन्हा तिथे खनिज तयार होणार नाही. तुम्हाला दुसरा डोंगर खणायला पाहिजे. म्हणजे खाण कॅन्सरसारखी पसरत जाते. ती नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाहीसे करते म्हणजे त्या भागात पुन्हा शेती अर्थव्यवस्थेकडे जाणे अशक्य करते.
प्रश्न : पण आज आपल्या देशाला लोहखनिजाची गरज आहे. तुम्हीपण लोखंडाच्या वस्तू वापरता, मग हा विरोध कसा काय करता?
गावस सर(हसून) : गोव्यातलं खनिज निर्यात होतं, त्यामुळे देशाला लोखंडाची गरज आहे म्हणून खाण उद्योग हवा हा मुद्दा निकाली निघतो.
पण आणखी पुढे जाऊन सांगेन की, मी लोखंडाच्या वस्तू न वापरता सुद्धा जगू शकतो पण ऑक्सिजनशिवाय आणि पाण्याशिवाय नाही. त्यामुळे ‘खाणी की पाणी’ हा प्रश्न आहे. मला वाटतं तुम्ही याचं उत्तर पाणी हेच द्याल.
प्रश्न : उद्या पाण्याचं संकट येईल. पर्यावरणाचं संकट येईल असं तुम्ही म्हणता. पण आज जगणं कठीण असताना खाणी हव्यात असं गोव्यातील कामगार सांगताहेत, त्याचं काय?
गावस सर : कामगारांची हेतुपुरस्पर दिशाभूल होतेय. पण तो मुद्दा आपण तूर्त बाजूस ठेवू. समजा, गेल्या शतकात जर आमच्या पूर्वजांनी खनिज काढलं असतं तर आज काय परिस्थिती झाली असती?
उद्याचं कोणी बघितलंय असं म्हणता येणार नाही. आम्ही आमच्या मुलांची लग्नं करतोय, भावी पिढीला जन्म देतोय, तर आम्हाला त्यांचा विचार करावाच लागेल.
प्रश्न : पर्यावरणीय प्रश्न आज अनुत्तरीत वाटत असले तरी उद्या त्यावर काही उपाय निघेल ना. शिवाय, विकसनशील देशांचा विकास होऊ नये म्हणून ‘पर्यावरणाचा प्रश्न’ हा विकसीत देशांनी केलेला बागुलबुवा आहे, याबाबत तुमचे काय मत?
गावस सर : मी उंचावरून उडी मारली म्हणून काय झालं, फ्रॅक्चर झालं, तर आर्थोपेडीक सर्जन आहे, असं आपण म्हणतो का? पर्यावरणीय प्रश्नावर उपाय निघेल असं म्हणणं हा भाबडा आशावाद आहे. दुसरं असं की, पर्यावरणाचा नाश करणारा वर्ग आणि त्याचा भुर्दंड भरावा लागणारा वर्ग हे दोन्ही वेगवेगळे आहेत. खाण मालकाच्या कुटुंबियांना काही आजार झाल्यास ते हेलिकॉप्टरने जगाच्या कानाकोपर्यात पोचू शकतात. पण खनिज वाहतूक करणार्या डंपरखाली जे अनेकजण मेले त्यांचे काय? आजूबाजूचे शेतकर्यांची शेती नापीक बनली त्यांचे काय? हवेच्या प्रदूषणामुळे ज्यांना कायमचे फुप्फुसाचे आजार जडले त्यांचे काय?
‘पर्यावरणाचा प्रश्न’ हा विकसित देशांनी उभा केलेला बागुलबुवा आहे, असे म्हणणे ही वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे. पर्यावरणात झालेले बदल ग्लोबल वॉर्मिंगच्या रूपात जसे दिसतात, तसे स्थानिक पातळीवर देखील दिसतात. खाणींच्या बाबतीत तर हे अगदी स्पष्ट आहे. गोव्यात पाण्याचे प्रश्न बिकट झालेत. शिरगाव हे गोव्यातील खाणींनी वेढलेले गाव. या गावात पाणी इतके मुबलक होते की, या गावाचा जत्रोत्सव ऐन वैशाखात असतो. या गावातील देवीच्या भक्तांना धोंड म्हणतात. त्यांच्या स्नानासाठी तळी होत्या. आज हे धोंड पी.डब्ल्यू.डी.च्या पाईपलाईनने पुरवलेल्या शॉवरखाली स्नान करतात. काल्याची तळी कोरडी झाली आहे. कृष्णमूर्तीचे विसर्जन बादलीतल्या पाण्यात करण्याची पाळी आली आहे.
खाणीमुळे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता नाहीशी होते. टोपोग्राफी बदलते. खाणीच्या मातीच्या गाळाने गोव्याच्या नद्या भरल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष आणि पावसाळ्यात पूर अशी अवस्था आहे.
अग्नी शीतल आहे, असे अनेक शहाण्या माणसांनी तर्क देऊन पटवले, तर तुम्ही मानाल का?
प्रश्न : खाणी सुरू व्हाव्यात म्हणून गोव्यातील ट्रेड युनियननी मागणी सुरू केली आहे. त्यांचे म्हणणे गोव्यातील कामगार बेकार होणार आहेत. तुमच्यासारख्या पर्यावरणवाद्यांमुळे त्यांच्यावर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे.
गावस सर : मी साधा कार्यकर्ता. मी किंवा माझ्यासारख्या पर्यावरणप्रेमींनी सांगितलं आणि कोर्टाने पुरावे न बघता खाणी बंद केल्या असं होईल का? गोव्यातील खाण विभाग, महसूल विभाग, पोलीस हे सगळेच खाण समर्थक. गोव्यातील आजपर्यंतची सरकारे पडद्यामागून खाणवलेच चालवतात. अशा परिस्थितीत आमची लढाई सोपी नाही.
गोवा फाऊंडेशन(पर्यावरणक्षेत्रात गेल्या सुमारे 30 वर्षांपासून कार्यरत असलेली संस्था) असो की मी, आम्ही खाण कंपन्यांनी कायद्यांचे उल्लंघन केल्याचे दाखवलेय. न्या.शहांना पस्तीस हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे आढळले. सुप्रीम कोर्टाने पाठवलेल्या केंद्रीय उच्चाधिकार समितीने देखील कायद्याचे उल्लंघन झाल्याचा अहवाल दिलाय. रोजगार बंद होतो म्हणून बेकायदेशीर धंदे चालू द्यायचे का?
त्यापुढे जाऊन मी म्हणेन ट्रेड युनियननी खाण कंपन्यांबरोबर भांडायला हवे. त्यांनी कायदे मोडलेत, त्यांनी पस्तीस हजार कोटी महसूल चुकवला. जेव्हा खाणीवर बंदी नव्हती, तेव्हा खाण कंपन्या कामगारांशी कशा वागत होत्या? खाणीवर कायमस्वरूपी कामगार ठेवायचे सोडून कंत्राटी कामगार ठेवत नव्हत्या का? वेतन करार करताना कामगारांना योग्य पगारवाढ देत होत्या का? कामगार कायदे पाळत होते का?
ट्रेड युनियन कशाच्या विरोधात रस्त्यावर येत आहेत? सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीच्या विरोधात. पण त्यांनी खाणीवरच्या कंत्राटी कामगारांबाबत, बार्जवरच्या(बोटीवरील) कामगारांबाबत काय भूमिका घेतली आहे.
ट्रेड युनियन बार्ज ओनर्स असोसिएशन, डंपर ओनर्स असोसिएशन यांच्या साथीने आंदोलन करत आहे. कोटी रूपये किंमतीच्या बार्जचा मालक, पंधरा लाख रूपये किंमतीच्या डंपरचा मालक आणि पाच-सहा हजार रूपये महिन्याकाठी मिळविणारा कामगार यांचे प्रश्न एक आहेत का? खाण मालकांची बंदूक ट्रेड युनियननी खाण कामगारांच्या खांद्यावर ठेवली आहे.
प्रश्न : पर्यावरणीय प्रश्न सोडून आणखी काही प्रश्न खाणींनी निर्माण केलेत का?
गावस सर : भयानक. सांस्कृतिक प्रश्न. लोकशाहीच्या विरोधातले प्रश्न निर्माण केलेत. गोव्याची संस्कृती ‘सुशेगात’ शांतीप्रिय पण खाण उद्योगाने भावाला भावाविरूद्ध उभे केले. गावात दुफळी माजवली. तक्रार करणार्याला दहशत दाखवणं, बोलू न देणं हे प्रकार झालेत. न्या.शहांच्या पुढ्यात आम्ही जाऊ नये म्हणून आमची अडवणूक करण्यात आली होती. खाणउद्योगाने लोकांना पैशाचं व्यसन लावलं.
मडगावला परवाच हल्ला करण्याचा झालेला प्रयत्न तुम्हाला ठाऊक आहे.
प्रश्न : याची भीती नाही वाटत?
गावस सर(मोठ्याने हसले) : मी स्ट्रॅटेेजिकली काम करतो. त्यांना संधी देत नाही. ते बाऊंसर आणून दहशत दाखवतात. पण मी कायद्यात राहून प्रश्न करतो. त्यामुळे त्यांना काही करत येत नाही. 1986-87 मधली गोष्ट सांगतो. खाणीच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर चिखल झाला होता. हे नेहमीचंच झालं होतं. मी एक मोठा दगड रस्त्याच्या मधोमध ठेवला आणि बसून राहिलो. दोन तास एकट्याने किल्ला लढवला. संध्याकाळपर्यंत हजार माणसं जमली. पण त्यात आंदोलनाला वेगळं वळण देणारे होते. कंपनीने रस्त्यावर आपली जीप आणून उभी केली. कोणीतरी जीपवर दगड मारण्याचा प्रयत्न केला. मी जीपवर जाऊन बसलो. त्यामुळे दगडफेक आपोआप थांबली. तो विषय बाजूला नेण्याचा आणि मला अडकवण्याचा डाव होता.
1997 ला ‘मये’गावातलं तळं वाचवण्यासाठी, 1991 मध्ये लामगावातील खाण विरोधी, 2003 मध्ये डेंपो कंपनीच्या पाच खाणींविरोधातल्या संघर्षासाठी उतरावे लागले. पूर्वी पर्यावरण विषयक जनसुनवाई राजधानी पणजीत होई. 2003 मध्ये पहिल्यांदाच ती खाणीच्या ठिकाणी घ्यायला लावली. संघर्ष करतानाच संघर्षासाठी मुद्दे मिळाले. खाणविषयक कायद्याचा अभ्यास झाला. मी ज्या गावातल्या शाळेत शिकवतो, त्या सर्वण गावातील खाणविरोधातली केस आम्ही 2011 मध्ये उच्च न्यायालयात जिंकलो. पूर्वी लोक खाणीच्या विरोधात बोलायला भीत असत. बर्याचजणांना हा प्रश्न कळला नव्हता. या प्रश्नाला लोकांच्या पुढ्यात न्यायला आम्ही यशस्वी झालो. गोव्यातील पर्यावरणवाद्यांचा खाणविरोधी लढा लवकर संपणार नाही. तो दीर्घकाळ चालू रहाणार. रमेश गावस सरांमुळे तो गोव्यातील पुरोगामी चळवळीला जोडला गेलाय. 1 जूनला गावस सर औपचारिक शिक्षकी पेशातून रिटायर्ड झालेत. त्यांच्या भाषेत सांगायचं तर ‘अधिक व्यस्त व्हायला मी मोकळा झालोय.’
-मुलाखतकार : डॉ. रूपेश पाटकर