Categories
आरोग्य शिक्षण

पाठ्यपुस्तकांमधून आरोग्यविषयक चुकीचे शिक्षण!

जुलै - २०१३

            शालेय पाठ्यपुस्तकातून मुलां-मुलींना आरोग्यविषयक शास्त्रीय माहितीची तोंड-ओळख व्हावी व आरोग्यविषयक शास्त्रीय दृष्टिकोन रूजायला मदत व्हावी अशी रास्त अपेक्षा असते. त्यासाठी पाठ्यपुस्तकातील आरोग्य-विषयक माहिती अचूकच असली पाहिजे. परंतु महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ निर्मित एक पाठ्यपुस्तक काही निमित्ताने पाहण्यात आले तेव्हा लक्षात आले की, त्यातील आरोग्य-विषयक माहितीत अनेक चुका आहेत. म्हणून ‘सामान्य विज्ञान’ या विषयाची इतर क्रमिक पुस्तके तपासली. तेव्हा आढळले की, या पुस्तकांमधील आरोग्य विषयक काही धड्यांच्या विषयांची निवड सदोष आहे. उदा. 5 वी च्या पुस्तकात इतर इयत्तांच्या मानाने आरोग्यावर सर्वात जास्त म्हणजे सहा धडे(45 पाने) आहेत. तर 6 वी आणि 8 वी साठी प्रत्येकी एकच धडा आहे. (एवढी तफावत का हे कळत नाही) 5 वी ते 10 वीच्या धड्यात पचन-संस्था तीनदा, आहारशास्त्र दोनदा शिकवले जाते. पण व्यायामाचे तीन मुख्य प्रकार, यांचे महत्व यांचा एकदाही उल्लेखही नाही! दुसरे म्हणजे काही ठिकाणची माहिती चुकीची आहे. त्यापैकी काही चुका पाहू या म्हणजे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. त्यातल्या त्यात 5 वीच्या पुस्तकातील धडे जास्त अर्थवाही, उपयोगी व कमी चुका असणारे आहेत. त्यातील चुका आधी पाहू-

लेखकांना प्राथमिक ज्ञानही नाही!

            ‘आहार’ हा धडा पान क्र.16 वर विद्यार्थ्यांना सांगतो- “तांदुळ, गहू, ज्वारी, बाजरी यांच्यामध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते…. पालेभाज्यांपासून आपणास क्षार व जीवनसत्वे मिळतात.” या विधानात धान्याचा प्रकार(पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, पालेभाज्या) व त्यातील पोषण-घटक(कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे) यात गोंधळ केला आहे. खरे तर तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी इत्यादीचा समावेश ‘पिष्टमय पदार्थ’ या धान्याच्या प्रकारात केला जातो आणि त्यांच्यामध्ये कर्बोदके(कार्बोहायड्रेटस्) या पोषण-घटकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शास्त्रीयदृष्ट्या बरोबर वाक्य असे हवे-“धान्यांपैकी तांदुळ, गहू, ज्वारी, बाजरी अशा तृणधान्यांमध्ये कर्बोदकांचे प्रमाण अधिक असते.” दुसरे म्हणजे जीवनसत्वाबाबतच्या वरील विधानावरून विद्यार्थ्यांचा गैरसमज होईल की फक्त पालेभाज्यांमधूनच जीवनसत्वे मिळतात. प्रत्यक्षात तृणधान्ये, कडधान्ये, फळे यातूनही कमी-अधिक प्रमाणात जीवनसत्वे मिळतात. शास्त्रीयदृष्ट्या बरोबर वाक्य असे हवे- “पालेभाज्या व फळे यांच्यामध्ये क्षार व जीवनसत्वे अधिक प्रमाणात असतात.”

            पान क्रमांक 10 वर असेच अशास्त्रीय विधान आहे- “साजूक तूप, काजू, बदाम यासारखे महागडे पदार्थ खाल्ले तरच शरीराचे उत्तम पोषण होते असे अनेकांना वाटते; परंतु निव्वळ पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने शरीराच्या सर्व गरजा भागत नाहीत. त्यापेक्षा वेगवेगळी फळे, पालेभाज्या, शेंगदाणे, फुटाणे, डाळी, कडधान्यांच्या उसळी यातूनही आपल्या शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक मिळतात.” खरं तर आहार शास्त्राच्या दृष्टीने साजूक तूप, काजू, बदाम, इत्यादी पदार्थ हे शेंगदाणे, फुटाणे, कडधान्ये, सोयाबीन यापेक्षा सरस नाहीत. पण काजू, बदाम हे खास ‘पौष्टिक’ आहेत असा पारंपारिक गैरसमज लेखकांच्या मनात दडलेला असावा म्हणून हा गैरसमज घट्ट करणारे वाक्य इथे आले आहे!

            ‘अभावजन्य विकार’ या विभागात जीवनसत्वांच्या कमतरतांमुळे होणार्‍या आजारांचाच फक्त विचार केला आहे. कर्बोदके, प्रथिने यांच्या कमतरतेमुळे भारतातील निम्म्याहून जास्त मुले, सुमारे 40% स्त्रिया व 25% पुरूष ग्रस्त आहेत. तसेच आहारात लोह कमी असल्याने होणार्‍या अ‍ॅनिमिया उर्फ रक्तपांढरीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. कॅल्शियमच्या कमतरतेचे प्रमाणही खूप आहे. पण त्यांचा उल्लेखही इथे केलेला नाही. त्यामुळे अभावजन्य आजार म्हणजे फक्त ‘जीवनसत्वांच्या अभावी होणारे आजार’ असा मर्यादित व चुकीचा समज विद्यार्थ्यांचा होईल.

            रातांधळेपणा, मुडदूस इ.आजार झाल्यास त्यावर उपाय म्हणून संबंधित जीवनसत्वे जास्त प्रमाणात असणार्‍या पदार्थांचा आहारात समावेश करावा असे पान क्र.19 वरील तक्त्यात म्हटले आहे. रातांधळेपणा, मुडदूस इ.आजार झाल्यास उपचार म्हणून डॉक्टर संबंधित जीवनसत्वांची मोठी मात्रा असणारी औषधे देतात व त्याला पूरक म्हणून आहारात सुधारणा करायला सांगतात ही प्राथमिक गोष्टही धड्याच्या लेखकांना माहीत नसावी असे दिसते! त्यामुळे ‘रातांधळेपणावर उपचार म्हणून गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या, दूध असे अन्न पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात” अशीही चुकीची माहिती हा धडा विद्यार्थ्यांना देतो!

            ‘रोगप्रतिबंध’ या धड्यात “घटसर्प, गोवर, कांजिण्या झालेल्या रोग्यांना स्वतंत्र जागी ठेवले जाते. त्यांनी वापरलेली भांडी, कपडे जंतुनाशकांनी धुतली जातात.” खरं तर असे करून या आजारांचा प्रसार थांबत नसल्याने कोणी शहाणा डॉक्टर असा सल्ला देणार नाही. पुढच्या पानावर “यात्रेला जाणार्‍यांना कॉलरा प्रतिबंधक टोचली जाते” असे म्हटले आहे. खरंतर अशावेळी सर्वांना कॉलरा लस टोचण्याचा फारसा उपयोग नसल्याने हे बंद केले आहे. या मुद्द्यानंतर त्याच परिच्छेदात ‘हिपॅटायटिस बी’ हा काविळीचा प्रकार टाळण्यासाठीही लस टोचली जाते” असे विधान आहे. “हिपॅटायटिस बी” ही एक प्रकारच्या विषाणूंमुळे होणारी कावीळ कॉलर्‍यासारखी दूषित पाण्यातून पसरत नाही. हे लेखकांना माहीत नसावे. एरवी या लसीचे इथे उल्लेख करायचे कारणच नव्हते.

            ‘प्रथमोपचार’ या धड्यात “डोके व मान या भागांना दीर्घ काळ प्रखर ऊन लागल्यास उष्माघात होतो” असे ठोकून दिले आहे. वास्तवात पुरेसे पाणी व मीठ न घेता कडक उन्हात प्रदीर्घ वेळ काम केल्याने उष्माघात होतो. जुलाब किंवा इतर कारणांनी शोष पडल्यास ‘प्रथमोपचार’ म्हणून घेण्यासाठी जलसंजीवनी बनवताना “एक लिटर पाण्यामध्ये आठ चमचे साखरेसोबत अर्धा चमचा मीठ घालावे” असे म्हटले आहे. खरं तर “पाऊण चमचा मीठ व शक्यतो पाव चमचा खायचा सोडा घालावा” असे हवे.

            सर्पदंशावरील प्राथमिक उपचारांची माहितीही चुकीची व कालबाह्य आहे. त्या सोबतचे आवळ-पट्टीचे चित्रही चुकीचे आहे. आता शास्त्रीय पद्धतीने उपचार करताना साप चावलेल्या जागी कोणताही उपचार केला जात नाही. सलग खूप वेळा एका ठिकाणी स्थिर उभे रहावे लागणार्‍यांच्या (उदा.पोलीस, नर्सेस) पायाला ज्या पद्धतीने कापडाची पट्टी गुंडाळतात त्या पद्धतीने साप चावलेल्या भागाच्या वर कापडाची पट्टी बांधायची असते. “आवळ-पट्टी”चा फायदा होत नाही, उलट नुकसान होऊ शकते.

म्हणे इन्सुलिन पाचकरस आहे!

            ‘सामान्यविज्ञान’च्या 7 वीच्या पुस्तकात पचनसंस्थेची माहिती देताना सोपी आकृती दिली आहे, पण अवयवांना नावेच दिलेली नाहीत! इन्सुलिन हा आंतररस आहे व त्याच्या अभावामुळे मधुमेह होतो हे सर्वश्रुत आहे. पण या धड्यातील तक्त्यामध्ये तो मोठ्या आतड्यातून स्रवतो असे सांगितले आहे!

            ‘आरोग्य व रोग’ या धड्यात ‘तृटीजन्य विकार’मध्ये फक्त जीवनसत्वे व क्षार यांच्या अभावामुळे होणार्‍या आजारांची माहिती आहे. उष्णांक व प्रथिनांच्या अभावामुळे होणारे कुपोषण याचे प्रमाण भारतात खूप आहे. पण या ‘तृटिजन्य विकारांचा’ उल्लेख नाही! ‘लोहाचा अभाव’ या परिच्छेदात “गहू/गूळ आणि हिरव्या पालेभाज्या, खजूर यापासून लोह मोठ्या प्रमाणात मिळते.” असे म्हटले आहे. एकतर मांसाहारी पदार्थात भरपूर व तेही अधिक सरस स्वरूपात लोह असून त्यांचा उल्लेख केलेला नाही. दुसरे म्हणजे गव्हापेक्षा बाजरी, मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, सोयाबीन यात जास्त लोह असून त्यांचा उल्लेख नाही. खजूरामध्ये भरपूर लोह असते असा गैरसमज या ‘तज्ञ’ लेखकांमध्येही रूजला असावा, म्हणून लोह “मोठ्या प्रमाणात” देणारा पदार्थ म्हणून खजुराचा चुकीचा समावेश केलेला दिसतो.

            ‘रोग’ या प्रकरणात संसर्गजन्य आजारांची प्रत्येकी 4 ते 6 लक्षणे दिली आहेत. एकूण 25-30 लक्षणांच्या निरर्थक पद्धतीने दिलेल्या या यादीमुळे संसर्गजन्य आजारांबाबतची समज वाढण्याऐवजी मुलांमध्ये या विषयाची नावड निर्माण होईल! “कांजिण्याबाबत प्रतिबंधक उपाय” या शीर्षकाखाली “वैद्यकीय उपचार करून घेणे” एवढे एकच वाक्य आहे! कांजिण्याच्या साथीमध्ये उपचार घेणे हा प्रतिबंधक उपाय कसा असतो हे लेखकच जाणोत! क्षयरोग व एड्सबाबत माहिती देताना यावर जागतिक आरोग्य संघटनेतर्फे “उत्तम औषधे मोफत उपलब्ध होतात” असे ठोकून दिले आहे. पण ते खरे नाही.

            एकंदरीत पहाता आरोग्य विज्ञानाबाबत मूलभूत माहितीही नसलेल्या ‘तज्ञांनी’ ही पाठ्यपुस्तके लिहिलेली दिसतात. गेली अनेक वर्षेदरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना हे अशास्त्रीय शिक्षण दिले जाते आहे. काही वर्षांपूर्वी ‘बालभारती’च्या विज्ञानाच्या पुस्तकातील अशाच चुकांबाबत लोकविज्ञान संघटनेतर्फे संबंधित अधिकार्‍यांना भेटून आम्ही सूचना केली होती की, वैद्यकीय महाविद्यालयातील ‘रोग प्रतिबंधक व सामाजिक शास्त्र विभागा’च्या तज्ञ डॉक्टरांकडून पाठ्यपुस्तकातील आरोग्यविषयक धडे तपासून मगच प्रसिद्ध करायला हवे. तसे आश्वासनही मिळाले होते. पण 2005-2006 मध्ये प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातही गंभीर चुका शिरल्या त्यामुळे संघटनेने ‘सकाळ’मध्ये आवाज उठवला होता. पण अजूनही परिस्थितीत सुधारणा नाही!

            दरवर्षी महाराष्ट्रातील हजारो डॉक्टरांची मुले ही पुस्तके अभ्यासात असतील. पण इतक्या प्राथमिक चुका असलेल्या या पुस्तकांबद्दल या डॉक्टर-पालकांपैकी कोणीच तक्रार केली नाही? का तक्रार करून दुर्लक्ष करण्यातआले! यापैकी काहीही असो, ही स्थिती चिंताजनक आहे हे निश्चित.

-डॉ.अनंत फडके