Categories
मानसमित्र

ताण

जुलै - २०१३

            अनपेक्षित, धोक्याचा इशारा देणारी किंवा अप्रिय घटना घडल्यास त्यावेळच्या परिस्थितीबाबत मनात तणाव निर्माण होतो. अपेक्षित, आनंददायक व प्रिय घटनेने शरीर व मनात बदल घडले तरी ते हवेहवेसे बदल असल्याने त्याचा ताण ‘जाणवत’ नाही. नोकरीत बढती मिळाली की, आनंद होतो, त्यातील वाढलेली जबाबदारी व वाढलेली कामे जाणवली की, ताण जाणवतो. संतती प्राप्त झाली की, मन सुखावते, पण ती मुलगी असेल तर थोड्या विचारानंतर मनात आर्थिक व सामाजिक अस्वस्थता येते(ती सर्वांनाच येत नसेल पण अनेकांना येते). बरे, ताण वाटावा अशी घटना घडलीच पाहिजे, असे नाही. ती घडणार या केवळ आशंकेनेही मनात हुरहूर(व स्वभाव चिंता करणारा असल्यास काहूर) माजते. घटनेचा वस्तुनिष्ठ अर्थ समजला पाहिजे, असेही नाही. चुकीचा अर्थ व त्या समजुतीतील चूक कळून आली तरी देखील छातीतले धडधडणे व श्वास कोंडणे चालू राहते.

            म्हणजे खरे तर ताण येत नसतो, आपण मनात केलेल्या विचाराने ताण आणला जातो. आपला आपल्या मनात उमटलेल्या विचारावर विश्वास जेवढा जास्त, तेवढा ताण जास्त वाढतो. कुशंका स्पष्टीकरणावर मात करीत ताण वाढवित रहाते. अनपेक्षित, अप्रिय व धोकादायक काही आपल्याबाबतीत घडूच नये या ठाम इच्छेपायी अस्वस्थ होऊन आपण परिस्थितीतील कितीतरी आशादायक, दिलासा देणार्‍या, ताण कमी करू शकणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कुणी आपल्याला त्या गोष्टी दाखवून दिल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करतो. मनात येणार्‍या शंका त्रासदायक असतात पण त्यानाच मन घट्ट पकडून ठेवते. वाईट होऊ नये असे मनात ठाम वाटत असतानाच तसेच होईल अशा भीतीने मन गांगरते. माणसे ताणाला विवेकी प्रतिसाद देत नाहीत तर प्रक्षुब्ध प्रतिक्रिया देतात. ‘काय होईल’ या प्रश्नाचे भयंकरीकरण करून ‘काय भयंकर होईल’ या विचारांत गुरफटतात. हा ताण मग झपाट्याने शरीरात पसरतो. मग धडधड वाढते, थरथर वाढते, घाम फुटतो, घामाची वाफ होऊन हातपाय गार पडतात, डोक्याला व शरीराला मुंग्या जाणवतात, श्वासोच्छवास तीव्र होत जातो, श्वास अपुरा वाटल्याने छातीत कोंडल्यासारखे होते. स्नायूंवरील ताण वाढल्याने कपाळ आखडते, डोके दुखते, मान व खांदे, पोटर्‍या दुखू लागतात. डोळ्यासमोर घटनेचा आपण लावलेला वाईट अर्थ अंधार आणतो. या सार्‍या ताणप्रक्रियेने मग अंग गळून जाते, थकवा येतो, मनात निराशा दाटते.

            घटना खरोखर वाईट असली तरी तिच्या संभाव्य परिणामांविषयी आपला अंदाज अशावेळी अतिशयोक्तीकडे झुकणारा असू शकतो. साठ टक्के वाईट आता नव्वद टक्के वाईट आहे, असे वाटू लागते. परिस्थितीशी प्रत्यक्षात सामोरे गेल्यावर मात्र ‘वाटले तेवढे काही वाईट नाही’ हे जाणवते. परिस्थितीचा साक्षेपी अंदाज ताण वाढलेल्या स्थितीतील मनाला जमत नसल्याने असे घडत असावे. ताणाचे प्रमाण जास्त असल्यास प्रतिक्रिया चुकते, परिस्थिती अधिक बिघडते व ताण वाढतो, असेही होते. ताण असह्य झाल्यास माणसे मरगळतात व परिस्थितीशी सामना करायचे टाळतात. ‘कशाला लढा, पराभव स्वीकारलेला परवडला’ अशी स्वत:ची समजूत घालतात. उगीच विषाची परीक्षा कशाला पहा असे म्हणत मागे येतात. सर्कशीत पिंजर्‍यातला वाघ जसा रिंग मास्टर काठीने टोचल्यावर गुरगुरत मागे सरकतो, तसे अनेक जण गुरगुरत मागे येतात. काहीजण परिस्थितीतील प्रश्न सोडविण्याचे काम हाती घेण्याऐवजी त्यातल्या त्यात सोपे, कमी कष्टदायक पण थातूरमातूर उपचार करून वेळ मारून न्यायला पहातात. त्याने थोडाकाळ विसावा मिळत असला तरी मूळ प्रश्न सुटत नाही. उलट प्रश्नालाही थोडी विश्रांती मिळाल्याने तोही ताजातवाना होऊन नव्या दमाने अंगावर धावून येतो.

-डॉ. प्रदीप पाटकर