पाडळी, ता.शिराळा जि.सांगली येथे म.ज्योतिराव फुले विचारप्रणित सत्यशोधक वास्तुशांत गृहप्रवेश सोहळा दि.16-5-2013 रोजी संपन्न झाला. पाडळी येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्तेरविंद्र पाटील यांच्या नवीन ‘सू-भीम’ घराचा वास्तुशांत-गृहप्रवेश समारंभ झाला. म.ज्योतिराव फुले यांनी शेतकरी, बहुजन यांची वैदिक विधीतून कर्मकांडामुळे होणारी आर्थिक लुबाडणूक रोखण्यासाठी सत्यशोधक विवाह आणि सत्यशोधक वास्तुशांतीची संकल्पना मांडली. पारतंत्र्यात शिराळा, वाळवा तालुक्यात प्रति सरकारने साधे विवाह, वास्तुशांत समारंभ रूढ केले होते. ‘गांधी विवाह’, ‘गांधी वास्तुशांत’ असे त्यांना नाव होते.
पाडळी येथे पार पडलेल्या सत्यशोधक वास्तुशांत सोहळ्याने गावातील व परिसरातील नागरिक प्रतिष्ठित यांना विशेष वेगळेपण जाणवले. रविंद्र पाटील यांनी पूजाविधी, होम-हवन, वैदिक धार्मिक विधी न करता, भटजी न बोलविता त्यासाठी होणारा खर्च रू.5000/-(रूपये पाच हजार) खासदार राजू शेट्टी यांना दुष्काळ निधी म्हणून अर्पण केला. या विधीमध्ये घराला सूत व गुंडाळता फक्त दाराला सूत गुंडाळला जातो. पै-पाहुणे यांनी गारवा म्हणून आणलेले अन्न घराभोवती माती न फेकता ते अन्न गोरगरिबांना खाऊ घातले. रविंद्र पाटील, बंधू मारूती पाटील, त्यांच्या मातोश्री श्रीमती सुमन भीमराव पाटील, सुना, नातवंडे यांनी दाराचे सूत कापून गृहप्रवेश केला. छ.शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, डॉ.आंबेडकर आणि भीमराव कृष्णा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन झाले. प्रतीमापूजनानंतर बांधकाम गवंडी मंजूनाथ व मल्लेश बेळगावकर यांचा रू.500 रोख, शाल देऊन त्यांचा सत्कार प्रा.विजयकुमार जोखे यांनी केला. सर्व कामगारांचा सत्कार रविंद्र व मारूती पाटील यांनी केला. प्रा.डॉ.विजय गायकवाड यांनी सत्यशोधक गृहप्रवेश, वास्तुशांत विधी केला. या सोहळ्याला आमदार मानसिंगराव नाईक, माजी सरपंच अर्जून पाटील, डॉ.सुनील पाटील, सुखदेव पाटील, हिंमत पाटील, अशोक पाटील, आकाराम पाटील इ.मान्यवर होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी शिराळा तालुका अध्यक्ष विकास देशमुख, शिराळा तालुका संघटक राम पाटील होते.
-प्रा.विजयकुमार जोखे, शिराळा, जि.सांगली.