Categories
पर्दाफाश

गुलाबजामुन मागणारी भानामती

मार्च - २०१५


पाटील यांच्या घरी नोव्हें 2014 पासून भानामतीचे प्रकार सुरू झाले. प्रथम जेवणामध्ये मीठ जादा पडणे, भांड्यामध्ये ठेवलेले दूध जमिनीवर सांडणे, जेवणामध्ये रक्त दिसणे, यासारखे प्रकार होऊ लागले. काही दिवसांनी पाटील यांच्या मुलीस पांढरी साडी नेसलेली, केस सोडलेली, कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या घातलेली बाई दिसू लागली. नंतर ती बाई भाजलेल्या अवस्थेत दिसायची. देव्हार्‍यातील दिवा हवेतून उडताना दिसायचा, रस्त्याने जाताना कपडे फाटायचे. ही भानामती घालवण्यासाठी त्या कुटुंबाने स्थानिक भगताची मदत घेतली. त्याने पूजा अर्चा करून अंगारा दिला. ती मुलगी दोन दिवस बरी झाल्यासारखी वागू लागली. परंतु काही दिवसांनी भानामतीचे प्रकार पुन्हा सुरू झाले. ती शाळेत जाण्यास नकार देऊ लागली, अभ्यास टाळू लागली “मी फक्त तुला मारणार तुझ्या भावाला काहीही करणार नाही“ असे घराच्या भिंतीवर लिहिलेले आढळले. तिला दिसणारी ती बाई तिच्या चुलत भावंडांना दगड मारण्यास सांगू लागली. ‘दगड नाही मारल्यास मी तुला मारेन’ अशी धमकी देऊ लागली. तिच्या अंगावर वेगवेगळ्या मजकूराच्या चिठ्ठ्या अधून मधून पडू लागल्या. अशा प्रकारच्या चिठ्ठया शाळेत वर्गातही पडू लागल्या. त्यामध्ये लिहिले होते “मी आहे यमुना, मला गुलाबजामुन, शेवयाची खीर पाहिजे, ते दिल्यावर हे सगळं थांबेल. मी मुलीच्या अंगात येणार नाही, हे पदार्थ तिने खाल्ले की मी खाल्ले असे समजा.“असे प्रकार दोन महीने चालू होते. सर्व कुटुंब हवालदिल झाले. भानामतीचा हा प्रकार सर्व गावभर पसरला. मोठ्या प्रमाणात प्रस्थ माजलेल्या एका बुवास पाचारण करण्यात येणार होते.

साखरपा येथील अंनिस कार्यकर्ते याबाबतची माहिती मिळवत होते. याच दरम्यान 27 व 28 डिसें. 2014 रोजी प्रा.मच्छिंद्रनाथ मुंडे व मा.सुशीलाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरपा येथे अंनिसचे शिबीर घेण्यात येत होते. त्यांनी मुलीच्या आईला व मुलीला शिक्षिकां मार्फत तेथे बोलावून घेतले. तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला तो असा.

प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे व मा. सुशीलाताई मुंडे यांनी त्यांना एका रूम मध्ये घेवून त्यांची चौकशी केली. मुलीच्या डोक्यावर पडलेल्या एका चिठ्ठीचा व इतर घटनांचा अभ्यास केला असता यामध्ये त्या मुलीचाच हात असावा असा संशय येऊ लागला. पूर्ण खात्री करण्यासाठी त्यांनी तिला त्या चिठ्ठीच्याच मागच्या बाजूस “मला शेवयाची खीर आवडते, मला गुलाबजामुन आवडतो “ असे लिहिण्यास सांगितले. सापडलेल्या चिठ्ठीतील अक्षरे मोठी काढण्यात आली होती. पण आता मात्र हुशारीने तिने अक्षरे लहान काढली. पण तिची चिठ्ठीतील भाषाशैली व अक्षर यावरून आमची खात्री पटली की तीच मुलगी गुपचुप स्वत: चिठ्ठी लिहायची व डोक्यावर पडली म्हणून सांगायची. ही सर्व भानामती तीच करायची हे स्पष्ट झाले. पण ती हे सर्व का करत होती हे गूढ उकलणे गरजेचे होते.

मुलीला विश्वासात घेऊन पुढे चौकशी केली असता समजले ते विचार करायला लावणारे होते. 11 वर्षांची 5 वीत शिकणारी अभ्यासात सर्व सामान्य असलेली ही पाटील दांपत्याची एकुलती एक मुलगी. गेल्या 10 वर्षात त्यांना दुसरे मुल झाले नाही. त्यामुळे 11 वर्षात तिचे भरपूर लाड झाले. आई वडील तिच्यावर भरपूर प्रेम करायचे. खायला हवे ते द्यायचे. तिला शेवयाची खीर व गुलाबजामुन भरपूर आवडतात. सप्टें. 2014 मध्ये त्या दांपत्यास मुलगा झाला. (रत्नागिरीतील त्या बुवाचा आशीर्वाद अशी समजूत) 10 वर्षांनंतर झालेला नवसाचा मुलगा म्हणून साहजिकच आई-वडिलांचे लक्ष छोट्या बालकावर केंद्रीत झाले. मुलीच्या मतानुसार आई-वडील मुलावर प्रेम जास्त करू लागले. तिच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. 11 वर्ष प्रेमाच्या वर्षावात वाढलेल्या मुलीच्या भावना दुखावल्या जाऊ लागल्या. आपल्या प्रेमामध्ये आलेला वाटेकरी तिला मान्य नव्हता. या सर्व मानसिकतेतून नि गुलाबजामुन, खीर खाण्याच्या इच्छेने तिने ही भानामती करण्यास सुरुवात केली.

प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे व मा. सुशीलाताई मुंडे यांनी योग्य प्रकारे प्रबोधन केल्यामुळे ही भानामती आता थांबली असून, ती मुलगी आता शाळेत व्यवस्थित जाऊ लागली आहे.

या प्रकरणी कुरुदुंडकर मॅडम, गरजे मॅडम, रत्नागिरी कार्याध्यक्ष विनोद वायंगणकर तसेच स्थानिक अंनिस कार्यकर्ते दिलीप चव्हाण, सूरज मधाळे, सुशांत कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

-दिलीप चव्हाण, साखरपा