एके दिवशी सकाळी फोन वाजला. “डॉक्टर मुहुर्ताचे सिझेरियन करायचे आहे. त्या पेशंटला सकाळी 5 ते 5.30 या वेळेतच बेबी आऊट यायला हवे आहे. तेव्हा 6 तारखेला सकाळी पावणे पाचलाच तुम्ही या.” “हो” म्हणून फोन ठेवला. 6 तारखेला रविवार होता. वार न सांगता फक्त तारीख सांगून कॉल गळ्यात मारणार्या सर्जनची चलाखी लक्षात आली. रविवारच्या कॉल्सला आधीच संडे स्पॉयलर म्हटले जाते. थोड्याच दिवसापूर्वी कोपर्यावर घडलेला किस्सा पुन्हा पुन्हा आठवू लागला.
मुंबई-पुण्यासारख्या अतिप्रगत ठिकाणचे कन्सल्टंटस् नाशिक सारख्या मागासलेल्या भागातील पेशंटना आपल्या ज्ञानाचा फायदा व्हावा या उदात्त हेतूने, रविवार असूनसुद्धा दोन तीनशे कि.मी.चा प्रवास करून येत असतात आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सना भेटी देत असतात. टवाळ लोक त्यांना मुलुखगिरी करणारे मावळे असं म्हणतात तर टारगट लोक त्यांना वाटमारे असं सुद्धा म्हणतात. याचं अजिबात वाईट वाटून न घेता ही मंडळी ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ या भावनेने वागत असतात. असाच एक मावळा एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या कोपर्यावर आपल्या मर्सिडीज मधून रविवारी सकाळी आठ वाजता उतरला. बाकीची भोई मंडळी बरोबर आणलेल्या सामानाची पालखी तयार करत होती. फुटपाथवर छतासारखे तिरकं किलतान बांधून तयार केलेल्या झोपडी वजा आसर्यातून धूर येत होता. बहुधा चहाचे आधण असावं. झोपडीचा भिकारी मालक गोणपाटावर बसून, वडा पाव बांधून आलेले वर्तमानपत्र उलगडून शांतपणे वाचत बसला होता. मावळे साहेबांनी त्या भिकार्यासमोर दहाची नोट फेकली आणि झटपट चालत चालत ते हॉस्पिटलकडे जाऊ लागले तोच त्यांचा ‘साहेब ओ साहेब’ अशी हाक ऐकू आली. मागे येऊन डॉक्टर त्यांच्यासमोर उमे राहिले. दहाची नोट, मेलेला उंदीर शेपटीने पकडावा तशी पकडून भिकार्याने साहेबांच्या समोर धरली व त्यांच्याकडे परत फेकली आणि म्हणाला “Sorry Doctor I don`t work on sundays.”!!
रविवारी पहाटे चार वाजताच उठून तयार होऊन मी हॉस्पिटलपाशी आलो तर ते मला मर्ढेकरांच्या कवितेतील काही ओळींशी साम्य दाखवू लागले.
जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकूरद्वारा खडखडते अन् ट्रॅम वाकडी कंबर मोडून चाटीत तारा त्या नाक्यावर तंग हवेली उत्साहाची ठिगळ्या चोळी घालून बसली बोथटलेली शिळी स्तनाग्रे झाकीत पवळी...... नाक्यावरील हवेलीस या येणारा जरी कोण नी कुठला कुणा न ठावे तरी तयारी निळ्या माडीचा विडा निराळा.
जिन्याच्या पायर्या चढून मी रिसेप्शनपर्यंत आलो. घरात शिरल्याबरोबर येणार्या वासावरून आज जेवायला काय आहे याचा आपल्याला बरोबर अंदाज येतो त्याप्रमाणे बाहेर दिसणार्या नातेवाईकांकडे बघून ओ.टी.मध्ये आपल्या साठी काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज घेण्याची सवय सेनॉरिटी प्रमाणे अॅनेस्थेटिस्ट मध्ये डेव्हलप होत असते. बाहेर बाकावर सहा फूट उंचीचा 90 किलोच्या वर वजनाचा, हबश्याप्रमाणे दिसणारा एक काळा कभिन्न माणूस चुळबूळ करीत बसला होता. मला पहाताच तो माणूस पुढे आला. “भूल देणारे तुम्हीच?” “हो” मी उत्तरलो. त्याच्याकडे बघताना आता स्पायनल वगैरे कठीणच दिसतंय असा विचार मनात, डोक्यात होता पण पुढे तो म्हणाला, “डॉक्टर जरा काळजी घ्या बरं का. जरा प्रिसियस प्रेग्नन्सी आहे.” “काय IVF का?”मी विचारले. तर म्हणाला “नाही आमचा प्रॉब्लेम निराळाच होता.” म्हणजे? मी विचारले. जरा काचकूच करत तो उत्तरला, “तुमच्या भाषेत त्याला Premature Ejaculation असं म्हणतात.” योगायोग म्हणा, किंवा कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडली म्हणा पण बरोबर तेव्हाच काऊंटर वरच्या टेपवर अरूण दाते गात होते. “इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी – साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी” तो इसम काय करतो वगैरे प्रश्नातून कळले की, मंडळी ऑस्ट्रेलियामध्ये असतात आणि गृहस्थ गणितात पी.एच.डी. वगैरे आहे आणि पुढे संशोधन करतोय. आत सटकायचा मी प्रयत्न करत होतो तर म्हणाला मला
Caesarean attend करायचे आहे. तयार झाली की मी बोलवीन, असं सांगून मी आत सटकलो. मुहुर्ताचे सिझेरियन असल्यामुळे Paediatrician तेवढ्यात हजर झाला, Spinal ला काही त्रास नाही. पेशंटला कव्हर करून झाल्यावर नवर्यास आत बोलावले, एका जागी उभे राहून कुणाला मदत न करण्याची सूचना मी त्याला देणार तोच तो म्हणाला, “डॉक्टर-माझी आणखी एक विनंती आहे. टेप केलेले काही मंत्र आहेत ते बाळ जन्मताना मला लावायचे आहे.” गायनॉकॉलॉजिस्टकडे पाहिले तर तिची मूक संमती आहे असं दिसलं म्हणून त्याला ‘ठीक आहे’, असं म्हटलं. त्याने टेप चालू केला. मंत्र कसले एकच धोशा होता. हरे रामा, हरे कृष्णा, हरे रामा, हरे कृष्णा!!! बाळ जन्मताच त्याच्या कानाशी टेप नेऊन त्याचा जन्म कशासाठी झाला आहे. वगैरेचे प्रवचन पण त्याने ऐकवले बाळाला घेऊन Paediatrician शेजारच्या खोलीत गेला. नवरोजी त्या मागोमाग गेले. बिचार्या बाईचे हे सगळं सहन करतांना हालच होत असतील असं वाटून मी प्रश्न विचारायला सुरवात केली. “तुझे शिक्षण किती झालंय?” उत्तर “मी गणितात पी.एच.डी.केलंय. मी पण ऑस्ट्रेलियामध्ये असते” पण तिथे तू करतेस काय?” या माझ्या प्रश्नाने उत्तरली “मी हरे कृष्णा मंदिराचे व्यवस्थापन बघते!!!”
मी म्हटलं “काय गं, मुहूर्त कुणी काढला?” तर म्हणते “आम्हीच.” “कसा काढला?” “कुंडलीवरून.”
आता मात्र तिला लेक्चर द्यायची उर्मी आवरली नाही. मी म्हटलं, “एवढी शिकलेली माणसं तुम्ही आणि कुंडली वरून मुहूर्त काय काढताय? मुहूर्त बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ ऑपरेशन करणारा डॉक्टर, असिस्ट करणार्या नर्सेस व भूल देणारा यांची कमीत कमी झोप तर झालेली आहे की नाही हे बघायला हवे.” Blood Bank, Medical Public Transport चालू आहे की नाही हे बघायला हवे पॉवर कट नाही ना याची खात्री करायला हवी. आणि मुख्य म्हणजे ऑपरेशन करणारा आणि भूल देणारा यांच्या पण कुंडल्या क्षीण चंद्र बळ तेज मंगळ धनुर्वात-घटसर्प, नर मुंडी मुरगळ हा योग होताच पण घरी जाताच पत्नी ताडन, पुत्र रूदन, गृहशांती विनाश हा योग आहे सांगण्यासाठी कुंडली बघायची पण गरज नाही.” बिचारीचा चेहरा फारच पडला.
– डॉ. अनिल गाडगीळ, नाशिक
– संपर्क : मोबा.9822017716