Categories
विज्ञान

जैव प्रकाश

मार्च - २०१५

काही किटक, मासे व वनस्पती रंगीत प्रकाशाचे उत्सर्जन करतात. याला जैव-प्रकाश किंवा बायो ल्युमिनिसन्स असं नाव आहे. जैव-प्रकाशीय घटनेचा एक विलक्षण अनुभव प्रख्यात विवेकवादी वैज्ञानिक डॉ.अब्राहम कोवूर यांना आला.

डॉ.कोवूर हे मूळचे केरळमधील. धर्मोपदेशक व्यवसायाचा वारसा असलेले कोवूर उत्तर आयुष्यात विवेकवादी बनले. सिलोनमध्ये वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांचे गूढ घटनांवर देखील संशोधन चालू होते. निवृत्त झाल्यानंतर अनेक अज्ञानमूलक अंधविश्वासाचा त्यांनी पर्दाफाश केला आणि सिलोन तसेच भारतभर दौरे करून प्रबोधनाचे कार्य केले.

डॉ.कोवूर यांना शिकारीचा छंद होता. एका रविवारी ते जवळच्या जंगलात गेले. रात्रीच्या वेळी सावज हेरण्यासाठी जंगलात शिरत असताना, तेथील माहितगाराने त्यांना या जंगलात न घुसण्याचा सल्ला दिला; तो म्हणाला या जंगलात रात्री आग्यावेताळ नावाचं भूत फिरतं व ते माणसावर हल्ला करतं ते हरीण, ससा या रूपातही वावरतं. त्यांना तुम्ही मारायला जाल तर तुमचं काही खरं नाही.

कोवूर निर्भयी वृत्तीचे होते. ते तडक जंगलात शिरले. दूरवर विशिष्ट ठिकाणी तथाकथीत आग्या वेताळ त्यांना दिसला. ते न भिता त्याच्याजवळ पोचले आणि त्यांना खरं काय त्याचं आकलन झालं. वाळलेल्या वृक्षावर बुरशी साचलेली होती. ही बुरशी चमकत होती. बुरशीतून बाहेर पडणारा प्रकाश कोवूरांनी प्रथमच पाहिला. त्यांनी सुरीने या झाडाच्या सालीचा काप घेतला व ते परतले. प्रयोगशाळेत ठेवलेल्या या सालीवरील बुरशीतून रात्रीच्या वेळी प्रकाश बाहेर पडत असल्याचे त्यांनी सखोल निरीक्षण केले व ही जैव-प्रकाशीय घटना आहे हे निश्चित केले.

जैव-प्रकाश घटनांची नंतर कोवूरांनी माहिती मिळविली व निरीक्षणे नोंदविली. एका गुहेत त्यांना गुहेच्या भिंतीवरून रंगीत प्रकाश सोडणार्‍या किड्यांची रांग जाताना दिसली. या किड्यांच्या डोक्यातून प्रकाश उत्सर्जित होत होता. समुद्रातील काही मासे विद्युत निर्मितीद्वारे प्रकाश उत्सर्जित करतात. समुद्र प्रवास करणार्‍या काही नाविकांना रात्रीच्या वेळी समुद्र पृष्ठभाग पेटल्यासारखा दिसतो. मोठ्या संख्येने जमलेल्या बॅक्टोरियामुळे त्या ठिकाणी प्रकाश निर्माण होत होता.

अग्नी प्रदीप्त करण्यासाठी लागणारे आगपेटीसारखे साधन न वापरता व ज्वलनशील नसलेल्या वस्तूमधून बाहेर पडणारा प्रकाश हा थंड प्रकाश म्हणजे कोल्डलाईट प्रकारात मोडतो. जैवप्रकाश हा थंड प्रकाश आहे. तसं नसतं तर या किड्यांच्या व वनस्पतीच्या अंगातून हा प्रकाश उत्सर्जित होतो त्यांची शरीरे जळाली नसती का? काही रासायनिक द्रव्येसुद्धा रंगीत प्रकाश बाहेर टाकतात. याचे सर्व परिचित उदाहरण म्हणजे फॉस्फरस.

जैव प्रकाशाचे तुम्हा आम्हाला परिचित असे उदाहरण म्हणजे काजवा. पावसाळ्याच्या दिवसात कोकणातील दाट झाडीत चमकणार्‍या काजव्याचे सौंदर्य विलोभनीय असतं. निसर्गात केवढी विविधता भरली आहे! प्रत्येक जीव त्याच्या गरजांसाठी उत्क्रांतीनुसार बदलत जातो. जैव-प्रकाश हा काही किड्यांना निसर्गाने दिलेली देणगी आहे. त्याचा उपयोग हे प्राणी स्वसंरक्षणासाठी किंवा भक्ष्य शोधण्यासाठी करतात.

ज्याचे कारण आपणास कळत नाही. त्याला आपण गुढतेचे वलय चिकटवितो. जंगलात वठलेल्या झाडांमधून बाहेर पडणारा जैव प्रकाश मग आग्या वेताळाचे रूप घेतो. समुद्रावरील प्रकाशित भाग मग झपाटलेली जागा बनतो. पण निर्भयपणे वास्तवाचा शोध घेणारे अब्राहम कोवूरसारखे प्रतिभावंत अशा घटनांचा उलगडा करतात. हेच विज्ञानाचे सामर्थ्य आहे.

जमिनीवर तसेच आकाशात दिसणार्‍या अनेक गूढ घटनांचा भेद विज्ञान करत असते.

 प्रा. प. रा. आर्डे