Categories
संपादकीय

हार का लांबला?

ऑक्टोबर - २०१२

भास्कर सदाकळे हा अंनिसचा हरहुन्नरी कार्यकर्ता. अफवा कशी पसरते याची गोष्ट आपल्या बहारदार शैलीत तो श्रोत्यांना सांगून पोटभर हसवतो. टिचभर लांबीचा साप खांबासारखा जाड व वावभर लांब कसा झाला हे त्याच्याच शैलीत ऐकावे. सर्वसामान्य माणसं एखादी किरकोळ घटना कशी मोठी बनवतात त्याचा हा किस्सा, सामान्य माणसाच्या स्वभावावर प्रकाश टाकतो. पण चमत्कारसदृश्य घटनांचा मुद्दामहून प्रचार शिक्षण क्षेत्रातील एखादा प्राचार्य करत असेल तर?

            झालं असं की, नगर जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेत एक चमत्कार घडला. ठिकाण होते या संस्थेच्या प्राचार्याचे कार्यालय. कार्यालयात भिंतीवर साईबाबाचा फोटो होता. प्राचार्य साईबाबाचे भक्त. पण या भक्तीचे शिक्षण संकुलात प्रदर्शन कशाला? या प्राचार्यांना भारतीय राज्यघटनेचा आशय कुणीतरी समजून घ्यायला हवा. स्वत:च्या घरात मूर्ती ठेवून तिची पूजा करा ते स्वातंत्र्य तुम्हाला घटनेनं दिलंय. पण शिक्षण संकुलात स्वत:च्या कार्यालयात साईचा फोटो भिंतीवर लावायचा. त्याला शिर्डीहून त्यांच्या सेवकांनी चार्ज करून आणलेला हार घालायचा व हा हार लांबल्याचा चमत्कार लोकांमध्ये पसरावयाचा हे म्हणजे ज्यांनी युवकांना विवेकी व विज्ञाननिष्ठ बनवायचे त्यांनीच उलटा प्रवास करण्यासारखे झाले. याचा निषेधच व्हायला हवा. हा श्रद्धेचा उघड बाजार झाला.

            हार का लांबला? प्राचार्य व त्यांच्या सहकार्‍यांना सूचित करावयाचे होते की, ही साईची कृपा.

            आपल्या कार्यकर्त्यांनी हा बनाव उघड केला. हारातील फुलाच्या देठांना दोर्‍याने दोन दोन-तीन तीन वेढे घातले होते. वजनाने वेढे सुटत गेले व हार लांबला. चमत्कारामागचा बनाव त्यामुळे उघड झाला.

            संबंधित शिक्षणसंस्था यंत्रशास्त्र(आय.टी.आय.) संबंधित आहे. यंत्रे विज्ञानाच्या नियमाने चालतात. हे नियम विद्यार्थ्यांना शिकवावे हे अपेक्षित कार्य. हे काम हार लांबवण्याच्या चमत्काराने कसे पार पडणार? रोज साईची आरती सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणून यंत्राचे चलनवलन आपोआप मुलाच्या मेंदूत घुसवता येईल काय?

            भारतीय राज्यघटनेने मूल्यशिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन हा 10 वा गाभा घटक समाविष्ट केलाय हे वरील संस्थाचालकांना माहीत नाही काय? या संस्थेशी संबंधित राजकीय नेते एके काळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री होते असे समजते. या मंत्र्यांनी संबंधित प्राचार्यांना चमत्काराचे शिक्षण देण्यास मान्यता दिली काय?

            शिक्षण क्षेत्रात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकासाची कौशल्ये द्यायची असतात. त्यासाठी बुद्धिमत्ता व शरीर कौशल्य यांचा विकास साधणे अपेक्षित असते. हे सोडून व तर्काला सोडचिठ्ठी देऊन हार लांबवण्याचे चमत्कार पसरविण्याचे उद्योग कशासाठी?

पिसाळलेले बुवा

            पिसाळलेले कुत्रे कुणाला चावेल याचा नेम नाही. त्याला आपलं-दुसर्‍याचं किंवा मालक-इतर असा फरक कळत नाही. निदान आपल्या गल्लीतील घरे सोडून शेजारच्या गल्लीत ते जाईल असं होत नाही. स्वार्थांध बुवाचेही असंच आहे. फलटण जवळच्या एका महाराजाने आपल्या चुलत भावालाच फसविले. त्याला जेव्हा पोलिसांनी अटक करून त्याच्या गावात नेले तेव्हा त्याने गावातीलच अनेक लोकांना पूजेच्या नावाखाली गंडा घातल्याचे उघड झाले. या लोकांनी संबंधित बुवाला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरासमोर गर्दी केली. तेव्हा पोलिसांना आश्चर्य वाटले. आपल्याच लोकांना गंडा घालण्याची अशी कृत्ये करणारे बुवा म्हणजे अनैतिकतेचा कळसच होय. आपल्या गावातील बुवा-बाबापासून लोकांनी सावध रहावे व अशांना गावातून हद्दपार करावे हाच धडा या प्रकरणातून मिळतो.

माधव बावगे यांना प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार

            डोंबिवली येथील ‘प्रजासत्ताक भारत’ या संस्थेचा या वर्षीचा प्रबोधनकार ठाकरे अंधश्रद्धा निर्मूलन पुरस्कार लातूर अंनिसचे कार्यकर्ते माधव बावगे यांना अ‍ॅड.सुरेश माने यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माधव बावगे यांचे म.अं.नि.स.तर्फे हार्दिक अभिनंदन.