Categories
चिकित्सा

हिंदुत्वाची प्रयोगशाळा-नवा कुंभमेळा

एप्रिल - २०१२

            छत्तीसगड या राज्यात भा.ज.पा.सत्तेवर असल्यामुळे त्यांनी तिथे हिंदुत्वाची प्रयोगशाळा उभारली आहे. ‘धार्मिक कामकाज’ हे खाते निर्माण करून त्यावर एक मंत्री नेमलेले आहेत. त्यांनी राजीम या गावी भारतातील पाचवा कुंभमेळा घेण्याचे ठरवले आहे. राजीम हे निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव महानदी, सोन्दूर आणि पैरी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले आहे. तिथे दरवर्षी माघ पौर्णिमेला मोठी यात्रा भरते, पण आता राज्यविधान सभेने ‘राजीम कुंभ मेळा कायदा’ पास करून या यात्रेला कुंभमेळा म्हणून मान्यता दिली आहे.

            आतापर्यंत नाशिक, उज्जैन, अलाहाबाद आणि हरिद्वार इथे कुंभमेळा भरत असे. त्याचे व्यवस्थापन करण्याकरता शासनाला करोडो रूपये खर्च करावे लागतात. गर्दीचे, वाहतुकीचे, सांडपाण्याचे आणि आरोग्याचे नियोजन करता करता अधिकार्‍यांच्या नाकी नऊ येतात. नंग्या साधूंच्या मिरवणुकी, त्यांची भांडणे, चोर्‍यामार्‍या, माणसे हरवणे, नकोशा वृद्धांना इथे सोडून जाणे, अपघात, रोगराई अशा असंख्य समस्या या मेळ्यापायी उद्भवतात. मनुष्य-तास किती वाया जातात याला गणतीच नाही. पण गॅरंटीड स्वर्गात प्रवेश मिळणार असल्यामुळे लोक इथे मेंढरासारखे धावून येतात.

            आता या समस्यात आणखी एका ठिकाणाची भर पडणार आहे. देवांनी पळवलेल्या अमृतकुंभातील थेंब ज्या चार ठिकाणी पडले तिथे कुंभ भरवण्याची परंपरा आहे. पण सरकारी हुकमाने चालू झालेला हा पहिलाच मेळा असावा. नेहमीचा कुंभ संपला की, लगेच छत्तीसगडला सर्व साधूंनी शासनाचे पाहुणे म्हणून यावे असे या सरकारचे आमंत्रण असते. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री यांचे भव्य कट औट स्टेशनवर साधूंचे ‘छत्तीसगडच्या पवित्र भूमीत’ स्वागत करत उभे असतात.

            गेल्या वर्षीच नागा साधूंनी त्यांना सणांसाठी आणि मुक्कामासाठी दिलेली जागा पसंत नाही म्हणून मेळ्यावर बहिष्कार घातला होता. रूसून 20 कि.मी.दूर जाऊन बैठा संप पुकारलेल्या ह्या साधूंची मनधरणी करण्याकरता बडे अधिकारी आणि मंत्री तीन दिवस त्यांच्या नाकदुर्‍या काढत होते.

            या राज्यात धर्मसंरक्षणाचा भाग म्हणून परकीय दुष्ट प्रभावापासून समाजाला दूर ठेवण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जातात. व्हॅलेंटाईन दिनी उच्छृंखल युवक युवतींना धडा शिकवण्यासाठी नैतिक पोलिसांच्या तुकड्या तैनात केल्या जातात. शिवाय हा दिवस मातृ-पितृ दिन म्हणून पाळावा असा आदेश सर्व शाळांना शासनामार्फत पाठवण्यात येतो. या दिवशी प्रत्येक शाळेत एक वयस्कर जोडपे पारंपारिक वेशात बसवले जाते. मुले ओळीने येऊन त्यांना नमस्कार करतात. ही दृश्ये टी.व्ही.वरील बातम्यात दाखवण्यात येतात.

            ख्रिस्ती मिशनरी शाळांना प्रत्युत्तर म्हणून संघ परिवारातर्फे शाळा चालवल्या जातात. एका मिशनरी शाळेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेल्याबद्दल राज्याचे मुख्य सचिव पी.जोय ओम्मेन यांना मुदत संपण्यापूर्वीच पदमुक्त करण्यात आले अशी बातमीही काही वृत्तपत्रात आली होती.

डॉ.शरद अभ्यंकर