महाराष्ट्र अंनिसच्या अथक प्रयत्नामुळे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला.
या कायद्यानुसार महाराष्ट्रात शेकडो ‘बुवा-बाबा’ वर केसेस दाखल झाल्या. या केसेस दाखल करण्यामध्ये महाराष्ट्र अंनिसे मोठा पुढाकार घेतला होता.
भंडारा येथील जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झालेल्या केसचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालानुसार आरोपीस पाच वर्षे सक्त मजुरी व पन्नास हजार रूपये दंड न्यायाधीशांनी सुनावला.
या ऐतिहासिक पहिल्या निकालाचे महाराष्ट्र अंनिस स्वागत करीत आहे. हे निकालपत्र खास अंनिवा वाचकांसाठी देत आहोत. – संपादक
खटला दाखल. – ता.12/06/2014
रजिस्टर झाला. – ता.-12/06/2014
निकाल लागला. – ता.12/02/2015
कालावधी – 8 महिने
भंडारा येथील चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांचे कोर्टात
न्यायाधीश – एम. एम. लोने.
नियमित फौजदारी खटला नंबर 161/2014
महाराष्ट्र राज्य
पी.एस.ओ. पोलीस स्टेशन तक्रारदार
भंडारा, ता. जि. भंडारा
यांचे मार्फत
विरूद्ध
(1) पौर्णिमा रविंद्र वहाने
(2) निर्मला बिरन वहाने प्रतिवादी (आरोपी)
(3) विश्वकला चिंतामण कांबळे
महाराष्ट्र मानवी नरबळी आणि इतर अमानुष, दुष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा 2013 या कायद्यातील कलम यु/5-3 अन्वये.
श्री. व्ही. एस. तामगडगे – सरकार वतीने असिस्टंट
पोलीस प्रॉसिक्युटर
श्री. ए. डी. गजभिये – आरोपीच्या वतीने वकील.
निकालपत्र
जाहीर ता.12 फेबु्रवारी 2015
1. सर्व आरोपी उपरोक्त कायद्यान्वयेच्या कलम 3 खाली शिक्षेस पात्र आहेत.
2. या खटल्याची हकीकत थोडक्यात खालील प्रमाणे
गुन्ह्याबाबतची माहिती देणार्या राजश्री संदीप वहाने या मुख्य साक्षीदार यांचे तिचा नवरा आणि इतर नातेवाईक यांच्याशी भांडण आहे. आरोपी क्र.1 या तिच्या सासू तर आरोपी नं.2 या तिच्या चुलत सासू आहेत. ही घटना घडली त्यावेळी राजश्री तिच्या वरठी, ता.मोहाडी, जि.भंडारा येथील एका नातेवाईकाच्या घरी रहात होती. 28/04/2014 रोजी आरोपी क्र.1 हिने एका बाईला त्या घरात आणले. त्या बाईने कपाळाला शेंदूर लावला होता; तिने केस मोकळे सोडले होते. नंतर ही बाई घुमायला लागली आणि तिच्या अंगात आले. हॉलमध्ये हळद, गुलाल आणि लिंबू ठेवलेले होते. आरोपी क्र.1 हिने त्या बाईला सर्व घर फिरून दाखविले आणि तिला एक पूजा करायला लावली. नंतर ती बाई निघून गेली. या घटनेवेळी आरोपी क्र.2, आरोपी क्र.1 बरोबर तेथे हजर होती.
3. तोंडी माहितीच्या आधारे भंडारा पोलीस स्टेशनला गुन्हा नं. 3092/2014 चा एफ.आय.आर. दाखल करण्यात आला आणि त्याच्या तपासाची कामगिरी ए.एस.आय. तुकाराम तुलसीराम गभणे यांच्यावर सोपविण्यात आली. (पोलीस साक्षीदार-5) तपासाचे वेळी तपास अधिकार्यांनी तिथल्या तिथे पंचनामा केला. पुजेचे साहित्य आरोपी क्र.1 यांच्या घरातून जप्त करण्यात आले, संबंधित आरोपींना अटक केली आणि साक्षीदारांचे जबाब घेतले. तपासात असे आढळले की ज्या बाईने या घरात अंगात आणले होते ती आरोपी नं.3 ही होती. तपास पूर्ण होताच आरोपपत्र कोर्टामध्ये दाखल करण्यात आले.
4. सर्व आरोपींच्या विरोधात Exh-03 द्वारा आरोप ठेवण्यात आले. सर्व आरोपींना त्यांच्यावरचे आरोप मराठीत वाचून दाखविण्यात आले. आरोपींनी आरोप अमान्य केले आणि आपण निरपराध आहोत हे सिद्ध करण्याचा क्लेम केला.
5. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून आणि खटल्यासाठीच्या कागदपत्रांची छाननी केल्यावर खालील मुद्दे विचारात घ्यावे असे मी ठरविले आणि त्यानुसार कोर्टाने निष्कर्ष नोंद केले आहेत.
| मुद्दे | निष्कर्ष |
| 1. 28-4-2014 च्या रात्री सुभाष वार्ड वरठी, ता.मोहाडी, जि.भंडारा येथे आरोपपत्र दाखल झालेल्या सर्व व्यक्ती अघोरी कृत्ये आणि जादूटोणा कृत्यात सहभागी होती काय? आणि अशा कृत्याबद्दल ते महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी आणि अमानवी कृत्ये व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातील कलम 3 अन्वये दोषीठरतात काय? | होय. |
| 2. कोर्टाचा हुकुम काय? | निकालपत्रातील ऑर्डर |
कारणमिमांसा
मुद्दा 1 साठी –
6. गुन्हा शाबीत होण्या संदर्भात सरकारी वकीलांनी खालील साक्षीदारांची तपासणी केली.
1) राजश्री संदीप वहाने
2) गीता अशोक लिचाडे
3) वैशाली राजू नागदेवे
4) राजू नथू नागदेवे
5) तुकाराम तुलशीराम गभने
तसेच पंचनाम्यात सापडलेल्या पुराव्यांचा आधार घेतला.
7. कलम 313 अन्वये संपूर्ण तपासात आरोपीतर्फे केला गेलेला युक्तीवाद फेटाळण्यात आला. आरोपींनी तोंडी किंवा कागदोपत्री कोणताही पुरावा सादर केला नाही.
8. असिस्टंट पोलीस प्रॉसीक्युटर महोदय व्ही. एस. तामगडगे यांनी या खटल्यात 5 साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. सर्व आरोपी शिक्षेस पात्र आहेत असा युक्तीवाद त्यांनी केला.
9. आरोपींचे वकील ए. डी. गजभिये यांनी आरोपीतर्फे बचावाचा युक्तीवाद मांडला. राजश्री वहाने हिचे तिच्या नवर्याबरोबर भांडण आहे. या भांडणातील द्वेषामुळे आणि वाईट हेतूने तिने ही तक्रार केली आहे. तिच्या साक्षीत मोठ्या विसंगती आणि अपुरेपणा आहे. तिची साक्ष सुसंगत नाही. म्हणून सर्व आरोपींना आरोपमुक्त करावे.
10. हा खटला प्रत्यक्ष पुराव्यावर आधारीत आहे. म्हणून राजश्री संदीप वहाने हिने संबंधित घटना प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. आरोपी क्र.1 ही तिची सासू आणि आरोपी क्र.2 ही तिची चुलतसासू असल्याचे तिने खात्रीपूर्वक सांगितले. 28-4-2014 रोजी अमावास्या होती. आणि त्या रात्री साडे अकरा वाजण्यच्या सुमारास आरोपी क्र.1 आणि 2 यांनी एका बाईला घरात आणले. या बाईने कपाळावर शेंदूर लावला होता. तिचे केस मोकळे होते. ती घुमत होती आणि तिच्या अंगात आले होते. त्या बाईने पूजा केली आणि ती निघून गेली. आरोपी क्र.1 ने त्या बाईला सांगितले की, राजश्री ही आजारी आहे. अघोरी पुजेत जे साहित्य वापरले जाते ते साक्षीदार राजश्रीने ओळखले. उलट तपासणीत तिने तिचा प्रेमविवाह झालायं आणि सध्या ती आणि तिचा नवरा यांचे पटत नाही आणि याबाबत कोर्टात खटले चालू आहेत असं सांगितलं. तिने त्या दिवशी अमावास्या होती, पुजेचे साहित्य हॉलमध्ये ठेवलं होतं. आणि आरोपी क्र.1 ने ती आजारी होती या गोष्टी पोलिसांना दिलेल्या जबानीत नाहीत असं उलटतपासणीत मान्य केलं. पुढच्या उलटतपासणीत आरोपी क्र.3 नेच पूजा केल्याचे कोर्टासमोर सांगितले. उलट तपासणीतून आरोपी क्र.3, राजश्री वहाने हिच्या माहितीनुसार त्या रात्री संबंधित घरात आली होती हे बचाव पक्षाने मान्य केले.
11. आरोपी पक्षाच्या वकीलांनी राजश्री वहाने हिचे नवर्याबरोबर व आरोपी क्र.1 बरोबर भांडण असल्याने तिची साक्ष विश्वसनीय नाही असा युक्तीवाद केला. पण हा युक्तीवाद कोर्टाने अमान्य केला.
12. शेजारी रहाणारे साक्षीदार गीता अशोक लिचाडे आणि वैशाली राजू नागदेवे यांनी पूजाविधी घटनेबद्दल आपणास माहिती नाही असा जबाब दिला.
13. घरातील वस्तू हस्तगत करून पंचनामा करताना प्रत्यक्ष हजर असलेले पंच राजू नाथू नागदेवे यांनी साक्ष फिरविली आपण तेथे हजर नसल्याचे कोर्टाला सांगितले.
14. तपास अधिकारी तुकाराम तुलसीराम गभने यांनी आरोपी क्र.1 च्या घरातून पुजेच्या वस्तू हस्तगत केल्या. त्या कोर्टात सादर केल्या. त्या वस्तूत एक कवडी, एक बिब्बा, एक काळा दोरा, सुपारी, हळद आणि कुंकू या वस्तू होत्या. या वस्तू अघोरी पूजेसाठी वापरतात.
तपास अधिकारी तुकाराम तुलसीराम गभने व प्रत्यक्षदर्शी मुख्य साक्षीदार राजश्री संदीप वहाने यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. आरोपी क्र.3 विश्वकला कांबळे या घटनेदिवशी दुसरीकडे लग्नात होत्या याचे पुरावे आरोपीचे वकील हजर करू शकले नाहीत. राजश्रीची साक्ष कोर्टाने ग्राह्य मानली.
वरील मुद्द्याच्या आधारे, सर्व आरोपीवर जादूटोणा विरोधी कायद्याच्या सेक्शन 3 नुसार गुन्हा शाबीत झाला आहे.
आरोपी या वृद्ध स्त्रिया आहेत. त्या कुटुंबवत्सल प्रतिष्ठित घरातील आहेत. म्हणून प्रोबेशन ऑफेंडर अॅक्ट 1958 नुसार त्यांना सोडून द्यावे अशी आरोपीच्या वकिलाची विनंती कोर्टाने अमान्य केली. आरोपीचा गुन्हा गंभीर असल्याने त्यांना शिक्षा व्हावीच हा सरकारी वकीलांचा युक्तीवाद कोर्टाने मान्य केला.
आरोपींना दया दाखवता येणार नाही कारण त्यांनी अघोरी प्रथेचा अवलंब करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवले.
अमावास्येच्या दिवशी मांत्रिक बाईंना घरात बोलावून भीतीचे वातावरण निर्माण केले आणि राजश्री वाहने हिचे मन:स्वास्थ्य धोक्यात आणले. असा गुन्हा दयेस पात्र नाही. म्हणून प्रोबेशन अॅक्ट 1958 चा विचार करता येणार नाही. या गुन्ह्याबाबत समाजात असा संदेश जायला हवा की असा गुन्हा करण्यास कोणी धजावूनये. आणि कोणी धजावलेच तर त्यांना अजिबात दया दाखवू नये.
म्हणून हे कोर्ट आरोपींना प्रत्येकी 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी 25000 रू.चा दंड ठोठावत आहे. यातील 50,000 रू राजश्री वहाने हिला देण्यात यावेत.
आरोपीचा जामीन रद्द करण्यात येत आहे. पुजेच्या सर्व वस्तू नष्ट करून टाकाव्यात.
मूळ इंग्रजी निकालपत्राचा मराठी सारांश –
–प्रा. प. रा. आर्डे