Categories
चिकित्सा

‘जरा विचार करून बोला’

जून – २०१२

“सरकारी शाळेत विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत नाहीत अशा शाळांमधून नक्षलवादी दहशतवादी तयार होतात” हे विधान स्वत:ला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणार्‍या श्री श्री रवीशंकर यांनी जयपूर जवळील आदर्श विद्यामंदिर शाळेच्या मैदानावरील कार्यक्रमात केले. या विधानावर अनेक ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या मग या गुरूंनी सारवासारव करणारी उत्तरे दिली. समाजातून ज्या प्रमाणात विरोध व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात तो झाला नाही. त्याला कारणेही तशीच आहेत. त्यांचे भक्तगण व शिष्य त्यांचे पाठीराखे आहेत. या पाठीराख्या वर्गात उच्चभ्रू व राजकारणी आहेत. पैसा व सत्ता एक झाल्यावर काय होणार नाही?

            सरकारी शाळाबद्दल वरील विधान करून ते थांबले नाही तर पुढे जाऊन ते असे म्हणतात की, सर्व सरकारी शाळा बंद करा व खासगी शाळाच फक्त चालू ठेवा. थोडक्यात सांगायचे म्हणजे श्रीमंतांच्याच मुलांनी शिकावे व स्वतंत्र भारतातील तळागाळातीलच काय पण मध्यमवर्गीयांच्या मुलांनीही घरी बसावे, खासगी शाळा हजारो रूपये फी घेतात हे या आध्यात्मिक गुरूंना बहुतेक माहीत नसावे. या गुरूंना म्हणावं तुम्ही कधी आदिवासी पाड्यावर गेला आहात का? खेड्यातील गरीब शेतमजूरांची परिस्थिती पाहिली आहे का? या लोकांनी अजूनही अशिक्षित, भूमिहीन दरिद्री राहून या गुरूंच्या चेल्यांचे गुलाम बनून रहावे हीच त्यांची इच्छा आहे. गरीबांची दु:खे काय आहेत हे हस्तिदंती मनोर्‍यात रहाणार्‍या या पंचतारांकित बाबा आणि त्यांच्या चेल्यांना काय समजणार? म.ज्योतिबा फुल्यांनी एका अविद्येने काय काय घातक परिणाम होतात हे सांगून तळागाळातील वर्गाला व खास करून स्त्रियांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. समाजाच्या विरोधाला व त्रासाला न जुमानता शिक्षणप्रसाराचे काम सुरू केले आणि आज स्वातंत्र्य मिळाल्यावर या वर्गाचे शिक्षणाचे हक्क काढून घ्या असे अध्यात्मिक गुरू सांगत आहेत. खासगी शाळा चालू ठेवा व सरकारी शाळा बंद करा, फी परवडते त्यांनीच फक्त शिका. लोकशाही राज्यात असा विचार मांडला जातो आणि आम्ही सामान्य माणूस त्यावर गप्प बसतो. शिक्षणाचा मूलभूत हक्क सरकारने मान्य केल्यामुळे शिकू इच्छिणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. शिक्षणावरील खर्चात सरकारने वाढ केली आहे. सर्वशिक्षा अभियानाच्या योजना आखल्या आहेत. सरकारी शाळांत फी नाही. कपडे, पुस्तके, शालेय साहित्य मोफत मिळते. एकवेळचे पौष्टिक जेवण फुकटचे मिळतेच आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या शाळेतील हजर दिवसांचे, मुलींना सानुग्रह अनुदान मिळते. त्या पैशाच्या आशेने आज गरीबांच्या मुलींना पालक शाळेला पाठवित आहेत.

            या सार्‍या गोष्टी कोणती खासगी शाळा फुकट देणार आहे? या आध्यात्मिक गुरूंना म्हणावं आध्यात्मिक गुरू हा बरकतीचा धंदा झाला आहे. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. तुम्हीच देशभर अशा शाळा काढा आणि ‘जगण्याची कला’ लोकांना शिकवा.

            सरकारी शाळेत शिकलेले कितीतरी वैज्ञानिक, तंत्रज्ञ, अर्थतज्ञ व इतर क्षेत्रात पारंगत असलेले कितीतरी लोक देशाची धुरा सांभाळत आहेत. या शाळांतून शिकलेले फक्त नशलवादी व दहशतवादीच यांना कोठे भेटले? सरकारी शाळांतून जीव ओतून शिकविणारे शिक्षक आहेत. प्रत्येक क्षेत्रात चांगली व थोडीफार वाईट माणसे असतात. समाज चालतो तो या चांगल्या लोकांच्या कर्तृत्वावरच. सरकारी शाळा आहेत म्हणून खेड्यातील मुले शिकतातच पण मुंबईसारख्या मोठ्या शहरातून श्रमजीवी वर्ग मोठा आहे त्याला आज शिक्षण मिळत आहे. तो पण आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवत आहे. स्वतंत्र भारताचा तो नागरीक आहे. भारताच्या संविधानाप्रमाणे त्यालाही शिक्षणाचा समान अधिकार आहे, जितका श्रीमंत वर्गाला आहे.

            सरकारी शाळाबद्दल सरसकट विधान करताना विचार करून बोलावे, हे स्वत:ला विचारवंत समजणार्‍या व्यक्तींना समजत नसेल तर यासारखे मोठे दुर्दैव नाही.

अलका चाफेकर