Categories
जात पंचायत

जातपंचायतीला मूठमाती

वार्षिकांक – २०१३

व्यक्तीला जन्मतःच लागणारी आणि कोणत्याही कारणाने न बदलणारी जात तिला नष्ट करण्याच्या सर्व प्रयत्नांना पुरून उरली आहे. जातीबद्दल असे म्हटले गेले आहे ‘जी जात नाही ती जात’. आधुनिक काळातही नवीन संदर्भांसहीत हा जातीचा प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात पुढे येत आहे. नाशिक शहरात जोशी (भटक्या) समाजातील एका तरूण गरोदर स्त्रीची आंतरजातीय विवाह केल्याबद्दल तिच्या स्वतःच्या वडिलांनी नुकतीच निर्घृणपणे हत्या केली. नंतर असे निष्पन्न झाले की, समाजाच्या जातीपंचायतीच्या धाकाला घाबरून त्यांनी असे कृत्य केले आणि जातीचे एक अमानुष रूप या जातीपंचायतीच्या रूपाने पुढे आले. तसेच त्या विरोधातील प्रक्षोभही उफाळून आला. जातपंचायतीच्या जाचामुळे जीवन असह्य बनलेले ठिकठिकाणचे अनेक लोक पुढे आले व त्यांनी आपल्यावरील अन्याय सर्वांसमोर मांडला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर ‘जात पंचायतीला मूठमाती’ हे अभियान चालविले. डॉ. दाभोलकरांनी अनेक लेख लिहून, व्याख्याने देऊन हा प्रश्न ऐरणीवर आणला. त्यांच्या खुनाच्या आदल्या रात्रीच दुरदर्शनवर याच विषयावरील चर्चा आटोपून ते पुण्याला परतले होते.

डॉ. दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अखेरच्या अभियानासंदर्भात त्यांनी लिहिलेला अखेरचा लेख आम्ही या विभागात प्रकाशित करीत आहोत. तसेच अंनिसने ‘जातपंचायतीला मूठमाती’ या अभियानांतर्गत नाशिक, जळगाव व लातूर येथे परिषदा घेतल्या. त्याचे वृत्तांत तसेच जातीव्यवस्था व जातपंचायत यांच्याबद्दल विचाराला चालना देणारा डाव्या चळवळीतील कार्यकर्ते सुभाष थोरात यांचा लेख व सरकारने जातपंचायतीच्या दडपशाही विरोधात कारवाई करण्याचे आदेश देणारे परिपत्रक अंनिवाच्या वाचकांसाठी देत आहोत.