जुने जाऊ द्या मरणालागुनी… अशी गर्जना करणार्या कविवर्य केशवसुतांचा हा महाराष्ट्र. संतांच्या विचारांनी, वीरांच्या पराक्रमांनी, समाजसुधारकांच्या प्रबोधनाने ‘महाराष्ट्रभूमी’ नांगरली आहे. महाराष्ट्राचा ‘पुरोगामी’ चेहरा बनवण्यात राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरचा महत्त्वाचा वाटा आहे. अनेक समाजसुधारणांचा ‘पाया’ याच कोल्हापुरात घातला गेला. महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या ‘सत्यशोधक’ समाजाचे कार्य कोल्हापुरात चांगलेच बहरले होते. 2011 हे वर्ष कोल्हापूर सत्यशोधक समाज स्थापनेचे शताब्दी वर्ष होते. अशा पार्श्वभूमीवर सध्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजामध्ये अजून प्रचलित असणार्या अनिष्ट प्रथा-परंपरांचा शोध घ्यायचा ठरल्यावर काय दिसून येते?
अनेक उत्सवप्रसंगी, दु:खदप्रसंगी व धार्मिकप्रसंगी काही प्रथा व परंपरा मिरवत असतात. कधी ‘आमचा मान आहे’ असं म्हणून तर कधी ‘गावकी’ आहे असं सांगून तर कधी कधी ‘आमचा तसा अनुभव आहे’ असं सांगून या प्रथा-रूढींचे समर्थन होत असते. गावकीच्या नावाखाली आजही ‘मांग समाज’ गावामध्ये लग्न समारंभप्रसंगी अथवा बेंदूरसारख्या सणावेळी प्रत्येक घराच्या दाराला ‘तोरण’ बांधण्याचे कार्य करत असतो. यामागे ‘कार्य’ व्यवस्थित पार पडावे व त्यामुळे घरात भरभराट होते असे मानणारा मोठा वर्ग आहे. गावात एखादा मयत झाल्यास काही गावांमध्ये दहनाऐवजी शेतामध्ये ‘दफन’ करण्याची चाल आहे. दफनासाठी खड्डा खोदताना खड्डा पाडण्यासाठी पहिल्या ‘पाच कुदळी’ महार समाजातील व्यक्तीने माराव्यात अशी रीत आहे. ग्रामदैवताची पालखी वाहणेचा ‘मान’ भोई समाजाकडे वर्षानुवर्षे आहे. देवाची पालखी वाहायला भोई समाज आणि देवाला वाहिलेल्या संपत्तीचा उपभोग घेणारा भटजी. हे चित्र सर्रास पहायला मिळते. ‘आम्ही पालखीचे भोई’ हा शब्दप्रयोग या ‘मानाच्या’ प्रथेवरून सुरू झाला असावा. सकाळी उठल्या उठल्या अगर महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना नाभिक समाज अथवा ‘तेली समाज’ बंधूचे तोंड पाहू नये अन्यथा काम होत नाही अशी गैरसमजूत आजही प्रचलित आहे. ‘वीर शिवा काशीद’ यांचा नाभिक समाज आणि तुकोबांचे अभंग लिहून काढणारे संताजी जमदाडेंच्या तेली समाजावर हा अन्यायच आहे.
काही धार्मिक प्रथा सवर्ण समाजाइतक्याच मागासवर्गीय समाजातही चालत आलेल्या आहेत. दरवर्षी अथवा तीन वर्षातून एकदा ‘सातीआसरांची परडी’ करण्याची चाल सर्रास आहे. सव्वा किलोचा भात, 14 पोळ्या, 7 केळी, 7 लिंबू, 7 सुपारी, खाऊची पाने असा ‘ऐवज’ टोपलीत भरायचा. ‘सातीआसरांनो आमच्यावर कृपादृष्टी असू द्या’ अशी विनवणी करत ही अन्नाने भरलेली टोपली नदीमध्ये(साती आसरांचे ठिकाण) सोडून द्यायची. काही गवळी समाजात गोडी परडी व काही जणांच्यात खारी परडी करण्याची रीत आहे. परडी देवीसाठी नदीत सोडल्यावर नदीच्या काठावर ठराविक जागी ‘नैवेद्य’ ठेवला जातो. यात मांसाहारी पदार्थाची रेलचेल असते. चिलीम व बाटलीसुद्धा असायलाच हवी. यानंतर घरातून आणलेल्या जेवणावर सर्वांनी यथाशक्ती ‘ताव’ मरायचा व ‘परडी’ सफल संपूर्ण झाली असं समजायचे. या प्रथेतून अन्नाची नासाडी इतकी होते की, ‘झोटींगासाठी’ ठेवलेला मांसाहारी नैवेद्य अक्षरश: विस्कटला जातो. प्रसंगी कुत्रेही हा नैवेद्य खात असते. परडीतील अन्नधान्य नदीमध्ये वाया जाते. भारतात कुपोषणाने लहान बालकांचे ‘जीव’ जात आहेत हे चित्र एकीकडे व प्रथा परंपरांच्या नावाखाली अन्नाची नासाडी दुसरीकडे.
विठलाई देवीच्या नावाने ‘करणी’ करण्याची प्रथा आजही जोरात आहे. यामध्ये मागासवर्गीयांबरोबर सवर्णांचाही समावेश असतो. ‘बाळूमामाचा बोकड दूध देतो’ अशी ‘अंधश्रद्धा’ आजही धनगर समाजाबरोबर इतर समाजात पाय रोवून आहे. जत्रा, यात्रा, उरूस यावेळी सार्या गावाबरोबर आजही गावची परंपरा म्हणून ‘कोंबड्याची अथवा बकर्याची पशूहत्या’ करण्यास मागासवर्गीय समाजही मागे नाही. नवीन पाण्याचे पूजन म्हणून भोई समाज व कोळी समाज आजही नदीमध्ये ‘नारळ’ टाकतो. देवाची अथवा देवीची ‘जत्रा’ करताना कोंबड्याचा अथवा बकर्याचा ‘बळी’ देण्याचा मान खाटीक समाज अथवा मुस्लिम समाजाचाच. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणार्या बाबूजमाल दर्ग्यात दरवर्षी मोहरमच्यावेळी ‘खाई फोडणेचा’ कार्यक्रम होतो. ‘खाई’ फोडणार्या व्यक्तीच्या पायाला भाजत नाही, इजा होत नाही असा समज सर्वत्र पसरला आहे. याची शास्त्रीय कारणे वेगळीच असून ‘पीरावरील’ आपली श्रद्धा तपासून घेण्यासाठी हिंदू-मुस्लीम भक्तांची चढाओढ पाहण्यासारखी असते.
‘मूर्ती घडवणार्या कुंभार समाजामध्ये मयतानंतर छोटीशी मूर्ती बनवून त्याला ‘पाणी’ पाजणेची प्रथा आहे. देवाची कृपादृष्टी म्हणून हातात गंडे, दोरे, धागे बांधण्याची ‘फॅशनेबल प्रथा’ सर्व समाजात दिसून येते. बाबासाहेबांचा वारसा सांगणारा आंबेडकरी समाजही याला अपवाद नाही. 6 डिसेंबर 2011 च्या महापरिनिर्वाणदिनी 22 प्रतिज्ञा अभियान संघटनेने केलेल्या आवाहनाला एका दिवसात 75 हजार गंडे-दोरे फेकून सच्चा आंबेडकरवाद्यांनी ही ‘बौद्धिक गुलामगिरी’ नाकारली याचे समाधान आहे. यल्लमादेवीची ‘जट’ आजही मागासवर्गीय समाजातच बहुसंख्य प्रमाणावर दिसून येईल. देवी अंगात येण्याची मानसिकताही अशीच.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ तसेच वेगवेगळे समाज व त्यांच्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा. या प्रथांचा ‘उदय’ समाजात कोणत्याही कारणाने झाला असो पण आजच्या विज्ञानयुगात ह्या रूढी ‘कालबाह्य’ ठरत आहेत. धार्मिकतेच्या व परंपरेच्या नावाखाली याचे समर्थन करणे बरोबर नाही. या प्रथा-परंपरामध्ये बहुजन समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक हानीची कारणे आहेत. जगातील प्रत्येक गोष्ट ‘परिवर्तनीय’ असते. जगप्रसिद्ध परिवर्तनवादी विचारवंत कार्लमार्क्स म्हणतो की, “प्रत्येक घटनेला उगम, विकास व अंत असतो.” प्रथा परंपरा याला अपवाद कशा असतील?
कालबाह्य जुन्या प्रथा-रूढी-परंपरा मुळापासून तपासून विवेकवादी समाजनिर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील राहू या.
–उमेश सुर्यवंशी