Categories
नरबळी

कराडमध्ये बालकाचा नरबळी

जून – २०११

            राज्यात अंधश्रद्धेमुळे कार्यकारणाच्या अभावाने समाजात मानसिक गुलामगिरी वाढत आहे. त्यामुळे आधुनिक काळात मानसिक गुलामगिरीसह अंधश्रद्धेस मूठमाती देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी केले.

            कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावात अंधश्रद्धेमुळे घरातीलच लोकांनी बालकाचा बळी घेतला. या घटनेनंतर गुरूवारी सातारा येथील परिवर्तन संस्थेमध्ये ‘जादूटोणा मानसिक गुलामगिरी’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.दाभोलकर बोलत होते. अध्यक्षस्थानी कुमार मंडपे होते.

            कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावातील काकडे कुटुंबाच्या घरावरील पत्रे वादळी वार्‍याने उडाले, आजोबांच्या समाधीस बोकडाचा बळी देण्यासाठी आणलेल्या बोकडास दोन वेळा रानटी कुत्र्यांनी खाल्ले, हौदातील पाणी अचानक तांबडे होणे, शेतातील पाण्याच्या टाकीतील पाणी अचानक संपणे अशा अनेक प्रकारानंतर घरातील लहान मुलगा प्रणव याचा अंधश्रद्धेतूनच घरात आजीने गळा दाबून खून करून मृतदेह घरातील पलंगाखाली लपवून ठेवला. अशा घटनेनंतर अंधश्रद्धेमुळे प्रणवचा बळी गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

            अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी लोकांना कार्यकारणभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन शिकविला पाहिजे. अंधश्रद्धा प्रतिबंधासाठी महाराष्ट्र नरबळी अमानवी, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध, समूळ उच्चाटन अधिनियम 2011 हा कायदा तात्काळ मंजूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या 2700 शाळा असून जिल्हा परिषदेने सहकार्य केल्यास प्रत्येक शाळेतील एका शिक्षकास प्रशिक्षण देणार आहोत. त्यामुळे प्राथमिक शाळेत शिकणार्‍या मुलांना अंधश्रद्धेचे ज्ञान दिल्यास ‘जादूटोणा मुक्त गाव’ ही संकल्पना साकारण्यास वेळ लागणार नाही. पारतंत्र्यातून देशाची सुटका करण्यासाठी सातारा जिल्ह्यात पत्री सरकार स्थापन झाल्याने स्वातंत्र्य लढ्यास महत्व प्राप्त झाले होते तसेच समाजास मानसिक गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सातारा जिल्हाच मोलाचे कार्य करेल, असा विश्वास डॉ.दाभोलकर यांनी यावेळी व्यक्त केला.

            याप्रसंगी आर.वाय.जाधव यांनी अंधश्रद्धेमुळे जिल्ह्यात वाईट घटना होऊ नयेत या संकल्पाचे वाचन केले. व अशा घटना होऊ नयेत असा संकल्प केला. उपस्थितांनी पेटती मेणबत्ती हातात घेऊन सहवेदना व्यक्त केली. याप्रसंगी शहरातील विविध संस्था व जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. उदय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. रोहित घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

            मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडल्यामुळे ही घटना अधिक धक्कादायक आहे. शासनाने काही अंधश्रद्धांच्याबाबत थेट व ठोस भूमिका घेण्याची गरज 1 मे रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली होती. जादूटोणा विरोधात कायदा करणे व त्याला प्रभावी प्रबोधनाची जोड देणे यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा असे समितीला वाटते. आपापल्या भागातील देवऋषी, मांत्रिक यांची नोंद संबंधित पोलीस स्टेशनला ठेवावी असा निर्णय गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असतानाच झाला होता. शासनाने याची सत्वर व प्रभावी अंमलबजावणी करावी. तसे झाल्यास प्रणव सारख्यांचे जीव यापुढे तरी वाचू शकतील. प्रणवच्या अघोरी मृत्यूबाबत कोणत्यातरी देवऋषाचा हात असावा असे समितीला वाटते. लवकरात लवकर पोलिसांनी तो शोधावयास हवा. या प्रकरणाचा आजपर्यंतचा तपास कराड तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक बरकत मुजावर हे पुरेशा गांभीर्याने योग्य दिशेने करत आहेत असे समितीला वाटते.

भगवान रणदिवे, सातारा.

            सातारा जिल्हा अशा प्रकारातून मुक्त करण्यासाठी चमत्कार सादरीकरणासह प्रबोधनाचा कार्यक्रम संपूर्ण वर्षभर अंनिस जिल्ह्यात राबवणार आहे. याचा प्रारंभ धोंडेवाडीला ता.20 मे ला कार्यकम झाला. अशा कार्यक्रमाची गरज असणार्‍या  गावांनी समितीशी संपर्क मोबाईल नं. 9421121328 वर साधावा असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पोतदार यांनी केले आहे.