Categories
परिषद

कोल्हापूरची ‘संघर्ष परिषद’

एप्रिल - २०१५

16 फेबु्रवारी 2015 रोजी कॉ.गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी कॉ.उमा पानसरे यांच्यावर हल्ला झाला. 20 फेबु्रवारीला कॉ.पानसरेंचे निधन झाले. तेव्हापासून कोल्हापूरमध्ये रोज निदर्शने, सभा, मोर्चा, कँडलमार्च, मेळावा असे काही ना काही सुरू आहे. 21 फेबु्रवारी रोजी प्रचंड मोठी अंत्ययात्रा निघाली. 2 मार्च रोजी कम्युनिस्ट पक्षातर्फे जेलभरो आंदोलन झाले तर शालेय विद्यार्थी हजारोंच्या संख्येने ‘आम्ही सारे पानसरे’ म्हणत रस्त्यावर उतरले. 11 मार्च रोजीच्या मुंबई मोर्चामध्ये हजारो कोल्हापूरकरांनी हजेरी लावली. 21 मार्च रोजी संघर्ष परिषद घेण्यात आली. कोल्हापूरातील डाव्या व पुरोगामी संघटना व पक्षांनी एकत्रित येऊन ‘शहीद कॉ.गोविंद पानसरे समता संघर्ष समिती’ स्थापन केलेली आहे. त्यामध्ये भा.क.प., मा.क.प., शे.का.प., जनता दल(धर्म निरपेक्ष), भारिप बहुजन महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, श्रमिक मुक्ती दल, लाल निशाण, अंनिस, सोशालिस्ट पार्टी, भटके विमुक्त जमाती विचार मंच इ. पक्ष व संघटना सामील झाल्या आहेत.

या सर्वांच्या वतीने शाहू स्मारक भवनमध्ये सकाळी 10 ते 2 या वेळेत संघर्ष परिषद संपन्न झाली. वेळ गैरसोयीची असूनही हॉल पूर्ण भरून श्रोते जमिनीवर आणि स्टेजवरही मांडी घालून बसले.

सुरवातीला कबीर कला मंच, अंनिस गीत मंच आणि शाहीर सदाशिव निकम यांनी चळवळीची गीते सादर केली. नामदेव गावडे यांनी प्रास्ताविकामध्ये पानसरेंचा खून झाला तरी कार्यकर्तेदबलेले नाहीत याची उदाहरणे देऊन खुन्यांना पकडेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही हे स्पष्ट केले.

त्यानंतर हणमंत उपरे आणि शाहीर साबळे यांना आदरांजली वाहून शोक व्यक्त केला गेला. उद्घाटक कॉ.अजीत अभ्यंकर यांच्या हस्ते ‘आम्ही सारे पानसरे’ या कॉ.अनिल चव्हाण यांनी लिहिलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कॉ.अजित अभ्यंकर यांनी उद्घाटनाचे भाषण केले- “दाभोलकर किंवा पानसरेंच्या सारखी वेळ इथून पुढे कोणावर येऊ नये हे आपण पाहिले पाहिजे. पुण्यात दरमहा अंनिस कार्यकर्ते निर्धार व्यक्त करतात आणि पुन:पुन्हा मिळणार्‍या धमक्यांना आपण घाबरत नाही. हे दाखवून देतात. भारतीय समाज आजही जातीसंबंधांने बांधलेला आहे. युरोपमध्ये सामाजिक चळवळीला चर्चने प्रखर विरोध केला. अनेक खून पडले. भारतात तसे झाले नाही. गेल्या शतकात स्वातंत्र्य चळवळ व सामाजिक चळवळ सुरू होती. पण स्वातंत्र्य आधी मिळाले. आधुनिकीकरणाची प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही. म्हणून खून पडत आहेत. हा भारतीय घटनेवरील घाला आहे.”

कॉ. उदय नारकर यांनी परिषदेमध्ये ठराव मांडला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना विवेकावर आधारित समाज हवा होता. कॉ. पानसरे दुर्बलांना वैचारिक बळ पुरवू पाहात होते. दाभोलकरांचा खून होऊन दीड वर्ष झाले तरी खुनी सापडलेले नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना-भाजप या सर्वांची भूमिका कर्तव्य टाळणारी आहे. प्रशासनात धर्मद्वेषी प्रवृत्ती शिरल्या आहेत, हे 1992-93 च्या भीषण दंगलीची चौकशी करणार्‍या श्रीकृष्ण आयोगाने दाखवून दिले आहे. भारतीय घटना आणि तिचे मारेकरी यांच्या संदर्भात सरकार काहीही भूमिका घेत असले तरी आम्ही भारताच्या सार्वभौम, धर्मनिरपेक्ष समाजवादी, प्रजासत्ताक घटनेचे संरक्षण करू. हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराजांचा आहे हे सांगण्यासाठी आणि खुन्यांना ताबडतोब अटक करा हे सांगण्यासाठी 8 एप्रिल रोजी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असा ठराव ही परिषद करत आहे. ठरावावर विविध वक्त्यांनी विचार मांडून पाठींबा दिला. कॉ. भारत पाटणकर म्हणाले, “खुनामध्ये सामील असणार्‍या हिंदुत्ववादी संघटनांची नावे घेतली पाहिजेत. 8 एप्रिलचा मोर्चा आर.एस.एस.च्या ऑफीसवर काढायचा आहे.

अं.नि.स.च्या सुनील स्वामींनी दाभोलकर आणि पानसरे यांचे खुनी एकच असल्याचे प्रतिपादन केले.

भाई भारत पाटील(शे.का.प.) म्हणाले, “राज्यसत्ता प्रतिगाम्यांची आहे. एकीच्या जोरावर त्यांना खुनी शोधायला भाग पाडू. कॉ. पानसरेंचे विचार जनतेपर्यंत पोहोचवू.”

कॉ. स्मिता पानसरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची माहिती दिली. “सनातनी धर्मांध बाबांचे खुनी आहेत त्यांची चौकशी करा म्हटल्यावर पत्रकारांनी ते कसे करतील? अशी शंका व्यक्त केली. त्या म्हणाल्या ही संघर्ष समिती आंदोलनाने चौकशी करायला लावेल. कॉ. धनाजी गुरव(श्रमिक मुक्ती दल) म्हणाले, “माणसे मारली की, विचार संपेल असे समजून खून पाडले जातात. अडाणी स्त्री पुरूष देव धर्माच्या कल्पनेत गुरफटलेले आहेत. त्यांच्या भाषेत आपण बोलावे. संत तुकारामांच्या भाषेत वारकर्‍यांशी बोलावे, बसवण्णांच्या भाषेत लिंगायतांशी बोलावे.”

कॉ. दिघे(लालनिशाणी पक्ष) म्हणाळे, “झुरळ खाणारा किडा झुरळापेक्षा लहान असतो. तो तुकडे करून झुरळ खातो. मनुवाद या देशातल्या कष्टकर्‍यांचे तुकडे पाडतो आणि भांडवलवाल्यांना खायला घालतो. कांबळे, फर्नांडीस, सुतार, दलित, ख्रिश्चन, मुस्लीम बहुजन हे कारखान्यात कामगार आहेत. मनुस्मृती अंमलात आणायची नसेल तर आर.एस.एस.ने गोळवलकर गुरूजींचे पुस्तक फेकून द्यावे. मनूने शेतकर्‍यांना शूद्र ठरवून संपत्ती काढून घेतली. मोदी जमीन अधिग्रहण कायदा करून जमीन काढून घेत आहे. म्हणून रामदास आठवले आणि राजू शेट्टीनी भाजपची पालखी खांद्यावरून उतरावी” असे आवाहन त्यांनी केले.

बाबूराव गुरव यांनी ‘आपल्या पक्ष, संघटना, प्रवाह या बाहेरही मोठा समाज आहे, त्याला जवळ घेण्याचे आवाहन केले. हा समाज प्रतिगाम्यांच्या हाताला लागल्याने त्यांचे खून करण्याएवढे धाडस झाले आहे. जाती अंताच्या लढाईत आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना संरक्षण दिले पाहिजे हे स्पष्ट केले. प्रमुख वक्ते म.अं.नि.स.चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कॉ. पानसरेंनी आपुलकीने कार्यकर्त्यांना जवळ घेऊन विश्वास दिल्याचे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच दाभोलकरांच्यानंतर अं.नि.स.चे कार्य सर्व समावेशक करता आले. आपण धोरण आखले पाहिजे हे सांगताना त्यांनी अंनिसने ठरवलेला चार कलमी कार्यक्रम जाहीर केला. 1) प्रत्येक जिल्ह्यात संकल्प मेळावा घेणे. 2) प्रत्येक जिल्ह्यात दरमहा 20 तारखेस विवेक व्याख्यान घेणे. 3)कॉ.पानसरेंची पुस्तके(240 रू.ची 100 रू.मध्ये) हा सेट व ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे. 4) दरमहा रक्तदानासारखे रचनात्मक कार्यही करावे.

भा.क.प.चे कॉ.तानाजी ठोंबरे यांनी अध्यक्षीय भाषणात “सरकार बहिरे असेल तर कानाखाली आवाज काढला पाहिजे” हे स्पष्ट केले. धर्मांध सनातनी विवेकानंद, म. गांधी, भगतसिंग, छ. शिवाजी अशा महापुरूषांचे नाव वापरतात. या महापुरूषांचे मूळ विचार जनतेपर्यंत नेले पाहिजेत. आर.एस.एस.चा इतिहास जातीयवाद वाढवणारा व कष्टकर्‍यांची चळवळ मारणारा आहे. लहान वयातच मुलांच्यावर ते कुसंस्कार करतात. आर.एस.एस.स्वातंत्र्य आंदोलनात नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर त्यांनी गुप्तहेर संघटना आणि मीडियावर कब्जा केला. फिडेल कॅस्ट्रो म्हणतात, ‘संघर्ष’ हा जगातला सर्वात सुंदर शब्द आहे. आपण प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चासत्रे, अभ्यास शिबीरे घेतली पाहिजेत.” सूत्र संचालन अनिल चव्हाण यांनी केले. कॉ. एस.बी.पाटील यांनी आभार मानले.

कार्यक्रमासाठी हमीद दाभोलकर, कॉ. दिलीप पवार, प्राचार्य टी.एस.पाटील, वसंतराव मुळीक, सुनील स्वामी, कॉ. मेघा पानसरे, कॉ. रघुनाथ कांबळे, कॉ. शिवाजी शिंदे इ.उपस्थित होते.

–अनिल चव्हाण

लेखक संपर्क : 9764147483

कॉ. अनिल चव्हाण यांनी लिहिलेल्या “आम्ही सारे पानसरे” पुस्तिकेत कॉ.गोविंद पानसरेंचे खुनी कोण असावेत? याचा ऊहापोह केला आहे. कॉ.पानसरेंनी अलिकडच्या काळात घेतलेली हिंदू जातीयवाद्यांच्या विरोधातील आंदोलने, सभा-व्याख्याने आणि शिवाजी कोण होता? सारखे लिखाण हे कारणीभूत आहे. ‘आम्ही सारे पानसरे’ म्हणणार्‍या कार्यकर्त्यांनाही काय कार्य करायचे आहे याचे मार्गदर्शन व्हावे, हा त्या मागचा उद्देश आहे. पुस्तिकेत अंनिसचे कृष्णात कोरे, ए.आय.एस.एफ.चे सुशील लाड आणि अस्मिता ग. चव्हाण यांच्या अर्थपूर्ण कवितांचा समावेश करण्यात आला आहे.