Categories
नवी अंधश्रद्धा

लाल रंगाच्या बाटलीला कुत्री घाबरतात?

ऑक्टोबर - २०१९

महाराष्ट्रभर ठिकठिकाणी घराच्या अंगणात लाल रंगाचे पाणी भरून ठेवलेल्या प्लास्टिक बाटल्या दिसतात. आता या बाटल्या कशाच्या, असा सुुरुवातीला नवागतांना प्रश्न पडायचा. मात्र आता हे लोण सार्वत्रिक झाले असून तो कुत्र्यांचा ‘बंदोबस्त’ असल्याचे सांगण्यात येते. म्हणजे भटकी कुत्री दारात ‘शी’ करत असतील, तर हा नामी उपाय असल्याचे सांगितले जाते.

दाराशी लाल रंगाच्या पाण्याची बाटली ठेवल्यास कुत्री घाण करीत नाही, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक घरांसमोर लाल पाण्याची बाटली ठेवल्याचे दिसून येते; परंतु कापडणे (जि. धुळे) येथे एक कुत्रा या बाटलीजवळ जाऊन तिला नाकाने हुंगत असल्याचे दिसून आल्याने ती श्रद्धा नव्हे, तर अंधश्रद्धा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यभरात घरांसमोर, ओढ्यांवर लाल पाणी भरलेल्या बाटल्या ठेवल्याचे दिसून येते. अशा बाटल्या ठेवल्यास भटकी कुत्री घाण करीत नाहीत, असा समज आहे, तर काही ठिकाणी त्याबाबत अन्य समजही आहेत. त्याबाबत कुंकवाचे लाल पाणी करून ते ठेवले जाते. बहुतेक जणांनी श्वान लाल पाण्याच्या बाटलीजवळ जाऊन तिला हुंगून पाहत असल्याचे बघितल्याने त्यांनी हा अंधश्रद्धेचाच भाग असल्याचे मान्य केले.

पशुवैद्यक डॉ. पी. पी. निकुमे यांनी सांगितले की, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. लाल पाण्याच्या बाटलीला कुत्री घाबरत नाहीत. फक्त खाद्य पदार्थ शोधण्याच्या नादात काय आहे, असे ते बघतात. यातच घाण करण्याचे विसरतात. त्याचमुळे उपयोग होतो.

कुत्र्यांना रंगज्ञान नसते

अलिकडे बर्‍याच घरांसमोर, अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लाल रंग भरलेल्या बिसलरी बाटल्या ठेवलेल्या पाहिल्या असतील. यामागे असा समज आहे की, असा लाल रंग पाहिल्यामुळे कुत्रे त्याला घाबरतात आणि त्या ठिकाणी शी/सू करत नाहीत. मुळात हे बिनकामाचे फॅड आणि याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. कारण मुळातच कुत्र्यांना आपल्यासारखे रंग वैविध्य आणि रंगछटा दिसत नाहीत. याचे कारण त्यांच्या डोळ्यांच्या ठेवणीमध्ये आहे. डोळ्यांमध्ये दंडाकार पेशी (Rod cells) आणि शंकू आकाराच्या पेशी (Cone cells) असतात.

दंडाकार पेशी- प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात, ज्यामुळे आपल्याला प्रकाश आणि काळोख समजतो.

शंकू आकाराच्या पेशी – प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात; पण त्यांना अंधुक संवेदना नसतात. (म्हणून आपल्याला अंधारात रंग ओळखता येत नाहीत)

माणसांमध्ये रंगज्ञानासाठी डोळ्यांमध्ये शंकू आकाराच्या पेशींची संख्या जास्त असते. याउलट कुत्र्यांमध्ये दंडाकार पेशींची संख्या जास्त असते म्हणून त्यांना हलणार्‍या गोष्टी (moving objects) अंधारात खूप चांगल्या प्रकारे दिसते आणि शंकू आकाराच्या पेशी फार कमी असतात, त्यामुळे आपल्याला दिसणार्‍या रंगछटांच्या उलट कुत्र्यांना सगळे जग फक्त पिवळ्या, निळसर आणि काहीशा राखाडी रंगछटांमध्ये दिसते. त्यामुळे या लाल रंगाच्या बाटलीचा त्यांना यत्किंचितही फरक पडत नाही.

आता दुसरा मुद्दा शी/सू करण्याचा. तर कुत्रे हे त्यांच्या जगात वास/गंध यांवर जास्त अवलंबून असते. त्यांची स्वतःची एक रासायनिक भाषा असते की ज्यातून ते स्वतःची हद्द आखत असतात, एकमेकांशी संवाद साधत असतात. म्हणून ते ठराविक ठिकाणीच शी/सू करतात, ज्याद्वारे इतर कुत्र्यांना त्या ठिकाणी आल्यानंतर त्या भागात असलेल्या त्यांच्या जातभाईंची संख्या, ताकद, सेक्स याविषयीची माहिती समजते. आता पावसाळ्यात सर्वत्र जमीन ओली, चिखल/पाणी असल्यामुळे आपल्या दारासमोर, अंगणात, रस्त्यावर असलेल्या कोरड्या जागेमध्ये शी/सू करून हद्द आखतात; जेणेकरून त्या ठिकाणी इतर कुत्रे येऊ नयेत.

या कृतीला काही ठिकाणी मिळालेले यश हे दुसरे तिसरे काही नसून काही मूर्ख लोकांच्या कृतींमध्ये आहे. काही मूर्ख लोक पेट्रोल भरलेल्या बाटलीतील पेट्रोल काढून या कुत्र्यांच्या ढुंगणावर मारतात, जे खूप जळजळते. म्हणून कुत्रे या बाटल्या आणि पेट्रोलला Corelate करतात, एवढेच.