Categories
हात मदतीचा

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आघाडीवर

ऑक्टोबर - २०१९

सांगली अंनिस

सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये कृष्णा व पंचगंगा नदीला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापूर आल्यामुळे नदीकडील गावांचे प्रचंड नुकसान झाले. घरे, शेती पाण्याखाली गेली. या नैसर्गिक आपत्तीमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी देशभरातील सामाजिक संस्था पुढे आल्या. सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांना लागणारे दैनंदिन सामान जसे – धान्य, कपडे, किराणा माल इत्यादींची मोठ्या प्रमाणात मदत केली. परंतु विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याची मदत ही दुर्लक्षित राहिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्रभरातील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली. याचे संयोजन अंनिसचे राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत यांनी केले. महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांचा दौरा केला.

शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप मोहीम

महाराष्ट्र अंनिस कार्यकर्त्यांच्या मदतीतून जमा झालेले साहित्य आणि मुंबईचे कार्यकर्ते गिरीशभाई शहा, दापोलीचे कार्यकर्ते अनिश पटवर्धन व पुण्याचे कायर्कर्ते दीपक गिरमे यांनी पाठविलेले शालेय साहित्य सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वाटले गेले. जवळजवळ 800 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये चव्हाण कन्या महाविद्यालय सांगलीवाडी, अभिनव हायस्कूल शामरावनगर, ब्रह्मनाळ हायस्कूल ब्रह्मनाळ, सेकंडरी स्कूल भिलवडी, जि. प. प्राथ. शाळा भिलवडी, प्रगती हायस्कूल आमणापूर, बोरजाईवाडी, ‘रयत’चे नांद्रे हायस्कूल नांद्रे, सांगली शहरातील पूरग्रस्त सफाई कामगारांची मुले व पूरग्रस्त हमाल पंचायतीच्या सभासदांच्या मुलांना स्कूल बॅग, वह्या, कंपास, पेन आणि पेन्सिल यांचे वाटप केले गेले. तसेच या उपक्रमास मिरज मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, आर्यांग्ल मेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी; तसेच संगिनी गु्रप सांगलीच्या कार्यकर्त्यांनी मोठे सहकार्य केले.

पूरग्रस्तांसाठी अंनिसचा मानसिक आरोग्य प्रकल्प

महापुराचे संकट अचानक आल्यामुळे पूरग्रस्त गावातील अनेक लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. महापुरामुळे शेतीचे व घराचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील दोघांनी आत्महत्या केल्या. पूरग्रस्त जनतेला मानसिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पूरग्रस्त गावात मानसिक आरोग्य प्रकल्प राबविण्याचे ठरविले. याची अधिकृत घोषणा अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेऊन केली.

महापुरामध्ये ब्रह्मनाळ या गावी बोट उलटल्याने तेरा जणांना प्राणास मुकावे लागले. या गावाचेही महापुराने प्रचंड नुकसान झाले होते. म्हणून या गावात अंनिसचा मानसिक आरोग्य प्रकल्प राबविण्याचे ठरले. त्यानुसार राजमती कन्या महाविद्यालयातील एन.एस.एस.च्या मुलींना दोन दिवस मानसिक आरोग्याचे प्रशिक्षण परिवर्तन संस्थेच्या समुपदेशिका योगिनी मगर व संवाद ग्रुप सांगलीच्या समुपदेशिका अर्चना मुळे यांनी दिले. त्यानंतर या 65 मुली व 10 अंनिस कार्यकर्ते यांना ब्रह्मनाळ या गावात नेऊन संपूर्ण गावाचा मानसिक आरोग्याचा सर्व्हे केला गेला. यामध्ये 700 कुटुंबांना भेट देऊन 900 ग्रामस्थांकडून 10 प्रश्नांची प्रश्नावली भरून घेतली. यापैकी 107 लोकांना तातडीने मानसिक आधाराची गरज वाटली म्हणून सांगली येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनुसे, डॉ. कुंभार यांच्या मदतीने त्या गावांमध्ये जाऊन त्यांची मानसिक आरोग्य तपासणी करण्यात आली.

यापुढे कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या क्लिनिकल सायकॉलॉजीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ब्रह्मनाळ गावात भेट देऊन उरलेल्या ग्रामस्थांचे समुपदेशन करण्याचा मानस आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या मानसिक आरोग्य प्रकल्पासाठी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर डॉ. नितीन पाटील, अंनिसच्या मानसिक आरोग्य विभागाचे सहकार्यवाह डॉ. हमीद दाभोलकर, राजमती कन्या महाविद्यालय आणि कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली शहर अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे, प्रा. अमित ठकार, गीता ठकार, डॉ. सविता अक्कोळे, डॉ. संतोष अक्कोळे, आशा धनाले, त्रिशला शहा; तसेच संगिनी गु्रप सांगली यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र अंनिसने केलेल्या या सामाजिक कामाची दखल ‘युनिसेफ’कडून घेण्यात आली. ‘युनिसेफ’ने त्यांच्या सहकार्याने सोबत काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंनिसला केले आहे.

इचलकरंजी अंनिस

2019 हे वर्ष संपूर्ण महाराष्ट्राच्या नेहमी लक्षात राहील, ते यावर्षी आलेल्या प्रलयकारी महापुरामुळे. इचलकरंजी शहर हे येथील कापड उद्योगामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतात प्रसिद्ध आहे. परंतु या पुरामुळे अनेक यंत्रमागधारकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागावर पाळी करून आपला उदरनिर्वाह करणार्‍या अनेक कामगारांच्या हातचे काम नाहीसे झाले आहे. अशा परिस्थितीमुळे आर्थिक, मानसिक, भावनिक सर्वच बाजूंनी खचलेल्या मनांना गरज आहे ती आपुलकीच्या शब्दांची आणि आधाराची…!! आणि याच महापुराने हाहाकार माजवलेल्या परिस्थितीत इचलकरंजी शहर व आसपासच्या भागातील पूरग्रस्तांच्या सोबतीला उभे राहिले शहरातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, विवेकवाहिनी, कन्या महाविद्यालयातील विवेकसाथी आणि राष्ट्र सेवादल सैनिक. शहरातील इतरही अनेक संघटना व संस्था सुद्धा मदतकार्यात सहभागी होत्याच; पण त्यांच्यासोबतीने मदतकार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी हे कार्यकर्तेही सातत्याने प्रयत्नशील आहेत.

यशवंत भंडारे या राष्ट्र सेवा दल जिल्हा संघटकाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या पूरग्रस्तांना मदतकार्यात सर्वतोपरी व नियोजनबद्ध काम अखंडपणे करत आहेत. साधारणपणे 50-60 कार्यकर्त्यांची टीम वस्तूंचे संकलन करणे, वाटपासाठी त्याचे वर्गीकरण करणे, विविध भागात जाऊन सर्व्हे करणे, वितरण करणे, बाहेरून येत असणारी मदत योग्य त्या ठिकाणी पोचवणे अशा विविध पद्धतीने काम करत आहेत. यामध्ये तरुण व महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे.

सुरुवातीचे दोन दिवस छावण्यांमध्ये जाऊन तेथे आलेल्या लोकांना कपडे वाटप करणे हे महत्त्वाचे व गरजेचे काम होते. ही गरज ओळखून कार्यकर्ते आपापल्या प्रयत्नांतून कपडे गोळा करून ते विविध केंद्रावर जाऊन वितरित करत होते. त्याचबरोबर पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी आलेल्या रिस्क्यू टीम व पोलीस कर्मचारी अशा जवळपास दोनशे जणांच्या चहा व नाष्ट्याची सोय करण्याचे काम सुद्धा कार्यकर्ते करत होते.

या पुरामध्ये जसे लोकांचे आयुष्य विस्कळित झाले, तसेच शेतकर्‍यांनी जीवापाड जपलेल्या जनावरांचेसुद्धा हाल झाले. हे लक्षात घेऊन ज्या छावण्यांवर जनावरे होती, तिथे पशुखाद्य पुरवण्याचे कामही सुरू केले. पुण्याहून डी. वाय. पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप, सिन्नर येथून राष्ट्र सेवादल टीम व छात्रभारती टीम; तसेच राष्ट्र सेवादलाच्या मुंबई, पालघर, सासवड, मालेगाव, संगमनेर या शाखांकडून काही कार्यकर्ते ट्रक घेऊन येथे मदतीसाठी येत होते, ज्यामध्ये धान्य, तेल, साखर, चहा, साबण, मेणबत्ती अशा जीवनावश्यक वस्तूंचा प्रामुख्याने समावेश होता. या वस्तूंचा एका कुटुंबाला आपापल्या घरी गेल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस संसार पुन्हा नव्याने उभा करेपर्यंत पुरेल, अशा पद्धतीने संच करण्याचे काम सुरू झाले. ते संच पूर ओसरल्यावर पूरग्रस्त लोक घरी गेल्यावर त्यांना नेऊन देण्याचे नियोजन करण्यात आले व त्यासाठी आसपासच्या गावात जाऊन सर्व्हे करण्याचे काम काही टीम करू लागल्या. हा सर्व्हे करण्यामध्ये प्रामुख्याने यशवंत भंडारे, प्रफुल्ल आवळे, अनिकेत पवार, अवधूत खचनाळे, सुनील स्वामी, विनायक चव्हाण इत्यादी कार्यकर्तेसहभागी होते.

दरम्यानच्या काळात जेव्हा कपडे, ब्लँकेट यांचे वाटप करत असताना छावण्यांवरील महिलांशी संवाद होऊ लागला, तेव्हा त्यांच्या बोलण्यातून सॅनिटरी पॅड व अंडर गार्मेंट्स याची गरज जाणवली. फक्त अंगावरच्या कपड्यानिशी घर सोडून या स्त्रिया केंद्रावर येऊन राहत होत्या व त्यालाही चार-पाच दिवस होत आले होते. समाजातील संकुचितपणामुळे महिलांना केंद्रप्रमुख किंवा इतर संघटनांकडून वाटप करणार्‍या पुरुषांना ही गरज बोलून दाखवण्यात अडचण येत होती; मात्र हा दुर्लक्षित विषय टीममधील मुलींनी उचलून धरला व ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मुली व महिलांच्या टीमने सॅनिटरी पॅड आणि नवीन अंडर गार्मेंट्स यांच्या खरेदीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला महाराष्ट्रभरातून अतिशय चांगला प्रतिसाद आला. त्यातून आवश्यकतेनुसार गार्मेंट्सची खरेदी करून महिलांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधत त्याचे वाटप करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम जवळपास 15 जणींच्या टीमने केले. ज्या महिलांना गरज होती त्यांना सॅनिटरी पॅडसुद्धा पुरवले. शहरातील जवळपास 35 केंद्रे व आसपासची 10 गावे अशा भागामध्ये मुलींनी स्वतः फिरून याचे वाटप केले. यामध्ये विभावरी नकाते, रुचिता पाटील, कादंबरी पडते, मानसी पडते, गौरी कोळेकर, उषा कोष्टी, समृद्धी हुबळे, वैशाली हुबळे, सुप्रिया कोष्टी, रागिणी ढवळे, स्नेहल माळी, दीपाली कांबळे अशा जवळपास 15 मुली व महिला सहभागी होत्या. यात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे कार्यकर्ते म्हणून काम करणारे प्रफुल्ल आवळे, ओम कोष्टी, दिग्विजय म्हमाणे अशा अनेक तरुणांच्या कुटुंबातील महिलांनी या कामात सक्रिय सहभाग नोंदवला व तरुणींच्या सोबतीने काम केले.

या सर्व कामांमध्ये येथे अतोनात काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी जळगाव येथून परिवर्तनाच्या चळवळीतील ज्येष्ठ साथी वासंती दिघे, अद्वैत दंडवते, मोहोळहून अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल कोरे, मोहोळचे उपनगराध्यक्ष शौकतभाई तलफदार, नगरसेवक अतुल गावडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हरिश्चंद्र बावकर, सक्षम भारत संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीरंग लाळे आणि त्यांचे साथी, तसेच सातारा येथून अंनिसचे प्रधान सचिव प्रशांत पोतदार, दापोलीहून अनिश पटवर्धन यांनी अत्यंत आवश्यक सहकार्य केले. अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनीही भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

अशा परगावाहून आलेल्या पाहुण्यांना सहकार्‍यांना निवासाची उत्तम व्यवस्था इचलकरंजी येथील उद्योजक दीनानाथ होगाडे आणि अंनिसचे शाखाध्यक्ष विनायक होगाडे यांच्या कार्यालयामध्ये करण्यात आली.

एकूण 35 खेडेगावांमध्ये अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सुरुवातीला तेथे प्रत्यक्ष भेट देऊन सर्व्हे करून, पूरग्रस्तांच्या भेटी घेऊन, त्यांना मानसिक आधार देत त्यांना गरजेच्या असणार्‍या जीवनावश्यक वस्तूंचे संच, शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य तपासणीचे कॅम्प, औषधे उपलब्ध करून देणे, जनावरांना खाद्य पुरवणे अशा विविध पद्धतीने काम कार्यकर्ते करत आहेत. अंनिसचे कार्यकर्तेफक्त मदत पुरविण्याचे काम करत नसून एक ‘मानसमित्र’ बनण्याच्या भूमिकेतून पूरग्रस्तांशी सातत्याने संवाद साधत त्यांना आधार देत आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात ‘विवेकवाहिनी’ व अंनिसने आयोजित केलेल्या ‘मानसमित्र’ कार्यशाळेत सुद्धा सहभाग घेतला.

पूरग्रस्तांच्या मदतीचे काम हे फक्त पूर असतानाच नव्हे, तर पूर ओसरल्यावर अधिक जबाबदारीने करणे महत्त्वाचे ठरते, याची जाणीव या परिस्थितीने प्रत्येक कार्यकर्त्याला करून दिली. पूरग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यात मदत म्हणून नव्हे, तर एक कर्तव्य म्हणून सहभागी झालेला प्रत्येक कार्यकर्ता ‘हे काम इतक्यात संपणारे नव्हे, तर बर्‍याच काळासाठी सुरू राहणारे आहे,’ याची जाण मनात ठेवून आपापल्या परीने अगदी आजतागायत कार्यरत आहे.

शब्दांकन विभावरी नकाते

सातारा अंनिस

सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पाटण व कराड तालुक्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये शालेय दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, वॉटर बॅग, शालेय गणवेश, कंपास यांचा समावेश होता. यामध्ये नावडी अंगणवाडी शाळा क्र. 359, जि. प. शाळा नावडी नं. 1, जि. प. प्राथमिक शाळा नंद्रुळ हवेली, ता. पाटण, जि. प. प्राथमिक शाळा जमदाडवाडी, जि. प. शाळा चौगुलेवाडी, स्वातंत्र्य सैनिक अण्णा बाळा पाटील विद्यालय व ज्युनि. कॉलेज तांबवे, जि. प. प्राथ. शाळा, दक्षिण तांबवे (ता. कराड, जि. सातारा), या शाळांमधील सुमारे 370 विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग होता. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीजवळील पूरग्रस्त कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचेही मोफत वाटप करण्यात आले. यासाठी सातारा येथील यशोदा शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक टेम्पो भरून साहित्य जमवले होते.

या संपूर्ण मदत कार्यात दापोली शाखेचे कार्यकर्ते अनिश पटवर्धन, अनुराग चव्हाण, सुजल नाचरे, अवंतिका चव्हाण, चेतन शेगवन, मल्हारपेठ शाखेचे मुलाणी सर, दादा पवार, प्रदीप देसाई, सातारा शाखेचे भगवान रणदिवे, वंदना माने, हौसेराव धुमाळ; तसेच विभा मॅडम यांचे महत्त्वाचे सहकार्य मिळाले; तसेच माझे वर्गमित्र व सध्या जयपूर स्थित (राजस्थान) येथे अ‍ॅडिशनल पोलीस कमिशनर असलेले संतोष चाळके, त्यांचे मित्र सुरेंद्र मेवदा, महेंद्र कोठारी, कुलारिया ट्रस्ट; तसेच सातार्‍यातील ‘विवेकवाहिनी’चे कार्यकर्ते पण सध्या यू.पी.मध्ये स्थायिक असलेले धनंजय बंडझोडे, सातार्‍याच्या ऐश्वर्या भोसले, मुंबईचे आनंद कीर्तने, वाईचे रणवीर गायकवाड, सातारचे दिलीप महादार या सर्वांचे बहुमूल्य सहकार्य याकामी मिळाले. ही संपूर्ण मदत मोहीत यशस्वी करण्याचे महा.अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, डॉ. हमीद दाभोलकर यांनी विशेष प्रयत्न केले.

– प्रशांत पोतदार, सातारा.

गडचिरोली अंनिस

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात कित्येक गावे पुराने वेढले गेल्याने अनेक दिवस त्यांना तालुक्याशी संपर्क ठेवणे अशक्य झाले. तर काही गावे अक्षरशः पुराच्या पाण्यात बुडली. त्यामुळे घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे जिल्ह्यातील सर्व शाखांच्या माध्यमातून जवळपास दहा ते बारा क्विंटल तांदूळ आणि पैसे गोळा करून किराणा सामान खरेदी करून व साहित्याचे सुमारे तीनशे किट बनवून पुरग्रस्त लोकांना वाटप केले. सोबत लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अंगावर परिधान करण्यासाठी साड्या-चोळ्या, लुगडे शर्ट-पॅन्ट, चादर, स्वेटर, वितरीत करण्यात आले. सांगली अंनिसकडून विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, नोटबुक कंपास बॉक्स, पेन-पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्य पाठविले गेले. महा.अंनिस सोबतच इतर समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. भामरागड येथील तहसीलदार कैलास अंडील यांचे सुद्धा सहकार्य लाभले.

विलास निंबोरकर, गडचिरोली

कोल्हापूर अंनिस

2019 चा पावसाळा हा सर्वार्थाने लक्षात राहील तो म्हणजे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत आलेला महापूर आणि या महापुराने घडवलेली वाताहत यासाठी.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून प्रत्यक्ष पूर वाढत असलेल्या काळात आपण फारसे काही करू शकत नव्हतो, तरीही आपले कोल्हापूर शहर प्रधान सचिव नियाज अत्तार, संघसेन जगतकर, महाराष्ट्र विवेकावाहिनीच्या न्यू कॉलेजचा भारतजीवन प्रभुदेसाई हे कार्यकर्ते अगदी पुराच्या पहिल्या दिवसापासून पुरात अडकलेल्या लोकांची पुरातून सुटका करणे, त्यांना अन्न किंवा इतर जीवनावश्यक मदत पोचवणे अशा कामांत होते.

या काळात महाराष्ट्र अंनिस कोल्हापूर शहर शाखेने पूरग्रस्त गावांच्या सर्वेक्षणाचा एक आदर्श नमुना विकसित केला. यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली ती शनिवार, दि. 7 ऑगस्ट रोजी न्यू कॉलेजच्या ‘विवेकवाहिनी’ सदस्यांनी शहरात पूरग्रस्त नागरिकांसाठी केलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी जाऊन केलेल्या सर्वेक्षणातून. या ‘विवेकवाहिनी’ सदस्यांनी पाच टीम बनवून सात ठिकाणी भेटी दिल्या. पूरग्रस्तांशी आपुलकीचा संवाद साधला. एरव्ही अन्नपदार्थ, कपडे यांची मदत घेऊन जाणार्‍यांच्या गर्दीत जवळ येऊन मायेने चौकशी करणारी ही तरुणाई त्या गर्दीत उठून दिसत होती. शहरात इंधनाचा तुटवडा असल्यामुळे या युवांनी सात निवारा केंद्रात पायी जाऊन 450 ते 500 पूरग्रस्त कुटुंबांशी प्रातिनिधिक संवाद साधला. यावेळी हे पूरग्रस्त निवारा केंद्रातील पूरग्रस्त नागरिक अन्न, औषधे, वस्त्र या तत्कालीन गरजा पूर्ण होत असल्या तरीही नंतर घरी गेल्यावर मदतीचा हा ओघ असाच सुरू राहणार नाही, अशावेळी पुराने वाहून गेलेले घर, संसार, खराब झालेले व्यवसायाचे साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे पाहिल्यावर आम्ही काय करायचं? या प्रश्नाने व्यथित, चिंतीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या सर्वेक्षणातूनच या विवेकसाथींनी केवळ पुराच्या काळात भावनिक होऊन भागणार नाही, तर पूर ओसरल्यानंतर सुद्धा या लोकांशी आपुलकीने संवाद साधण्याचा आणि त्यासाठी ‘मानसमित्र’ होण्याचा निर्धार केला. या सर्वेक्षणात यश अंबोळे, भारतजीवन प्रभूदेसाई, तेजश्री पाटील, सोनम पाटील, शामल पाटील, आदिनाथ पाटील, मिताली जमाल, वैभव सावंत, वैभव राऊत, आदिती निल्ले, वृषाली खोत, क्षितिज

बनसोडे, ऋतुजा यादव, आशितोष पाटील, अनिकेत देसाई, जयगुरू चिले या विवेकसाथींनी सहभाग घेतला. या युवा विवेकसाथींनी केलेल्या सर्वेक्षणातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र अंनिसच्या कोल्हापूर शाखेच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्यक्ष पूरक्षेत्रात जाऊन पाहणी करणे, पीडितांच्या नुकसानीची माहिती घेऊन त्यांच्या गरजा समजून घेणे, राज्यभरातून आलेली मदत योग्य ठिकाणी पोचवणे यासाठी ‘ग्राऊंड झिरो रिपोर्ट’ मांडणारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नंतरच्या टप्प्यात हळदी, हालोंडी, इंगळी, रुई, या ग्रामीण भागातील; तर सिद्धार्थनगर, बापट वसाहत, शाहूपुरी कुंभार गल्ली या कोल्हापूर शहरातील भागांत स्वतः फिरून सर्वेक्षण केले तर चंदूर, बस्तवाड, कारदगा या गावांतील सर्वेक्षण तेथील सहकार्‍यांकडून करून घेतले.

या सर्वेक्षणानंतर महत्त्वाचा टप्पा हा बाहेरून मिळालेल्या मदत साहित्याचे वितरण हा होता. आम्ही गोळा केलेल्या तपशिलानुसार अत्यंत गरजू, उपेक्षित अशा समुदायांकडे लक्ष केंद्रित केले. साधारणतः पाच सदस्य असलेल्या प्रत्येक कुटुंबाला किमान आठ दिवस पुरेल इतका शिधा, अत्यावश्यक निवडक कपडे, स्वच्छतेचे साहित्य, सॅनिटरी नॅपकिन्स, अंथरुण अशा जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार केले. यादीनुसार प्रत्येक कुटुंबाला पोचते केले. शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. काही ठिकाणी मेडिकल कँप लावले. 20 ऑगस्ट रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त तावडे हॉटेल परिसरातील झोपडपट्टीतील साधारण 70 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले गेले.

या सर्वांसाठी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील विविध संस्था, संघटना, मंडळे, व्यक्ती यांनी दिलेले साहित्य; तसेच महाराष्ट्र अंनिसच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी दिलेले साधारण त्रेचाळीस हजार रुपये उपयोगी पडले. सर्वेक्षण, साहित्य संकलन आणि वितरणाच्या या कामात नियाज अत्तार, राजवैभव शोभा रामचंद्र, यश अंबोळे, प्रांजल जगजंपी, संघसेन जगतकर, कपिल मुळे, रेश्मा खाडे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथून सुट्टीसाठी आलेली मानसी निर्मळे, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी खास लांजा (जि. रत्नागिरी) हून आलेले सुहास शिगम, साने गुरुजी स्मारक ट्रस्ट, वडघर (जि. रायगड) येथून आलेले सतीश शिर्के आणि कृष्णात स्वाती यांनी मदत केली.

एकूणच, या आपत्तीमुळे खचलेल्या मनांना नैराश्याच्या खाईत जाण्यापासून रोखणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पूरग्रस्त भागातील लोकांशी सातत्याने संपर्कात राहून, ‘मानसमित्र’ हा एक संवाद उपक्रम राबवण्याचे महाराष्ट्र विवेकवाहिनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठरवले आहे. या उपक्रमांतर्गत पीडितांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्याही नकळत त्यांच्या भावनिक जखमांवर प्रेमाची फुंकर मारण्याचा प्रयत्न केला जाईल. एका अर्थाने भावनिक प्रथमोपचारच म्हणा ना! आवश्यक वाटले तर व्यावसायिक तज्ज्ञांकडून समुपदेशन किंवा मानसोपचार उपलब्ध करून दिले जातील. त्यासाठी शनिवार दि. 24 ऑगस्ट रोजी न्यू कॉलेज येथे मानसिक आरोग्य विभागाचे कार्यवाह डॉ. हमीद दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत न्यू कॉलेज, शिवाजी विद्यापीठाचा समाजकार्य विभाग, महावीर महाविद्यालय आणि काही स्वयंसेवी संस्था आणि महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्तेमिळून एकूण 74 कार्यकर्ते उपस्थित होते.

मानसी निर्मळे (9503226191)