Categories
प्रेरणा

 म.फुलेंची पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे

ऑगस्ट - २०१२

            क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे आजोबा लहुजी साळवे  त्याकाळी  आजोबाचे नांव नातवाला  ठेवत असल्याने नातू व आजोबा यांची नावे सारखी आली असावीत. त्यांचे वडील राघोजी साळवे यांच्याकडे  पुरंदर  किल्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती. साळवे घराण्याचे अतुलनीय शौर्य पाहून त्यांना शिवाजी महाराजांनी ‘राऊत’ ही मानाची पदवी दिली होती. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठपुरंदर या गावात साळवे घराणे राहत असे. राघोजी साळवे  यांना दोन पुत्र एक  क्रांतिवीर लहुजी वस्ताद व दुसरा यशवंत लहुजी साळवे यांनी सन 1822 मध्ये गंजपेठेत आखाडा सुरू केला. या आखाड्यातून क्रांतिवीर तयार करणे हा हेतु होता. म.जोतीराव फुले यांनी याच आखाड्यातून प्रशिक्षण घेतल्याने म. फुले, वस्ताद लहुजी साळवे यांना गुरू मानत. म.फुले यांनी 1 ऑगस्ट 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेंच्या वाड्यातील पहिली मुलीची शाळा स्थापना केली. म.फुले यांच्या शाळेत आणि सावित्रीमाईंना संरक्षण देण्यासाठी क्रांतिवीर लहुजी साळवे पुढे सरसावले.

            लहुजी साळवे यांचा भाऊ यशवंतचे लग्न झाले त्यांना मुलगी झाली त्याच मुलीचे नांव मुक्ता होय. मुक्ता साळवे यांचा जन्म दिनांक 5 सप्टेंबर 1843 साली झाला.  मुक्ता साळवे तिसर्‍या इयत्तेत शिकत असतांना वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी समाजात असलेल्या विषमतेबाबत व जातीयवादाबाबत लिहिण्याचे व बोलण्याचे धारिष्ट्य दाखविले.  याबाबत त्यांनी आपले विचार निबंधातून व्यक्त केले.  12 फेब्रुवारी 1853 च्या पुणे येथे झालेल्या निबंध स्पर्धेत त्यांनी जातीयवादाच्या जाचातून अस्पृश्यांना मुक्त करण्यासाठी आपले विचार बालवयातच स्पष्टपणे मांडले व शिक्षणाची मक्तेदारी समजले जाणार्‍या ब्राह्मणांवर व समाजात असलेल्या विषमतेबाबत विचाराची तोफ डागली.  महार व मांग यांचा धर्म कुठला? हा सवाल विचारण्याचे धारिष्ट्य त्यांनी त्या काळात दाखविले. 

            12 फेब्रुवारी 1853 रोजी मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली फुले दांम्पत्याच्या क्रांती कार्याचा गौरव म्हणून पुणे कॉलेज चौकात त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या. तसेच काही विद्यार्थ्यांचे निबंध वाचन घेण्यात आले.  पहिली मातंग विद्यार्थीनी मुक्ता साळवे हिचे स्वत: अनुभवित असलेल्या अन्याय-अत्याचार, शोषित-पिडीत जीवनावर आपल्या निबंधातून प्रकाश टाकून आपला धर्म कोणता? असा प्रखर सवालच गावकुसाबाहेर लाचार, भिकार जिणे जगणार्‍या आपल्या समाज बांधवांना केला. शिक्षणाची संधी मिळताच तिसर्‍या इयत्तेत शिकणार्‍या 11 वर्षाच्या मुक्ताने इंग्रजी अधिकार्‍यांसमोर महार-मांगांच्या दयनीय, करुण, दु:खी अवस्थेला आपल्या निबंधातून वाचा फोडली.  आपल्या निबंधातून मुक्ता प्रथम हल्ला करते ती वेदांवर, वेदांना सर्वस्व मानणार्‍या लोकांच्या विधानाचे खंडण करावयास पाहिजे असे ती स्पष्टपणे म्हणते.

            मुक्ता साळवे आपल्या निबंधातून वेदांवर दोषारोप करतांना उपरोधिकपणे म्हणते – “वेद हे ब्राह्मणांचे आहेत तर मग वेदानुसार आचरण करणे ब्राह्मणांचाच धर्म आहे.  वेदाचे पठण केले तर आम्ही केवढे महापापी बनतो की त्यासाठी आमचा छळ व सर्वनाश आम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहावा लागतो, सोसावा लागतो.”  पुढे मुक्ता म्हणते- “वेदानुसार आचरण करुन येणारी हीनता अर्थात कलंकितपणा आम्हा मांगा-महारांना परवडणार नाही.”  मुक्ताने स्पष्टपणे म्हटले आहे की, “हे वेद ज्यांचे त्यांना लखलाभ असोत.  आम्हाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही.  अर्थात जीवाचा सर्वनाश करणार्‍या वस्तूचा लोभ आम्ही का धरावा ? तिला ठोकरलेलेच बरे,”  आणि मुक्ता वेदांना ठोकरते.  कारण वेद-वेद करीत वेदाचे शस्त्र हातात घेवून शूद्रातीशूद्रांचा सर्वनाश करावयास निघालेल्या वेदसत्ताक ब्राह्मणांचा गर्व, ताठा पाहून मुक्ता बंडखोर झाली आहे. 

            पुढे निबंधात मुक्ता म्हणते – “मग आमचे धर्मपुस्तक कोणते, ज्यानुसार आम्ही दिनचर्या करावी?  मुसलमानाचे कुराण आहे.  ख्रिश्चनांचे बायबल आहे.  ब्राह्मणांचे वेद आहेत.  आम्हाला मात्र धर्मानुसरणासाठी पुस्तकच नाही. तर मग आमचा धर्म कोणता? जो हिंदूधर्म सर्वांसाठी म्हणून सांगितला आहे त्या धर्माचा अधिकार एकच ब्राह्मण जात गाजवित आहे. एक जेवत आहे तर एक गलीतगात्र होवून उपाशी पोटी टुकटूक पाहत आहे. हा कसला धर्म? हा तर अधर्म! अशा धर्माचे पृथ्वीवरुन  उच्चाटन व्हायला पाहिजे. अशा धर्माचा अभिमान बाळगणे तुच्छ आहे.” अशी ती स्पष्टपणे जाहीर करते. अर्थात अशा तुच्छ, टाकाऊ धर्माचा होवून राहण्यात, बांधील राहण्यात काही अर्थ नाही.  असा स्पष्ट इशारा मुक्ताने मांग-महारासाठी ब्राह्मणांकडून अस्पृश्य गणल्या गेलेल्या व गावकुसाबाहेर कुत्र्या-मांजरापेक्षाही हीन दर्जाचे लाचार जिणे जगणार्‍या आपल्या समदु:खी शोषीत, पीडित बांधवांना दिला आहे.

            शेकडो वर्षापासून मांग-महारांवर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मुक्ता म्हणते, “आम्हा गरीब मांगा-महारांना मारुन त्यांनी इमारती बांधल्या आहेत. इमारतीच्या पाया भरणीच्यावेळी आम्हास शुभ समजून तेल व शेंदूर पाजून, जिवंत गाडून आमचा बिमोड करावयाचा उपक्रम चालविला होता.” क्षत्रीय मांग-महारांना परशुरामाने संपविण्यासाठी अनेकानेक युक्त्या वापरुन नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  त्यासाठी इमारती, गढी, किल्ले आदिच्या पायातही त्यांना सहकुटुंब गाडून मारण्यात आले आहे

            “अस्पृश्यांनी लिहिणे, वाचणे यासाठी बाजीरावांचा खास विरोध होता.  मांग-महार असून लिहिता, वाचता तर मग ब्राह्मण, मांग-महारांना दप्तरी काम देवून स्वत: काय विधवांची हजामत करीत बसतील? महार-मांग वाचन-लेखन शिकल्यास तो शिक्षा देत असे.” असे पेशव्यांचा मांगा-महाराविषयीचा शैक्षणिक बाबतचा भेदभाव मुक्ता निबंधातून स्पष्ट करते.

             ब्राह्मणांच्या सोवळ्यावर, उच्चपणावर टीका करतांना मुक्ता म्हणते की, “यांना लोकांपेक्षा पवित्र आहोत. हे दाखविण्याचा भारीच सोस आहे. परंतु यांच्या उच्चतेमुळे आम्हाला अस्पृश्यतेचा काय काय त्रास सहन करावा लागतो.  स्वत:चे उच्चत्व जोपासणारी व समाजाची संपूर्ण घडी विस्कटून इतरांच्या जीवनाशी खेळणारे हे ब्राह्मण निर्दयी आहेत” असे ती जाहीर करते.

            आपल्या समाज बांधवांचे दैनंदिन जीवनातील कौटुंबिक हाल पाहून “पंडितांनो आपले स्वार्थी पांडित्य व पूजापाठ जरा बाजूला ठेवा आणि माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका” असे मुक्ता ब्राह्मणांना सुचित करते.  ती म्हणते – “आमची स्त्री बाळंत होते तेव्हा घरावर छतही नसल्या ठिकाणी तिचे बाळंतपण होते.”  बाळ-बाळंतीणीचे हाल ती आपल्या निबंधातून स्पष्ट करतांना “सुरक्षितता, पैशांचा अभाव, डॉक्टरांच्या मदतीशिवाय जन्माला येणारे नवजात बालक व माता जगले तर ठीक, नाही तर माता-बालकांना मृत्युला कवटाळण्याची स्थिती केवढी ही स्त्रियांची करुण अवस्था.  अशावेळी खाण्यापिण्याची कुठलीही सोय नाही.  अशा अवस्थेत, कपडेलत्त्याचाही अभाव अन् कसले बाळंतपण? स्त्री आणि जनावर सारखेच.”

            “मांग-महार जातीच्या मुलांना दगडधोंड्यांनी मारुन ब्राह्मणांची मुले रक्तबंबाळ करीत असली तरीही तो अन्याय मुकाट्याने सहन करण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही.  दाद मागावी कुणाकडे? अन्याय, अत्याचार हाच जिथे पांडित्यांचा धर्म होता, तिथे फिर्याद करण्याचा प्रश्न नव्हता केवढी ही मुस्कटदाबी?”

            हे सर्व महार मांगाचे समाज जीवन पाहून मुक्ता कळवळते. समाज बांधवांच्या हीन दीन, लाचार अवस्थेविषयीचा, करुणतेतून निर्माण झालेला हा कळवळा आहे.  तिला हे दु:ख पाहवत नाही. हे समाजावरील अन्याय, अत्याचार, दु:ख दैन्य लिहिता, लिहिता ही 11 वर्षांची चिमुरडी मुक्ता रडवेली होती.  ती रडकुंडीला येते. ‘मला रडू येते’ असे त्या स्पष्ट म्हणतात.  ‘आमचे दु:ख निवारण करण्यासाठी परमेश्वराने इंग्रज सरकारला इथे पाठविले आहे’ असे स्पष्ट करते.

            आपल्या निबंधात ब्राह्मणांच्या पराक्रमबाजीवर मुक्ता भडकते.  “घरात उंदीर मारण्याचीही ज्याची क्षमता नाही असे पराक्रमी वीर? मांगा-महारांवर अन्याय, अत्याचार करण्यातच पटाईत आहेत.  गड-किल्ल्याच्या पायात असहाय्य मातंग स्त्री, पुरुष, बालकांना दफन करणारे पराक्रमी कसे ? शिवरायांचा आठवावा प्रताप !  लढाईच्या धुम:श्चक्रीत असहाय्य स्त्री पुरुष अथवा बालक आढळल्यास त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करुनच पुढे जावे असा खास आदेश, सैनिकांना शिवरायांचा होता.  सहायता करण्यासाठी जात धर्म आडवा येत नव्हता.  शत्रूचीही स्त्री स्वराज्यात सुरक्षित होती.   कुठे ते स्वराज्यातील जनतेचे रक्षक! आणि कुठे हे राक्षस!”

            मुक्ताने आपल्या निबंधात अगदी मुक्तपणे ब्राह्मण आणि त्यांचा धर्म, अर्थात शूद्र मांग-महारासोबत त्यांचा कट्टर धर्मवाद! नव्हे पिढ्यान्पिढ्यांचा जातीयवाद, शत्रुत्व। यावर कडाकडून टीका केली आहे. 

            मुक्ताने आपल्या निबंधातून धर्मशास्त्रावरील वेदांवर प्रथम प्रहार केला. वेद म्हणजे जातीव्यवस्था टिकवून ठेवणारे शास्त्र. एकीकडे हिंदू म्हणून अस्पृश्य जातीचा समावेश केला जातो. परंतु धर्मबंधू म्हणून समानता पाळली जात नाही, हा मुक्ताचा आक्रोश होता. वेद म्हणजे ब्राह्मणांची संपत्तीच होती. एखाद्या अस्पृश्याने वेद वाचले तर त्यास मरेपर्यंत कठोर शिक्षा दिली जाई. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की, अस्पृश्यांची वेद ही धर्म पुस्तके होऊ शकतात काय? मुक्ताने सांगितले की, ‘वेद ही त्यांची मत्ता आहे, जर आम्हास धर्मपुस्तके पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहीत आहोत,’ असे स्पष्ट दिसते.

            भारतात हजारो वर्षापासून रुढ झालेल्या वर्णवादामुळे शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मण वर्गाकडेच होता.  ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही वर्गाची सेवा शूद्रांनी नि:स्वार्थीपणे करावी असा दंडक होता.  पण अतिशूद्र अर्थात अस्पृश्य म्हणून संबोधलेल्या वर्गाची काय अवस्था असेल? याची कल्पनाही करणे कठीण होते.  ढोर, गवार, शूद्र, पशू नारी! सब है ताडन के अधिकारी। म्हणजेच अतिशूद्राने केवळ गुलाम म्हणूनच रहावे अशीच स्थिती होती.

            व्यवस्थेचे गुलाम बनविलेल्या समाजाला प्रथम विद्यादान देण्याचे क्रांतीकारक कार्य राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी केले. शूद्र, अतिशूद्रांच्या मुलामुलींनी शिक्षण घ्यावे, हा त्यांचा उद्देश होता.  कारण अज्ञानानेच या ढोंगी धर्मांधाशी शूद्र-अतिशूद्रांना अंधारात ठेवले होते.  त्याकरिता राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी अस्पृश्यांच्या मुलांकरिता शाळा काढल्या.  त्यावेळी मुलींनी शिक्षण  घेणे धर्माविरुद्ध आहे किंवा पाप आहे असे समजले जात होते.

            राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या शाळेत अस्पृश्यांच्या मुलांनी शिकावे, याकरिता आपल्या समाज बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून त्यांना शाळेत आणण्याचे कार्य वस्ताद लहूजी बुवा साळवे करीत होते.  लहूजी साळवे समाजाला सांगत होते की, ‘तुम्हाला माणूस बनायचे झाल्यास तुमच्या मुलांना म.फुले यांनी सुरुवात केलेल्या शाळेत पाठवा.  त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र राणोजी महार गायकवाड मदत करीत होते.  राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या या कार्यामुळेच आजचा संपूर्ण शूद्रअतिशूद्र समाज शिक्षणातून आगेकूच करीत आहे.

            मुक्ता म्हणते – ‘लोक देव देव, धर्म धर्म करतात पण हे देव, धर्म गरिबांकरिता नाहीत.  ते शहाण्या लोकांच्या व पैसेवाल्या लोकांच्या हिताकरीता आहेत.  आम्ही नुसते गप्प बसून लोकांची सुखे पहावी, ज्या धर्मात धर्माचे सुख व देवाची कृपा मोठमोठ्यांना मिळते तो धर्म नष्ट होवो.  त्या धर्माचा अभिमान धरण्याची इच्छा आम्हास कधीही न होवो.’

            पेशवे काळात ब्राह्मणांचे अस्तित्त्व टिकून रहावे हाच मुळ उद्देश होता म्हणुन मुक्ताने लिहिले की, “बाजीरावांच्या काळात महार, मांगांनी बारीक लडीचे नवीन धोतर किंवा वस्त्र घालून राजवाड्यासमोरुन गेल्यास किंवा स्वच्छ पांघरुणे वापरली तर ते चोरीचे आणले असावे म्हणून त्यांस शिक्षा होत असे. एखादा अस्पृश्य त्यांच्या आखाड्यासमोरुन गेल्यास गुलटेकडीच्या मैदानात त्यांच्या शिरांचा चेंडू व तलवारीचा दांडू करुन उठविला जाई.  कारण त्या शूर समाजाचा बिमोड करणे त्यामागील शुद्ध उद्देश होता, हेतू होता.”  म्हणजेच मातंग समाजाने निरक्षर किंवा अज्ञानी रहावे, त्यांनी आपले राहणीमान सुधारु नये, या समाजाने चांगल्या कपड्यांऐवजी गोधड्या वापराव्यात, फाटकी वस्त्रे नेसावीत, आयुष्यभर गाढवाप्रमाणे गुलामी आणि लाचारीत राहावे, त्यातच जीवन कंठावे, त्यांनी आपले परिवर्तन कधीच करु नये. असाच पेशवेशाहीचा कट होता.

            शिक्षणाचा गंधही नसणार्‍या अस्पृश्य समाजासाठी शिक्षणाची दारे उघडी ठेवणार्‍या इंग्रजी शासनाचे मुक्ताने आभार मानले कारण इंग्रज हे जातीभेद मानत नव्हते  ते समतावादी होते त्यामुळे भारतात प्रथमच अस्पृश्यांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह नेण्याचे कार्य राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी केले  म्हणून समाज व्यवस्थेवर घाव घालणारी मातंग समाजातील मुक्ता ही पहिली विद्यार्थिनी तयार होऊ शकली. अस्पृश्यतेच्या नावाखाली मांग, महारांवर होणारा अन्याय, अत्याचार मुक्ताने अनुभवले होते. ते दु:ख विषद करण्यासाठीच तिने त्यावर निबंध लिहिला.  महार मांगाच्या दु:खाविषयी तिने लिहिलेला ‘आपला धर्म’ हा निबंध 1853 साली इंग्रज शासनाच्या शैक्षणिक अहवालात गाजला.  ज्ञानोदय या वृत्तपत्राने 17 फेब्रुवारी 1853 रोजी हा निबंध प्रकाशित केला एवढेच नव्हे तर आजही पुणे शहराच्या वर्णनात याची नोंद आढळून येते. 

            मुक्ताने निबंध रुपातून ठेवलेले सर्व सामाजिक आशय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात प्रखरतेने आढळतात कारण मुक्ताच्या त्या निबंधाचे वाचन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले होते.  त्यांनी  राष्ट्रपिता जोतिराव फुले यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या साहित्याचे आकलन केले.  त्याच राष्ट्रपिता जोतिराव फुले, सावित्रीमाई फुले यांची मुक्ता साळवे ही अस्पृश्य समाजातील पहिली विद्यार्थिनी होती. नंतरच्या काळात राष्ट्रपिता जोतिराव फुले यांच्या शाळेत मुक्ताने शिक्षिकेचेही कार्य केले.  अशा या देशाच्या समाजव्यवस्थेवर प्रहार करणार्‍या या विद्यार्थीनीचे विचार आजही समाज परिवर्तनाच्या कार्यास महत्त्वपूर्ण ठरतात.

– गौतम निकम