Categories
मानसमित्र

मानसोपचारातील काही अडथळे

वार्षिकांक – २०१४

मानसोपचारात गेल्या काही वर्षात जरी वेगाने बदल झाले असले तरी आजही मानसिक रोगांबाबत प्रचंड गैरसमजुती जनमानसात आहेत. या गैरसमजुती मानसिक आजारांवर उपचार करताना कशा अडथळ्याच्या ठरतात याचा उहापोह या लेखात डॉ.प्रदीप पाटकर यांनी केला आहे. पण केवळ अडथळ्यांची जंत्री देऊन लेखक थांबलेला नाही तर ते अडथळे ओलांडण्यासाठी आपल्या आजाराकडे व उपचाराकडे रूग्ण, नातेवाईक, काळजीवाहक, मित्र व डॉक्टर या सार्‍यांनीच कसे पाहिले पाहिजे याचाही उहापोह करीत ‘मानसमित्र’ संकल्पना यासाठी कशी सहाय्यभूत ठरेल याचाही उहापोह केला आहे.

मनोविकारतज्ञांच्या कन्सल्टिंग रूम मध्ये सतत वाढत जाणार्‍या गर्दीची विविध कारणे सांगितली जातात. मनोविकारांविषयी अधिक सजगता हे त्यातले एक मुख्य कारण सांगितले जाते. माहिती वाढली तशी जागृती वाढली. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे मनोविकारांचे स्वरूप जसजसे लक्षात येऊ लागले तसतशी हा त्रास आपल्याला, आपल्या मुलाबाळांना, नातेवाईकांना तर नाही ना अशी भीतीही वाटू लागली. उपचारांनी रुग्णात सुधारणा दिसू लागल्यानंतर लोक या शास्त्राला अधिकाधिक स्वीकारू लागले आहेत असेही दिसते. 35 वर्षे या क्षेत्रात काम करणार्‍या माझ्यासारख्या मनोविकार तज्ञाला या मुळे निश्चित समाधान वाटते आहे. गेल्या 10 वर्षात मानसोपचारात संशोधनामुळे घडून आलेल्या वेगवान प्रगतीमुळे आता बरे वाटणे, बरे राहणे, बरे होणे सोपे, कमी त्रासाचे झाले आहे. मात्र आजही त्यातील समजांबरोबर अजूनही दृढ असलेल्या गैरसमजापोटी व अनाकलनीय दुर्लक्षामुळे मनोरुग्णांचे कितीतरी नुकसान होत आहे असे मला खेदाने सांगावेसे वाटते. हे नुकसान सहज टाळता येण्यासारखे आहे.

माझ्या ओपीडीत रोज येणार्‍या रुग्णांमध्ये, साधारण दहा केसीसपैकी दोन केसीस नवीन असतात तर तीन केसेस वेळ ठरवून नियमित फॉलोअप करणार्‍या असतात. उरलेल्या पाच केसेस मात्र औषधोपचार चुकविल्यामुळे, उपचार मध्येच सोडून दिल्याने, स्वतःच औषधांचे प्रमाण चुकीचे घेतल्याने, पुन्हा रोगलक्षणे उद्भवल्याने आलेल्या असतात. पन्नास टक्के रुग्ण केवळ उपचारांची नियमितता व शिस्त न पाळल्याने स्वतःचे नुकसान करून घेत असतात. लक्षणे व आजार मान्यच नसल्याने उपचारासाठी न येणे असा प्रकार अनेक रुग्ण करतात. उपचारांचा खर्च झेपत नसल्याने, अनेक कारणांनी उपचार खंडित झाल्याने वा लक्षणे सौम्य असताना त्याकडे दुर्लक्ष करून न येणार्‍या केसेस तर मोठ्या संख्येने असतात. येथे मी उपस्थित रुग्णांविषयी काही निरीक्षणे मांडतो आहे.

बर्‍याचदा, संशोधनात औषधाने दाखविलेले चांगले परिणाम प्रत्यक्ष उपचारात का दिसून येत नाहीत, या प्रश्नाचे एक उत्तर रुग्णाचे उपचारांकडे होणारे / केले जाणारे दुर्लक्ष हे असते. बरे रुग्णाला खूप काही कठीण मेहनत घेउन उपचार करावे लागतात असे नाही. नियमित वेळी अर्धा ग्लास पाणी घेउन त्याबरोबर दोन-चार गोळ्या साधारण दहा सेकंदात गिळल्या की दिवसभराचे उपचाराचे एक महत्वाचे काम संपते. अगोदर 25 सूर्य नमस्कार घाला, विशिष्ट अवस्थेत बसून स्नायू जोरदार पिळा, नियमित दीर्घ श्वसन करा, उपाशी राहा, तळपत्या उन्हात पायपीट करा असे काही त्रासदायक करावे लागत नसतानाही, मानसिक रुग्ण गोळ्या नीट का घेत नाहीत, त्याबाबत लपवाछपवी व टाळाटाळ का करतात, गोळ्या घेण्यास सांगितले की नाराज, दुःखी, त्रस्त, वा संतप्त का होतात? अनेक दिवस रोगाशी झगडून रोग आटोक्यात आणलेला असतानाही हा गोळ्यांचा फायदा विसरून हे रुग्ण गोळ्या घेणे का टाळतात? गोळ्या सोडल्यावर पुन्हा त्रास होतो, हे वारंवार दिसूनही त्यांना उपचाराच्या नियमिततेचे महत्व का मान्य होत नाही? मला, रुग्णांची काळजी घेणार्‍याना व जगातील तमाम मनोविकारशास्त्राच्या अभ्यासकांना हे प्रश्न छळत राहतात. औषधे चुकविल्याने रुग्ण पैसे, वेळ, मानसिक (व शारीरिकही) ताकद उगीचच खर्च करतो, पदरी नुकसान पाडून घेतो. व्यवसाय, नोकरी, नातेसंबंध या सार्‍या क्षेत्रात त्याचे बरेच नुकसान होते. सर्वांनी मेहनत करून रुग्णाची गाडी पुन्हा रुळावर आणली व हुश्श म्हणत जरा विसावा घेतला की रुग्णाने गोंधळ केलाच म्हणून समजा. बरे रुग्ण अशिक्षित असो वा सुशिक्षित, श्रीमंत असो वा गरीब, मूल असो वा प्रौढ, शहरी असो वा ग्रामीण, चुकीच्या पद्धतीने उपचार घेण्यात कुणी कमी पडत नाही. अज्ञानापेक्षा अर्धवट ज्ञान, अंधःविश्वास, चुकीचे मार्गदर्शन, अनाहूत सल्ले, ठाम गैरसमज यांनी नुकसान जास्त होते.

वैद्यकीय सल्ला नीट न पाळला जाण्याची कारणे अनेक आहेत. त्यातली काही वरवरची, सहज टाळता येण्यासारखी आहेत, उदा. शिस्तीचा अभाव, गोळ्यांचा कंटाळा, साइड इफेक्टस, खर्च इ? पण काही कारणे मात्र समाजात खोलवर रुजलेल्या अविवेकी विचार पद्धतीमुळेही आहेत. वैज्ञानिक मनोवृत्ती, कार्यकारणभाव व संशोधनाबाबत सखोल अभ्यास करण्याची वृत्ती यांचा अभाव, एकंदर ‘जे नवे’ त्याबद्दल संशय व भीती, विवेकी तर्कवादापेक्षा भावनिक ‘उसळी’वर आधारून निर्णय घेण्याकडे कल अशीही अनेक कारणे उपचारातला तोल व सातत्य धोक्यात आणतात. वैज्ञानिक वृत्ती आपल्यात कितपत आहे? आजाराविषयी व औषधांविषयी कितपत शास्त्रशुद्ध माहिती आपल्यापाशी आहे? हे प्रश्न वैद्यकशास्त्रातील उपचारांमध्ये महत्वाचे ठरतात. वेळेचा अभाव असल्याने वैद्यकीय तज्ञांकडून ही माहिती मिळणे कठीण जाते. इंटरनेटसारख्या माध्यमातही मिळणारी माहिती योग्य, शास्त्रीय, अधिकृत आहे ना, याची खात्री करून घ्यावी लागते. रोजच्या ओपीडीत मला आढळणारी काही कारणे मी मांडीत आहे. त्याचा उपयोग कसा करून घ्यावा हे वाचकांनी ठरवायचे आहे.

‘महत्व कशाला द्यावे ?’

आपण अन्न-पाण्याला, करमणुकीला बरेच महत्व देतो. ते योग्यही आहे. (स्त्रियांवर) भरपूर ताण पडला तरी चालेल, पण सण उत्सवातील सर्व त्रासदायक कर्मकांडे (बर्‍याच सणांचे दिवशी उपवास करून) काटेकोरपणे पार पाडली पाहिजेतच, असा घरात सर्वांचा आग्रह असतो. सण कमी पण ताण जास्त(प्रदूषण त्याहून जास्त) अशी घरातील अनेकांची अवस्था असते. आत्मपीडनावर भर असतो. आत्मपीडन मनात रुजले की समाजमानसात परपिडनाला जोर चढलाच म्हणून समजा. मग उत्सव सार्वजनिक होतो. त्यात कर्णकर्कश गोंधळ, हिणकस करमणूक, डौल, दिमाख, खंडणी, पैशांची उधळपट्टी, भ्रष्टाचार घुसतो. आपल्याच माणसांची, आजूबाजूच्या त्रस्त, आजारी, लहान, वृद्ध, गरीब, पक्षीप्राणीमात्र, पर्यावरण या कुणाचीच पर्वा केली जात नाही. वर्षोनुवर्षे श्रावण व रमझान संपला की, अतिआम्लता, अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर, निद्रानाश इ. तक्रारी घेऊन स्त्रिया दवाखान्यात हजर होतात, पण कितीही सांगितले तरी उपवास टाळत नाहीत. जणू काही उपवासाशिवाय देव खुश होणारच नाही, किंबहुना उपवास केला नाही तर तो/ती शिक्षाच करील, अशी प्रेमळ परमेश्वराबद्दल अतार्किक, चुकीची कल्पना जास्त!अशा दिवसात रोजच्या औषधांकडे, पथ्याकडे, नियमांकडे, व्यायामाकडे दुर्लक्ष होते; ते गृहीतच धरले जाते. गावाला, यात्रेला, प्रवासाला जाताना औषधे तेवढी बरोबर न्यायला नेमकी विसरतात. आजारात रोज घ्यायची काळजी घरीच खुंटीला टांगून जातात. वर या सर्व बेशिस्तीचे कौतुक होताना दिसते. नातेवाईक लटके रागवताना रुग्ण स्मित हास्य करतात!आपल्या आजाराचे आपल्यालाच कमी महत्व वाटते. (अशा ठिकाणी काही आत्मलुब्ध, स्वप्रेमी रोगी काम टाळण्यासाठी आजाराचे सोंग ही करतात ती गोष्ट वेगळी. उलट असे केल्याने, हळूहळू त्यांच्या खर्‍या त्रासांकडे इतर दुर्लक्ष करू लागतात हा आणखी एक गोंधळ.).

पन्नास रुपयांची नोट, जमिनीचे सातबारे, मित्र मैत्रिणीचे फोटो, प्राचीन प्रेमपत्रे सर्व नीट सांभाळले जाते. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मात्र तेलात किंवा लोणच्यात बुडवून, चिवड्याभोवती गुंडाळून, वेगवेगळी आकडेमोड लिहून, अगदी बहुतेक फोडणी देऊनही आणतात. रुग्ण राग आला की पहिले केसपेपर फाडतात. पोरगी दिसली कि दिल हरवावे तितक्या नियमितपणे पेपर हरवतात. निदान पेपर आणायला तरी विसरतात. वर पेपर विसरून आल्यावर डॉक्टरांची स्मरणशक्ती तपासत बसतात. नोट क्वचितच हरवते, पेपर मात्र हरवतात, तो फाटतो, तो आणायला विसरतात. आपल्या आजाराचे महत्व आपल्या स्वतःलाच कमी वाटते. मनोविकारी दुर्मुखलेला, एकाकी, शांत कोपर्‍यांत पडून असेल तर दुर्लक्षिला जातो. त्याने चिडून आदळआपट केली तर मात्र लगेच त्याला डॉक्टरांकडे आणले जाते. शांत माणसाकडे दुर्लक्ष तर उद्धट माणसाला बहुमान हे तर समाजात नेहमीच दिसते. स्वतःचे डोके फोडले तरी चालेल, पण रुग्णाने टीवी, मोबाईल फोडून चालत नाही. महत्व कशाला द्यावे हेच समजत नाही. वर्षानुवर्षे रुग्ण घरात निष्क्रिय पडून आहे, त्याने उद्योगी व्हावे असे कुणाला वाटत नाही? तो असाच पडून राहील, झोपून राहील, अशाच गोळ्या द्या ही विनंती काही खरोखरच कंटाळलेले थकलेले नातेवाईक करीत राहतात. ते समजण्यासारखे आहे. रुग्णाने आपल्यासारखे कार्यशील झाले तर उलट त्याचा आजार कमी होईल, असे रुग्णाच्या काळजीवाहकांना वाटायला हवे. पण आजारातील चढउतार त्यांना हतबल करतो, निराश करतो.

‘औषधांचा कंटाळा’

फिट्स, स्किझोफ्रेनिया यासारख्या दीर्घकाळ उपचार घ्यावे लागणार्‍या रोगांमध्ये साहजिकच रुग्ण औषधे घेत राहण्याच्या दैनंदिन कार्यक्रमाला कंटाळतो. मग तो मध्येच गोळ्या कमी घेतो, मधून मधून (चविपुरत्या!) घेतो, अथवा सरळ बिनधास्त गोळ्या सोडून पाहतो. पुन्हा त्रास झाला की, चरफडत, गोळ्या सुरु करतो. हा त्याचा कंटाळा डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाईकांनी, मित्रांनी समजून घेतला पाहिजे. ‘मूड’ सांभाळून त्याला उपचार नियमित सुरु ठेवण्याबद्दल प्रोत्साहन दिले पाहिजे. काही दिवस बरे वाटल्यावर, रुग्ण व त्याचे नातेवाईक (कधी कधी फॅमिली डॉक्टर व इतर विषयातील तज्ञ डॉक्टर्सही ) ‘आता गोळ्या बंद करून पाहू’ असा अविचार बिनधास्त करतात व गोळ्या बंद करतात. यात रुग्णाचे जवळचे अनुभवी नातेवाईक कमी भाग घेतात, पण लांबचे नातेवाईक (ज्यांच्यावर उपचारांची काही जबाबदारी नसते) आपले म्हणणे पुढे दामटवीत रुग्णाला गोळ्या बंद करायला प्रोत्साहन देतात. सल्ला आवडणारा असल्याने तो त्वरित पाळला जातो. मग पुन्हा आजार उफाळला की हे दूरचे काका -मामा सुचतील ते बिना उपयोगाचे, रोगाशी संबंधित नसलेले पण लोकप्रिय (सिटी स्कॅन, एमआरआय ई.) महाग तपास त्या बिचार्‍या रुग्णाला करायला लावतात. ते नॉर्मल आले की वर डॉक्टरनाच विचारतात , “हे काय हो डॉक्टर, हा रोग परत परत का होतोय? एकदाचा फायनल उपाय करून टाका की ओ! किती वेळा त्याने हा त्रास काढायचा? का दुसर्‍या कुणा मोठ्या, मुंबईच्या डॉक्टरना दाखवून घेऊ?” मग डॉक्टर आपले मुंबईतलेच वैद्यकीय शिक्षण आठवीत, होकारार्थी मान हलवून नि:श्वास टाकतात.

‘गोळ्या औषधांविषयी संशय’

रोग बरा नाही झाला तरी चालेल, पण साईड इफेक्ट नको, एवढी दहशत साईड इफेक्टबद्दल असते (रोगाबद्दल एक वेळ बेफिकिरी असू शकते). साईडइफेक्ट सौम्य असतात, काही तर काही दिवसात निघून जातात, गोळीचा डोस कमी करणे पुरेसे असते, योग्य उपाय योजनेने साईड इफेक्ट्स निघून जातात. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, नेचरोप्याथी सर्व पद्धतीत साईड इफेक्ट्स असू शकतात. रुग्णासाठी औषधाचे योग्य प्रमाण ठरविण्यासाठी काही काळ लागतो. त्या काळात काही त्रास होत असल्यास अस्वस्थ, भयभीत न होता आपल्या डॉक्टरांशी सल्ला मसलत करावी हे उत्तम.

एकदा का औषधे सुरु झाली की त्या नंतरच्या काळात सर्दी, ताप, खोकला काहीही झाले, तर ते साईड इफेक्ट समजून घाईघाईत औषधे बंद करू नयेत, त्वरित डॉक्टरांशी बोलून, शंका निरसन व उपाय करून घ्यावे. उपचार सोडून देऊ नयेत. रोगट जीवन शैलीची, तात्पुरता आराम देणार्‍या औषधाची सवय लागता कामा नये ही काळजी घ्यायला हवी. पण सर्व गोळ्या सवय लावणार्‍या असतात हा गैरसमज मनात ठेऊ नये. दीर्घ काळ गोळी घेतली की तिची सवय होते हे खरे नाही. आजार बरा झाला कि गोळी हळू हळू कमी करून सोडता येते. बरेचदा रुग्ण, डॉक्टरांच्या भेटी घेणे टाळून, आपल्या ओळखीच्या प्रेमळ(की बेफिकीर?) केमिस्टच्या मदतीने गोळ्या चालू ठेवतात व गोळ्यांची स्वतःला सवय लागली असल्याचे ठरवून टाकतात. झोपेच्या गोळ्या विषयी चिक्कार गैरसमज आहेत. झोप सुधारली कि डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या सोडता येतात, निद्रानाश देणार्‍या सवयी मात्र टाळाव्या लागतात.

गोळ्या गरम(?) पडतात, त्यांनी अशक्तपणा येतो, डोस आपणच कमी करावा, गोळ्यांमुळे लिवर, हार्ट, किडनी, हाडे, डोळे खराब होतात, असे गैरसमज माणसे समाजात बिनदिक्कत पसरवित रहातात. अविवेकी अनाहूत सल्ले जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात देणारे अनाहूत सल्लागार खूपच आहेत. स्वतःला वैद्यकीय ज्ञान असल्याचा गाढ आत्मविश्वास त्यांना असतो. ‘मेडिकल फ्रॅटर्निटी’ *ली चोर आहे’ असे वाक्य त्यांच्या तोंडी (ते उच्च विद्याविभूषित असतील तर अधिक आत्मविश्वासपूर्वक !) असते. ’इतक्या गोळ्या कशाला खातो, लिवर-किडनीचा भुसा होईल, आयुष्यभर काय गोळ्याच खाशील काय, सोड त्या गोळ्या, बघू काय होत ते, नुसत्या विलपॉवरने (इच्छाशक्तीने) तुला बरा करू, चल बाबांकडे, ते लय पावरफुल हायेत, एका फटक्यात (??) बरा करतील, तुला काय झालंय? आहेस की बरा, फुक्कट काळज्या कशाला करतोस’ असे सल्ले ते बिनदिक्कत देतात. रुग्णाला त्रास झाला की मात्र हे सारे अदृश्य होतात. ‘मी गोळ्या सोडतो, तुमचं ऐकतो, आता काही झालं तर तेवढी त्यावेळी तुम्ही माझी काळजी घ्या’ असे रुग्णाने नम्रपणे म्हटले तरी ताबडतोब ते हात झटकतात. ‘तुला चांगला सल्ला दिला तर तू असं उद्धट बोलतोस’ असे उलट म्हणतात. त्यांचे किती ऐकावे, आपल्या मनाचा तोल किती बिघडून घ्यावा हे रुग्णानेच ठरवायचे असते. इतर वैद्यकीय तज्ञही रोगाचे व्यवस्थापन पहाणार्‍या डॉक्टरांशी चर्चा न करता असे सल्ले बिनधास्त देतात, त्याचे वाईट वाटते. कित्येक जुन्या, अनुभवी फॅमिली डॉक्टरांना रुग्णाने आपल्याला न विचारता नव्या तज्ञ डॉक्टरांचे मत घेणे हा आपल्या (त्या विषयात नसलेल्या) हुशारीचा अपमान वाटतो. मग ते उलट सल्ला देतात व औषधाचे प्रमाण कमी करतात. रोगीही खुश होतो. औषधाचे प्रमाण कमी झाल्याने रोग पुन्हा उचल खातो, जुनाट होत जातो.

डॉक्टरांशी चर्चा न करता रुग्ण गोळ्या सोडून देतात आणि आजारी पडतात. हाताशी आलेले रोगावरचे नियंत्रण घालवून बसतात. गोळ्यांची नावे , रंग, आकार, वरचे वेष्टन, डोस बदलला तरी रुग्ण अस्वस्थ होतात. औषधे दीर्घकाळ किंवा अनिश्चित काळ घ्यावी लागतील असे म्हटले की माणसे आधुनिक, शास्त्रीय उपचार सोडून, अशास्त्रीय, वैज्ञानिक शब्दात गुंडाळून दिले जाणारे अशास्त्रीय, पण आकर्षक, अतिशयोक्त -भ्रामक-पण आश्वासक, उपचारांकडे धाव घेतात. टीव्ही, वृत्तपत्र, पत्रके यातून खोटे दावे मांडणार्‍या जाहिराती त्रासलेल्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना भुरळ घालतात. वेळ, पैसे, प्रकृती या सार्‍याच बाबतीत मग नुकसान पदरी पडते.

काही वेळा डॉक्टर्सही रुग्णास समजून घेण्यात कमी पडतात. रोग व रुग्ण, त्याची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती, त्याचे नाईलाज, अडचणी सारे समजून घ्यावे लागते, समजेल अशा पद्धतीने सांगावे लागते. आस्थेने आजार समजून घ्यावा लागतो. अप्रिय सत्य रुचेल अशा शब्दात योग्य वेळी, रुग्णाच्या योग्य त्या काळजी वाहकास संवेदनशिलतेने सांगावे लागते. खर्चाबाबत, फी बाबत शक्य तेव्हा जरुरी, अडचणी प्रमाणे सवलत ध्यावी लागते. रोगाविषयीच्या माहितीसोबत, रोग प्रतिबंधन कसे साधावे हेही समजावून द्यायचे असते. जरुरीनुसार, इतर वैद्यकीय तज्ञांचे मत घेणे रुग्णासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यावेळी हयगय करू नये, उगीच महत्वाचा वेळ दवडू नये.

अविवेकी अनाहूत सल्ले जसे त्रासदायक ठरू शकतात, तसेच हल्ली लोक अनधिकृत स्त्रोतातून अर्धे कच्चे ज्ञान मिळवतात., इंटरनेटवरील तथाकथित तज्ञांची माहिती व सल्ले खरे मानून तसे उपचार करू पाहतात. इंटरनेटवरील माहिती वाचताना ती अधिकृत शास्त्रीय साईट आहे का हे प्रथम पाहावे लागते. एपीए(अमेरिकन साय. असोशिएशन) मानसशास्त्राबाबत चांगली माहिती देते. आपले डॉक्टर देखील त्यांच्याकडील माहितीपत्रे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकास देऊ शकतात. मराठीत आता मानस शास्त्र व मनोविकार शास्त्राबाबत माहितीपूर्ण पुस्तके उपलब्ध आहेत.

मानसिक आरोग्याबाबत काय करावे?

आपल्या आजाराकडे व उपचाराकडे पुरेशा गांभीर्याने रुग्ण, त्याचे नातेवाईक, काळजीवाहक, मित्र, व डॉक्टर सार्‍यानीच पहिले पाहिजे. आपापली जबाबदारी उचलली पाहिजे. विवेकाने व समतोल साधून रुग्णास मदत, प्रोत्साहन, आधार दिला पाहिजे. ‘आजार आहे’ हे मान्य करण्यात वेळ घालवू नये. आजारावर शास्त्रीय उपचार आहेत, याची जाणीव ठेवावी. उपचाराविना, दुर्लक्ष केल्याने आजार व नुकसान वाढेल, हे लक्षात घ्यावे. आजाराचे चढ-उतार त्वरित करण्याची उपाययोजना डॉक्टरांशी चर्चा करून समजून घेतली पाहिजे. आजाराविषयी समाजात असलेले गैरसमज, अंधश्रद्धा कमी करण्यासाठी आपण लोकशिक्षणाच्या कामात आपला वाटा उचलायला हवा. माझी मानसमित्र ही संकल्पना जोपासून, मानसिक प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेऊन समाजात जागोजागी मानसिक आरोग्याची काळजी घेऊ शकतील, रुग्णांना योग्य मार्ग दाखवतील, आधार देतील, जगण्याचे पाठबळ देतील असे कार्यकर्ते तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. हल्लीच गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या घरी भेटी देऊन आपण त्यांना मानसिक आधार दिला, व तत्काळ मदत उभी केली. मानसमित्र कसे उपयोगी पडू शकतात हे माझ्या बीड उस्मानाबादच्या मानसमित्रांनी दाखवून दिले. ’मानस मित्र व मानसिक आधार केंद्र’ या बाबत माझे विस्तृत माहितीपुस्तकही येत आहे, जे या संकल्पनाची अधिक नीट माहिती देईल.

मानसिक आजार लपविण्याने खूप नुकसान होते. व्यसने, विवाहबाह्य प्रेमसंबंध, गुप्तरोग, कुष्ठरोग, एड्स, विवाहपूर्व गर्भावस्था, लैंगिक शोषण, तृतीयपंथी लिंगभाव हे जसे समाजात अस्वीकारार्ह म्हणून लपविले जाते, तसेच मनाच्या ताणतणावातून उद्भवणार्‍या, मेंदूतील रासायनिक घडामोडीतील बिघाडामुळे होणार्‍या मनोविकाराबाबतही होते. विवेकी, शास्त्रीय, समजूतदार, निरोगी, पूर्वग्रहविरहीत उदार दृष्टीकोन समाजाने स्वीकारायला हवा. तसे झाल्यास मनस्तापाची दुःखी कहाणी येत्या काळात सुसह्य होऊ शकेल. वैज्ञानिक प्रगतीला सामाजिक प्रगतीची जोड देऊन आपण सारे समाजाचे मनःस्वास्थ्य अधिक सुदृढ करू शकू.

लेखक संपर्क: patkar. pradeep@gmail.com

Mob. 9869472215.