घाणंद(ता.आटपाडी, जि.सांगली) येथील श्री.सिद्धनाथाच्या यात्रेत मंदिरावरून पुजार्याच्या हस्ते लहान मुलांना झोळीत फेकण्याची अनिष्ट प्रथा तहसीलदार रामहरी भोसले यांच्या प्रयत्नामुळे बंद झाली. महसूल विभागाचे प्रयत्न आणि स्थानिक नेते, पुजारी यांच्या सहकार्यामुळे अनेक वर्षांची ही अघोरी प्रथा थांबल्याने ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
दसरा-दिवाळीच्या दरम्यान दरवर्षी येथे सिद्धनाथाची यात्रा भरते. यात्रा कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यात्रेच्या मुख्य दिवशी सिद्धनाथ मंदिराच्या कळसावरून लहान मुलांना झोळीत फेकण्याची प्रथा या गावात अनेक वर्षांपासून सुरू होती. जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांच्या सूचनेप्रमाणे तहसीलदार भोसले यांनी ही प्रथा बंद करण्याचा निश्चय केला. यात्रेपूर्वी मंदिराचे पुजारी, उत्सव समिती, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांची बैठक घेतली. प्रथा चालू ठेवायची का नाही याबाबत बैठकीत चर्चा झाली. लहान मुलांना अंधश्रद्धेपोटी उंचावरून फेकल्याने त्यांच्यामध्ये भय निर्माण होते. मुले रडतात, त्यांना शारीरिक त्रास होतो. याची कल्पना तहसीलदारांनी ग्रामस्थांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी ही प्रथा बंद करण्याची तयारी दर्शविली.
यावर्षी यात्रेच्या मुख्य दिवशी सुमारे 70/80 बालकांना मंदिराच्या कळसावरून फेकण्याऐवजी पुजार्याच्या हस्ते लहान मुलांना मातेच्या ओटीत घातले आणि अंधश्रद्धेपोटी गेली अनेक वर्षे सुरू असलेली एक अघोरी प्रथा अखेर बंद झाली. यात्रेनिमित्त बाहेर गावाहून, परराज्यातून आलेल्या ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. ही प्रथा कोणीतरी बंद करावी, अशी भूमिका होती. परंतु तहसीलदारांच्या पुढाकारामुळे ही प्रथा बंद झाली, असे ग्रामस्थांनी सांगितले.
– सुनिल भिंगे, आटपाडी, जि. सांगली.