देवी प्रसन्न झाल्याचे सांगत 30 दिवसांत तिप्पट पैशांचे आमिष दाखवून जळगावातील कंजारभाट समाजातील 171 जणांना दोन कोटी 49 लाखांंना चुना लावणार्या डॉ.अशोक जडेजासह त्याची पत्नी नितूबेन जडेजा व सहकारी हकमभाई फौजाभाई यांना अहमदाबाद(गुजरात) कारागृहातून 10 फेबु्रवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता 15 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.
या प्रकरणी आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल असून इतर पाच आरोपींना अटक झालेली नाही. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशसहित अकरा राज्यांमध्ये त्याच्याविरूद्ध फसवणुकीचे 165 गुन्हे दाखल आहेत.
अहमदाबादचा रहिवाशी असणारा डॉ.अशोक जडेजा मला समाजाची वहानवटी सिकोतर माता प्रसन्न झाली असून त्यांच्याकडे पैसे दिल्यास ते 30 दिवसांत तिप्पट करतात, असे एजंटांकरवी जनतेत पसरवून नागरिकांकडून पैसे लुबाडत होता. नागरिकही त्याला बळी पडत. प्रसंगी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून त्याला विश्वासाने पैसे दिले होते. मात्र हे सर्व घेऊन नंतर त्याने पोबारा केला.
महाराष्ट्रातील जळगाव शहरात जून 2009 मध्ये प्रथम तक्रार सुरेश सिद्धराम भाट यांनी डॉ.जडेजाने सात लाख सत्याहत्तर हजार(7,77,000) घेऊन फसवणूक केली अशी दाखल केली होती. त्यानुसार डॉ.जडेजासहित आठ जणांविरूद्ध कलम 420, 120(ब), 34 प्रमाणे एम.आय.डी.सी., पो.स्टे.(जळगाव) ला गुन्हा दाखल झाला होता.
–विश्वजीत चौधरी, जळगाव.