Categories
फसवे विज्ञान

‘मिडब्रेन’ म्हणजे थोतांड…. आधुनिक बुवाबाजी….

‘मिडब्रेन’ विरोधात सातार्‍यात अंनिसची पत्रकार परिषद
फेब्रुवारी – २०१५

मिडब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन, वास घेणे अथवा स्पर्श या गोष्टीचा आणि दिसण्याची क्रिया यांचा कोणताही संबंध नसल्याने अशा पद्धतीची प्रशिक्षित व्यक्ती वस्तू ओळखण्याचा करत असलेला दावा म्हणजे थोतांड आहे. एवढेच नव्हे तर ही एक आधुनिक बुवाबाजी आहे, असे मत मअंनिसचे राज्य सरचिटणीस व मानसोपचारतज्ज्ञ डॉ.हमीद दाभोलकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ‘मिडब्रेन’मुळे डोळे बंद केल्यानंतरही दिसू शकते, असा दावा करणार्‍यांनी अंधांनाही प्रशिक्षण देऊन त्यांना दृष्टी द्यावी, असे आव्हान त्यांनी केले.

डॉ.दाभोलकर म्हणाले, “गेल्या काही महिन्यांमध्ये सातारा जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छोट्या मुलांचे ‘मिडब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन’ करून त्यांचा बुद्ध्यांक, तसेच स्मरणशक्ती वाढवतो, असे दावे करणार्‍या कथित तज्ज्ञांचे पेव फुटले आहे. मिडब्रेन(मध्य मेंदू)चे उद्दिपन केल्याने डोळ्यावर पट्टी बांधून देखील मुलांना केवळ स्पर्शाने अथवा वासाने गोष्टी ओळखता येतात, असा दावा संबंधित जाहिरातींमधून करत आहेत. विज्ञानाच्या नावावर हातचलाखीचा वापर करून मुले व त्यांच्या पालकांची आर्थिक व मानसिक फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे.”

शास्त्रीय नावाखाली समाजात छद्मविज्ञानाचा वापर करून विद्यार्थी व पालकांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात आहे. ही एक आधुनिक पद्धतीची बुवाबाजीच आहे. हजारो रूपये खर्चून पालक आपल्या मुलांना खोटे बोलण्याचे प्रशिक्षण घेण्यास भाग पाडत आहेत, असे मतही डॉ.दाभोलकर यांनी व्यक्त केले.

काही वाहिन्यांवर ‘मिड ब्रेन’ बाबत प्रसारित होणार्‍या कार्यक्रमांची तक्रार ‘अंनिस’ने प्रसार भारतीकडे केली आहे. सातार्‍यात सुरू झालेल्या काही क्लासेसच्या माध्यमातून अशा पद्धतीचे होत असलेले प्रकार थांबविण्यासाठी पोलीस अधिक्षकांनाही निवेदन देण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ओझरच्या(जि.नाशिक) ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी जाहीर कार्यक्रमात ‘मिड ब्रेन’च्या दाव्यांचा भांडाफोड केला. त्याची चित्रफित पत्रकार परिषदेत दाखविण्यात आली. त्याचबरोबर समितीचे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार यांनी यावेळी डोळ्यावर पट्टी बांधून कशा प्रकारे हातचलाखीने वस्तू ओळखल्या जातात याचे प्रात्यक्षिक पत्रकारांना दाखविले. ‘अंनिस’चे कार्यकर्ते कुमार मंडपे, उदय चव्हाण, भगवान रणदिवे यावेळी उपस्थित होते.

युवराज झळके

संपर्क : 9921119993

मिडब्रेन विरोधात पोलीसांना द्यावयाचे निवेदन

प्रति, ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ

म. पोलीस अधिक्षक, जिल्हा. ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ ˉ

विषय :- मिड ब्रेन अँक्टीव्हेशनच्या नावाने चाळणारी फसवणूक थांबणेबाबत.

महोदय,

गेल्या काही महिन्यांमध्ये नाशिक-सातारा तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुलांचे मिड ब्रेन अँक्टीव्हेशन करून त्यांचा बुध्यांक तसेच स्मरणशक्ती वाढवतो असे दावे करणाऱ्या मार्गदर्शन वर्गाचे पेव फुटले आहे. मिड ब्रेन (मध्य मेंदू) चे उद्दीपन केल्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधून देखील मुलांना केवळ स्पर्शाने अथवा वासाने गोष्टी ओळखता येतात असा दाबा मिड ब्रेन अँक्टीव्हेशनच्या जाहिरातींमधून केला जातो.

विज्ञानाच्या नावावर हातचलाखीचा वापर करून मुलांची व पालकांची आर्थिक फसवणुक करण्याचा हा प्रकार असून महाराष्ट्र अंनिसने ह्या हातचलाखीचा भांडाफोड केला आहे.

डोळ्यावर पट्टी बांधली असताना नाक आणि डोळे यांच्यामध्ये जी जागा राहते त्यामधून बघितल्याने गोष्टी ओळखल्या जातात. त्याचे दृकश्राव्य सादरीकरण ‘यु-ट्युब’ https://www.youtube.com/watch?v=BoR8uDMCbm0 वर उपलब्ध आहे. जर हाताने दाब देवून डोळे घट्ट बंद केळे अथवा डोळ्यावर आतून काळा रंग दिलेला आणि घट्ट बसणारा पोहण्याचा चष्मा लावला तर ह्या गोष्टी ओळखता येत नाहीत हे महाराष्ट्र अंनिस कार्यकर्त्यांनी सप्रयोग दाखवून दिले आहे. आजूबाजूला पूर्ण अंधार करून अथवा डोक्याच्या मागच्या बाजूला वस्तू धरली असता मिड ब्रेन अँक्टीव्हेशनचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना वस्तू ओळखता येत नाहीत. तसेच अंध मुलांना देखील मिड ब्रेन अँक्टीव्हेशनचे तीही प्रशिक्षण दिले तरी अशा प्रकारे वस्तू ओळखता येत नाही.

वैद्यकीयदृष्ट्या मिडब्रेन, वास घेणे अथवा स्पर्श या गोष्टींचा आणि दिसण्याची क्रिया यांचा संबंधनसल्याने जैविक पातळीवर मिड ब्रेन अँक्टीव्हेशन मुळे वास घेवून अथवा स्पर्शाने डोळे बंद असताना दिसू शकते हा दावाच वैद्यकीयदृष्ट्या अशक्य आहे. केवळ संगीताचा वापर करून प्रशिक्षणाचा वर्ग घेण्यास हरकत असण्याचे कारण नसून मिड ब्रेन अँक्टीव्हेशनच्या नावाखाली चमत्काराचा दावा करून पालकांची आणि मुलांची फसवणूक करण्यास महाराष्ट्र अंनिसचा विरोध आहे व ही एक आधुनिक प्रकारची फसव्या विज्ञानाचा वापर करुन केलेली बुवाबाजी आहे. काही वाहिन्यांवरून मिड ब्रेन अँक्टीव्हेशनचे जे कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येत आहेत. त्याविषयी महाराष्ट्र अंनिस तर्फे प्रसार भारती कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिड ब्रेन अक्टीव्हेशनच्या नावाखाली चालणारी फसबणुक तातडीने बंद व्हावी म्हणून अंनिस राज्यव्यापी मोहीम हाती घेत आहे. आपण पोलीस दलामार्फत ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालून ही फसवणुक थांबवावी अशी विनंती.

आपले स्नेहांकित,