Categories
अंधश्रद्धा

नरबळी प्रथा

मे - २०१२

            मुंबईसारख्या महानगरात जेव्हा जेव्हा मोठे प्रकल्प हाती घेतले जातात तेव्हा रस्त्यावर जगणार्‍या मुलांमध्ये घबराटीचे वातावरण असते. या समजुतीत तथ्य किती हे सांगता येत नसले तरी मोठमोठी कामे हाती घेताना बळी द्यावा लागतो ही समजूत सार्वत्रिक आहे. काम किती मोठे त्यावर बळीचा प्रकार ठरत असतो. नरबळीची प्रथा सगळ्यात अमानुष प्रथापैकी एक असली तरी आजही असे प्रकार घडताना आपण ऐकत असतो. प्रवासाला निघताना, नवीन काम सुरू करताना इतकेच काय तर नवीन वस्तू विकत घेतल्यावर नारळ फोडून त्याचे पाणी शिंपडले जाते तो एक प्रतीकात्मकरित्या नरबळीच असतो.

            फक्त भारतात नव्हे तर इतर देशातही अशा पद्धतीने नरबळी दिला जात असे. चीनच्या प्रसिद्ध भिंतीच्या बांधकामाच्या वेळेस नरबळी दिला गेल्याच्या दंतकथा आहेत. जपानमध्ये “हितोबशिरा” याचा अर्थच मानवी खांब(किंवा पाया) असा आहे. आणि इमारतीला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी ज्यांना बळी द्यायचे त्यांना जिवंत पुरले जायचे. बळीप्रथेला विरोध करत असताना, काही संघटना “बळी प्रथा आमच्या धर्माचा भाग आहे असा दावा करतात. परंतु बळीप्रथेचा उगम धर्माच्या निर्मितीच्याही अगोदर झालेला आहे आणि जगातील जवळ जवळ सर्वच देशामध्ये नरबळीची प्रथा अस्तित्वात होती.

            बळी देण्यामागे काय मानसिकता असावी याचा अंदाज काही प्रथांमध्ये दिसतो. कोल्हापूर पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर वाशी गावात बीरदेवाची यात्रा भरते. उत्तम कांबळे यांच्या ‘अनिष्ट प्रथा’ या पुस्तकात त्याचे वर्णन आहे. बिरदेव हा शाकाहारी देव आहे तरीदेखील त्याच्या देवळाच्या परिसरात बळीचा खेळ रंगतो. हजारे नावाचे एक मानकरी खांद्यावर शेळी घेऊन पळतात तर लांडगे नावाच्या मानकर्‍याने त्याचा पाठलाग करून खरोखरीचा लांडगा जसे शेळीच्या मानेच्या ठिकाणी चावा घेऊन तिची शिकार करतो त्याप्रमाणे शेळीचे नरडे फोडायचे असते. धनगर जमातीतील या प्रथेचे मूळ अर्थात त्यांच्या शेळ्या, लांडगे खातील या भयामध्ये आहे. लांडग्याला एक शेळी खायला दिली तर तो कळपामध्ये शिरून आणखीन नासधूस करणार नाही या विचारातून अशी बळी प्रथा निर्माण झाली असावी हे स्पष्टच दिसते. महाभारतात एके ठिकाणी पांडवांचे वास्तव्य असलेल्या घरातील तरूण मुलाला वेशीबाहेर असणार्‍या नरभक्षक राक्षसाचे खाणे व्हावे लागणार असते त्याऐवजी भीम जातो अशी कथा अहे. या कथेतही गावाच्या भल्यासाठी कुणीतरी एकाने बळी जावे हीच मानसिकता दिसते. पुराणकथांमध्ये नदीपात्राच्या ठिकाणी यात्रेकरूना प्रश्न विचारणारे यक्ष भेटतात आणि प्रश्नाचे उत्तर न देणार्‍याचा वध करतात. अशा सर्व प्रकारच्या बळींना मृत्यूनंतर अत्यंत महान बक्षीस मिळण्याचे आश्वासन आहे. याचा अर्थ असा की, केवळ शत्रूला बळी म्हणून चढवावे असा हेतु त्यामागे नाही. बळी जाण्यासाठी पारितोषिक दिले जावे म्हणजेच त्यामागे जमातीच्या भल्यासाठी कुणीतरी एकाने त्याग करावा अशी जबरदस्ती आहे. युद्ध म्हणजे मृत्यूचा आखाडाच!! बळी देण्यामागची भूमिका पाहिली तर अशा वेळेस आपली कमीत कमी हानी व्हावी म्हणून नरबळी दिले जाणे स्वाभाविक होते. इस्त्राईलच्या विरोधात युद्ध करताना मोबच्या राजाने स्वत:च्या मुलाचा बळी दिला होता. युरोपमधील प्रसिद्ध मिथकातील ट्रोजनच्या लढाईच्या वेळेस राजाने आपल्या मुलीचा बळी दिला होता.

            परंतु हा एकमेव विचार बळी देण्यामागे असावा असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. अशा प्रासंगिक बळी देण्याबरोबरच एक नित्य कर्मकांड म्हणून नरबळीची पद्धत अस्तित्वात होती. पुराण आणि इतर मिथ्य कथामध्ये नरबळी आणि प्राण्याचे बळी दिले जात असल्याचे उल्लेख आहेत. लोक कथामधील काही कथा विचारात घेतल्या तर त्या कथा आजच्या समाजजीवनाशी तुलना करता फारच विसंगत आहेत. “काली”ही देवी शिवाची पत्नी आहे. पण ती कालीच्या छातीवर नाचून त्याचा वध करते(त्यातून त्याला नवजीवन प्राप्त होते ही जोडलेली कथा) पुन्हा हेही लक्षात घेतले पाहिजे की, तिच्या हातात आणि गळ्यात अनेक बळीची धडावेगळी केलेली डोकी आहेत. म्हसोबा हा देव मूळचा ‘महिषासुर’. त्याचे लग्न ज्या जोगूबाई बरोबर लावून दिले जाते, तिनेच त्याचा वध केलेला आहे. अश्वमेघयज्ञ करताना घोड्याचा बळी देण्यापूर्वी किंवा दिल्यानंतर त्याच्याशी संग करण्यासंदर्भातील दासी आणि राणी यांच्यामधील संवाद आहेत. घोड्याचा बळी आणि राणीने त्याच्याशी संग करण्याचा संदर्भ अत्यंत पुरातन नरबळीच्या कर्मकांडाशी आहे.

            ज्यांना बळी दिला जातो त्या बहुतेक सगळ्या मातृदेवता आहेत. डी.डी.कोसंबी यांच्या ‘पुराणकथा आणि वास्तव’ या पुस्तकामध्ये या नरबळी प्रथेच्या इतिहासाचा सांगोपांग मागोवा घेतलेला आहे. उर्वशी आणि पुरूरवा यांच्या प्रेमाच्या कथेचा विचार केला तर असे दिसते की, मातृसत्ताक समाजामध्ये प्रमुख स्त्रीशी संग म्हणजे मृत्यूला आमंत्रणच होते. अशा स्त्रीशी लग्न केल्यानंतर काही कालावधीनंतर त्या पुरूषाचा बळी दिला जात असे. नरबळी हा सुफलतेच्या विधीचा अनिवार्य भाग होता. सुफलतेचा विधी आजही नवरात्रीच्या दिवसात केला जातो. घटस्थापना केल्यानंतर त्यात वेगवेगळ्या धान्याचे बीज पेरले जाते आणि नवरात्रीची सांगता करताना नव्याने आलेले अंकुर कुमारिकांना वाटले जातात. अगदी अशाच कर्मकांडाशी नाते सांगणारे चित्रलिपी हडाप्पा येथून मिळालेल्या आहेत. त्यातील इतर संबंधित चित्रलिपी सूचित करतात की, या विधीनंतर नरबळी दिला जायचा. आणि पुराण, लोककथा आणि इतर महाकाव्यातील संदर्भ लक्षात घेतला तर अशा नरबळीचा मान(?) प्रमुख स्त्रीशी एक वर्षापर्यंत संग करणार्‍या पुरूषाचा असायचा.

            तुलसी विवाह कथा सर्वांना माहीत आहेच. जालंधरच्या पत्नीचे पातिव्रत्य विष्णूने नष्ट केल्यानंतर, जालंधरची हत्या करणे शक्य झाले. त्यानंतर विष्णूचे लग्न तुळशीशी लावण्यात येते. असे या कथेचे स्वरूप आहे. परंतु डी.डी.कोसंबी मात्र त्यातील काही महत्वाच्या बाबीकडे लक्ष वेधतात. एक तर ज्याचे लग्न लावण्यात येते त्याचे फक्त मुंडकेच तुळशीशेजारी लावले जाते. आणि तुळशीचे रोप ज्याप्रकारच्या कुंडीत लावण्यात येते. त्या कुंडीचा आकार देखील यज्ञवेदीप्रमाणे आहे. फरक फक्त एवढाच की, तुळशीचे लग्न एकाच बरोबर दरवर्षी लावले जाते. अश्वमेघ यज्ञ पूर्ण झाल्यानंतर राणी, घोड्याशी(प्रत्यक्षात किंवा प्रतिकात्मक रित्या) संग करत असे आणि त्यानंतर घोड्याचा बळी दिला जात असे. यामागे याच प्रथेच्या खुणा दिसतात.

सतीप्रथा

            सतीप्रथेचा उगमदेखील नरबळीच्या प्रथेशी निगडित आहे. सती जाणारी स्त्री ही पुरूषाच्या इतर हक्काच्या वस्तुप्रमाणे नव्हती. तर तिचा एक पंथ तयार होत असतो. वेदामधील काही रूचामध्ये पत्नीला सल्ला देताना तू पतीची हत्या न करणारी हो असा सल्ला दिलेला आढळतो किंवा तू पतीचा सांभाळ मुलाप्रमाणे कर असे सांगितले जाते. मातृसत्ताक पद्धतीतून पितृसत्ताक पद्धतीत बदल होताना, पुरूषांना ही भीती सतत राहिली होती की, जुन्या प्रथा पुन्हा पुनरूजीवीत केल्या जातील.(ग्रीक मिथ्यकथातील अचिलस आणि भारतातील पुराणातील कृष्ण यांचा मृत्यू एकाच पद्धतीने झाला आहे. दोघांच्याही टाचेत कोणीतरी बाण मारून त्यांची हत्या केली अशी कथा आहे आणि दोघांचाही गुन्हा एकच आहे तो म्हणजे मातृदेवतांशी लग्न केल्यानंतर ते बळी गेलेले नाहीत.) या भीतीपोटी एखाद्या पुरूषाचा मृत्यू झाल्यास त्याला पत्नीच जबाबदार आहे असे मानून तिलाही शिक्षा व्हावी आणि जरब बसावी या हेतूनेच सती प्रथेचा जन्म झाला असावा असे मानयाला वाव आहे. (आधुनिक काळात या प्रथेचा वापर स्त्रीचा वारस हक्क डावलता यावा यासाठी केला गेला हा भाग वेगळा)

नरबळी आणि पशुबळी

            माणसाच्या विकास प्रक्रियेवर नरबळी घृणास्पद मानला जाऊ लागला(परंतु काही विशिष्ट सिद्धी प्राप्तीसाठी नरबळीच लागतो ही समजूत मात्र कायम आहे. अशी सिद्धी प्राप्त करून घ्यावी की नाही हे मात्र नैतिकतेच्या कल्पनेत बसवले जाते) काली मातेला कलीयुगात नरबळी वर्ज्य मानलेला आहे याचा अर्थ आधीच्या काळात तो चालत होता. हा नवीन नियम बनवण्यामागचा हेतू स्पष्ट आहे, तो म्हणजे जुन्या प्रथेला उघड विरोध न करता ती बदलली जावी. ज्यू धर्मातील कथेप्रमाणे अब्राहम आपल्या मुलाचा बळी देण्यास जातो तेव्हा देव स्वत: त्या मुलाचा बळी न घेता प्राण्याच्या बळीवर संतुष्ट होतो. या कथामधून नरबळीच्या पुरातन कर्मकांडाचे रूपांतर आजच्या पशु बळीच्या कर्मकांडात झाले असावे असे दिसते.

संजय सावरकर