जळगाव जिल्ह्यातील पारोळा या तालुक्याच्या शहरात मारोती गल्लीत मागील जुलै महिन्यात सलग तीन दिवस भयग्रस्त वातावरण होते. कोणीतरी अज्ञात व्यक्ती या गल्लीत जादूटोणा व करणी करत असून त्याचे परिणाम भयंकर होतील, अशी अफवा पसरली होती. शौचालयास गेलेल्या एका मुलीच्या डोक्यावर व पायावर अचानक कुंकू पडल्याचे आढळून आले. यासंदर्भात दै.लोकमतने मोठी बातमी लावल्यावर तर हा प्रकार खरा तर नाही ना? म्हणून नागरीक साशंक होऊ लागले.
पुन्हा वृत्त आल्याच्या दिवशी एका 17 वर्षांच्या मुलाच्या पायाला व अंगठ्याला कुंकू लावलेले आढळून आले. या प्रकरणी तेथील पोलीस निरीक्षक मधुकर गावित व महाराष्ट्र अंनिसचे पारोळा तालुकाध्यक्ष पिरन अनुष्ठान यांनी त्या परिसरात भेट देऊन सविस्तर पाहणी केली. पो.नि.गावीत यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, या सर्व मनाच्या समजुती आहेत असे जाहीर आवाहन केले. म.अं.नि.स.चे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, तालुकाध्यक्ष पिरन अनुष्ठान, शहर कार्याध्यक्ष एस.बी.चौधरी यांनी नागरिकांचा वाढता गोंधळ पाहून घटनास्थळी पुन्हा भेट देऊन लोकांचे प्रबोधन केले. हे जादूटोण्याचे प्रकार रात्रीच होत असतील. रात्री गस्त घालायला अंनिस तयार आहे, हेही सांगितले. याबाबत सर्व वर्तमानपत्रांना जाहीर खुलासाही करण्यात आला. अन् तीन दिवसांनंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला व असे प्रकार अस्तित्वात नाही. कोणी करत असताना दिसले तर त्यास तेथेच रोखू असा सुर नागरिकांनी व्यक्त केला. या प्रसंगी पोलीस निरीक्षक मधुकर गावीत, अंनिसचे डिगंबर साळुंखे, बी.बी.खैरनारसर, संजय पाटील, स्वप्नील अग्रवाल, संजय खत्री, कमरूद्दिन खाटीक यांनी परिश्रम घेतले.
-विश्वजीत चौधरी, जळगाव