फेब्रुवारी महिन्यात सांगली जिल्ह्यात संपूर्ण समाजाने जिचे कौतुक करावे, अशी घटना घडली. 24 फेब्रुवारी रोजी सांगली जिल्ह्यातील शिरगाव येथील वीस वर्षांच्या विधवा सोनाली संतोष पाटील हिचा, सासू राजश्री आणि सासरे शांताराम पाटील यांनी पुढाकार घेऊन त्यांचा धाकटा मुलगा उमेश याच्याशी पुनर्विवाह घडवून आणला. सोनालीचे पती काविळीने आजारी पडले; त्यातच त्यांचे दु:खद निधन झाले. त्यावेळी त्यांची मुलगी सहा महिन्यांची होती. राजश्रीताई यांना आपल्या सुनेच्या व नातीच्या भवितव्याची चिंता वाटू लागली. तिच्या विधवा म्हणून जीवन कंठण्याच्या भावी आयुष्याचे भयाण वास्तव राजश्रीताईंना भेडसावू लागले. त्यांची करुणा व संवेदनशीलता यांनी त्यांच्या विवेकाला आवाहन केले. आपले पती, धाकटा मुलगा उमेश व सोनालीचे आई-वडील यांचे मन वळविण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. इतर नातेवाईकांचेही त्यांनी प्रबोधन केले आणि एक ऐतिहासिक कार्य घडून आले. कुटुंबातीलच आपल्या दिराशी विधवा भावजयीचे लग्न ही मराठा समाजातील अतिशय दुर्मिळ घटना असावी.
विधवा हिंदू मुलींच्या पुनर्विवाहाची सुरुवात बंगालमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केली. लहानपणीच विधवा बनलेल्या मुलीविषयीच्या करुणेने ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी त्यांच्या पुनर्विवाहाबद्दल प्रबोधन करायला सुरुवात केली; पण सनातन्यांनी धर्म बुडतोय, अशी हाकाटी पिटत त्यांना प्रचंड विरोध केला; पण अभ्यासू विद्यासागर यांनी हिंदू धर्मग्रंथातील विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करणारी अनेक वचने सनातन्यांच्या तोंडावर फेकली. या कार्यात त्यांची कुचेष्टा झाली, धमक्या दिल्या गेल्या; प्रसंगी मारहाणीचाही प्रयत्न झाला; पण विद्यासागर आपल्या कार्यापासून तसूभरही विचलीत झाले नाहीत. आपल्या काही मित्रांच्या व सनदी सेवेतील इंग्रज सहानुभूतीदारांच्या मदतीने त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा ड्राफ्ट इंग्रज सरकारला सादर केला. त्यावर वाद-प्रतिवाद झडले. अखेरीस या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर त्यावेळचे ब्रिटीश व्हाईसरॉय लॉर्ड डलहौसी यांनी या कायद्याचा अंतिम मसुदा सरकारला सादर केला. त्यांच्यानंतर व्हाईसरॉय झालेले लॉर्ड कॅनिंग यांनी तो मंजूर केला 26 जुलै 1856 या दिवशी.
अॅक्ट दत 1856 या नावाने तो प्रसिद्ध झाला. विधवांचा पुनर्विवाह व्हावा, यासाठी महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी आणि इतर समाजसुधारकांनी प्रबोधन केले. राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नाने 1829 साली सतीची चाल कायद्याने बंद झाली; पण विधवा घरीच अत्याचाराच्या बळी ठरल्या. केशवपन, अंधारी कोठडी, घरातीलच लोकांनी केलेले अत्याचार, गर्भपात यांच्या विरोधातही मग आवाज उठू लागला. विधवा पुनर्विवाहाचा कायदा झाल्यावर ब्राह्मण व इतर अभिजन वर्गात विधवांच्या पुनर्विवाहाचा विचार स्वीकारला जाऊ लागला. 1860 साली सारस्वत जातीतील रघुनाथ भांडारकर आणि नर्मदाबाई यांचा पुनर्विवाह झाला. महात्मा फुले यांनी दिलेल्या प्रोत्साहनातून विष्णुशास्त्री पंडित यांनी 1866 मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले. बिपीनचंद्र पाल आणि धोंडो केशव कर्वे यांनी स्वत: विधवेशी विवाह केला. सावित्रीबाई व महात्मा जोतिराव फुले यांचे याबाबतीतील कार्य महाराष्ट्र विसरू शकत नाही.
हे झाले वरिष्ठ वर्गातील अभिजनांचे; पण मराठ्यांचं काय? मराठ्यांपेक्षा खालच्या जातीत पुनर्विवाह होत; पण त्यांना गौणत्व दिले गेले. अंधार्या खोलीत, रात्रीच्या अशुभ वेळी, उलटे मंत्र म्हणून बिन मंडपाचे हे विवाह करण्यास मराठा समाज राजी नव्हता. याचे कारण मराठा समाजाला चिकटलेली त्यांची तथाकथित थोरवी. असे विवाह कमीपणाचे समजल्याने मराठा समाजातील अनेक विधवा लेकी-सुना यांच्या दु:खाची कोणालाही ना खंत, ना खेद वाटत होता; पण गेल्या काही वर्षांत मराठा समाजातही स्त्री-शिक्षणाचे वारे वाहू लागले. तरुण वर्ग प्रबोधित होऊ लागला आणि थोड्या प्रमाणात का होईना विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळू लागली. यासाठी जवळपास 150 वर्षांचा काळ उलटला. या काळात कित्येक मराठा विधवांना दु:खभरीत जीवन जगावे लागले असेल.
पण ही कोंडी अखेर फुटते आहे. मराठा पाऊल पुढे पडत आहे. आपल्या विधवा सुनांना आधार देणार्या राजश्रीताईंसारख्या विवेकी स्त्रिया पुढं येत आहेत. त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे मराठा समाज, सांगली या संस्थेने अभिनंदन केले. विशेषत: ए. डी. पाटील व प्रकाश चव्हाण यांनी याबाबतीत पुढाकार घेतला. त्यांचे व राजश्रीताईंच्या कुटुंबीयाचे महाराष्ट्र अंनिस तर्फे अभिनंदन!