महाराष्ट्र राज्य निर्मितीला 1 मे 2020 रोजी 60 वर्षे पूर्ण होणार आहेत. म्हणजे आताच्या 1 मे 2019 रोजी आपले राज्य साठाव्या वर्षात पदार्पण करणार आहे. मराठी भाषिकांना भाषावार प्रांत रचनेतुन मिळालेल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासुन साठ वर्षातील वाटचालीचे अवलोकन होणे गरजेचे वाटते. त्याच दरम्यान ऑगस्ट 2019 मध्ये आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देखिल तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या साठ वर्षाच्या वाटचालीत, उभारणीत आणि प्रगतीत आमच्या सारख्या विविध सामाजिक प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी कार्यरत असणार्यांचे काय योगदान राहीले आहे याचा उहापोह करावा असा आमचा प्रयत्न राहणार आहे. तसेच आमच्या संघटनेच्या त्रिदशक पूर्ती निमित्ताने करावयाच्या नियोजित कार्यक्रमांची, उपक्रमांची कल्पना आपल्यापर्यंत पोहचवून त्यासाठी सहकार्याचे आवाहन करीत आहोत.
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा मंगल कलश यशवंतराव चव्हाणांनी दिल्लीहून आणला असे सांगितले जात असले तरी त्याला समाजवादी व कम्युनिस्ट विचारसरणी मानणार्यांनी त्याबाबत मतभिन्नता व्यक्त केली होती. कारण संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या मागणीचे आंदोलन उभारले गेले व चालविले गेले ते एस.एम. डांगे, अत्रे यांच्या नेतृत्त्वात आणि हजारो सहकारी, कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाने त्यामध्ये ‘मुंबईसह महाराष्ट्र मिळाला पाहीजे’ यासाठी हुतात्मा झालेले 105 कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विविध प्रदेशातील, जाती-धर्माला प्रतिनिधीत्व करणारे होते. आजही बेळगांव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र पूर्ण झाला नसला तरी देशाची आर्थिक राजधानी राहिलेल्या मुंबईसह महाराष्ट्र मिळविण्यात आपल्याला यश येऊ शकले. त्यासाठी अनेकांनी निरपेक्ष योगदान दिलेले आहे. अशा महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या इतिहासातील घटनाक्रमांचे पुनर्स्मरण करून नव्या पिढीसमोर मांडणे आवश्यक वाटते. म्हणजे ते आजच्या त्यांच्या जगण्याशी ते ताडून बघतील आणि नवमहाराष्ट्राच्या उभारणीसाठी कटिबद्ध होतील.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी परिवर्तनवादी विचारांचा जाज्वल वारसा लाभलेल्या महाराष्ट्राच्या उभारणीत संत-समाजसुधारंकांची दिलेली दिशा मार्गदर्शक आहे. जवळपास 150 वर्षांचा विविध समाजसुधारकांचा कार्यकर्त्वृत्वाचा वस्तुपाठ आपल्याला राज्य म्हणून मिळाला आहे, जो देशात विरळ आहे आणि अनुकरणीय देखील. शोषणमुक्त, समताधिष्ठित, कालसुसंगत समाज उभारणीसाठी प्रयत्न होण्याऐवजी आपण नंतरच्या काळात प्रतिके, प्रतिमा, प्रदेश, भाषा, खानपान, वेशभुषा, केशभुषा, चालीरीती, सण-उत्सव, यात्रा-जत्रा, रूढी-प्रथा-परंपरांच्या अस्मितांमधे अडकून पडलो आहोत का? असा प्रश्न पडतो. या सर्व प्रकारच्या अस्मितांचे अस्तित्व मान्य करूनही त्यांची सीमारेषा काय? ही सर्व मिळून असणारी ‘संस्कृती’ वा सांस्कृतिक वास्तवच आपण पुढे घेऊन जाणार आहोत का? त्यांना तपासण्याची, चिकित्सा करण्याची आणि बदलविण्याची कसोटी, निकष काय असू शकतील? अशा संभ्रमित, संक्रमित सभोवतालमध्ये आपली सद्य:स्थितीतील वाटचाल सुरू आहे.
महाराष्ट्र उभारणीतील पुरोगाम्यांचे योगदान
अस्मितांच्या समाजकारणातून पक्षीय व निवडणूकीच्या राजकारणाकडे प्रवास करण्याची सध्या चलती आहे. त्यासोबतच सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठीचा प्रयत्न देखिल पक्षीय व निवडणूकीच्या राजकारणाद्वारे करता येतो असा काहीसा आदर्शवत वाटणारा वारसा देखिल महाराष्ट्राला मिळालेला आहे. त्यामध्ये पुरोगामी परिवर्तनवादी विचारसरणीच्या विविध प्रवाहांनी आपला अमीट ठसा उमटविलेला आहे. तो आता विस्मृतीत तर टाकला गेलाच पण तो तथाकथित मुख्य प्रवाहाकडून निंदनीय देखिल ठरविला आहे. त्यांनी आपापल्या जागी पाय रोवून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अविरत, चिकाटीचे प्रयत्न केले याची नोंद इतिहासाने घेतलेली दिसत नाही. त्यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्याचे जे जे छोटे मोठे संघर्ष केले ते देखिल आजच्या महाराष्ट्राच्या उभारणीसाठीचे पायाभूत योगदान राहीले आहे याची दखल घ्यायला लावली गेली पाहीजे. त्यासाठी त्यांनी अवलंबलेल्या पद्धतीला विकासाचे काम म्हणायचे नाही का ? ते विकास विरोधक नव्हते तर त्यांचा विकासाचा दृष्टिकोन व आग्रह हा जास्त मानवीय राहिला असे म्हणायला हवे.
ह्याला विकासाचे काम का नाही म्हणायचे?
सर्वसामान्यांच्या जगण्यातील विविधांगी छोटे मोठे प्रश्न उपस्थित करणे, सोडविणे, त्यासाठी संघर्ष करणे, त्यामधे पाठपुरावा करणे, सातत्य-चिकाटी ठेवणे, प्रश्न सोडविण्याचे मार्ग सूचविणे, दृष्टिकोन मांडणे, धोरण मांडणे, उपाय योजना सूचविणे, कायदे व नियम-नियमावली तयार करुन घेणे, कल्याणकारी योजना व प्रकल्पांची संकल्पना मांडणे. हे सर्व सत्ताधारी, विरोधक, शासन-प्रशासन यांच्यार्मात संवैधानिक लोकशाही मार्गाने मान्य करुन घेणे.
मान्य करुन घेतलेले अंमलात, कार्यवाहीत आणण्यासाठीचा पाठपुरावा करणे. त्यासाठी आवश्यक संरचना, यंत्रणा, आकलन, दृष्टिकोन, क्षमता विकसित करणे आणि आर्थिक तरतूद करवून घेणे.
हे सर्व यशस्वीपणे प्रातिनिधीक का होईना घडवून दाखविणे.
अशा प्रक्रियेतून महाराष्ट्रातील विविध समाज समुहांचे आणि घटकांचे लहान-मोठे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असणारे सर्व व्यक्ती, गट, समुह, संस्था, संघटना, चळवळ यांचा महाराष्ट्राच्या वाटचालीत, प्रगतीत, विकासात किमान ‘खारीचा’ का होईना वाटा आहेच !
तो काय राहीला हे अभ्यासपूर्ण तयारीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. जेणे करून संवैधानिक लोकशाही-प्रजासत्ताक व्यवस्थेतील देखिल हेतूपुरस्कर निर्माण झालेले भ्रम-भास व मिथके दूर व्हायला, संपायला मदत होईल.
तसेच सामाजिक प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी कार्यरत व्यक्ती, संस्था, संघटना, चळवळी हे ‘लष्कराच्या भाकरी’ थापायचे काम म्हटले जात असले तरी ते वांझोटं, निरर्थक, रिकामटेकड्यांचे काम नाही तर त्याऊलट ते समाजाला, समाजातील विविध स्तरावरील घटकांना मानवतेने, सामाजिक न्यायाने, स्वातंत्र-समता-बंधुभावाने जगायला अनुकुलता, संधी व अवकाश उपलब्ध करुन देण्यासाठीचे पायाभूत काम आहे याची दखल सर्वांनी होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या तीस वर्षाच्या संघटीत कामाच्या वाटचालीचा लेखाजोखा महाराष्ट्र राज्याच्या शष्ठब्दी वर्षानिमित्ताने जनमानसापुढे मांडायचा प्रयत्न करणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनापासुन वैज्ञानिक दृष्टिकोनापर्यंत आणि विवेकवादापासुन मानवतावाद समाजात निर्माण करण्याच्या उदात्त हेतुने तीन दशकांच्या वाटचालीचा प्रवास करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. अर्थात तो पुरेसा आणि तेवढा प्रभावी नाही, याची आम्हाला नम्र जाणीव आहेच; परंतु तरीही जे काही झाले, घडले, घडविण्याचा प्रयत्न केला गेला, त्याचा उपयोग समाजाला सुखी-समृद्ध करण्यासाठी झाला की नाही, याचे अवलोकन व साक्षेपी मूल्यमापन होणे आम्हाला आवश्यक वाटते. त्याच भूमिकेतून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आघाडीवर गत तीस वर्षांत केल्या गेलेल्या विविध भौगोलिक, धार्मिक, जातीय समुहांच्या व वर्गांच्या मानस बदलामध्ये आणि चमत्कार, बुवाबाजी, अघोरी-अमानुष अंधश्रद्धा, अन्याय शोषण करणार्या रूढी-प्रथा-परंपरा, कालबाह्य सण-उत्सव यांच्यापासून काही प्रमाणात परावृत्त करण्यामध्ये निश्चितच यश आले आहे, असे म्हणता येईल. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेचे अंधश्रद्धा निर्मूलन ही मानवी विकासातील, प्रगतीतील आणि आधुनिकीकरणासाठी अत्यावश्यक बाब आहे, हे तर नक्कीच स्वीकारलेले आहे. म्हणजे अंधश्रद्धेचा प्रश्न आहे आणि त्याचे निराकरण केले पाहिजे, याबद्दल सर्वसहमती झालेली आहे, असे म्हणता येईल. त्या प्रश्नाच्या सोडवणूकीचा एक वस्तूपाठ गेल्या तीन दशकांच्या संघटित कामातून आम्ही उभा केला आहे. त्याबद्दल कदाचित मतभेद असू शकतात; पण त्यानिमित्ताने आम्ही जगापुढे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यानुभव, त्याची वाटचाल, त्याचे सिंहावलोकन आणि त्याचे सामाजिक प्रभावाचे मूल्यमापन (Social Impact Analysis) मांडायचा प्रयत्न करणार आहोत. तसाच प्रयत्न पुरोगामी-परिवर्तनवादींसह विचारधारेतील सर्व विचार प्रवाहांना प्रतिनिधित्व करणार्या राजकीय पक्ष, संघटना, संस्था, गटांनी आणि व्यक्तींनी देखील करावा, असे जाहीर आवाहन आम्ही करीत आहोत. कारण समाज परिवर्तनासाठी काम करणार्या कुठल्याही समुहाचे भवितव्य, ती काळाच्या कसोटीवर किती समाजोपयोगी ठरते, यावरच अवलंबून असते, असे आम्हाला वाटते. त्यानुसार आपणच आपली उपयोगिता महाराष्ट्र राज्य महोत्सवी वर्षानिमित्त जनतेसमोर स्वत:हून मांडावी, असे आमचे मत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. महा. अंनिसच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्ताने आम्ही आमच्या संघटीत कामाचा लेखा-जोखा मांडायचा प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी विशेषांक निर्मिती व प्रकाशनाची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आमच्या कामाबद्दल त्यांचे निरीक्षण, मूल्यमापन देखील जाणून घेण्यात आम्हाला रस आहे. त्यासाठीचे वेगळे नियोजनबद्ध प्रयत्न केले जाणार आहेत. अशा मराठी व इंग्रजीतील विशेषांकाचे प्रकाशन ऑगस्ट 2019 मध्ये मुंबईत होणार्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत व दोन दिवसीय संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केले जाणार आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट 2019 ते 1 मे 2020, म्हणजे महाराष्ट्र राज्य साठाव्या वर्धापन दिनापर्यंतच्या कालावधीत आम्ही संघटनेतर्फे विविधांगी पद्धतीने व मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कार्याचे योगदान जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे अभियान राबविणार आहोत. या सर्व संकल्पसिद्धीसाठी आपण आम्हाला यथाशक्ती सहकार्य करावे, अशी नम्र विनंती करीत आहे.
नवमहाराष्ट्र उभारणीसाठी कटीबद्ध होऊ या !
विवेकाचा आवाज बुलंद करू या !
आपला स्नेहांकित
अविनाश पाटील