रोग बरा होत नाही म्हणून सामान्य माणूस ‘आशावादी’ बनतो की, कुणीतरी रोग बरा करणारा भेटावा…..
आणि जर एखादा जादूगार भेटला आणि त्याने जादू दाखविली आणि वर सांगितले की, या जादूने मी रोग बरा करेन तर सामान्य माणसांची झुंड तिकडे दौडू लागते. पुण्याजवळील टोमॅटो महाराज याचे उत्तम उदाहरण आहे.
याहूनही उत्तम उदाहरण आता संपूर्ण भारतात धुमाकूळ घालते आहे. त्याचे नाव आहे मिडब्रेन अॅक्टीव्हेशन किंवा एम.बी.ए.
टोमॅटो बाबा उघडा पाडणे सोपे आहे. पण विज्ञानाची परिभाषा वापरून समाजात सुटा-बुटातल्या बुवांच्या झुंडीच्या झुंडी जर घुसल्या तर त्याचे काय परिणाम होतात ते मिडबे्रन अॅक्टीव्हेशनच्या बुवाबाजीने दाखवून द्यायला सुरवात केली आहे. आणि विज्ञानाची झुल पांघरून ही बुवाबाजी व्यापारी पद्धतीने पसरू लागल्याने ती धोकादायक बनली आहे.
एमबीए काय प्रकार आहे?
वय वर्षे 5 ते 12 वयोगटांतील मुले या एमबीएची सावज आहेत. आणि या मुलांच्या पालकांची शिकार केली जात आहे. या वयोगटातील मुलांच्या डोक्यातील मध्यमेंदूस वेगवान चालना देतो असे सांगायचे. यासाठी दोन दिवसांचे ट्रेनिंग प्रोग्रॅम आम्ही घेतो असे जाहीर करायचे. आणि मग तुमचा मुलगा तिसर्या दिवसापासून ‘सुपर जिनियस’ ‘महाबुद्धिमान’ होतो असे सांगायचे.
यासाठी पालकांच्या मनातील इच्छांचा खुबीने वापर करून घेतला जातो. प्रत्येक आई बाबास आपले पोर हुशार निपजावे आणि जगात चमकदार कामगिरी करून दाखवावे असे मनोमन वाटत असते. मुलाने हुशारी दाखवावी, आजच्या स्पर्धेच्या जगात पाय रोवून टिकावे आणि यशस्वी व्हावे यासाठी आपण इच्छा बाळगणे गैर नाही. पण ही इच्छा जर आपण एखाद्या अवैज्ञानिक आणि निव्वळ भ्रामक कल्पनांच्या नादी लागून पुरी करण्यास जाऊ लागलो तर मात्र आपण कधी फसलो गेलो हे देखील ध्यानात येणार नाही.
सांगलीत असेच एमबीएचे सेंटर चालू झाले. जाहिरातबाजी सुरू झाली की, “एमबीए म्हणजे उजव्या व डाव्या मेंदूच्यामधील मेंदू. म्हणजे दोन्हीच्या मधला पूल. या पुलाला धडधाकट केले की, दोन्ही बाजूचे मेंदू एकत्रितरित्या उत्तम कार्य करतात. म्हणजे माहिती सहज गोळा होते. शिकणे वेगाने घडते. आणि मुले एका बाजूचाच ब्रेन वापरतात त्याऐवजी संपूर्ण मेंदू वापरू लागतात. त्यामुळे मुलांमध्ये नवनवीन संकल्पना निर्माण करण्याची क्षमता अवतरते. अभ्यासाचे सारे काही सहज लक्षात ठेवता येते, स्मृती वाढते. कसे कुठे काय करायचे त्याचे कौशल्य वाढते. आत्मविश्वास जबरदस्त होतो. कोणत्याही कार्यात एकाग्रता वाढविता येते. एमबीएमुळे आपल्याला प्रत्येक मुलाच्या मेंदूत जे दडलेले असते ते बाहेर काढता येते…..”
जाहिरात पुढे असाही दावा करते….
‘खालील गोष्टी एमबीए वाढवते :
‘स्मृती, एकाग्रता, आत्मविश्वास, चित्रमय स्मृती, भावना, चटकन ओळखण्याची क्षमता, सर्जनशीलता, क्रिडा कौशल्ये व क्षमता, सहावे इंद्रिय(?), शहाणा विचार करण्याची क्षमता, भावनिक बुद्ध्यांक, उजवा व डावा मेंदू यांचा समतोल साधणे, अजागृतावस्थेतील मन:शक्ती, मुले पूर्ण स्वावलंबी होणे.’
पुढील गोष्टी एमबीए कमी करते :
टी.व्ही. बघणे, मोबाईलवर गेम्स खेळणे, इंटरनेटवर गेम्स खेळणे.
डोळे बंद करून आपली मुले पुढील गोष्टी करू लागतात:
रंग ओळखतात, नंबर वाचतात, आकार सांगतात, वृत्तपत्रे वाचतात., 7 मिनिटांत पुस्तके वाचतात, नोटेवरील नंबर वाचतात, गणिते सोडवितात, चित्रे काढतात, सायकल चालवितात, चालतात, अडथळ्याची शर्यत पार पाडतात.”
हे सर्व जाहिरातीत आलेच. पण त्याचबरोबर लोकांना पटावे म्हणून ‘मार्केटिंगचा’ नेहमीचा फंडा वापरला आहे. मोठ-मोठ्या वैज्ञानिकांचे, सायकॉलॉजिस्टचे विचार या जाहिरातीत पेरले आहेत. चक्क आईन्स्टाईनचाही फोटो लावला आहे. आईन्स्टाईनचा खरे तर मिडब्रेन अॅक्टीव्हेशनशी काही संबंध नाही. जॉन हॅजेलीन या अमेरिकन वैज्ञानिकाचे मत मांडले आहे की, “मेंदूचा फक्त 5% वापर होतो” हे जॉन हॅजेलीन महर्षी महेश योगी या बुवाचे भक्त आहेत. आणि त्यांचे 5% वगैरे सारे झूट आहे. थॉमस् बुडझिनस्की या बायोफिडबॅक तंत्राचा शोध लावलेल्या अमेरिकन सायकॉलॉजिस्टचे विचार मांडले आहेत. वास्तविक बायोफिडबॅक आणि एमबीएचा थेट संबंध काहीच नाही. आणि बायोफिडबॅक हे मानसिक रोगावर उपचार करण्याचे एक तंत्र आहे ज्याविषयी मतभिन्नता आहे.
याचा अर्थ ते जे वैज्ञानिकांचे पुरावे देतात त्यांना आधार नाही. विशेष असे की, या वैज्ञानिकांचे सोडाच, साधी मेंदूची रचना याविषयी संयोजकांना विचारले तर त्याची उत्तरे त्यांना देता येत नाहीत.
सांगलीतील एमबीएचा प्रकार करणार्या प्रतिनिधीवर जेव्हा मेंदूच्या रचनेविषयीचा मारा केला तेव्हा त्यांना काहीही माहीती नाही हे आढळले. मिडब्रेन किंवा मध्यमेंदू हा मेंदूतील अतिशय छोटा भाग आहे. डोळ्याच्या हालचाली व ऐकण्याची संस्था यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे एक कार्य ते करते. या मध्यमेंदूत लाल केंद्रक नावाचा भाग असतो जो शरीराच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो. दुसरा एक भाग जो आहे तो खराब झाला तर पार्कीनसन्स नावाचा रोग होतो. याशिवाय मध्यमेंदूचे अन्य कार्य कोणते नसते. म्हणजे मुलांमध्ये ‘जीनियसपणा’ निर्माण करण्याजोगे काही नसते.
एमबीएने मात्र अत्यंत हुशारीने या मध्यमेंदू आणि उजव्या बाजूचा मेंदू यांची सांगड घालून स्वतचे विज्ञान तयार केले आहे. सामान्य लोकांना हेच विज्ञान खरे वाटते आणि फ्रँचाईजी घेतलेले हजारो एमबीएचे दलाल हेच विज्ञान पोपटासारखे बडबडत फिरत असतात.
हे एमबीएचे तथाकथित ब्रेन विज्ञान आहे! ते मांडले आहे, एमबीएचा जन्मदाता डॉ.माकोटो शिचिदा नावाच्या जपानमधील एका व्यक्तीने. त्याची बिनबुडाची विज्ञानकाव्ये पुढीलप्रमाणे-
-जगातील 80% लोकांचा डावा मेंदू जास्त विकसित झाला आहे. उजवा नाही.
– उजवा मेंदू हाच जास्त महत्वाचा मानावा.
– डाव्या प्रमाणेच उजव्या बाजूच्या मेंदूत 5 इंद्रिये असतात.
– उजव्या मेंदूतून निर्माण होणार्या लहरी प्रतिमा तयार करते.
– अतिंद्रिय संवेदन हे उजव्या मेंदूतून येते. (ESP)
-‘शिचिदाची अवस्था’ नावाची एक अवस्था मेंदूत असते. विश्वातील सर्व अणूरेणूत एक नाद असतो. हा नाद डाव्या मेंदूस कळतच नाही. मात्र उजव्या मेंदूस कळतो. म्हणून उजवा मेंदू जर प्र्रशिक्षण देऊन आणि ध्यानधारणा करून ‘प्रज्वलित’ केला तर तो या नादमय अणूरेणूंशी तादात्म्य पावतो. (ट्यून होतो). आणि हे टेलिपथी (दूरचे संवेदन) किंवा अतिंद्रिय ज्ञानप्राप्ती(क्लोर व्होयन्स) ने कळते.
– वयाच्या 6 व्या वर्षापर्यंत मुलांचा उजवा मेंदू प्रभावी असतो त्यानंतर डावा प्रभावी होतो. हेच मुलांना घातक ठरते(!)
– म्हणूनच उजवा मेंदू सतत उद्दिपीत करत राहिल्यास मुलांची प्रगती होते. त्यासाठी 50 चित्रे असलेले मोठे पेपरशीट मुलांना दाखवायचे. ही पद्धत शिचिरा अॅकॅडेमिक सेंटरमध्ये वापरतात. यामुळे प्रत्यक्ष पाहून अनेक गोष्टी जास्त काळ लक्षात ठेवता येतात ज्यास फोटोग्राफिक मेमरी म्हणतात.
– एकदम चमकणारी चित्रे (flash Images) दाखविली तर ती उजव्या मेंदूस चटकन पकडता येतात. हाही एक व्यायाम आहे.
– चित्रांची कार्डे दाखविणे, ध्यानधारणा करणे आणि श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवण्यास शिकणे या पद्धती देखील शिचिदा सांगतात.
माकोटो शिचिदा हा माणूस स्वत:स घोषित वैज्ञानिक समजत असला तरी वरील दावे(व असेच अनेक त्याचे दावे आहेत ते) सारे फसव्या विज्ञानात मोडतात. मानसविज्ञान (Psychology), मेंदू विज्ञान(न्यूरोलॉजी). या विज्ञानांचा कोणताही आधार माकोटो शिचिदाच्या दाव्यांना नाही. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या दाव्यांचे कोणतेही संशोधन, प्रयोग व सिद्धता त्यांनी दिलेली नाही.
याच माकोटो शिचिदांनी स्वत: पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी ‘उजवा मेंदू विकसित करणारी शिचिदा पद्धत’ आणि ‘शिचिदाच्या 36 पद्धती’ ही दोन पुस्तके जपानमध्ये जास्त गाजली.
याच माकोटो शिचिदांनी फसव्या विज्ञानाचा दिवा पेटवला आणि भारतात आता सर्वत्र दिवे पेटू लागले आहेत! हे दिवे अंधश्रद्धांचा प्रकाश पाडून भारतास उजळावयास निघाले आहेत. त्यापैकी व्यापारात अग्रेसर असलेल्या गुजरातमध्ये मोठमोठी नावे घेऊन डॉ.माकाटो शिचिदांच्या मिडब्रेन अॅक्टीव्हेशन तंत्राचा व्यापार अनेकांनी सुरू केला आहे. हा व्यापार मिडब्रेनच्या नावाखाली कसा केला जातो त्याची एक झलक बघू या.
* शिचिदा पद्धत ज्यांना हवी आहे त्यांच्यासाठी डॉ.मोकोटो शिचिदांकडून लायसन घ्यावे लागेल.
* आमची उत्पादने दोन आहेत – ‘तुमचे बुद्धिमान बाळ’, ‘तुमची बुद्धिमान मुले’
* धंदा करण्याची उत्तम संधी. फ्रँचाइजी घ्या. भरपूर कमवा.
* स्पर्धा नसलेल्या धंद्यात आत्ताच उतरण्याची उत्तम संधी.
* कधीही मंदी न येणारा हा धंदा.
* फक्त 200 ते 300 स्क्वेअर फूटच्या जागेत धंदा चालू करा. विद्यार्थ्यांना गिर्हाईके बनवा. कंपनीकडून सर्व प्रकारचे प्रशिक्षण मिळेल.
* प्रत्येक व्यक्ती तुमची गिर्हाईक आहे आणि प्रत्येक घर तुमच्या व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे.
मिडब्रेन अॅक्टीव्हेशनच्या दाव्यांविषयी अंनिसचे आव्हान
1. मिड ब्रेनचे कार्य वाचणे, बोलणे, वस्तू ओळखणे याच्याशी निगडित नसताना त्याचे उद्दिपन करून वस्तू डोळ्यांवर पट्टी बांधून बघणे, वाचणे हे विसंगत नाही काय?
2. मिडब्रेनमध्ये पिनियल ग्रंथी पिट्युटरी ग्रंथी, वर्निक व ब्रोकाचा भाग, फ्रंटल कॉर्टेक्स असे भाग नसताना या भागांची कार्ये आपण मिडब्रेन उद्दिपनामागे कसे करता?
3. मिड ब्रेन उद्दिपीत करता म्हणजे ते नेमके कसे करता? व त्यामुळे ते वेगाने सक्रिय होते यास वैद्यकीय पुरावा कोणता?
4. जर मिडब्रेन अॅक्टीव्हेशन(या पुढे त्यास एमबीए असे संबोधिले जाईल) ने मेंदू तल्लख व वेगवान बनू शकतो तर मतिमंद मुलांचा मिडब्रेन आपण तल्लख, वेगवान बनवून द्याल का? नसेल तर का नाही?
5. आंधळ्या मुलांमुलींचे मिडब्रेन अॅक्टीव्हेशन करून त्यांना आपण ज्या ज्या क्रिया गोष्टी करायला सांगता त्या करवून घेऊन दाखवाल काय?
6. आपल्या शरीरात नाडी चक्रे असतात, तर ती कुठे असतात ते शरीर विज्ञानाच्या आधारे सांगाल काय?
7. मेंदू लहरी वारंवारिता(Brain frequency) ही मेंदूच्या सेंटरमध्ये असते असे आपण सांगता, ती नेमकी कुठे असते व कशी असते?
8. एमबीएचे वेगवेगळे कोर्सेस आपण सांगता. पैकी पहिल्या कोर्समध्ये स्पर्श व वासाने नुसते ओळखता येते. दुसर्या कोर्समध्ये पाठीमागचेही ओळखता येते व तिसर्यामध्ये क्वांटम रिडिंग करता येते. या तिन्ही पायर्या आपण सिद्ध करून दाखवाल काय? जर दाखविणार असाल तर प्रथम पायरी व द्वितीय पायरीची चाचणी आम्ही घेऊ इच्छितो.
फ्रँचायजीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे दर आहेत. 5 लाखांहून 75 लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास हमखास पैसा मिळेल अशी खात्री दिली जाते. यात मल्टीलेव्हल मार्केटिंग तंत्र वापरणारेही बरेच जण आहेत. त्याचबरोबर 25-35% प्रत्येक गिर्हाईकामागे(म्हणजे मुलामागे) कट प्रॅक्टीस पण आहे. म्हणजे तेवढे टक्के रक्कम मूळ कंपनीस वळती करावी लागते.
धंदा करणार्यांना या मिडब्रेनची भुरळ पडते आहे. त्यामुळे दे दणादण शाखा सर्व देशभर चालू झाल्या आहेत. यावर ‘ना सरकारचे नियंत्रण आहे ना लक्ष’ या धंद्यास ते ‘एज्युकेशन एनरिचमेंट इंडस्ट्री’ म्हणतात. याचाच अर्थ शैक्षणिक समृद्धी उद्योग या गोंडस नावाखाली लुटालूट राजरोसपणे चालू आहे. आणि यासाठी बिझनेस मॅनेजमेंटची सर्व तंत्रे वापरली जात आहेत. म्हणजे ‘प्रोफेशनल टीम’, ‘काऊंसेलर्स’, ‘आर अँड डी डिपार्टमेंट’, ‘अॅडव्हर्टायझिंग ब्युरो’ या सार्या तंत्रांची मस्त रेलचेल या एमबीए धंद्यात आहे.
फ्रँचायझी किंवा शाखा कुणीही काढू शकतो. हा आणखी एक मोठा विनोद आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळणार्या या बिनडोकांना हे एक्सपर्ट सरकार उघड्या डोळ्यांनी कसे काय पहात बसले आहे? हा मानसिक आरोग्याशी चाललेला जीवघेणा खेळ आहे. तो रोखण्यासाठी सरकारने कायदेशीर कार्यवाही करायला नको काय?
भारतात ज्या कंपन्या एमबीएचे खूळ पसरवित आहेत त्यात, ‘एम्पॉवर माईंड ट्रेनिंग इन्स्टीट्युट’, ‘वे टू ब्रेन’, ‘इग्नाईट जिनियस माईंड’, ‘जिनियस माईंड अॅकेडमी’ अशा अनेक कंपन्या आघाडीवर आहेत. या सर्व कंपन्यांची एमबीएचा प्रचार करण्याची समान पद्धत आहे. ती अशी-
* एमबीएच्या जाहिराती वाटायच्या. त्यात ‘सुपरकीड’ बनविण्याचा दावा. त्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधून देखील तुमची मुले काहीही करून दाखवतील अशी भुरळ.
* प्रत्येक शहरात एक दिवसाचे मोफत शिबीर. त्यात कंपनीचा प्रतिनिधी येऊन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व ‘चमत्कार’ करून दाखवितो.
मग आवाहन करतो की, मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी आमची टीम येईल. त्यासाठी नाव नोंदवा.
* कमीत कमी 20 जणांची नावे तरी नोंदविली जायला हवीत. प्रत्येकाकडून 5 हजार पासून 25 हजारपर्यंची फी आकारली जाते.
* एमबीए शिकविणार्या गुरूजींची टीम मग दोन दिवस येते. आणि डोळ्यावर पट्टी बांधून कसे बघायचे ही जादू शिकवून जाते.
मोठमोठ्या टी.व्ही.चॅनेल्सवरून या एमबीएचा बिनदिक्कतपणे प्रचार केला जातो. हे वैज्ञानिक आहे असे आवर्जून खोटे सांगितले जाते. आणि तपासण्यास नकार दिला जातो. काही कार्यक्रमात तर जादूगार, कॉलेज-शाळांचे प्रिन्सिपॉल-हेडमास्तर, शिक्षणतज्ञ यांना बसवून त्यांच्याकडूनही ‘वाह व्वा’ मिळविण्याचे ढोंग केले जाते.
मिडब्रेन अॅक्टीव्हेशन प्रोग्राम तपासणी चाचणी
आपण घेत असलेल्या एमबीए कार्यक्रमात मिडब्रेनवाले खालील दावे करतात.
1. डोळ्यावर पट्टी बांधून कोणत्याही मुला-मुलीस वस्तू ओळखता येतील.
2. मुलांची वये 5 ते 20 दरम्यानची असावीत कारण त्यांचा मेंदू तयार होत असतो.
3. एमबीएच्या व्यक्तीस पुस्तक वाचता येते, नोटांचे नंबर वाचता येतात व गणिते सोडविता येतात, रंग ओळखता येतो. लोगोज-ब्लॉक्स व अन्य गेम्स खेळून दाखवितात.
4. त्यांची स्मृती तल्लख बनते व वाढविता येते.
अंनिस खालील पद्धतीने चाचणी घेऊ इच्छिते:
1) डोळ्यावर आम्ही आमची पट्टी किंवा कापड बांधू.
2) डोळ्यावर व नाकावर कापड आमच्या पद्धतीने बांधू.
3) कोणतीही क्रिया ओळखताना मुला-मुलींना वस्तू कशा दाखवायच्या ते आम्ही ठरवू. म्हणजे त्या डोळ्यासमोर, की खाली ते आम्ही ठरवू.
4) डोळ्यावर पट्टी, कापड न बांधता केवळ डोळ्यावर हात ठेवून आम्ही त्यांची चाचणी(काही मुलांची) घेऊ.
5) मुलांना दाखवायच्या सर्व वस्तू व खेळणी आम्ही स्वत: आणू व स्वत:च त्यांना दाखवू.
6) आम्ही जी पुस्तके आणू ती आपल्या मुलांनी वाचून दाखविणे बंधनकारक आहे.
7) आपल्या एमबीएच्या कोर्समुळे मुले तल्लख स्मृतीची बनतात तर त्यांची आम्ही स्मृती चाचणी घेऊ.
8) चाचणी घेतल्यानंतर जे निष्कर्ष निघतील ते आम्ही समाजासमोर मांडू, त्यास वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊ वा टी.व्ही.चॅनेलस वरून प्रसारित करू.
9) आपल्या दोन दिवसांच्या कोर्समध्ये आम्ही आमचा एक विद्यार्थी घेऊ. त्याची चाचणी आम्ही घेऊ. त्याने आपल्या कोर्सविषयी माहिती आम्हास दिल्यावर त्यासही यथायोग्य प्रसिद्धी देऊ. जर तो आमच्या चाचणीत पास होऊ शकला नाही तर आम्ही आपणास आपली कोर्स फी रू.21 हजार देणार नाही.
सांगलीतील फ्रँचायजीच्या ऑफीसात सांगली अंनिसचे अॅड.चंद्रकांत शिंदे जाऊन बसले व त्यांनी या एमबीएच्या प्रतिनिधीस माझीही मुलगी आणायची आहे सांगून प्राथमिक माहिती द्या असे सांगितले. आणि मग यावर काही जणांना शंका आहेत म्हणून त्यांचे निरसन करण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केल्यावर अंनिसच्या ऑफीसमध्ये या प्रतिनिधीस घेऊन आले. तेव्हा त्यांना प्रा.प.रा.आर्डे, ज्योती आदाटे, गणेश कांबळे, चंद्रकांत वंजाळे, डॉ.संतोष अक्कोळे, प्रियांका तुपलोंढे, गौरव नवघरे, अमित नवघरे, किरण पाटील, सुभाष कोष्टी, बाळासाहेब पाटील, अशा सर्व कार्यकर्त्यांच्या शंकांवर काहीच सांगता येईना. मग त्यांना एमबीए सिद्ध करण्याचे आव्हानपत्र देण्यात आले. ते त्यांनी घेतले पण त्यावर उत्तर देण्यास नकार दिला आणि माघार घेतली.
असाच प्रकार सातारा आणि नाशिक येथेही घडला. नाशिक येथे प्रत्यक्ष स्टेजवर जाऊन आव्हान देण्यात आले. परंतु एमबीएवाले आमनेसामने येण्यास घाबरत आहेत असेच चित्र सध्या तरी दिसते आहे.
एमबीए ही बुवाबाजी जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा 2013 च्या अनुसूची 2(1)(ख) मधील क्रमांक 2 कलमाप्रमाणे गुन्हा होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसविणे, ठकविणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे असे हे कलम सांगते. ही सरळसरळ फसवणूकच असल्याने ती भादंवि 420 कलमाखालीही आणता येते. याबाबतीत आपण सर्वांनी मिळून जोरदार मोहीम चालू करणे अत्यावश्यक आहे.
‘मेंदूत एक ग्रंथी असते. वाटाण्याएवढी. ती म्हणजे मेंदूचा सेंटर. तिच्यात प्रचंड ऊर्जा असते आणि तिच्यात आध्यात्मिक शक्ती असते’ असा दावा हे मिडब्रेनवाले करतात. असाच दावा अनेक सायकीक किंवा तंत्र-मंत्र सांगणारेही करतात. तीच ही पिट्युटरी ग्रंथी असे सांगतात. पण ही ग्रंथी आणि मिडब्रेन यांचा शून्य संबंध आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे बालिश विज्ञान पसरवून समाजातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे घृणास्पद आहे.
विज्ञानाचा वापर करून जेव्हा या 21 व्या शतकात एक नवी शोषण व्यवस्था उभी राहू पाहत आहे तेव्हा त्यास खंबीरपणे विरोध करणे खूप महत्वाचे आहे. ही व्यवस्था फक्त श्रीमंतांनांच लुटते असा भ्रम कुणी बाळगू नये. हातावर पोट असणारे पालक जेव्हा एमबीएच्या कोर्ससाठी कर्ज काढून पैसे देतात तेव्हा ही शोषण व्यवस्था गंभीर बनते. सामान्यांच्या अगतिकतेचा असा गैरफायदा घेणे ही नवीन कल्पना नाही. जुनीच आहे. पण ती जेव्हा फसव्या विज्ञानाचे रूप घेते तेव्हा ती लबाडी असते हेच सामान्यांना पटत नाही. एवढेच नव्हे तर त्यात फसवणूक अशी काय असते हेही ध्यानात येत नाही. ‘मुलांमध्ये खूपच फरक झाला’ असे संदिग्ध रिझल्टस् सांगणार्या या पालकांना हेही कळत नाही की, मुलांंची शैक्षणिक क्षमता व बुद्धिमत्ता ही दोन दिवसांत वाढविण्याची गोष्ट नव्हे. तसे असते तर एमबीएने आंधळ्यांचा मध्यमेंदू क्षमतावान बनवून त्यांना डोळस करून सोडले असते. मतिमंदत्व गायब करता आले असते. आणि वर्गात उभे राहून शिक्षण देण्याऐवजी सर्व मुलांना मध्यमेंदूच्या प्रयोगशाळेत दोन दिवस नेऊन ठेवल्यावर क्रांती घडविता आली असती.
मिड ब्रेन विरोधात पोलीसात तक्रार नोंदवा
महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तसेच केरळ, गुजरातसारख्या राज्यांमधून असे प्रशिक्षण वर्ग भरमसाठ मोबदला घेऊन चालू आहेत. या वर्गांमधून विद्यार्थी आणि पालक यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. विज्ञानाचा मुलामा दिल्यामुळे अनेक सुशिक्षित पालक देखील याला बळी पडत आहेत. मिडब्रेन अॅक्टीव्हेशनच्या नावाखाली चालणारी फसवणूक तातडीने बंद व्हावी म्हणून महाराष्ट्र अंनिस राज्यव्यापी मोहिम हाती घेणार आहे. त्या-त्या जिल्ह्यातील असे प्रकार थांबवण्यासाठी पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले जाणार आहे. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या पालकांनी तक्रार देण्यासाठी 7588806688 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन मअंनिसच्या वतीने करीत आहोत.
–अविनाश पाटील
राज्य कार्याध्यक्ष, म.अं.नि.स.
एवढी सोपी उत्तरे जर स्वभाव-मानसिकता-क्षमता बदलविण्यासाठी अन् घडविण्यासाठी जर असती तर समाजाची विराट व्यवस्था प्रत्येकाच्या मुठीत सामावली असती. पण हे कळण्याइतपत इथल्या समाजाची मानसिक मुक्तता अजूनही झालेली नाही.
आणि हेच तर खरे मोठे आव्हान आहे. मानसिक गुलामगिरीमुक्त समाज घडविण्याचे!
–डॉ.प्रदीप पाटील,सांगली
लेखक संपर्क : 9890844468