अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिराळा तालुक्याचे अध्यक्ष महाराष्ट्र विवेकवाहिनी जिल्हा सांगलीचे कार्याध्यक्ष प्रा.काशिलिंग गावडे यांचा म.ज्योतिबा फुले प्रणित सत्यशोधक पद्धतीने विवाह पलूस येथे संपन्न झाला. म.ज्योतिराव फुले यांनी प्रचलित केलेला आणि सत्यशोधकांनी, पुरोगामी विचाराच्या युवकांनी, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पुढे चालू ठेवलेला ‘सत्यशोधक विवाह’ हा पलूस, कुंडल परिसरात कुतुहलाचा आणि विचारास चालना देणारा ठरला.
प्रा.काशीलिंग गावडे आणि कु.दीपाली यांचा दि.6-5-2011 रोजी पलूस येथे सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला. सत्यशोधक विवाहाचे कुतूहल या परिसरात होते. हळदी समारंभ, पालक सन्मान विधी, वधू-वरांचा शपथविधी, सत्यशेधक मंगलाष्टका, मंगळसूत्र बंधन, सप्तपदी इ.विधी सत्यशोधक पद्धतीने पार पडले. ‘पालक सन्मान विधी’ सत्यशोधकी विवाहाचे वैशिष्ट्य आहे. वधू-वराकडील मूळ पुरूष (आजी, आजोबा इ.) यांचे फोटोपूजन, वधू वरांकडील निवडक पालकांचा सत्कार प्रा.विजयकुमार जोखे यांनी केला. वधू व वराने निर्मिकाच्या साक्षीने, सर्वांसमोर जाहीर शपथवाचन केले. यानंतर म.फुले प्रणित मंगलाष्टका गाऊन अक्षतांऐवजी फुले आणि पाकळ्यांचा वर्षाव केला. मंगळसूत्रबंधन, निर्मिक प्रतिमेभोवती सप्तपदी झाली. हा विवाह प्रा.विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
हुंडा, मानपान, पुरोहित, कर्मकांड वगळून साधा, सोपा सत्यशोधकी विवाह संपन्न झाला. यामुळे प्रभावित होऊन यापुढे सत्यशोधक विवाहाला चालना देण्याचा मनोदय व्यक्त केला गेला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समाजवादी प्रबोधिनी शाखा शिराळाने पुरोगामी प्रबोधनात्मक विचारांच्या पुस्तकविक्रीचा स्टॉल मांडला होता. एकूण रू.5000/- ची पुस्तके विकली गेली. वधूवरापाठीमागे म.ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांची लावलेली चित्रे लक्ष वेधून घेत होती. तांदूळ न टाकता फुले टाकून नको अन्नधान्याची नासाडी हा संदेश देणारी ‘फुले की अक्षता’ अशी पत्रके वाटली.
–विजयकुमार जोखे, शिराळा.