कासव! हिंदू धर्मात गाय, हत्ती याबरोबरच कासवाला शुभ मानलं जातं. त्यामुळे बहुतेक मंदिराच्या बाहेरही कासवाची प्रतिमा कोरलेली असते. अवतारवादी विष्णू रूपात कासवाच्या रूपाचाही अंतर्भाव केला आहे. कासवाची टणक व कठीण पाठ हे त्याचे वैशिष्ट्य आहे. पण हीच पाठ कासवाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहे. कासवाची पाठ तंत्रमंत्रासारख्या प्रकारातही वापरली जात असल्याने कासवांची मोठ्या प्रमाणावर हत्या होते. तंत्र-मंत्र ही शुद्ध अंधश्रद्धा आहे याचबरोबर कासवांचं मांस खाल्ल्यास शक्ती वाढते किंवा मांसापासून बनवलेले तेल वापरल्यामुळे हातापायांचे सांधे दुखत नाहीत अशी अंधश्रद्धा आहे. ह्या अंधश्रद्धांतूनच कासवांची तस्करी मोठ्या प्रमाणात होते व त्याची हत्याही होते. कासवाबद्दलची शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास मोठ्या प्रमाणात या अंधश्रद्धा दूर होतील असे वाटते.
भारतात कासवाच्या विविध जाती सापडतात. मऊ पोट व कठीण पाठ असणार्या प्राण्याला सरसकट कासव म्हटले जाते. तरी प्रत्येक जातीचे वेगळे वैशिष्ट्य असते. जमीन आणि पाणी येथे राहणार्या कासवाला सर्रास कासव म्हटले जाते. यातही समुद्रात, नदीत आणि जमिनीवर वास्तव्य करणार्या कासवाला इंग्रजीत वेगवेगळी नावे आहेत. समुद्रात म्हणजेच खार्या पाण्यात राहणार्या कासवाला ‘टर्टल’ असे इंग्रजी नाव आहे. नदीच्या म्हणजेच गोड्या पाण्यात राहणार्या कासवाला ‘टेरपिन’ असे इंग्रजीत म्हणतात. तर जमिनीवर म्हणजेच जंगलात राहणार्या कासवांना ‘टॉरटाईज’ असे इंग्रजी नाव आहे. या प्रत्येक कासवाची शरीररचना वेगळी असते. आपण सर्रास जे कासव पाहतो त्या जमिनीवरील कासवाला पाय असतात व या पायाला बोटेही असतात. त्यामुळेच कोणताही धोका दिसला की हे कासव आपले पाय पोटात घेत व कठीण कवचाच्या पाठीमुळे संरक्षण करून घेते. पण गोड्या व खार्या पाण्यातील कासवांना हे शक्य होत नाही कारण नदीत असणारे कासवांच्या पायाची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात. आणि समुद्री कासवाचे पाय एक प्रकारे ‘वल्हीच’ असतात. या कासवांना मोठ्या प्रमाणात समुद्रात पोहायला लागत असल्याने त्यांच्या पायांची ही नैसर्गिक रचनाच झालेली असते.
कासवाच्या कठीण पाठीचे कवच उगाळून प्यायल्यास पोटदुखी थांबते असा समज आहे. पण हे वैद्यकीय परिभाषेत कुठेही सिद्ध झालेले नाही. कासवाची हत्या रूचकर मांस म्हणून खाण्यासाठीच होते. कासवाच्या पाठीपासून शोभेच्या वस्तू बनवल्या जातात या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अतिशय मागणी आहे.
कासवामुळे घरात सुबत्ता येते असा समज आहे. फेंगशुईचं वेड जगात वाढल्यावर फिशटँकमध्ये, घरामध्ये कासव ठेवली जातात. हे खरे असले तर सरकारला ‘गरीबी हटाव’ कार्यक्रम जोरात करायला हरकत नाही. दारिद्य्ररेषेखालील आणि गरीब कुटुंबांना घरामध्ये ठेवायला एक कासव दिले की पुरे. कासवाचे मांस खाऊन शक्ती येत असेल तर भारतातील दर 7 मिनिटाला जे कुपोषित बालक मरत आहे त्याच्या कुपोषणावर छानच उपाय सापडला म्हणायचा. कासवाच्या मांसापासून बनवलेल्या तेलामुळे सांधेदुखी व पाठीचा कवच उगाळून पिल्यास पोटदुखी थांबते असं कुठेही संशोधनाने सिद्ध झालेले ऐकिवात नाही. मग हा व्यर्थ खटाटोप कशापायी? आजकाल 21 नखांचे कासव मिळवण्यासाठी अंधश्रद्ध व विवेकहिन माणसांची फौजच मागे लागलीय. यासाठी लाखो रूपये मोजायचीही त्यांची तयारी आहे. 21 नखांचे कासव सापडून वैभव, भरभराट होवो न होवो पण ही अंधश्रद्ध माणसे 21 व्या शतकात म्हणजेच विज्ञानयुगात रहायला लायक नाहीत एवढं निश्चित. त्यापेक्षा कासवाच्या कठीण व टणक पाठीचा दाखला घेऊन आपणही संकटापासून वाचण्यासाठी आपली पाठ म्हणजेच पाठीचा कणा ताठ ठेवला तर यश आपल्यापासून फार लांब/दूर राहणार नाही. पण लक्षात कोण घेतो?
– उमेश सुर्यवंशी