Categories
परिवर्तन

 प्रतिगाडगेबाबा : पालवे गुरूजी

फेब्रुवारी – २०१३

प्रश्न : गेली अनेक वर्षे तुम्ही गाडगे महाराजांच्या वेशात कीर्तने करीत आहात व त्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करता आहात, या सर्वांबद्दल जाणून घेण्याआधी या सर्वाची सुरवात कुठून झाली? व ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली?

पालवे गुरूजी : माझे लहानपण पुण्यात मंगळवार पेठेत गेलं, वयाच्या आठव्या नवव्या वर्षापासून माझा सेवा दलाशी संबंध आला. माझ्याबरोबर त्यावेळेला शाखानायक विठ्ठल भागवत, दत्ता रणदिवे, आणि दत्ता लांजेकर ज्यांचं नुकतंच निधन झालं. या सर्वांशी जवळून संबंध आला. श्रमदानाच्या माध्यमातून सेवादलाच्या शिबिराच्या माध्यमातून लोकांशी संबंध येत गेला. पहिली ते सातवी पर्यंतच शिक्षण 15 नंबर शाळेत झालं आणि त्यानंतर 11 वी पर्यंत सरस्वती मंदिर संस्थेच्या ‘पूना इंग्लिश स्कूल’मध्ये झालं. त्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेतला आलं नाही. नोकरीला लवकर लागलो. सुरवातीला मी ‘पोस्ट आणि टेलिग्राफ’ विभागात काम करत होतो. परंतु पगार तुटपुंजा असल्यामुळे नंतर ‘अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीत’ नोकरीला लागलो आणि जवळजवळ 37 वर्षेतिथे सेवा केली. याच काळात लोकांच्या जवळ जाण वाचनाची आवड प्रचंड असल्यामुळे मी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, नरहर कुरूंदकर अशा मोठ-मोठ्या विचारवंतांची पुस्तके माझ्या वाचनात आली व त्याचा प्रभाव माझ्यावर पडला व त्यातून आपण काहीतरी केलं पाहिजे हा विचार नेहमी मनात राहिला. याचवेळी लोकांच्यामधल्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, बाबा, बुवा, बापू, अम्मा यांच्यामागे जो समाज आहे आणि दुसरीकडं विचार केला की, गाडगेबाबा अशिक्षित असताना लोकांच्या समोर किती विज्ञानवादी विचार सांगतात आणि हे विचार लोकांच्यापर्यंत का पोहोचत नाहीत? हे सगळे त्यांचे विचार मनाला पटल्यानंतर या माध्यमातून सेवानिवृत्त होताना 28/05/1999 रोजी गाडगेबाबांच्या वेशात हा कार्यक्रम केला आणि त्यानंतर हा प्रवास सुरू झाला.

प्रश्न : गेली किती वर्षे तुम्ही हा प्रयोग करताय?

पालवे गुरूजी : आत्तापर्यंत पंधरा वर्षे झाले आणि या पंधरा वर्षाच्या काळात 1584 कार्यक्रम मी लोकांच्यासमोर केले. लोक याचा स्वीकार करतात. पण मला विचारतात की, ‘गाडगेबाबा हे बोलेले ते आमच्या कानापर्यंत आलंच नाही, हे बरं सांगता बाबा तुम्ही’. इथंच नेमकं आपलं चुकलंय. आपण तुकाराम महाराज, गाडगेबाबा यांनी आपल्याला उपयोगी पडेल असे किती जबरदस्त विचार अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या माध्यमातून सांगितले. मी त्यांना विचारतो, की गाथा तुम्ही कधी वाचलीय का? नुसतीच गाथा आहे आणि ती कपड्यात गुंडाळून ठेवलेली आहे. त्या गाथेतच असं सांगितलंय की,

‘चंदनाच्या झाडाला सर्पाची वसती, सुगंधाचे त्यास काय घेणे.’

            चंदनाच्या झाडाला साप सगळे वेटोळे घालून बसलेले असतात पण त्याला वास येत नाही तसं आमच्या घरात गाथा आहे, पण ती कपड्यात गुंडाळून ठेवलीय तिचा काय उपयोग? यासाठी ती वाचली पाहिजे तिचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. मनातल्या अंधश्रद्धा आपण काढल्या पाहिजेत. त्या नुकसानकारक आहेत.

            तुकाराम महाराज आणखी पुढे म्हणतात,

‘दगडाचा देव तो, बोलेल कैसा।
कधी न काळी वाचा येईल त्यासी।
दगडाच्या देवाला पुरणपोळी, जिवंत माणसाला शिवीगाळी
अहिराव बहिराव, म्हसोबा, केसोबा
मद्य, मासाचे भक्षती,
जरी मरी रंडीचंडी सुक्या रोटीचे सोबती
असा कसा तुमचा देव घेतो दुसर्‍याचा जीव
तुका म्हणे किती सांगू या लोकां
तरी त्यांच्या मनातला जाईना हेका.’

            हे इतकं चांगलं आपण जर कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आपण देवाला नेहमी काहीना काही मागत असतो. गाडगेबाबाच नेहमी म्हणायचे,

‘देवळात जाणारा कोण - तर आपणच....
देवळाम्होरं उभा राहणारा कोण - तर आपणच
देवापुढं मागणारा कोण - तर आपणच
अन् ऐकणारा कोण - तर आपणच
मग देवळात काह्यला जायाचं?
महाराजांची गाथा काय सांगते?
मना करारे निर्मळ सर्व सिद्धीचे कारण

            मनाला निर्मळ केलं पाहिजे, मनातून माणसाने चांगलं राहिले पाहिजे.

प्रश्न : एकंदरीतच आज इतकी वर्षं तुम्ही हा प्रयोग करता आहात याच्या माध्यमातून तुम्हाला आलेले चांगले वाईट अनुभव याच्याबद्दल काय बोलाल?

पालवे गुरूजी : आजवर वाईट अनुभव काहीच नाही आला. कारण माझ्या अंगावर गाडगेबाबांचा पोशाख, त्याच्या वाणीतूनच बोलत असताना लोकांना असं वाटायचं की, गाडगेबाबाच समोर बोलतात की काय असा त्यांचा समज होतो त्यामुळे आतापर्यंत एवढे कार्यक्रम झाले. पण बाबा तुम्ही देवाला का असं बोलता म्हणून कुणी बोलायला आलं नाही.

            एक अनुभव मला इथं सांगावासा वाटतो, एकदा एक मोठा क्लास वन ऑफिसर जो बुद्धीस्ट असल्याने मला लोक म्हणाले, की अहो त्याचा मोठा फ्लॅट आहे आणि तो घरभरणी करून सत्यनारायणाची पूजा घालणार आहे असं आम्ही ऐकलंय. बरीच लोकं आम्ही घेऊन गेलो पण तो काही ऐकत नाही. तेव्हा तुम्ही चला… तेव्हा मी म्हणालो, की मी जाऊन तरी काय करणार आहे तिथं?

            पण लोकांनी आग्रहच केला तुम्ही चलाच म्हणून. शेवटी मीही म्हणालो की, ठीक आहे येतो, पण मी त्यांना सांगितलं की, एक मोठी पिशवी घ्या आणि एक मोठा दगड आणा, लोक म्हणाले दगड कशाला’ पण मीही त्यांना म्हणालो तुम्ही आणा तर बरं!’ मग लोकांनी दगड आणला हळद-कुंकू सोबत घेतलं, उदबत्ती घेतली. आणि त्या अधिकारी असणार्‍या व्यक्तीच्या जवळ गेलो, गेल्यावर माझं कार्ड त्याला दाखवलं. कार्ड पाहून तोही म्हणाला, ‘बाबा तुमच्याविषयी बरंच वाचलंय, चांगलं काम करताय तुम्ही’ थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मीच विचारलं की, ‘तुमचा गृहप्रवेश कधी आहे?’ तो म्हणाला की, ‘नाही नाही बाबा मी घरभरणी करणार आहे, सत्यनारायणाची पूजा करून घरात होम पेटवणार आहे.’ मी म्हणालो ठीक आहे पण तो पिशवीतला दगड बाहेर काढ. मग तो दगड बाहेर काढला, त्या दगडावर थोडं पाणी टाकलं, पूजा केली आणि म्हटलं की, बाप्पा आता हे काय झालं? देव झाला ना? मग घाल ना माझ्या डोक्यात. तो म्हणाला, ‘बाबा तुम्हाला लागल ना’ मीही त्याला म्हणालो आरं देव कुठं मारतो का? बरंच काही बोलल्यावर त्याला विचारलं आत्तापर्यंत तुम्ही एवढं शिकला, सवलतीत शिकला का, पैशानं शिकला? नाही नाही म्हणे सवलतीत शिकलो. आज एवढे तुम्ही अधिकारी झालात जनरल जागेवर झाला का, राखीव जागेवर, नाही राखीव जागेवर झालो. मग हे सगळं बाबासाहेबांच्या नावाने घ्यायचं आणि हे सत्यनारायण वगैरे कशाला?

प्रश्न : एकूणच समाजातल्या अंधश्रद्धा पाहता गेली पंधरा वर्षं तुम्ही हे कार्य करताय समाजातल्या अंधश्रद्धांबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय?

पालवे गुरूजी : समाजातील अंधश्रद्धांबद्दल मला एवढंच सांगायचंय की, ज्या ज्या गोष्टी तुकाराम महाराज, महात्मा फुले, गाडगेबाबा यासारख्या लोकांनी अंधश्रद्धेबद्दल विचार सांगितला तो विचार लोकांच्या समोर सातत्याने आपण ठेवत नाही, आणि आपल्यात व आपल्या विरोधकात हाच फरक आहे की, त्यांची चार माणसे का असेनात पण त्यांच्या कामात एक प्रकारचं सातत्य असतं. आम्ही फक्त कार्यक्रमांच्या माध्यमातून जागे होतो. पण लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना पटवून दिलं पाहिजे. ह्याला वेळ लागेल पण कायम जर हे करीत राहिलोत तर नक्की बदल होईल. हजारो वर्षेह्या अंधश्रद्धा आमच्यात ह्या लोकांनी रूजवल्यात आणि म्हणूनच शेंदूर लावलेल्या दगडाला आमचा चुकून पाय लागला तर आम्ही दहा वेळा सारखं पाया पडत राहतो, आणि चुकलं म्हणून थोबाडीत मारून घेतो. आणि म्हणून ही जी भीती माणसाच्या मनात घातलीय ती संतांच्या आणि विचारवंतांच्या विचाराच्या माध्यमातून दूर केली पाहिजे.

प्रश्न : गेली वीस वर्षाहून अधिक काळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं समाजातल्या अंधश्रद्धांच्या विरूद्ध लढतेय, कार्य करतेय वेगवेगळे अनुभव समितीला आले. तुम्हीदेखील हे कार्य पाहताय तुम्ही स्वत:ही या स्वरूपाचं कार्य करताय. समितीबद्दल तुम्ही काय सांगाल?

पालवे गुरूजी : समिती अत्यंत परखडपणे आणि डोळसपणे काम करतेय, पण सरळ बोललो की, माणसाला राग येतो. म्हणून त्याला दाखले देत गेलो, संतांचे पुरावे दिले की, लोक त्याला नकार देत नाहीत. आपण अनुभव लोकांच्या समोर उभे केले आणि संतांचे दाखले दिले, केवळ गाडगेबाबा आणि  तुकाराम महाराज या दोन संतांनी फार परखडपणे अंधश्रद्धेवर मात केली आहे.         

मुलाखत : हर्षल लवंगारे