प्रत्येक समाजात अंधश्रद्धा आहेत तशी ती मुस्लिम समाजातही आहे. मागच्या आठवड्यात माझ्या शेजारी अशीच एक मयत झाली. त्यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्यामुळे तो मेला. प्रेत दवाखान्यातून घरी आणले. आता वाद चालू झाला. प्रेताचे तोंड कोणत्या दिशेने ठेवायचे? कोणी म्हणायचे किबला म्हणजे मुस्लिमांची नमाज पडायची दिशा पूर्वेकडे आहे; त्या बाजूला तोंड करा. कोणी म्हणाले; हज करायचे तीर्थस्थान मक्का मदिना दक्षिणेकडे आहे त्या बाजूला तोंड करा. असे मानतात मक्का-मदिनामधूनच दुनिया सुरू झाली आणि तिथेच तो संपणार आहे. यावर मरणार्याच्या परिवारात प्रचंड बहस झाली. शेवटी मक्का मदिना ज्या दिशेला आहे त्या दक्षिणेकडे मरणार्याचे तोंड केले गेले. सगळा प्रकार बघून मी अंतर्मुख झाले.
काय फरक पडतो? कोणत्याही बाजूने तोंड केले तरी. संध्याकाळच्या आत त्या प्रेताला कबरमध्येच जावे लागते. दिशा सर्वच शुभ असतात. या निसर्गात अशुभ असे काहीच नाही. सगळे खाऊन पिऊन मगम असलेल्या लोकांचे हे नखरे आहेत. प्रेत अंघोळीसाठी बाहेर काढले. शानदार जनाजा सजविला गेला. आता पुन्हा वाद सुरू झाला. अंतयात्रा कोणत्या दिशेने न्यावी? थेट कबरस्तानात न्यावी की अगोदर मस्जिदमध्ये न्यावी. मस्जिद होती दक्षिणेला आणि करबस्तान उत्तर दिशेला. या दिशांचा वाद का? तर कोणी म्हणाले एकदाची प्रेताला आंघोळ झाल्यानंतर पुन्हा त्याला स्वत:च्या घरावरून नेऊ नये. मस्जिदीसमोरून जायचे म्हणजे घर समोर येणार. थेट मस्जिदीत नेले; तर घर मधे लागत नाही. शेवटी सर्वानुमते प्रेताचा जनाजा उत्तर दिशेला म्हणजे थेट कबरस्तानात नेण्यात आला.
अर्थात सगळा दु:खाचा माहौल; जवळचे सगळे नातेवाईक रडत असतात. पुरूष मंडळी प्रेतासोबत गेलेली. कोणीतरी पांढरा दुप्पटा आणला मरणार्याच्या बायकोच्या डोळ्यावर ओढला. तर कोणी म्हणाले; नवरा मेल्याबरोबर पांढरा दुप्पटा ओढायचा होता; कोणी म्हणाले आता ओढा; तर कोणी म्हणाले कबरस्तानातून लोक घरी आल्यावर ओढा. पांढरा दुप्पटा ओढला काय, नाही ओढला काय? मरणार्याच्या पत्नीचे दु:ख कमी होणार आहे काय? उलट रूढी परंपरेच्या नावाखाली तिच्या गळ्यातील काळी पोथ तोडणे, जोडवे काढून घेणे, हातातील हिरव्या बांगड्या फोडणे, म्हणजे तिच्या दु:खी मनावर, ती पती विरहाची जी जखम असते त्यावर मीठ चोळणेच होय. त्यातही मी ज्या केसचे इथे वर्णन केले आहे; तो मुस्लिम नवरा किडनीने मेलेला. अवघ्या तीस वर्षाचा. लग्नानंतर बरेच दिवस अपत्यप्राप्ती झाली नाही. दोघांनीही औषध घेतली. वैद्यकीय उपचार घेतला. आज झालेली मुलगी चार वर्षांची आहे. मात्र “आमचा मुलगा, आमचा भाऊ तुझ्यामुळेच मेला” असा ठपका सुनेवर ठेवण्यात आला. कारण अपत्यप्राप्तीची जी औषधे खाल्ली त्यामुळेच त्यांच्या किडनीवर परिणाम झाला आणि तो मेला असा गैरसमज. औषधे दोघांनीही खाल्ली. मग पत्नी जिवंत आहे. खरं म्हणजे त्याला लग्नापूर्वीपासूनच किडनीचा आजार होता. सगळे खापर मरणार्याच्या बायकोच्या माथी आले.
मी प्रत्यक्ष बघितलेली ही प्राथमिक केस. पण अशा कितीतरी महिला अशा अंधश्रद्धेच्या वाईट प्रवृत्तीच्या बळी पडतात. अशा अंधश्रद्धेचे समर्थन करणार्याच्या पिढ्या न् पिढ्या तयार होत आहेत. अगदी डोळ्यादेखतची हाफ चड्डीत खेळणारी मुलं लांबलचक दाढी वाढवून, कधी या प्रवाहात आली? कळतच नाही.
– रजिया सुलताना