Categories
जात पंचायत

पुरोगामी महाराष्ट्र जातपंचायतींच्या विळख्यात

जानेवारी - २०१५

ऊठसूट पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या व सामाजिक न्यायाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात सर्व काही अलबेल आहे, असं काही नाही. नागपुरला हिवाळी अधिवेशन चालु असताना, कोकणात गावकीमुळे बहिष्कृत झालेल्या मोहिनी तळेकर या महिलेने आत्महत्या केल्याचे प्रकरण घडले. प्रसार माध्यमांनी तो विषय लावून धरल्यामुळे विधानसभेत त्याची दखल घेतली गेली. या संदर्भात आम्ही कायदा तयार करणार असल्याचे सरकारच्या वतीने प्रसार माध्यमातून सांगितले गेले. गावकी, जात पंचायत, खाप पंचायत, शालिसी सभा, कांगारू कोर्ट अशी वेगवेगळी प्रादेशिक नावे असलेली एकच व्यवस्था आहे. त्यांचे काम सारखेच असते. आपल्या जातीचा ठेका स्वतः कडे घेतलेल्या पंचांनी स्वतः कायदे बनवायचे, स्वतः न्याय निवाडे करायचे व स्वतःच शिक्षा करायची. कधी दंडाच्या स्वरुपात तर कधी समाजबांधवाचा जीव घेऊन किंवा जीव देण्याची मानसिकता तयार करून एकट्या रायगड जिल्ह्यात या वर्षांत एकुण तीनशे पंचाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोकणातील प्रकरणांत अंनिसचे कार्यकर्ते गावोगावी फिरुन बहिष्कृत व्यक्तीना धीर देत आहे. पंचांनी सुसंवाद, गरज असल्यास तक्रार दाखल करणे, त्याचा प्रशासनाकडे पाठपुरावा करणे अशी कामे कार्यकर्ते मोठ्या हिंमतीने व जोमाने करत आहेत. मुक्ता दाभोलकर, नितीन राऊत, प्रभाकर नाईक, महेंद्र नाईक, निलेश घरात, आरती नाईक, नुरखान पठाण, संजीव गायकवाड आदी कार्यकर्ते यात सामील असून चौथ्या जातपंचायत मूठमाती परिषदेची तयारी करत आहेत.
पंचांचा न विचारता लग्न जमविल्याच्या रागातून बारामतीच्या वैदू जातपंचायतने हनुमान शिंदे यांच्या कुटुंबावर कुर्हाडीने खुनी हल्ला केला. जातीचे प्रश्न जातपंचा मिटविण्याचा नियम असतांना, गावातील इतर समाजातील कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला म्हणून त्यांनाही मारहाण करण्यात आली. आंतरजातीय विवाहाच्या आरोपामुळे पुणे येथील वीरशैव लिंगायत गवळी जातपंचायतने धीरज पंगुडवाले या युवकास जात बहिष्कृत केले आहे. महाराष्ट्र अंनिसच्या पाठबळामुळे त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील उच्चशिक्षित सत्तर कुटुंबाला तेलगु मडेलवार जातपंचायतीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे बहिष्कृत केले आहे. औरंगाबाद येथील दर्शनसिंग मलके यांनी कंजरभाट जातपंचायत विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नाशिक जिल्ह्यात जैन समाजातील काही कुटुंबाला बहिष्कृत केल्याचा प्रकार घडला आहे. आष्टा (सांगली) येथील कोल्हाटी जातपंचायतने एका अल्पवयीन मुलीचे व्यसनी व्यक्ती सोबत जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केला होता. विरोध करणाऱ्या परिवारास जातीतुन बाहेर टाकण्याची धमकी देण्यात आली.अहमदनगर येथील शांताबाई शिंदे या महिलेस कोर्टाने निर्दोष मुक्तता करुनही वैदू जातपंचायतने पारंपारिक न्याय निवाडा करत जाणीवपुर्वक दोषी ठरवून दोन लाख तीस हजार रुपयांचा दंड वसूल केला व जात बहिष्कृत केले. मुलांच्या लग्नासाठी पुन्हा जातीत घेण्यासाठी पंधरा लाख रुपयांची मागणी करणाऱ्या वैदू जातपंचायत विरोधात अंनिस च्या अ‍ॅड. रंजना गवांदे व पुण्याचे दीपक गिरमे यांच्या प्रयत्नाने तक्रार दाखल झाली. परभणी येथील एक परिवार गोंधळी जातपंचायतच्या दहशती मुळे जीव वाचविण्यासाठी नाशिक मध्ये लपत राहतात. त्यांना साथ देणाऱ्या परीवारांना बहिष्कृत केले आहे. साथ देणाऱ्या परिवारातील मुलींचे जमलेले लग्न जातपंचायतीने तोडले आहे. अशा मुलींनी आयुष्यभर अविवाहित रहाण्याची भिती परिवाराने ओल्या डोळ्यांनी व्यक्त केली. एवढा अन्याय होऊनही पिडीत कुटुंबिय पोलिसांत येण्यास घाबरतात कारण अनेक जातीत पोलिसांत जाणं हाच मोठा अपराध समजला जातो. कधी तरी पंच जातीत घेतील, या आशेवर ते जगत आहेत. जुने कपडे विकणाऱ्या या कुटुंबाकडे अठरा लाख रुपयांची मागणी पंचांनी केली आहे. फेसबुक व हॉट्सअ‍ॅप संस्कृतीला असं काही घडतंय यावर विश्वास बसत नाही. जणु हे लोक आपले नाहीच, असंच चित्र समाजात दिसत आहे. आज जातपंचायत विरोधी कायदा नाही. राजकारणी जातीच्या पुढारी असलेल्या पंचांनी बाजू घेतात. बहुतांश पोलीस धनदांडगे असलेल्या पंचांची बाजु घेतात. महाराष्ट्र अंनिस वगळता कुणीही पुरोगामी संघटना यावर बोलायला तयार नाहीत. प्रसारमाध्यमांनी मात्र हा विषय लावून धरला आहे. दूरचित्रवाणीवर वारंवार चर्चा चालु आहेत. हिवाळी अधिवेशनात जातपंचायतचा विषय निघाला. सरकार जातपंचायत विरोधी कायदा बनविण्यास तयार असल्याचे सरकारच्या वतीने प्रसार माध्यमातून सांगितले गेले. महाराष्ट्र अंनिस लवकरच गृहमंत्री व सामाजिक न्यायमंत्र्यांची भेट घेणार आहे. जातपंचायत च्या मनमानी विरोधातील लढाई लढणे हे आव्हानात्मक आहे. अविनाश पाटील यांच्या शब्दात सांगायचे तर अंनिस एवढेच मोठे संघटन उभे राहील, असं हे दिर्घकालीन काम आहे. हे खरेच आहे. कायदा नसतांनाही प्रबोधनाने जातपंचायतीत अनेक सकारात्मक बदल घडत आहेत, हे आश्वासक आहे. कंजारभाट समाजातील तरुणांनी लग्नातील पंचाचा हस्तक्षेप टाळुन लग्न लावले. ही समाजातील अभूतपूर्व घटना आहे. अनेक जातपंचायतीनी आपल्यात बदल केला आहे. एवढे मात्र नक्की की, अंनिस मुळे पिडीत कुटुंबियांना न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे. ते मोठ्या हिम्मतीने समोर येत आहेत. आपण सर्व कार्यकर्ते संयमाने, चिकाटीने, लोकशाही मार्गाने व डॉ दाभोलकरांनी दाखवून दिलेल्या मार्गाने लढत राहू.

कृष्णा चांदगुडे, नाशिक