Categories
पर्दाफाश

राहुरीत भोंदूबाबाचा पर्दाफाश

जुलै - २०१२

बनावट ग्राहक पाठवून राहुरी तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दत्तनगर(राहुरी) येथील विजय बागूल या भोंदूबाबाचे स्टींग ऑपरेशन केले. मला काहीही चमत्कार येत नसून यापुढे लोकांना फसविणार नाही, असे लेखी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये बाबाकडून लिहून घेतले. तसेच अनेकांची फसवणूक केल्याची कबुली बाबाने दिली.

            विजय भीमराज बागूल(वय 39) हा मूळचा उक्कलगाव(ता.श्रीरामपूर) येथील रहिवाशी असून एक वर्षापासून दत्तनगरमध्ये जादूटोण्याच्या नावाखाली लोकांना फसवित असल्याची तक्रार अंनिसकडे आली होती. जुन्या वाड्यातील धन काढून देतो. भूत काढतो, जुने आजार बरे करतो, असा दावा करणार्‍या बागूलने माझ्या घरात देवाचे ठाणे आहे, असा दावा करून पैसे उकळण्याचे उद्योग सुरू होते. राहुरी तालुका अंनिसकडे तक्रार आल्यानंतर सय्यद निसार व अशोक तनपुरे या दोघांना बनावट ग्राहक म्हणून बागूलकडे पाठविण्यात आले. व्यवसाय चांगला चालेल या नावाखाली अशोक तनपुरे यांच्याकडून 350 रूपये बाबाने घेतले. त्यानंतर सय्यद निसार यांच्याकडे 500 रूपये अ‍ॅडव्हान्स घेत जुन्या वाड्यातील धन काढून देतो, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र वाघ, पोलीस जमादार मधुकर सुरवसे, बार्शीकर व अनिल कोळसे यांनी बाबावर झडप घालून ताब्यात घेतले. बाबाचा पळून जाण्याचा प्रयत्न असफल ठरला.

बाबाची बनवेगिरी
            अंनिसचे डॉ.नरेंद्र दाभोलकर हे माझे खास मित्र आहेत. आम्ही एका ताटात जेवलो आहोत, एका पत्रकार संघात मी काम केलेले आहे. अंनिसवाले मला टरकून असतात. पायाची व हाताची घडी घालून माझ्यासमोर बसून नका. मी डुप्लीकेट नसून ओरिजनल आहे, अशी भाषणबाजी करीत उदी देणार्‍या विजय बागूलला अंनिस कार्यकर्ते व पोलिसांनी खाक्या दाखविताच पोलीस स्टेशनला येण्याची तयारी दर्शविली.

            डॉ.मच्छिंद्र वाघ यांनी चमत्कार करून दाखव. आम्ही तुला 21 लाख रूपयांचे बक्षीस देऊ असे आव्हान केले. मात्र बाबाने अंनिस कार्यकर्त्यांपुढे लोटांगण घेत माफी मागितली. मला चमत्कार करता येत नाहीत. पोटासाठी मी लोकांना फसवित आलो. अनैतिकपणेही वागलो. यापुढे मी कुणालाही फसविणार नाही. कष्ट करून पोट भरील. 8 दिवसांनंतर राहुरी सोडून जाईन, असे लेखी दिले.

            मला गुप्तधन काढता येत नाही व लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतल्याची कबुलीही बागूल याने दिली. राहुरी पोलीस निरीक्षक अशोक रजपूत यांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांचे भोंदूगिरी उघडकीस आणल्याबद्दल अभिनंदन केले.

-अशोक तनपुरे, राहुरी