गेली 15 वर्षे महाराष्ट्रातील जनतेला शनी देवाची कवचकुंडल व डायरेक्ट ऑथोराईज्ड कनेक्शने जोडणारा भोंदू शिवाजी माळी अखेर अंनिसपुढे शरण आला. येडं-उपाळे(मायणी) येथे राहणारा व माजी सैनिक असलेला शिवाजी माळी हा स्वत:ला स्वयंघोषित दत्त अवतार मानत असे. दर गुरूवारी व रविवारी मोठा दरबार भरवून भक्तांच्या कौटुंबिक, आर्थिक, मानसिक समस्या पत्रिकेच्या सहाय्याने डायरेक्ट शनीदेवाला कॉन्टॅक्ट करून सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्याची त्याची खासीयत होती. बोलण्यामध्ये अतिशय चतूर असणारा या भोंदूबाबाने अनेक भक्तांना व त्यांच्या सर्व कुटुंबियांना आपल्या कवेत घेतले होते. कुटुंब प्रमुखाबरोबरच कुटुंबातील सर्व सदस्यही त्याची मनापासून देवा करत असत. महाराजांचा शब्द हा अंतिम मानून त्याप्रमाणे सर्व भक्तगण आचरकण करत. सातारा जिल्ह्यातील काही भगिनींचे संसार यामुळे उध्वस्त झाले. स्वत:च्या इज्जतीला घाबरून ही कुटुंबे तक्रारीस पुढे येत नव्हती. याबाबत अंनिसकडे फोनवरून तक्रार व आपली झालेली फसवणूक त्यांनी कथन केली. याची दखल घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पोतदार व सांगली जिल्ह्याचे कार्यकर्ते भास्कर सदाकळे स्वत:ची खोटी समस्या घेऊन भोंदूबाबाकडे गेले. यावर भोंदूबाबाने प्रशांतला ‘साडेसाती’ लागली असून व भास्करला ‘बाहेरची बाधा’ झाली आहे असे सांगून त्यावर दैवी उपायही सांगितले. यावरून हा लोकांची फसवणूक करत आहे हे लक्षात आले. यानंतर सातारा व सांगली अंनिस यांनी संयुक्त स्टींग ऑपरेशनद्वारे भोंदूबाबाला अंनिसच्या जाळ्यात घेतले व डायरेक्ट कडेगाव पोलीस स्टेशनला हजर करून कायद्याचा बडगा दाखवताच महाराजाने सपशेल शरणागती पत्करली.
आता मला माझ्या कृत्याचा पूर्णपणे पश्चात्ताप झाला असून यापुढे कोणत्याही प्रकारे देवाच्या नावावर दरबार भरवून लोकांची फसवणूक मी करणार नाही. आतापर्यंत मी जे करत होतो ते सर्व खोटे व लोकांची दिशाभूल करणारेच होते हे मला कळले आहे असे म्हणून स्वत:च्या हस्ताक्षरात माफीनामाच पोलीस स्टेशनमध्ये लिहून दिला.
या मोहिमेमध्ये सातारा अंनिसचे प्रशांत पोतदार, रोहित घाडगे, वसिम बागवान, शंकर कणसे, किशोर धरपडे, संतोष जाधव, इस्लामपूर अंनिसचे संजय बनसोडे, योगेश कुदळे, अवधूत कांबळे, भास्कर सदाकळे, अंकुश चव्हाण व युवक क्रांती दलाचे राजकुमार डोंबे, गणेश पिसे यांनी सहकार्य केले. कडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव जगदाळे व ए.एस.आय.तानाजी वंजारे व दिगंबर मुर्हे यांनी विशेष सहकार्य केले.
-अंकुश चव्हाण