Categories
कव्हर स्टोरी

झटपट यशाचा फसवा मार्ग

जुलै - २०१२

            जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या आजच्या जमान्यात आक्रमक मार्केटिंगला महत्व आहे. अन्नापासून आरोग्यापर्यंत, सण-उत्सवांपासून आर्थिक गुंतवणुकीपर्यंत, लोकांना ज्या ज्या गोष्टीत स्वारस्य असू शकतं, त्या सर्व ठिकाणी ही ‘बाजारू संस्कृती’ आली आहे. लोकांच्या भावनांना हात घालत आपल्या उत्पादनांना ‘जीवनमूल्या’चा दर्जा द्यायचा आणि जाहिरातबाजीद्वारे लोकांच्या मनाचा ताबा घ्यायचा. मनाचा ताबा घेतला की खिसा आलाच ताब्यात. यासाठीचं प्रभावी हत्यार म्हणजे अर्थातच प्रसारमाध्यमं. मग काय? स्काय शॉपद्वारे वस्तू विकल्या जातात, सत्संगाद्वारे अध्यात्म विकलं जातं, पडद्यावरच्या समृद्ध जगाद्वारे स्वप्नं विकली जातात, काहीच नाही तर चघळायला ब्रेकिंग न्यूज विकल्या जातात. आता एवढं सगळं लोकांनी विकत घ्यायचं म्हणजे पैसा हवा. मग त्यासाठी ‘लोन स्कीम्स’ किंवा ‘इन्व्हेस्टमेंट स्कीम्स’ येतात, झटपट पैसे मिळवण्याचे मार्ग सांगितले जातात. तरूणाईला अशा गोष्टींचं आकर्षण वाटलं नाही तरच नवल!

            बहुतेकांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायची महत्वाकांक्षा असते. पण हे ‘काहीतरी’ म्हणजे नेमकं काय हे मात्र स्पष्ट झालेलं नसतं. त्यात चंगळवादाला खतपाणी घालणारं जाहिरातींचं मोहजाल सभोवताली विणलं गेलेलं असतं. त्यामुळे चंगळवादी राहणीमान खुणावत असतं. त्यासाठी पैसा हवा असतो. सरळ मार्गानं तो मिळवायचा तर नोकरी किंवा व्यवसाय करणं आलं. नोकरी करायची तर ती आधी सहजपणे मिळायला पाहिजे, मिळाल्यानंतर टिकायला पाहिजे, त्यात पुढे प्रगती व्हायला पाहिजे, बदलत्या परिस्थितीनुसार येणारी नवी आव्हानं किंवा नवं तंत्रज्ञान यांच्याशी जुळवून घेता यायला पाहिजे. व्यवसाय करायचा तर भांडवल पाहिजे, मार्केटिंगचं आणि व्यवस्थापनाचं कौशल्य पाहिजे, जीवघेण्या तीव्र स्पर्धेला तोंड देत टिकून रहायची तयारी पाहिजे. हे सगळं कसं साधायचं हा प्रश्न अनेकांना पडतो, यामध्ये तरूण मुलं-मुली आले आणि त्यांचे चिंतातूर पालकही आले. म्हणजेच नव्या अर्थव्यवस्थेमुळे ग्राहकांचा हा एक खास आणि वेगळा वर्ग निर्माण झाला. अशा वर्गाची गरज पुरवणं ही एक नवी व्यवसाय संधी निर्माण झाली. आयुष्यात ‘काहीतरी चांगलं’ करायची इच्छा असणारे ग्राहक झाले आणि आपल्या ‘प्रॉडक्ट’द्वारे त्यांची ‘गरज भागवण्याचं आश्वासन देणारे’ उत्पादक झाले. अशा या अभिनव प्रॉडक्टचं नाव तरी काय? नाही ओळखलंत? झटपट यश! इन्स्टंट सक्सेस!!

            सध्या ‘झटपट यशस्वी व्हा’, ‘यश तुमच्या दारी’ अशीव भुरळ पाडणारी नावं असणारे कार्यक्रम, शिबिरं, क्लासेस आणि(पुस्तकंही!) यांचं पेव फुटलंय. का घडतंय असं? औद्योेगिकरण वाढलं अशा खाजगी क्षेत्रात नव्या नोकर्‍यांच्या किंवा सेवा क्षेत्रातल्या व्यवसायांच्या संधी वाढल्या. पण शिक्षण घेणार्‍या, पदवीधर होणार्‍या तरूण-तरूणींची संख्या त्यापेक्षा कितीतरी पटीनं वाढली. त्यामुळे जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. सतत निर्माण होणार्‍या आव्हानामुळे असुरक्षितताही वाढली. करिअरला नवी उंची देण्याच्या प्रयत्नात ‘टार्गेट’ आणि ‘डेडलाईन’ पुरी करण्याच्या नादात सरळ जगणं विसरायला व्हायला लागलं, प्रत्येक जण ‘यशस्वी प्रोफेशनल’ होण्याची इच्छा बाळगू लागला. या असुरक्षिततेच्या वातावरणाला ‘नशिबाचा खेळ’ मानणारे दैववादी लोक बुवाबाजीच्या मागे लागतात. (अलिकडच्या कुप्रसिद्ध निर्मलबाबाच्या दरबारातली बहुतांश गार्‍हाणी नोकरी व्यवसायातल्या यशासंबंधातच असतात) तर तितके भोळे नसणारे, काही प्रमाणात तरी प्रयत्नवादी असणारे पण गोंधळलेले लोक ‘झटपट यशा’च्या मागे लागताना दिसतात.

            काही तरूण-तरूणींना अनुभवानं आणि निरीक्षणानं हे लक्षात आलेलं असतं की, यशस्वी प्रोफेशनल होण्यासाठी संभाषणचातुर्य, शिष्टाचार(‘मॅनर्स’) अशी अनेक कौशल्यं आपल्याकडे नाहीत. अर्थात याचं कारण त्याची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी यासाठी अनुकूल नसते हे असतं. आई-वडिलांचं शिक्षण फारसं झालेलं नसतं, आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे वरच्या वर्गात मिसळता आलेलं नसतं, शाळेच्या दर्जामुळे किंवा शिकवणार्‍या शिक्षकांच्या मर्यादांमुळे योग्य मार्गदर्शन मिळालेलं नसतं, इत्यादी. यशस्वी होण्याच्या मार्गातले हे अडथळे कळले असले तरी आजच्या गतीमान जीवनात नवीन कौशल्यं आत्मसात करायला पुरेसा वेळ नसतो. अशा वेळी ‘झटपट यशस्वी होण्याची खात्री’ देणार्‍या कार्यक्रमांची भुरळ पडली नाही तरच नवल.

            दुसरा वर्ग असा असतो की, आई-वडिलांचं शिक्षण थोडं-फार तरी झालेलं असतं, त्यांच्यापैकी बहुधा दोघांना नोकरी-व्यवसाय असल्यामुळे आर्थिक स्थिती गरीब म्हणावी अशी नक्कीच नसते. पण आई-वडिलांच्यातच आयुष्यात शक्य तिथं ‘शॉर्टकट’ शोधायची मनोवृत्ती तयार झालेली असते. हा वर्ग उन्हाळ्यातल्या ‘सर्वगुणसंपन्न करणार्‍या(?) शिबिरांमध्ये मुलांना पाठवणारे नसेल कदाचित. पण मुलांवर स्वत: परिश्रम घ्यायची तयारी नसणारा, सोप्या विषयांसाठी क्लास लावून आपली जबाबदारी संपल्याची भावना बाळगणारा मात्र नक्की असतो. त्यांच्या लेखी संपत्ती, कार, बंगला, पाच-सहा आकडी पगार म्हणजे यश असतं. त्यामुळेच आपल्याला नाही जमलं तरी मुलांनी ‘यशस्वी’ व्हायला हवं, घरात सुबत्ता यायला हवी असा हव्यास धरणारी ही मंडळी असतात.

            हा झाला ‘यशस्वीपणा’ किंवा ‘यश’ या ‘प्रॉडक्ट’चा ग्राहकवर्ग. आता या ‘प्रॉडक्ट’च्या निर्मात्यांबद्दल-खरं तर विक्रेत्यांबद्दल-थोडंसं. मोठ्या उद्योगसमूहांमध्ये कर्मचार्‍यांची किंवा अधिकार्‍यांची गुणवत्ता वाढावी, त्यांनी प्रेरित होऊन समर्पितपणे काम करावं(आणि उत्पादन वाढवावं!) यासाठी शिबिरं आयोजित केली जातात. अशा शिबिरांमध्ये मार्गदर्शन करणार्‍या लोकांची गुणवत्ता(आणि अर्थातच त्यांचं ‘मार्केटिंग स्कील’) चांगली असते. मानसशास्त्र किंवा व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव असतो आणि ते चांगले वक्तेही असतात. ‘झटपट यश’वाल्यांच्या बाबतीत मात्र तसं असतंच असं नाही. त्यांच्यापैकी काहींचा शैक्षणिक दर्जा चांगला असतो, काहींना व्यवस्थापन क्षेत्रात शिकवण्याचा अनुभव असतो. पण ते स्वत: त्यांच्या क्षेत्रात, त्यांच्या अपेक्षेइतके यशस्वी झालेले नसतात, म्हणूनच तर यश मिळवण्यासाठीचा हा नवा झटपट मार्ग त्यांनी स्वीकारलेला असतो. या झटपट मार्गदर्शकांच्या गाठीशी शिक्षण आणि अनुभवाची शिदोरी असो किंवा नसो एक गोष्ट खरी की ते सगळेच ‘बोलबच्चन’ मात्र असतात. तो त्यांच्या मार्केटिंगचा एक अविभाज्य भाग असतो.

            सर्वसाधारणपणे ‘इन्स्टंट सक्सेस’च्या या वर्गांमध्ये विचारपद्धती, वर्तन आणि जीवनशैली यात बदल घडवून आणण्यावर भर दिला जातो. हे बदल कसे घडवून आणायला सांगितले जातात यावर त्या वर्गाचा दर्जा ठरतो. पर्यायांच्या अग्रक्रमानुसार वेळेचं नियोजन करणं, सकारात्मक विचार करणं, व्यक्तीमत्व खंबीर करणं, कोणत्याही गोष्टीचं आधी नियोजन किंवा आखणी करून मग अंमलबजावणी करणं, साधकबाधक विचार करून निर्णय घेणं, संवादकौशल्य विकसित करणं या महत्वाच्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन केलं जातं. यात अर्थातच काहीही गैर नाही. व्यक्तीमत्व विकास आणि तणावमुक्त जीवनासाठी त्या आवश्यकच आहेत. पण या बाबतीत मार्गदर्शनाला किती वेळ दिला जातो, या संकल्पना समोरच्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याची क्षमता बोलणार्‍या व्यक्तीकडे आहे का, विद्यार्थ्यांची आकलनाची पातळी किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी सारखीच आहे का, हे मुद्दे परिणामकारकतेच्या दृष्टीनं महत्वाचे ठरतात. शिवाय ही कौशल्यं संकल्पना म्हणून समजून घेणं आणि त्या सवयी म्हणून अंगी बाणवणं यात फार मोठा फरक आहे. जाहिरातीत आश्वासन दिल्याप्रमाणे अशा सवयी झटपट रूजत नाहीत.

            ही कौशल्यं झटपट आत्मसात व्हावीत म्हणून काही ठिकाणी जे उपाय सांगितले जातात, ते आक्षेपार्हच नव्हे तर अक्षरश: आचरट असतात. योगासनांनी स्मरणशक्ती सुधारते, प्राणायामामुळे आत्मविश्वास वाढतो, संमोहनामुळे व्यक्तीमत्व विकास होतो, सकाळी गायत्री मंत्र म्हटल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे बुद्धीमत्ता वाढते, सकाळी केलेल्या गणेश मंत्राच्या पाठामुळे दिवस ‘निर्विघ्न’ जातो, अशा दैवी आणि आध्यात्मिक ‘तत्वां’च्या आधारे ‘तज्ञ आणि अनुभवी’ व्यक्ती मार्गदर्शन करतात. यातल्या कोणत्याही गोष्टीला कसलाही पुरावा नाही. पण परंपरा आणि दैववाद भिनलेल्या आपल्या समाजात या गोष्टी सहजपणे स्वीकारल्या जातात. ‘अंनिवा’च्या सूज्ञ वाचकांना या गोष्टींतला फोलपणा उकलून दाखवायची गरज नसावी.

“डावा मेंदू – उजवा मेंदू”

            मेंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजू वेगवेगळ्या विचार प्रकारांवर नियंत्रण ठेवतात अशी एक कल्पना लोकप्रिय आहे.  त्यानुसार डाव्या मेंदूचं वर्चस्व असणारे लोक अधिक तर्कशुद्ध, चिकित्सक आणि वस्तूनिष्ठ असतात, तर उजव्या मेंदूचं वर्चस्व असणारे लोक अधिक सर्जनशील, कलासक्त आणि भावनाप्रधान असतात. पण अनेक मानसशास्त्रीय मिथकांप्रमाणेच इथंही मूळ माहिती विपर्यस्त आणि अतिशयोक्त होऊन पराचा कावळा झाला आहे.

            1981 चं वैद्यकशास्त्रातलं नोबेल मिळवणारे रॉजर स्पेरी यांना अपस्माराचे(फेफरे) परिणाम अभ्यासताना असं लक्षात आलं की, मेंदूचे डावा आणि उजवा हे दोन भाग जोडणारा ‘कॉर्पस कॉलेसम’ हा भाग कापला तर झटके येणं बंद होतं किंवा त्यांचं प्रमाण कमी होतं. पण मग अशा दुभागलेल्या मेंदूच्या रूग्णांमध्ये इतर काही लक्षणं उद्भवतात. उदाहरणार्थ, मेंदूच्या उजव्या बाजूनं प्रक्रिया केलेल्या वस्तूंची नावं अशा रूग्णांना घेता येत नसत, पण डाव्या बाजूनं प्रक्रिया केलेल्या वस्तूंची नावं मात्र घेता येत असत. या माहितीआधारे स्पेरीनी असं सुचवलं की, भाषेचं नियंत्रण मेंदूचा डावा भाग करत असावा.

            नंतरच्या संशोधनानं मात्र मेंदू असा ‘दुभंगलेला’ नसल्याचं दाखवून दिलं. गणितासारख्या क्षमता तर मेंदूचे दोन्ही भाग एकत्रपणे काम करत असतात तेव्हाच विकसित  होतात. कला, भाषा, गणित यांची आवड किंवा नावड हा संस्कारक्षम वयातल्या भौतिक कारणांचा आणि परिस्थितीचा परिपाक असतो. कोणतीही कौशल्यं विकसित करायची तर त्यासाठी त्यांच्या सरावाची(प्रॅक्टिस) गरज असते. मोठ्या वयात कौशल्यं आत्मसात करायला जास्त सरावाची गरज भासते.

            काही ‘व्यक्तीमत्व विकासातून यशाकडे’ वर्गांमध्ये संमोहनाद्वारे किंवा ‘योगा’द्वारे मेंदूतील सुप्त क्षमता जागृत करून यशस्वी होण्याची ‘ट्रिक’ शिकवली जाते.(मेंदूतील जादुई शक्तीबाबत याच अंकात स्वतंत्र लेख आहे) डाव्या आणि उजव्या मेंदूचं सुंतलन साधून ‘मनशक्ती’ विकसित करण्याचं ‘प्रशिक्षण’ काही ठिकाणी दिलं जातं. (पहा चौकट : ‘डावा मेंदू-उजवा मेंदू) या शिवाय “यश हे मनात असतं, ती आपणच आपल्याला देतो अशी भेट आहे, तो विचार करण्याचा मार्ग आहे.” अशा हवेतल्या गोष्टी करत लोकांना गोंधळून टाकणारे वर्ग भारतातच नव्हे तर प्रगत देशांमध्येही चालतात. “यशस्वी होण्याचा इरादा असणं, यशस्वी होण्याचा निश्चय करणं, यशस्वी झाल्याची कल्पना करणं, यशाशी निगडित भावनांवर लक्ष केंद्रीत करणं आणि या भावना स्वत:च्या शरीरात आणि आयुष्यात भिनवणं” अशा पाच कलमी ‘मनोविकास’ कार्यक्रमानं यशाप्राप्ती होते(की वेड लागतं?) असा त्यांचा दावा असतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रकाशात मेंदूविषयीचे असले दावे भ्रामक असल्याचंच सिद्ध झालं आहे. विज्ञानाविषयी आकर्षण असणार्‍या लोकांना अशा गोष्टींनी भुलायला होतं. परिणाम अर्थातच शून्य!

            याच्या जोडीला बर्‍याच ठिकाणी मुलाखतीची (इंटरव्ह्यू) तयारी कशी करावी, कोणत्या वेळी कोणते कपडे घालावेत. वरिष्ठांवर ‘इंप्रेशन’ कसं मारावं, देहबोली म्हणजे काय, याही गोष्टी शिकवल्या जातात. काही ठिकाणी इंग्रजी संभाषणावर भर दिला जातो. या गोष्टी शिकणं तुलनेनं जास्त सोपं असतं. यामुळे माणूस ‘स्ट्रीट स्मार्ट’ होऊ शकतो, पण वर सांगितलेली कौशल्यं आत्मसात केली(आणि ते झटपट जमणं कठीणच!) तर आणि तरच तो नोकरी-व्यवसायात तगू शकतो. तगला तर पैसे कमावू शकतो आणि पैसे कमावणं हेच यश मानलं तर त्या अर्थानं यशस्वीही होऊ शकतो.

            पण यश म्हणजे केवळ पैसा कमावणं का? तसं असेल तर प्रत्येक श्रीमंत माणूस सुखी-समाधानी-आनंदी असायला हवा होता. पण भरपूर पैसा मिळवणारे बरेच लोक सतत त्रासलेले, तणावग्रस्त, दयनीय का दिसतात? पैशामुळे मानसन्मान मिळताना दिसतो पण समाधान आणि मन:शांती मिळते का? नसेल तर मग ती कशामुळे मिळते? स्वत:च्या मनाला आनंद होईल असं काम आपण केलं तर त्यात यश मिळणं सोपं जातं. (मुलांचा ‘अ‍ॅप्टिट्यूड’ म्हणजे नैसर्गिक कल तपासण्याचा सल्ला म्हणून दिला जातो) यश मिळालं की नाव होतं आणि पैसाही मिळतो. पण पैशाच्या मागे लागलं तर जगण्यातला आनंद मात्र नाहीसा होतो. समाजाच्या दृष्टीनं यशस्वी असणं, म्हणजे धनसंपन्न, प्रतिष्ठित किंवा प्रसिद्ध असणं. समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासारखी गोष्ट पैशामुळे जितक्या सहजपणे मिळताना दिसते(अर्थात सरळ मार्गानं प्रतिष्ठा मिळण्याइतका पैसा मिळवणं कठीणच!) तशी साहित्य, संगीत, कला, खेळ किंवा इतर सामाजिक क्षेत्रात सहजपणे मिळू शकत नाही. त्यासाठी योग्य दिशेनं अथक परिश्रम करावे लागतात, भरीव कामगिरी करावी लागते. आपल्या आजूबाजूचे विविध क्षेत्रातले यशस्वी ‘आयकॉन्स’ पाहिले तर असं लक्षात येतं की त्यांनी दोन महत्वाच्या गोष्टी आवर्जून केलेल्या असतात. एक म्हणजे आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेणं(आणि काही वेळा संधी नसेल तर ती निर्माण करणं). या गोष्टींवर अर्थातच आपलं नियंत्रण नसतं, पण प्रयत्न निश्चित करता येतात. दुसरं म्हणजे स्वत:तल्या सगळ्यात चांगल्या गुणांचा, जे सर्वोत्तम त्याचा, अविष्कार होऊ देणं, ते प्रकट करणं. हीही गोष्ट सहजसाध्य नसली तरी कष्टसाध्य नक्कीच असते. निव्वळ तेवढं केलं तरी कलाकरांना किंवा खेळाडूंना रसिकांची दाद मिळते, सामाजिक कार्यकर्त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळतो, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी संबंधितांकडून प्रशंसा होते, कुठल्याही व्यक्तीला कुटुंबातल्या लोकांचा विश्वास आणि प्रेम मिळतं, आणि हेच खरं यश! खरं यश म्हणजे चिरस्थायी समाधान! एखादा पुरस्कार, एखादा सत्कार, एखादं इन्क्रिमेंट याला यश मानून चालणार नाही. कारण यश म्हणजे एकमेव शिखर नव्हे, ध्येयाच्या एका टप्प्यावर पोचल्यावर पुढे आणखी उत्तुंग शिखरं दिसत असतात. तो एक प्रवास असतो आणि त्यात आनंद शोधायचा असतो. म्हणूनच अपयश असं काही नसतंच, तर तोही एक टप्पा असतो, अनुभव असतो-पुढे जाण्यासाठी! यशानं पात्रता ठरत नसते तर पात्रतेनं यश ठरत असतं. तेव्हा झटपट यश ही स्वत:चीच फसवणूक आहे.

मेंदूची क्षमता

            अनेक तथाकथित संमोहनतज्ञ संमोहनाच्या द्वारे आपल्या मेंदूतील सुप्त क्षमता जागृत करण्याचे दावे करत असतात. आपण आपला मेंदू पूर्ण क्षमतेनं वापरत नसतो, पण योगसाधनेच्या सहाय्यानं आपण आपल्या जाणीवांच्या कक्षा रूंदावू शकतो, अंतर्ज्ञानासारख्या सिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो असं सांगणारे अध्यात्ममार्गीही असतात. शास्त्रज्ञांना मेंदूचं गूढ अजूनही पुरतं उकललेलं नाही, तरीही काही ‘वैज्ञानिक’ मार्गांनी आपण आपली ‘मनशक्ती’ पूर्णपणे विकसित करू शकतो, असा आग्रही प्रचार करणारेही असतात. आपल्याकडेच नव्हे तर प्रगत देशांतही असे प्रकार चालतात. ‘मनाच्या जादुई शक्ती’चा शोध घेऊन ती मुक्त कशी करायची आणि तिच्या आधारे यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करायची असल्या जाहिराती करणारे धार्मिक किंवा भ्रामक वैज्ञानिक पंथ तिकडेही कमी नाहीत. शिवाय ‘डेटाबेस सॉफ्टवेअर’, डिजीटल टीव्ही, एअरलाईन्स यांच्या जाहिरातीतही या ‘छुप्या शक्ती’चा उल्लेख केला जातो. लोकप्रियतेच्या मागे लागणारी प्रसारमाध्यमं असल्या दाव्यांचा खुलेआम प्रसार करतात. सामान्य माणूस या आग्रही प्रचारानं भुलून जातो किंवा गोंधळतो. आपण आपल्या मेंदूच्या मूळ क्षमतेच्या फक्त 10% क्षमता वापरतो ही गोष्ट धादांत खोटी आहे.

भ्रमाचा उद्भव : ‘आपण आपल्या मेंदूचा फार थोडा भाग वापरतो’ या समजाची सुरवात नेमकी कधी झाली ते सांगता येत नाही. बुद्धी, विचार, स्मृती, भावना, कल्पना, वासना आणि पाच ज्ञानेंद्रियांद्वारे होणार्‍या जाणीवा यांचा मेंदूशी असलेला संबंध चौदा-पंधराव्या शतकापर्यंत जगातल्या कोणत्याही संस्कृतीत माहीत नव्हता. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळात युरोपमध्ये मेंदूच्या कार्यासंबंधी एक वादविवाद सुरू होता, त्यातून मेंदूतील सुप्त शक्तीचा समज बळावला असण्याची शक्यता आहे. मेंदूची वेगवेगळी कार्ये ही त्याच्या वेगवेगळ्या भागांशी निगडित असतात असं एका पक्षाचं मत होतं, तर मेंदू समग्रपणे सगळी कार्ये करतो असा दुसर्‍या पक्षाचा दावा होता. कवटीची रचना, आकार, तिच्यावरील उंचवटे यावरून माणसाचं वर्तन आणि गुणधर्म यांचं अनुमान काढता येतं अशी एक कल्पना त्या काळात चर्चेत होती. फॅन्झ जोसेफ गॉल आणि जोहान स्पर्झियम यांनी ही कल्पना ‘फ्रिनॉलॉजी’ या नावानं विकसित केली होती. मात्र सगळ्यांनाच ही कल्पना मान्य नव्हती. मारी-जीन-पियर फ्लॉरेन्स हा भूलशास्त्राचा प्रवर्तक संशोधक या कल्पनेच्या विरूद्ध होता. मोठा मेंदू, छोटा मेंदू, आणि मेंदूपुच्छ यांची कार्यं वेगवेगळी असली तरी मेंदूचे हे सगळे भाग एकत्रपणे (equipotential : सारख्या शक्तीनं) काम करतात असं त्याचं म्हणणं होतं. ससे आणि कबुतरांच्या मेंदूचे विविध भाग कापण्याचे प्रयोग करून त्यानं असं दाखवून दिलं की, मेंदूचा जितका जास्त भाग कापला जातो तितकी त्यांच्या वर्तनातली कमतरता वाढते एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गुस्ताव फ्रित्श, एडवर्ड हिटझिग, पॉल ब्रोका आणि कार्ल वेर्निके यांच्या संशोधनामुळे हा सिद्धांत खोडून काढण्याएवढा सबळ पुरावा मिळाला. तरीही विसाव्या शतकाच्या सुरवातीला कार्ल स्पेन्सर लॅशले सारखे काही शास्त्रज्ञ मेंदू समग्रपणे काम करतो याच कल्पनेचा पुरस्कार करत राहिले. लॅशलेनं उंदरांवर केलेल्या प्रयोगांत त्याला असं आढळलं की, जोपर्यंत मोठा मेंदू एका ठराविक प्रमाणात शिल्लक आहे, तोपर्यंत घेतलेल्या चाचण्यांत उंदीर नेहमीसारखेच वागत. अर्थात या प्रयोगांच्या मर्यादा उघड होत्या. पण अशा माहितीची अतिशयोक्ती आणि सुलभीकरण यातून ‘मेंदूचा थोडाच भाग वापरला जातो’ अशा समजाचं एक कारण मानलं जातं.

            हार्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स आणि बोरिस साइडिस यांनी 1890 मध्ये ‘राखीव उर्जे’चा सिद्धान्त मांडला. त्याच्या समर्थनासाठी त्यांनी विल्यम साइडिस या मुलाला असं काही वाढवलं की त्याचा बुद्ध्यांक अठराव्या वर्षी 250 हून जास्त झाला. आपण आपल्या मानसिक शक्तीपैकी फारच थोडा भाग वापरतो असं या उदाहरणावरून विल्यम जेम्स यांनी सांगितलं. 1936 मध्ये डेल कार्नेजी यांचं ‘हाऊ टू विन फ्रेन्डस अ‍ॅन्ड इन्फ्लुएन्स पीपल’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याच्या प्रस्तावनेत अमेरिकन लेखक लॉवेल थॉमस यांनी जेम्सच्या दाव्याला 10% अशी टक्केवारी चिकटवून टाकली. मेंदूच्या ‘छुप्या शक्ती’ बद्दलचे गैरसमज पसरण्याचं हेही एक कारण सांगितलं जातं.

            अशा प्रवादांवर सामान्य माणसाचा चटकन विश्वास बसतो याची कारणं दोन. एक म्हणजे आल्बर्ट आईन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञानं ‘मेंदूच्या मर्यादित वापराचं’ केलेलं तथाकथित समर्थन. त्यामुळे आपल्या मेंदूचा पूर्णपणे वापर केला तर आपणही आईन्स्टाईन बनू ही खुळी आशा. दुसरं कारण म्हणजे बौद्धिकदृष्ट्या आपण कुठं तरी कमी पडतोय, असं अनेकांना अनेक वेळा वाटत असतं. अशा वेळी मेंदूच्या ‘अप्राप्त सुप्त क्षमते’ची पळवाट समाधान देते. सुरवात कशीही झाली असो, पण “आपण आपल्या मेंदूच्या एकूण क्षमतेच्या अवघी 10% क्षमता वापरतो” ही कल्पना लोकप्रिय माध्यमांनी अनेक वर्षं उचलून धरली आहे. आपली उत्पादनं खपवण्यासाठी जाहिरातींमध्येही तिचा वापर केला जातो. “मेंदूतील सुप्त क्षमता मुक्त करून, न वापरलेली मन:शक्ती वापरून जीवन समृद्ध करण्याच्या” आश्वासनाला लोक भुलतातही.

सत्याचा मागोवा : “मेंदूची अवघी 10% क्षमता वापरतो” याचा अर्थ काय? कोणत्याही वेळेला मेंदूतील फक्त 10% चेतापेशी कार्यरत असतात? एका वेळी फक्त 10% चेतापेशी  विद्युत संदेश(action potential : क्रिया विभव) पाठवत असतात? समजा हे खरं असतं तरीही चेतापेशी फक्त संदेश देण्याचं काम करत नाहीत. इतर चेतापेशींकडून त्यांच्यावर संदेशांचा भडीमार होत असतो. त्यातून चेतासंपर्कोत्तर विद्युत विभव(post-synaptic action potential) तयार होत असतं, त्यामुळे त्यांनी संदेश पाठवले नाहीत तरीही त्या सक्रीय असतातच. जर मेंदूतील सर्वच चेतापेशी एकाच वेळी क्रिया विभव निर्माण करत असत्या तर त्यातून बिघाड व्हायची शक्यता खूप वाढली असती. खरं तर GABA सारखे काही चेताप्रसारक (neurotransmitter) चेतापेशींची सक्रियता (पर्यायानं क्रियाविभव तयार होण्याची शक्यता) कमी करण्याचं काम करतात. तसं झालं नाही तर मोठ्या मेंदूतील चेतापेशींचं मोठ्या प्रमाणावर उद्दीपन होऊ शकतं आणि अपस्माराचा झटका येऊ शकतो. चेतापेशींच्या सक्रीयतेचं नियमन हे मेंदूचं नेहमीचं आणि महत्वाचं कार्य आहे. सोप्या शब्दात बोलायचं तर मेंदूतील काही भाग इतर भागांना शांत ठेवण्याचं काम करतात.

            माणसाच्या मेंदूत सुमारे शंभर अब्ज चेतापेशी असल्या तरी मेंदूत फक्त तेवढ्याच पेशी नसतात. चेतापेशींच्या दहा ते पन्नास पट आधार पेशी(glial cells) असतात. मेंदूच्या रचनेला आधार पुरवणं, अक्षतंतूचं रोधक आच्छादन म्हणून काम करणं, चेतापेशींभोवतीचा पेशीय कचरा साफ करणं आणि पेशीबाह्य जागेतील रासायनिक घटक प्रमाणाचं नियमन करणं, ही त्यांची कामं असतात. या पेशी सक्रीय नसतील तर मेंदूचं काम व्यवस्थित चालणं अशक्य होईल.

            माणसाच्या मेंदूचं सरासरी वजन 1400 ग्रॅम आहे, त्यातला 90% काढून टाकला तर शिल्लक उरेल 140 ग्रॅम मेंदू. हा आकार झाला मेंढीच्या मेंदूएवढा! मेंदूमधील रक्तस्त्रावामुळे किंवा काही भागाला रक्त पुरवठा न झाल्यामुळे थोड्या भागाला जरी हानी पोचली तरी त्याचे गंभीर परिणाम होतात. कंपवातासारख्या(Parkinson`s diesease) चेतासंस्थेच्या आजारांमध्ये मेंदूच्या विशिष्ट भागावर परिणाम झालेला असतो. मेंदूच्या कोणत्याही विशिष्ट भागाला खूप कमी प्रमाणात इजा झाली तरी त्यातून विकलांगता उद्भवू शकते. मेंदूचे काही छोटे पण महत्वाचे भाग काढून टाकले तर त्याचे गंभीर परिणाम होतात. म्हणूनच अपस्मार किंवा मेंदूचा ट्यूमर यांवरील उपचारात, मेंदूचा संबंधित भाग काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मेंदूचं काळजीपूर्वक ‘मॅपिंग’ करावं लागतं. तेव्हा मेंदूतील सर्वच पेशी सक्रीय नसतील तर आपल्या क्षमता टिकून रहाणं अशक्य आहे.

            मेंदूच्या प्रतिमा घेण्याच्या पद्धतींमुळे (brain imaging) 10% मेंदू वापराचा समज पूर्णपणे खोटा असल्याचं सिद्ध होतं. मेंदूचा पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी स्कॅन(PET scan) केला तर असं लक्षात येतं की, अनेक वेगवेगळी कामं करताना मेंदूचा बराचसा भाग सक्रीय असतो. जे भाग कमी सक्रीय असतात ते स्कॅनच्या तुलनात्मक आलेखात निष्क्रिय असल्याचं वाटू शकतं. पण एखाद्या मोठ्या उपहारग्रहाच्या स्वयंपाकघरात आपण डोकवायचं ठरवलं, तर ती वेळ ब्रेकफास्टची आहे, जेवणाची आहे की, दुपारच्या चहाची आहे, उपहारगृहात त्यावेळी किती गर्दी आहे, यानुसार तिथले वेगवेगळे कर्मचारी वेगवेगळी कामं कमी अधिक वेगानं करताना दिसतील, तसंच हे! अगदी आपल्या झोपेतसुद्धा मेंदू सक्रीय असतो, हे या ‘इमेजिंग’ तंत्रज्ञानामुळे लक्षात आलं आहे.

            मेंदूच्या कार्याविषयी संशोधन करताना मेंदूमध्ये एक छोटासा इलेक्ट्रोड सरकवून फक्त एका चेतापेशीची सक्रीयता तपासू शकणारं तंत्रज्ञान(single-unit recording) उपलब्ध आहे. जर बहुतांश पेशी निष्क्रिय रहात असत्या तर या तंत्रज्ञानाद्वारे ते सहजपणे कळू शकलं असतं.

            उत्क्रांतीवादातील ‘नैसर्गिक निवडी’च्या तत्वाचा विचार केला तर कोणतीही निरूपयोगी गोष्ट टिकून रहात नाही. आपल्या शरीराच्या वजनाच्या प्रमाणात आपल्या मेंदूचं वजन 2% असलं तरी शरीराला लागणार्‍या उर्जेच्या 20% ऊर्जा मेंदू त्याच्या कामासाठी वापरतो. मेंदूला ऑक्सिजन आणि पोषणद्रव्यांची असलेली आवश्यकता पाहिली तर शरीराच्या दृष्टीनं तो तसा ‘महागडा’ अवयव आहे. त्यामुळे 90% निरूपयोगी रहाणारा मेंदू उत्क्रांतीच्या प्रक्रियेत टिकण्याची, तगण्याची शक्यताच राहिली नसती.

            शारीरिक विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तरीही 10% मेंदू वापराचं विधान चुकीचं ठरतं, कारण चेतासंस्थेच्या बाबतीत ‘वापरा नाही तर गमवा’ अशी स्थिती असते. मेंदूच्या पेशी वापरल्या गेल्या नाहीत तर त्यांचा र्‍हास होतो. जर बहुतांशी मेंदू वापरला जात नसता तर शवतपासणीत मेंदू मोठ्या प्रमाणावर नाहीसा झालेला दिसला असता. गर्भविकासाच्या काळात मेंदूमध्ये अनेक चेतासंधी(synapse) तयार होतात. जन्मानंतर विकासाच्या पुढच्या टप्प्यात काही चेतासंधी नाहीसे होतात आणि नव्या जोडण्या तयार होतात. चेतासंधींच्या विकास आणि निरासाची ही प्रक्रिया चेतासंस्थेच्या जोडण्यांचं ‘फाईन-ट्युनिंग’ होईपर्यंत दीर्घकाळ चालू रहाते. चेतासंधी सुस्थितीत रहाण्यासाठी योग्य ‘इनपुट’ची आवश्यकता असते. एखाद्या विशिष्ट चेताव्यवस्थेचा ‘इनपुट’ वगळला तर ती व्यवस्था नीट काम करू शकत नाही. 1981 चं वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ डेव्हिड ह्युबल आणि टॉर्स्टेन वीसल यांनी ‘दिसण्याच्या क्रिये’बाबत संशोधन केलं आहे. सुरवातीच्या विकासाच्या काळात ‘दृश्य भाहिती’ वगळली गेली तर पूर्ण अंधत्व येऊ शकतं असं त्यांनी दाखवून दिलंय. तेव्हा असं म्हणणं सयुक्तिक ठरावं की, 90 मेंदूचा वापर झाला नसता तर अनेक चेतामार्ग नष्ट झाले असते.

            दुखापतीनंतर बरं होण्याची आणि परिस्थितीशी जमवून घेण्याची क्षमता मेंदूमध्ये असते हे खरंच आहे. मेंदूला इजा झाल्यानंतर उरलेल्या चेतापेशी काही वेळा कामाचं अतिरिक्त ओझं पेलून वेळ निभावून नेताना दिसतात. याचा अर्थ दुखापत झालेल्या पेशींना काम नव्हतं असा नसून मेंदूतील पेशींची पुनर्गठित होण्याची आणि जोडण्या बदलण्याची क्षमता त्यातून कळते. तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की, मेंदूमध्ये कोणताही छुपा असा शक्तीचा साठा नसतो. आपण आपला सगळाच मेंदू वापरत असतो.

–डॉ.आशुतोष मुळ्ये