मुंडेसारख्या अनेक डॉक्टरांनी, मुलगाच हवा मुलगी नको या मानसिकतेचा फायदा उठवत अनेक कुटुंबातील वंशवेली खुडून टाकण्याचे दुष्कृत्य केले. गर्भातील स्त्रीभ्रूण नष्ट करण्यासाठी या दुष्टांनी गडगंज रक्कम घेतल्या. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या दहा वर्षांत साडेचार लाख कळ्या गर्भातच खुडल्या गेल्या. पुरोगामी समजल्या जाणार्या महाराष्ट्रात स्त्री-पुरूष समानतेचा ढोल वाजवला जात असताना समोर आलेले हे वास्तव भयाण तर आहेच पण भविष्यात येऊ घातलेल्या संकटाची ही चाहूल आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य खात्याच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात 4 लाख 68 हजार 680 मुली गर्भातच मारून टाकण्यात आल्या. शून्य ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचे लिंग गुणोत्तर प्रमाण 952 असायला हवे. हे प्रमाण 2011 च्या जनगणनेत 883 वर आले आहे. बीड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, जळगाव, अहमदनगर, उस्मानाबाद या भागात स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण सर्वाधिक आढळले आहे.
भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ अशी शेखी मिरवणार्या समाजात स्त्रियांचा हा विच्छेद होतोच कसा? जननी व जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ मानणार्या संस्कृतीत ही विकृती आलीच कशी? मुलींना जन्माला घालणे समाजाला का नकोसं झालंय?
जयवंत दळवींच्या ‘गुंतता हृदय हे’ या नाटकातील भाविणीच्या तोंडी एक अस्वस्थ करणारा उद्गार आहे. ‘कसं आहे आमचं जिणं? जो पेजेला देईल तो शेजेला घेईल.’ देवदासी, मुरळ्या व हतबल अवस्थेत बनविल्या गेलेल्या वेश्या अशा ‘जोगिणी’ स्त्री वर्गाचे आजपर्यंत शोषण झाले. अशा स्त्रियांचे जिणे सुसह्य व्हावे म्हणून चळवळी उभ्या राहिल्या. त्याला यशही येऊ लागलं. देवदासी प्रथा कमी होऊ लागली. त्यांच्या पुनर्वसनाचा कायदाही झाला.
स्त्रियांकडे पहाण्याचा आणखी एक दृष्टिकोन आहे. त्या ‘भोगिणी’ म्हणजे भोगवस्तू आहेत. याबाबतही सुजाण स्त्री-पुरूषांनी प्रबोधन मोहीमा राबविल्या. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे आदी सुधारकांनी स्त्री-पुरूष समतेचा पुकारा केला. कृतिशीलता राबविली. परिणामी स्त्रिया शिकू लागल्या. त्या निर्भय होऊ लागल्या. पुरूषाच्या बरोबरीने समाजकारणात व राजकारणात वावरू लागल्या.
असं असताना स्त्रीभ्रूण हत्या का घडावी? समाजाला कुटुंबात स्त्री जन्माला येणं संकट का वाटावं? स्त्री हे परक्याचं. धन म्हणून? की हुंडा देऊन तिचा विवाह करणं अवघड झालंय म्हणून? मुलगा मोठा झाल्यावर आपला सांभाळ करेल पण मुलगी हे ओझे होईल असं लोकांना वाटतंय म्हणून? कारणे काहीही असोत पण स्त्रीभ्रूण हत्या करून समाज मन संवेदनाहीन झालंय हे वास्तव भयाण आहे.
काही संकटे व्यक्तीगत स्वरूपाची पण काही अशी असतात की, त्यांचा परिणाम सर्व समाजावर होत असतो. स्त्रीभ्रूण हत्या हे असेच संकट आहे. भविष्यकाळात स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तर असेच बदलत गेले व स्त्रियांची संख्या कमी होत गेली तर त्याचे काय विपरित परिणाम होतील हे कळायला बुद्धीला फार ताण देण्याचे कारण नाही. स्त्रीभ्रूण हत्येचे संकट टाळायचं असेल तर संवेदनाहीन समाजाला जाग आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू व्हायला हवेत. त्यासाठी स्त्री-भ्रूण हत्येत वाटेकरी होणार्या सर्वांना कायद्याचा वचक बसेल असे कडक कायदे व्हायला हवेत. कळ्या खुडणार्या डॉक्टरांना जरब असेल अशा शिक्षेची तरतूद व्हायला हवी. या दृष्टीने प्रयत्न करणार्या व्यक्ती व संघटनांना आपण साथ द्यायला हवी. खासदार सुप्रिया सुळे व त्यांच्या विचाराच्या इतर भगिनी यांनी स्त्रियांना वाघिणी बनण्यासाठी हाक दिलीय. नको जोगिणी, नको भोगिनी, होऊया वाघिणी या त्यांच्या हाकेला यश मिळेल व कळ्यांचे गर्भातच खुडणे याला लगाम बसेल अशी आशा बाळगू या!