वंश, धर्म आणि जात यांची बंधने किती चिवट असतात! जपानमध्ये घडलेली एक घटना आठवते. एका बाईंना गंभीर आजार बरा होण्यासाठी रक्ताची गरज होती. डॉक्टरांनी तसा सल्लाही दिला होता. पण बाईंनी दुसर्या व्यक्तीचे रक्त स्वीकारण्यास नकार दिला; कारण ते तिच्या धर्माविरूद्ध वर्तन झाले असते. अखेर बाईंना जीव गमवावा लागला. प्रख्यात गणिती रामानुजन यांना क्षय झाला असताना वैद्यकीय सल्ला न मानता त्याने मांसाहाराला नकार दिला. परिणाम मृत्यू. ही कसली श्रद्धा? पण- याच्या उलटही काही सुखद अनुभव येतात. जातीच्या पलिकडे जाऊन माणुसकीचा धर्म उफाळून आला एका बहिणीचे(ब्राह्मण) प्राण भावाने(मराठा) वाचविले. रक्तदानाची कल्पना तितकीशी रूजली नव्हती त्या काळात. 1972 मध्ये घडलेली ही घटना वाचकांना जाती अंताच्या दिशेने घेऊन जाणारी ठरावी. -संपादक


गोपाळ श्रीधर कुलकर्णी. आय.टी.आय.कराड येथे निदेशक म्हणून कार्यरत होते. त्याच्या कुटुंबातील ही घटना त्यांच्याच शब्दात….
सप्टेंबर 1972. सकाळी 7 वाजता कामावर हजर झालो. 11.30 वाजता घरून फोन आला.- मंडळी सिरियस आहेत. वरिष्ठाची परवानगी घेऊन 4 किलोमीटर अंतर सायकलवरून भरभर कापले व घरी पोचलो. सौभाग्यवती निपचित पडलेली. तीन मुले घाबरून कोपर्यात बसलेली. सौ ला कसेबसे टांग्यात बसविले व कराडमधील दातारांचा दवाखाना गाठला. डॉक्टरनी बाहेर येऊन टांग्यातच सौ ला तपासले व घरी येऊन जाण्यास सांगितले. सर्व आटोपले असे वाटले. परत फिरावे तर टांगेवाल्याने थेट कॉटेज हॉस्पिटल गाठले. स्ट्रेचरमधून सौ.ला आत नेतानाच डॉ.ताठे ऑपरेशन आटोपून बाहेर येत होते. त्यांनी सौ.ला लगेच तपासले आणि ऑपरेशन रूममध्ये नेले. लगेत रक्त मिळाले तर पुढील उपचार करता येतील असे ते म्हणाले.
आय.टी.आय.मध्ये फोन लावला व कोणी विद्यार्थी रक्तदान करण्यास येईल काय यासाठी अरविंद भोसलेंना निरोप दिला. भोसले हे माझे सहकारी निदेशक होते. ते स्वत:च ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोचले व स्वत:च रक्तदानास तयार झाले. भोसले नामक मराठ्याचे रक्त कुलकर्णी नामक ब्राह्मण ताईच्या शरीरात मिळाले. रक्ताला जात नसते हेच खरे ना? कुलकर्णी ताईंनी उपचाराला प्रतिसाद दिला. त्या मृत्यूवर मात करून बर्या झाल्या.
अरविंद भोसले व निर्मला कुलकर्णी बहीण भाऊ झाले. त्यांचे हे रक्ताचे नाते आजही टिकून आहे. परस्स्परांना जपणे, सुखदु:खात सामील होणे हेच खरे नाते. कृत्रिम जातीच्या भिंती माणुसकीने गळून पडल्या.
वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रभावाचा कुलकर्णी सरांना आलेला हा दुसरा अनुभव त्यांच्याच शब्दात-
“पत्नीच्या आजारामुळे झालेल्या श्रमातून व कष्टामुळे मी आजारी पडलो. मला क्षय झाल्याचे निदान झाले. डॉक्टरनी धीर दिला. औषधे व आहार व्यवस्थित घ्या असा सल्ला दिला. क्षय हा संसर्गजन्य रोग. मुलांना जवळ घेणे टाळायला हवे. मनाची कुतरओढ सुरू झाली. पण डॉक्टरांनी मुलांना प्रतिबंधात्मक इंजेक्शन दिली व घाबरण्याचे कारण नाही असा धीर दिला. अरविंद भोसले काका रोज येत, मुलांना गोष्टी सांगत, हसवत. मी आहारात अंडी व प्रोटीन्स घेऊ लागलो. मी वर्षभरात पूर्ण बरा झालो. आज माझे वय 79 वर्षांचे आहे. पत्नीही हयात आहे. मुलगी डॉक्टर आहे. दोन्ही मुले उद्योजक आहेत. धाकटा मारूती इलेक्ट्रीकल डिप्लोमा होऊन नाशिक येथे कॅपॅसिटर बनवतो. 17 राष्ट्रात हे उत्पादन निर्यात होते.
-गो. श्री. कुलकर्णी
(गोपाळराव कुलकर्णी वैद्यकीय विज्ञान व डॉक्टर ताठे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. कुलकर्णी ताई व अरविंद भोसले यांचे बहीण भावाचे नाते आजही कायम आहे. माणुसकी व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा हा विजय आहे. आपणही असा अनुभव घेतला असेल तर अवश्य कळवा-संपादक)